बुधवार, ४ जानेवारी, २०२३

122. मन आणि प्रेम

       कदाचित ही गोष्ट फार जुनी आहे आणि प्रत्येकाने ऐकली असावी. पण ज्या ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी. असेच काही घडले होते परीच्या आयुष्यातही. परी खूप हुशार, खूप बोलणारी, मनमिळावू आणि खूपच सुंदर. तिचे हसणे एवढे मोहक की दु:खही पळून जाणारे. वडीलांच्या निधनानंतर स्वत:ला खूप मोठी समजायला लागली होती. तिच्या चाणक्ष बुध्दीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही. पण समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे पाहताक्षणी ओळखणारी, घरच्या परिस्थितीने गांजलेली पण तरीही आकाशाला झेप घेणारी स्वप्ने पाहणारी अशी ही परी सर्वांनाच हवी हवी असणारी.
     परी कॉलेजमध्ये असताना शांतच असायची. त्यामुळे तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी जास्त ओळखत नव्हते. पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडीलांच्या निधनानंतर ती तिच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोनवर गप्पा मारु लागली होती. कारण फोनवर बोलून ती स्वत:चा विरंगुळा करत होती. असेच एकदा सोशल नेटवर्कींग सायीटवरुन तिची ओळख तिच्याच कॉलेजमधला मित्र नील शी झाली. नील खूप प्रेमळ, खूप समंजस आणि खूप साधा, चांगुलपणाचा तो एक मूर्तीमंत उदाहरण होता. कॉजेमध्ये शांत असणारी परी आता नीलशी तासन्तास गप्पा मारत होती. ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळे, त्या त्या वेळी ते दोघे फोनवर बोलत होते. त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या की, त्यांना वेळेचे आणि भुकेचे भान नसायचे.
     असेच एकदा नीलने परीला मन आणि प्रेमाची गोष्ट सांगितली. नील तिला सांगतो, मन आणि प्रेम हे दोघे जीवलग मित्र असतात. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. एके दिवशी ते दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरवात करतात. लपाछपीच्या  त्यांच्या खेळामध्ये शोधायचा डाव प्रेमावर येतो आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडतो. मन एका काटेरी झुडपामागे लपल्यामुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही. कारण त्याला असे वाटते, मन एवढी नाजूक आहे की ती काटेरी झुडपामागे लपू शकत नाही म्हणून प्रेम प्रत्येक झुडपाला काठीने मारत असतो. प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी त्या काटेरी झुडपामागे येतो. पाहतो तर काय, मन विव्हळत होती. तिचे डोळे रक्ताने माखलेले होते. प्रेम घाबरतो, खूप आरडा-ओरडा करतो. पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत नाही. शेवटी प्रेम मनाला घेऊन डॉक्टरकडे जातो. डोळ्यांत काटे गेल्याने मन आंधळी होते. मनाचे डोळे जातात. म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देतो आणि म्हणून प्रेम आंधळे असते. आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात.
     परीला तशी ही गोष्ट नवीनच होती. तिने पहिल्यांदा ऐकली होती. पण ही गोष्ट ऐकून भावूक परी स्तब्धच झाली होती आणि ह्या गोष्टीनंतर ती नीलच्या प्रेमात केंव्हा पडली हे तिच्या लक्षातच आलं नाही. आता मात्र परीला फक्त नीलशीच बोलावे असे वाटत होते. तसा नील तिचा कॉलेजचा मित्र. पण तरीही त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलंल नव्हतं. कदाचित त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे नीललाही परी आवडायला लागली होती.
     असेच एके दिवशी परी नीलला आपल्या मनीच्या भावना फोनवरच व्यक्त करते. तिला वाटते की नीलही तिच्यावर प्रेम करतोय पण नीलने तिला नकार दिला. पण तरीही नील परीला म्हणाला, मला एकदा तुला मिठीत घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी नीलच्या मित्राची लग्नाची पूजा असते. नील परीलाही आमंत्रित करतो. तसेच नीलला भेटण्यास परी उत्सुक असते. परी नटून-थटून निलच्या मित्राच्या पूजेस जाते. वाटेतच ती नीलला भेटते. खूप खूश होते. त्याला पाहून तिच्या मनात काहूर वाजतो. पण एक विलक्षण भीतीही तिला जाणवत होती. पण नीलला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती. कदाचित नीलचेही हेच झाले होते. परीची सुंदरता आणि मोहकता पाहून तोही त्याच्या मनाला आवरु शकला नाही आणि ते दोघे समुद्रावर फिरायला गेले. पाहताच क्षणी ते दोघांचे एकमेकांचे झाले होते. प्रत्येक प्रेमी युगलाप्रमाणे तेही प्रेमाच्या बाहुपाशात वचनबध्द होतात.
     आज परी खूप खूश होती. तशी नीलची अवस्थाही पाहण्याजोगी नव्हती. म्हणून नील ही खूप खूश होता. शेवटी अति रात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात. दुसऱ्या दिवशी परी नीलच्या फोनची आतुरतेने वाट पहात होती आणि नीलचा फोन येतो. परी खूप उत्सुक होती त्याच्याशी बोलण्यात, कारण आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पण ज्यावेळी नीलचा फोन येतो, त्यावेळी परीच्या पायाखालची जमिनच हादरते. नील परीला म्हणतो, माझे खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर. पण मी तुझ्याशी लग्न नाही करु शकत. त्याचे तो तिला कारणही सांगतो. नीलच्या मोठ्या भावाचे म्हणजेच जितेंद्रचे प्राजक्ता नावाच्या एका मुलीवर प्रेम होते. अगदी लहानापासून होते. ज्यावेळी जितेंद्र त्यांच्या आई-वडीलांना ही गोष्ट सांगतो, तेंव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे त्यांचे लग्न नाही झाले. आणि ह्यामुळे नीलही परीशी लग्न करु शकत नव्हता. तरीही नील आणि परी एकमेकांना भेटत होती. फिरायला जाणे, चित्रपट पाहणे हे त्यांचे नेहमीचेच झाले होते.
     परी आणि नीलचं प्रेम दिवसेंदिवस बहरत होते. आणि एके दिवशी नीलच्या बाबांनी नीलचे लग्न ठरवले. ती मुलगी नीलच्या गावाकडची. नीलनेही त्या मुलगीला होकार दिला. आता मात्र नील परीला टाळू लागला होता. तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता. पण त्याच्या काहीही परीणाम परी वर होत नव्हता. ती रडत असे, भांडत असे, पण पुन्हा त्याला फोन करुन त्याच्याशी बोलत असे. लग्न ठरल्यानंतरही परी आणि नील एकमेकांना भेटत होते. तेच नाते, तेच प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते. जसजशी नीलच्या लग्नाची तारीख जवळ येत होती तसतसे परीचे प्रेम वाढतच चालले होते. परीला आता नीलशीवाय राहणे खूप कठीण होऊन बसले होते आणि एके दिवशी तिला नीलच्या लग्नाची तारीख समजते.  परीला खूप त्रास होत होता. म्हणून ती कसलाही मागे पुढे विचार करता नीलला लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करु लागली. पण त्यामुळे ती नीलच्या आणखीच जवळ गेली. नीलने लग्न मोडावे म्हणून ती नीलला विनंती करु लागली. पण घरच्या परिस्थितीने गांजलेल्या नीलच्या हातात काहीच नव्हते. कारण एका बाजूला त्याचे आई-वडील आणि दुसऱ्या बाजूला त्याची परी. लग्नाचे दिवस जसजसे जवळ येत होते तस तसे परी आजारी पडू लागली. पण तरीही ह्याचा नीलवर काहीही परीणाम होत नव्हता आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला होता. आता मात्र सगळे नील आणि परीच्या हाताबाहेर गेलेले होते. परी खूप रडत होती. काय करावे? तिला सूचत नव्हते. आणि जे होऊ नये तेच घडले. अति रडल्यामुळे आणि अतिविचारामुळे परीचा ब्रेन हॅमरेज झाला होता आणि ती गेली…… पण शेवटच्या क्षणालाही परी निलणे सांगितलेल्या मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती. कारण तिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती. तिच्या मरण्याने निलची आवश्यकता पाहण्यास किंवा तो खूश आहे की दु:खी आहे हे पाहण्यास ती राहिली नाही. तिने नीलच्या, तिच्या घरच्यांना आणि हृया जगाचा कायमचा निरोप घेतला. कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना तिने तिच्या नीलशी केली आणि नीलचे प्रेम परीला खोटे वाटले. पण तरीही परीला शेवटच्या क्षणी सुध्दा मरण नीलच्या बाहुपाशात यावे असे तिला वाटत होते आणि शेवटी ती इच्छाही पूर्ण करण्यास नील अपयशी ठरला होता.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...