गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

128. नात्याला गालबोट लागू नये म्हणून आता झटायचं आहे.

         दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेजमध्ये होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची. ती दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुशार. तो अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा. सतत बरोबर असायचे दोघे. अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाईमपास काहीही असो. ती कधीही त्याला बोलवायचे विसरत नव्हती. तो तिला सोडून कुठे जायचा नाही. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची. आणि त्याला तिला सोडून कुठे एकटे जाणे शक्यच नव्हते. अरे आज मला विद्यापीठात थोडे काम आहे. येतोस का बरोबर? असा नुसता तिचा फोन आला. आणि तो जेवण अर्धवट सोडून तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोहचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, अरे निदान जेवण तरी संपव. पण त्याला कुठे भान होतं. बाईकवर ती नेहमी त्याच्यामागे बसायची आणि हो तो ही कुठल्या दुसऱ्या मैत्रिणीलाही मागे बसू द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोके ठेवायची. तिचे केस वाऱ्यांनी उडायचे. हलकेच त्याच्या गालावर बसून त्याला गुदगुली व्हायची. लहानपणापासून दोघं एकत्र असल्यानं दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. तिचं एक स्वप्न होतं. तिला विद्यापीठाचं सुवर्ण पदक हवं होतं. त्या करीत ती मेहनतही तशी घेत होती. तासन्तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसून रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं मन एकाग्र रहावं म्हणून रात्री तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणून तिच्या करीता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा. परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फस्ट्र क्लास मिळाला. त्याचा करिता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला सुवर्ण पदक मिळालं होतं. त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला. हातात एक गुलाबाच फुल होतं तिच्या. तो  प्रचंड खूश होता. फर्स्ट क्लास करता नाही तर तिला सुवर्ण पदक मिळालं म्हणून. ती त्याला म्हणाली, आज मी खूप खुश आहे. एक गंमत झाली. तुला विनय आठवतोय? दादाचा उत्कृष्ट मित्रअमेरिकेला असतो गेली दोन वर्षे. परवाच आला होता तो पंधरा दिवसांकरिता. आज त्याला कळलं माझ्या निकालाबद्दल. म्हणून हे गुलाब घेऊन आला माझे अभिनंदन करायला आणि त्याने मला चक्क प्रपोज केलं !!! म्हणजे पूर्वी तो असताना माझी भेट व्हायची त्याच्याबरोबर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणून. मला म्हणाला की अमेरिकेला पुढचं शिक्षण घेता येईल. आई-बाबांनासुध्दा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगितलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना. म्हटलं तुला येऊन आधी सांगते. तुला पण कोणी आवडत असेल तर, तू मलाच पहिलं सांगशील ना? तो गप्प राहिलानेहमीसारखानुसतंच हं केलं. तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी. ती त्या गुलाबाकडे बघत होती.
            हृदयाला तलवारीच्या घावाने चिर पडावी अशी त्याची अवस्था झाली. थोडा वेळ त्याला काही सुचले नाही. मग तो बाईकवरुन घरी परत येत होता. येता येता त्याच्या मनात विचार आले की, तिनं बोलतं केलं. आमचं प्रेम आधी मॅसेज नंतर कॉल, मग मैत्री आणि खूप जवळची व्यक्ती असं टप्प्याटप्प्यानं फुलत गेलं. माझं प्रेम मोबाईलवरच बहरलं. ती आणि मी कधी एकत्र आलो, कधी जवळ आलो हे कळलंच नाही. मला अशी व्यक्ती मिळाली जिचा मला आधार वाटतो. मन मोकळं करण्यासाठी जवळची मैत्रीण मिळाली आहे. तिला मी माझी स्वप्ने सांगू शकतो. तिचं मन मी समजू शकतो. नातं कसं टिकवायचं हे तिनंच शिकवलं. तिनं मला बोलायचं कसं ते शिकवलं. तिच्यापेक्षा मोठा असलो तरी कधी कधी तिच मोठी असते. माणसांना जोडायचं कसे, नवे मित्र बनवायचे कसे सारं तिच्या बोलण्यातून मी शिकलो. आमच्या नात्याला गालबोट लागू नये म्हणून आता झटायचं आहे. एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची आहे एवढं नक्की…!
           दुराव्यात कसलं प्रेम?  प्रेम या दोन अक्षरी शब्दात खूप काही दडलेलं आहे. प्रेम हे आपल्या प्रत्येक नात्यात असतं. फक्त त्याचा पोत, त्याची व्यक्त करण्याची पध्दत वेगवेगळी असते. त्याग, सर्वस्व अर्पण करणे म्हणजे प्रेम नव्हे तर एकमेकांबरोबर असणं, समजून घेत सहवास वाढवणं, सहवासांचे असंख्य क्षण परस्परांना देता येणं म्हणजेच प्रेम.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...