शनिवार, १४ जानेवारी, २०२३

164. तुमच्याकडे आयुष्य तर शिल्लक असायला पाहिजे ना?

         मुंबईत वावरलेली निशिता एक चांगली लेखिका होती. तिला एक कादंबरी लिहायची होती. पण विषय मिळत नव्हता. कदाचित तो विषय तिला तिच्या गावात मिळू शकतो या आशेने ती जंगमवाडीला येत होती. तिचे वडील जंगमवाडीचे देशमुख होते. घोडागाडीची चाके हळूहळू गावाकडे सरकत होती तसतसे गावचे वेगळेपण तिला जाणवत होते. वीस वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर ती गावी येत होती. अचनाक एक वेडा कुठूनतरी आला आणि तिच्या हातात असलेली एक प्रसिध्द कादंबरी हिसकावून घेऊन गेला. टांगा थांबवून ती त्या वेड्याचा शोध घेऊ लागली. पण फाटलेले कपडे, वाढलेले केस, दिसायला बळकट असणारा असा तो वेडा कुठे गायब झाला ते कळालंच नाही. अचानक तिला कोणीतरी हाक मारली. त्या दिशेने पाहिलं तर एक बाई तिला हाक देत होती. ती बाई तिच्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही निशिता ताई ना? हो मी रंजना. देशमुख साहेबांच्या इथे काम करते. तुम्हाला घ्यायला साहेबांना मला धाडलंय. कुठे आहेत तुमच्या बॅगा, सामान? टांग्यामध्ये आहेत. रंजनाने निशिताचं राहण्याचं सगळं सामान घेतलं आणि तिला देशमुख वाड्यावर घेऊन गेली. वडीलांसोबतच्या थोडा वेळ गप्पा झाल्यावर निशिताने आपला इथे येण्याचा हेतू सांगितला. वडीलांनी तिच्या हेतूला सहमती दर्शविली आणि रंजनाला तिच्यासोबत रहायला सांगितले. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रंजना निशिताला घेऊन बाहेर पडली. गावाजवळून वाहणारी नदी, सुंदर रान, झाडे बघून निशिता मोहून गेली. पण अचानक एक जागी येऊन ती थांबली. कारण एका झाडावर बदाम कोरलं होतं. ज्यामध्ये दिपक आणि विणा अशी नावे कोरली होती. निशिताने रंजनाला या गोष्टीबद्दल विचारले. ती म्हणाली, यामागे एक प्रेमकथा आहे. निशिता म्हणाली, मग सांगा ना. रंजनाने सांगायला सुरवात केली.
     एक चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळी विणा आणि दीपक एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. ते दोघे या गावातले. रोज संध्याकाळी ज्यावेळी सूर्य बुडत्याला असायचा त्यावेळी ते इथे एकमेकांना भेटायला यायचे. दिवसभर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ते एकमेकांना सांगायचे. एक दुसऱ्याचं दु: वाटून घ्यायचे आणि सुखही. विणा आणि दिपक यांना आपलं आयुष्य हळूहळू एकमेकांशिवाय अधुरं वाटू लागलं होतं. हळूहळू त्या प्रेमाची चर्चा गावागावांत रंगू लागली. विणाच्या बापापर्यंत बातमी पोहोचली. त्यानं तिचं बाहेर येणं-जाणं बंद केलं. गाठीभेटी बंद झाल्या. एकमेकांसोबत ते आठवणींतच बोलू लागले आणि त्यात भर म्हणजे दिपकचं बारावीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं. त्याच्याजवळ एक दिवस होता. त्याने विणाला एका छोट्या मुलीकडून निरोप धाडला. विणा त्या सायंकाळी बाबाची नजर चुकवत कशीबशी आली होती. त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. दोघांनीही एकमेकांना लग्नाचं वचन दिलं आणि एक आठवण म्हणून त्यांनी ह्या झाडावर बदाम कोरलं आणि ज्यात आपली नावे लिहली. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी विरह स्वीकारला.
     इतकीशी कथा ऐकून निशिताचा उत्साह वाढत होता. ती म्हणाली, मग पुढे काय झालं? पुढे मग एक दिवस दिपक शहरी निघून गेला. तिकडून तो विणाला वेळोवेळी पत्रे पाठवू लागला आणि विणादेखील पत्रे पाठवायची. एक-दोन वर्षानंतर विणाची पत्रे यायची बंद झाली. दिपकच्या पत्राला उत्तर येत नव्हतं. विणाचं पत्र येऊन तीन महिन्यांच्यावर वेळ झाला होता. दिपकचा जीव कासावीस झाला होता. तो तातडीने गावी निघून आला. आलाआल्या तो विणाच्या घरीच निघून गेला. पण तिथे गेल्यावर त्याला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याला कळलं की विणाचं लग्न झालं आहे आणि तिला दूर कोणत्यातरी गावी दिलं आहे. त्याला हे कळताच तो स्वत:ला सावरु शकत नव्हता. त्याच्या मनात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती. पण त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला विणा येथे नव्हती. तो गावातल्या आपल्या पूर्वीच्या घरी गेला. पुढची कथा रंजना निशिताला ऐकवणार तेवढ्यात वाड्यावरचा नोकर देशमुख साहेबांचा निरोप घेऊन आला. संध्याकाळ झाली आहे. ताईसाहेब, काकासाहेबांनी सांज व्हायच्या आत दोघींना वाड्यावर बोलवलं आहे असं सांगून तो नोकर निघून गेला. रंजना म्हणाली, चला ताईसाहेब, काकासाहेबांनी बोलवलंय, आता जावं लागेल आपल्याला. अगं, पण पुढची कथा? ती मी उद्या सांगेन तुम्हाला. नाहीतर काकासाहेब रागवतील. ठीक आहेचल मग रात्रीच्या जेवणानंतर तिला झोपच येत नव्हती. तिला कथेच्या पुढच्या भागाची उत्सुकता झोपू देत नव्हती. रात्री उशीरा तिला झोप लागली.
     रात्रीच्या उशीरा जागणानंतरही निशिता लवकर उठली होती. दिपक आणि विणाच्या प्रेमकथेविषयी तिची उत्सुकता शिगेला पोहचली हेाती. फ्रेश होऊन ती रंजनाची वाट पहात होती. थोड्या वेळाने रंजना वाड्यावर आली. रंजनाला पाहून निशिताला आनंद झाला. ती लगेच तिथे गेऊन गेली जिथे काल त्या दोघी गेल्या होत्या. रंजनाला पुढची कथा ऐकवण्यासाठी विनंती करु लागली. अहो, थांबा ताईसाहेबसांगतेसांगते. तर काल मी कुठे होते? हंआठवलंविणाच्या लग्नाच्या बातमीनंतर दिपक स्वत:ला सावरु शकत नव्हता. तो कासावीस व्हायचा. त्याच्या मनात विणाला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची आणि त्यामुळे तो तिचा गावोगावी शोध घेऊ लागला. पण ती त्याला सापडत नव्हती. तिच्या आठवणीत तिची जुनीच पत्रे वाचायचा. एक दिवस तिचा त्याला शोध लागला. तो लगबगीने त्या पत्यावर गेला. पण समोरचा प्रसंग बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचं आभाळ फाटलं. त्याच्यासमोर विणाचं प्रेत स्मशानात नेत होते. ते बघून त्याच्या डोळ्यातले अश्रू हृदयात कैद झाले आणि तो वेडा झाला. तेंव्हापासून आजपर्यंत तो वेडाच आहे.
     विणाची आणि दिपकची ही कहाणी ऐकून निशिताने भरल्या डोळ्यांनी रंजनाला प्रश्न विचारला, पण विणाचा मृत्यू कशामुळे झाला? आणि दीपक आता कुठे आहे? विणाला दिपकच्या प्रेमाचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली. हा योगायोग इतकाच की दिपकने विणाला शेवटच्या दिवशीच पाहिलं. त्याच्या वेडेपणानंतर काकासाहेब(देशमुख) यांनी त्याला गावांत आणालं. त्यानंतर तो या गावातंच फिरत असतो. तू मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतेस का?   निशितानं विचारलं. हो चला, आपण तिकडे जाऊ.
     त्या दोघी दिपकच्या घरी गेल्या. घराचे दार उघडेच होते. त्या दोघी आत गेल्या. घरातलं सामान अस्तावस्त पडलं होतं. निशिता एकेक गोष्ट  व्यवस्थित  पडताळत होती. तिला विणाची तरी पत्रे मिळाली जी दिपकने जपून ठेवली होती. एक गोष्ट पाहून तिला समजलं की दिपक हा तोच वेडा होता, ज्याने माझ्या हातातून कादंबरी घेतली होती. कारण ती कादंबरी सुध्दा निशिताला तेथेच मिळाली. नंतर त्या दोघी वाड्यावर गेल्या.
     निशिताला तिच्या कादंबरी लेखनासाठी एक जबरदस्त विषय मिळाला होता. गावांतच राहून एुढच्या सहा महिन्यांत दिपक आणि वीणाच्या  प्रेमावर इंग्रजीमध्ये कादंबरी लिहली. वितरकांशी बोलणी झाली. कादंबरी छापली गेली. विणा-दीपकच्या प्रेमकहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या. पुढच्या चार महिन्यांत ही गोष्ट उत्कृष्ठतेच्या रांगेत जाऊन बसली. विणा आणि दिपकच्या प्रेमकहाणीला जागतिक स्तरावर नेण्याचा निशिताचा हेतू साध्य होतं होता. पण अजून एक गोष्ट बाकी होती आणि ती म्हणजे बुकर पुस्तकावर या कादंबरीचं नाव कोरणं आणि शेवटच्या काही कादंबऱ्यामधून याच कादंबऱीने हा पुरस्कार पटकवला. संपूर्ण देशात या कांदबरीचा उधो अधो होत होता. पण निशिताच्या डोळ्यात अश्रू होते. कारण त्यावेळी तिला विणानं दिपकला लिहलेलं शेवटचं पत्र हाती लागलं होतं. ज्यामध्ये विणानं म्हण्टलं होतं, तुझ्याशिवया जगण्यासाठी माझ्याकडे आयुष्यच नाहीये. वडीलांच्या हट्टापुढे नाईलाजाने जोडलेले हे नातं मला डोईजड होत होतं मला.मला माहित आहे की आपण सोबत जगण्यामरणाच्या शपथा खाल्ल्या होत्या. पण तुझी साथच नसेल तर अशा जगण्याचा अर्थ तरी काय? पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मृत्यूनंतरही तू जगायचं भरपूर जगायचं. मी जगेन अथवा मरेन पण मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही फक्त तुझ्यावर प्रेम करेन.
     या कथेतून योग्य तो बोध घ्या. जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वांत सुखाचा दिवस देखील असू शकतो. पण ते सुख भोगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यतर नक्कीच शिल्लक असलं पहिजे ना? म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...