बुधवार, ११ जानेवारी, २०२३

153. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या

एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांच्यात वाद सुरु असतो. लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं की, जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळेच(पैशामुळे). ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही त्याला काहीही किंमत नाही. माणूस ओळखतो, जाणतो आणि बोलतो ते फक्त पैशानेच. यावर विष्णू भगवान हसून म्हणतात की, असं काही नाही. पण लक्ष्मी माता कशा ना कशाप्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की पैशाला जास्त महत्व आहे.तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत. म्हणून लक्ष्मी माता म्हणते, बर ठीक आहे. मी सिध्द करुन दाखवते. मग तरी मान्य कराल? विष्णू भगवान हसून म्हणतात, होचालेल.
           त्यावेळी लक्ष्मी माता पृथ्वीवरील एक दृश्य दाखवते. एक शोकमग्न अंतयात्रा चाललेली असते. लक्ष्मीमाता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते. आणि लगेच अंत्ययात्रेतील लोक आपण कोठे जातोय हे विसरुन पैसे गोळा करु लागतात. लक्ष्मी माता भगवान विष्णूकडे पाहात म्हणते, पाहिलंत. पैशासमोर माणूस आपण कोणालातरी कायमचे गमवून बसलोय हे दु: देखील विसरतो. अगं, पण त्या चौघांच काय जे मृतदेहाला खांदा देऊन आहेत? ते तर नाही ना वाकले पैसा उचलायला. विष्णू भगवान म्हणाले. लक्ष्मी माता म्हणाली, ठीक आहे…… हे घ्या. एवढे म्हणून लक्ष्मी मातेने खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर धनाचा वर्षाव सुरु केला. त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि जमेल तितका पैसा गोळा करायला सुरवात केली. यावर लक्ष्मी मातेने आपण जिंकलो या अविर्भावात भगवान विष्णूंना प्रश्न केला, आता तरी पटलं? अजूनही एकजण बाकी आहे. दृश्याकडे पाहत भगवान विष्णू म्हणाले. तो जो तिरडीवर झोपलाय. तो तर नाही उठला पैसे उचलायला? लक्ष्मी माता म्हणाली, तो उठेल तरी कसा? त्याच्या शरीरात आत्माच नाही आहे. त्याचक्षणी भगवान विष्णू म्हणाले, हेच तर सांगायचं आहे मला. जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला(पैसा/संपत्ती) मान आणि किंमत. ज्या क्षणी मी मनुष्य देहातून अंतर्धान पावलो त्याक्षणी मनुष्यासाठी पैसा मातीमोल.
          देवी एक गोष्ट सांगतो. ज्ञान, धन आणि विश्वास. तिघेही खूप चांगले मित्र असतात. तिघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. एक दिवस असा आला की त्यांना वेगळं व्हावं लागल. तिघांनीही एकमेकांना विचारलं कोण कुठे जाणार? ज्ञान म्हणाले की मी मंदीरात जाईन. धन म्हणाले मी श्रीमंत लोकांत, महालात राहीन. पण विश्वास गप्पच होता. ते दोघे म्हणाले तू काहीच बोलत नाहीस? त्यावर विश्वास म्हणाला, माझ्या जाण्याची गोष्टच करु नका. मी गेलो की परत नाही येत. आणि या मृत देहातला तो जगण्यातला जो प्राण म्हणजेच मी म्हणजेच विश्वास. मी एकदा गेलो की पैशाची किंमत ती काय?
        माणसाबद्दल हेच तर आश्चर्य आहे की तो पैशासाठी जीवन पणाला लावतो. मग तोच पैसा त्याचा जीव का नाही वाचवू शकत? आयुष्य जगताना तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि मरताना असा मरतो की कधी जगलाच नाही. यावर नक्की विचार करा आणि पैशापेक्षा लाख मोलाचा असतो आपला जीव आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...