शनिवार, १४ जानेवारी, २०२३

165. तो एक दिवस किती महत्वाचा असतो

       आज खूपच गर्दी होती बसस्टॉपवर. खूपच लाईन लागली होती. सर्वजण बसची वाट पहात होते. तेवढ्यात त्याचा थोडा धक्का लागला तिला. ती चिडली आणि रागाने त्याला ओरडली. कारेदिसत नाही का तुला? का डोळे फुटले तुझे? तो सॉरी म्हणाला तिला. पण हिची बडबड काही केल्या थांबेनाच. मग तोही चिडला आणि म्हणाला, इतका कसला माज आहे गं तुला? मगआहेच मुळी गर्व मला. आहेच मी इतकी सुंदर. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर. असं बोलून तिनं तर त्याच्या स्वाभिमानाला हात घातला होता. तो म्हणाला, तुझ्यासारख्या छप्पन पोरी मी म्हटलं तर उभ्या करु शकतो पण माझा तो मूळ स्वभाव नाही म्हणून गप्प आहे. ती म्हणाली, तर तरआला मोठा दीडशहाणा. मी सर्वांपेक्षा वेगळी, मला पटवणं इतकं सोपं नाहीये. तो म्हणाला, असं म्हणतेस, आजपासून मी तुझं आव्हान स्वीकारलं. बरोबर पंधराव्या दिवशी तू मला आय लव यू म्हणशील आणि तेही इथेच. आजपासून बरोबर पंधराव्या दिवशी. हा माझा विश्वास आहे. असं म्हणून तो टॅक्सीने निघून गेला.ती मनातल्या मनात विचार करत होती की मी काही केल्या याला आय लव यू कशी आणि का म्हणेल? छेछेवेडा आहे हा
     कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले. त्याचबरोबर दोघांनीही एकमेकांकडे बघून नाके मुरडली. दोघांचं एकाच वर्गात ॲडमिशन झालं होतं. त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले होते. त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून-राहून वाईट वाटत होतं. म्हणून तिनं ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं. मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याचा शोध घेऊ लागली. पण तो काही दिसला नाही. कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिनं केला. म्हणून तिनं त्याला शोधणं बंद केलं आणि कँटीनच्या दिशेने चालू लागली. कँटीनमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला. मग ती त्याच्या टेबलावर जाऊन बसली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं पण तो शांतपणे कॉफी घेत राहिला. ती म्हणाली, आय एम सॉरी. तो थोडा दचकलाच. पण तिने आणखी एकदा, आय एम सॉरी म्हटलं. तो म्हणाला, कशाबद्दल? ती म्हणाली, बस स्टॉपवर जे झालं त्याबद्दल तो म्हणाला, इट्स ओके यार. मी तुला माफ केलं. कॉफी घेणार? ती म्हणाली, नाही नको. मला खरंच तू माफ केलंस ना? मी थोडं जास्तच बोलले त्यावेळी. इतकं बोलायला नको होतं मी. (हात पुढे करुन) फ्रेंड… (त्याने मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली.)
     तो दिवस बस स्टॉपनंतरचा तिसरा तिसरा दिवस होता. त्यानंतर ते क्लासमध्ये पुन्हा-पुन्हा भेटू लागले. एकाच बेंच्यावर बसू लागले. दिवसेंदिवस त्यांची मैत्री वाढू लागली होती. एकमेकांच्या वह्या अभ्यासासाठी अदलाबदल करणं हे तर त्यांचं घरी येण्याजाण्याचं एक कारणंच बनलं होतं. त्याचा स्वभाव इतका छान होता की तो कोणालाही आवडावा. समोरच्याला समजून घेऊन त्याच्याशी वागणं, त्याला मदत करणं, अडचणीच्यावेळी योग्य तो आधार देणं हा त्याचा स्वभावच होता. दिसायलाही तो बरा होता. त्या दोघांना भेटून एक आठवडाच झाला होता की एकमेकांना ते खूपच आवडू लागले होते. दिवसानंतर दिवस गेले.
     आज त्याच्या भेटीनंतरच्या चौदाव्या दिवसाची रात्र आहे. ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती. ती मनातच म्हणत होती. (कधी कळणार रे तुला माझ्या मनातल्या भावना,  बघ ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणतीये ते ऐकना, माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात.) रात्रभर असेच विचार राहून राहून तिला सतावत होते. मग ती झोपी गेली.
     दुसरा दिवस उजाडला. तिनं ठरवलं होतं की काही केल्या त्याला प्रपोज करायचं. आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे नऊ वाजले होते. घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली. आज सव्वीस तारीख होती. तशीच ती सॅक घेऊन बस स्टॉपकडे निघाली. थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की बसस्टॉपवरच्या पहिल्या भेटीनंतरचा आज बरोबर पंधरावा दिवस होता. तिला धक्काच बसला. कारण त्याने दिलेलं ते आव्हान तिला आठवलं. ज्यानुसार खरंच पंधराव्या दिवशीच ती त्याला आय लव यू म्हणणार होती. बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली. कॉलेजपर्यंत जाईपर्यंत तिने निर्णय घेतला की काही केल्या आज त्याला आय लव यू म्हणायचं नाही. कारण त्यानं माझा अहंकार दुखावला जाऊ शकतो. गाडी कॉलेजच्या बसस्टॉपवर थांबली. तो तिथेच हातात गुलाबाच फुल घेऊन उभा होता. ती गाडीतून उतरली. ती म्हणाली, हे फुल कोणासाठी? आहे कोणासाठीतरी ? ती म्हणाली, मला नाही सांगणार तो म्हणाला, ते एक गुपीत आहे. ते मी तुला उद्या सांगेन. प्लीज, आता पुन्हा विचारु नकोस. ती म्हणते, ठीक आहे, चल. तो म्हणतो, कुठे? ती म्हणते, अरेक्लासमध्ये आणि कुठे? तो म्हणतो, आज मी नाही येणार. आज माझं थोडं काम आहे. तू जा कॉलेजला. ती म्हणते, अरेअसलं कसलं काम, काय बोलतोस तू. चल ना क्लासमध्ये जाऊया. तो म्हणतो, अगं प्लीज, माझ्यावर जबरदस्ती करु नकोस. तू जा ती म्हणते, अरे पण तो म्हणतो, जा म्हटलं ना ती म्हणते, जाते जाते, चिडतो कशाला एवढा. असं म्हणून ती वर्गात गेली. वर्गात तिचं मन लागत नव्हतं. तिला कळून चुकलं होतं की तो ते फुल माझ्यासाठीच घेऊन उभा होता या आशेवर की मी ते फूल माझ्या हाताने हक्काने घेईन त्याच्याकडून आणि त्याला आय लव यू  म्हणेन. तसं करावं असं खूप वाटत होतं तिला. पण राहून-राहून तिचा अहंकार आड येत होता आणि ते दिलेलं आव्हान तिला सारखं आठवत होतं. क्लास सुटला. ती कॉलेजच्या बसस्टॉपकडे वळली. तो तिथेच उभा होता. त्याच्या हातातलं ते फुल सुकलं होतं. पण तो अजून तसाच हसतमुख वाटत होता. तिला वाटलं होतं की तो तिथून गेला असेल पण त्याला स्टॉपवर बघून ती स्तब्ध झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेवढ्यात बस आली. ती गोंधळात होती. तिला काही सुचत नव्हते. बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली. राहून-राहून खिडकीतून ती त्याला तो तिला पाहत होता. घरात पोहोचल्यावर ती खोल विचारात गेली होती. वारंवार त्याचे विचार, त्याच्या चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता. अशातच रात्र झाली. खरंच हा इतकं प्रेम माझ्यावर करतो? का करतो इतकं प्रेम माझ्यावर? अशा काही अनुत्तरीत प्रनांच्या विचारात ती झोपी गेली.
     आज एक नवीन दिवस उजाडला. ती आज लवकरच उठली होती. कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट पहात होती. सकाळची अंघोळ आवरुन ती आरशासमोर आली. आरशात बघून स्वत:शीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तू माझ्यावर, खूपच त्रास दिला ना मी तुला. प्लीज माफ कर मला. मनातल्या मनात ती थोडी खूश होती. कारण तो आव्हान हरला होता. किती गर्वाने बोलला होता तो मला असा विचार करत होती. तीने आज ठरवलं की आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार. तो मला किती आवडतो सगळं-सगळं मी त्याला सांगेन. ती खूपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पहात होती. ती लगबगीने कॉलेजकडे निघाली. आज आनंदाने एक वेगळीच स्फूर्ती तिच्यात आली होती. एक वेगळंच हसू तिच्या ओठाची शोभा वाढवत होतं. बसस्टॉपवर येण्याची खूपच अधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फूल घेतलं होतं. तिने आय लव यू म्हणायची प्रॅक्टीसही केली होती. जसजसा बसस्टॉप जवळ येऊ लागला होता तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. मघाची अधीरता आता भितीमध्ये रुपांतरीत झाली होती. कॉलेजचा बसस्टॉप आला, ती बसमधून उतरली. तशीच तिथे जाऊन गुलाबाचं फुल घेऊन उभ राहिली जिथे काल तो उभा होता. एका अनामिक भितीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली. थोड्या वेळाने तोही आला. आज त्याची सॅक थोडी जास्तच जड दिसत होती. (त्यानं तिच्या हातातलं गुलाबाचं फूल पाहिलं नव्हतं.) आणि म्हणाला, मला माफ कर. मी आव्हान हरलो. तुला पंधरा दिवसाच्या आत मिळविण्याचं. (ती मनातल्या मनात हसत होती.) पहिल्यांदा एक आव्हान म्हणून घेतलं होतं मी याला पण नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करुन बसलो. मग ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं आणि मला वाटलं की मी या पंधरा दिवसांत पूर्णपणे ओळखलंय तुला. मला तुझ्या डोळ्यांत माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तूही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं. आणि म्हणून मी काल ते फूल घेऊन तुझ्यासाठीच उभा होतो. ना की माझं आव्हान पूर्ण करण्यासाठी. तू येशील आणि हक्काने ते फूल माझ्याकडून मागून घेशील. तू आलीस, फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्याच सांगण्याने गेलीस मला वाटलं होतं की तू माझ्या मनातलं ओळखशील. आव्हानाबद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं. मी आज पुण्याला जातोय. तिथंच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय. तुला शेवटचं भेटून जावं असं मला वाटलं म्हणून मी तुला भेटायला आलोय. मी निघतोअरे थांब वेड्या. मलाही तुला काही सांगायचं आहे. तू मला कॉलेजच्या दुसऱ्या दिवसापासूनच आवडायला लागला होतास. पण मी तुला सांगू शकले नव्हते. ज्या दिवशी खरंच सांगावंस वाटलं त्या दिवशी माझा अहंकार आडवा आला. हे फूल मी तुझ्यासाठीच आणलंय. तिने हात पुढे करुन त्याला आय लव यू म्हण्टलं. तो ते फुल हात पुढे करुन स्वीकारणार तेवढ्यात एक मोठी वाऱ्याची झुळूक आली अन् ती भानावर आली. मी त्या स्टॉपच्या शेजारी मेडीकल स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा आहे. मी रामचंद्र काकांना (मेडीकल स्टोअरचे मालक) विचारलं होतं की, काका मी इथे कामाला लागल्यापासून बघतोय की, ती मुलगी दररोज त्या बसस्टॉपवर  एक गुलाबाचं फुल घेऊन बरोबर दहा ते पाच या वेळेत का उभी असते? या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत होते. इथपर्यंत तिची प्रेमकहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेमकहाणीबद्दल असणारी रुची खूपच वाढू लागली होती. एकदा मी त्या मुलीकडे एका नजरेने पाहिलं आणि रामचंद्रकाकांना उत्सुकतेपोटी विचारलं मग त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का? सांगा ना, सांगा ना काका. मी खूपच अधीर झालो होतो. अरे थांब सांगतो. काका सांगू लागले.
     तोही ते फुल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढ्यात एक अकल्पित घडलं. क्षणार्धात तो तिच्यापासून लांब जाऊन पडला होता. कारण एका भरगाव येणाऱ्या चारचाकी गाडीने त्याला उडवलं होतं. ती हात पुढे करुन तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातला एक अश्रू पावसाचं थेंब जसं आळवाच्या पानावर घरंगळतो तसा तिच्या गालावर घरंगळत होता. क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता. त्याला मरुन पाच वर्षे झालीत पण तेंव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत दहा ते पाच इथे उभी असते. फक्त याच आशेवर की तो येईल आणि ती हे फूल त्याला देऊन आय लव यू म्हणेल आणि तो तिला घेऊन जाईल. त्या मुलीची कहाणी ऐकून माझी आसवं दाटली होती. मनात खूपच प्रश्न उभे होते की, खरंच एवढं प्रेम कोणी करु शकतं का? मी अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघत रामचंद्र काकांना विचारलं, हे सर्व तुम्हाला कसं माहित? तेवढ्या माझं लक्ष गेलं की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपऱ्याला येऊन थडकला. त्यामुळे तिच्या हातातलं फूल रस्त्यावर जाऊन पडलं होतं. ते फूल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या ट्रकने उडवलं. ते मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पहात होतो. रामचंद्र काकांनी ते पाहताच दुकानच्या काऊंटरवरुन उडी मारुन ते तिच्याकडे धावले. मी ही त्याच दिशेन धावत गेलो. ते त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेले मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले. मी काही वेळ स्तब्ध झालो होतो. ते म्हणत होते, मुली, तुझ्या या अभागी बापाला माफ कर. तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही. पण, तूही कुठे माझं ऐकत होतीस. तुही फक्त तुझ्याच मनाचं करत होतीस. कसला वेडेपणा केलास गं तू. त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली होती. तेच त्या मुलीचे अभागी बाप होते. जर त्या मुलीने त्या दिवशी, फक्त त्या दिवशी आपला अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पहाणाऱ्या आपल्या प्रियकराला आय लव यू हे तीन शब्द म्हटले असते तर कदाचित तो मेला नसता. कदाचित तिला त्याच्यासाठी पाच वर्षे अश्रू ढाळत त्या स्टॉपवर वाट पहावी लागली नसती. कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता. आणि कदाचित त्या तिच्या बापाने तिला गमावलं नसतं. म्हणूनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो.
     असां एक दिवस प्रत्येक प्रेमीविरांच्या आयुष्यात येतो. त्याला हातचं जाऊ देऊ नका. कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...