सोमवार, ९ जानेवारी, २०२३

142. काहीजण स्वर्ग स्वत:च्या हातांनी घडवतात

          ती त्याला रेल्वेस्टेशनवर भेटली. आपल्या मैत्रिणीला रेल्वे स्टेशनला सोडायला आली होती. तिला बघताच हा तिच्या चेहऱ्यात अशाप्रकारे हरवून गेला की जसा भोवरा फुलाचा सुगंधात हरवून जातो. एक वेगळाच मोह होता तिच्या चेहऱ्यात. ती जाऊ लागली. तो तिच्या मागे-मागे जाऊ लागला. पण अचानक ती गर्दीत कुठे गायब झाली ते कळलंच नाही त्याला. त्याने शोधायचा खूप प्रयत्न केला पण ती काही सापडली नाही. थोड्या वेळानंतर त्याच्या लक्षात आलं की आपणाला ज्या ट्रेनमध्ये बसायचं आहे तिची वेळ जवळ जवळ होत आली होती. गडबडीने तो प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावला. पण ट्रेन निघून गेली होती. मुलगीही गेली आणि ट्रेनही
       काही दिवस तो तिला विसरुच शकला नाही. तिच्या आठवणीत काही दिवस तसेच गेले. तो तिला जवळजवळ विसरलाच होता की ती पुन्हा दिसली त्याला मंदीरात जाताना. चालू एस.टी. तून त्याने उडी मारली आणि कधी मंदीरात जायचे माहिती नसणाऱ्या ह्याने पहिल्यांदा मंदीरात पाय ठेवले. तिथलं वातावरण खूपच मोहक होतं. ती देवाला नमस्कार करत होती. हा ही तिच्या शेजारीच उभा राहून प्रार्थना करण्याचा आव आणत होता. तिच्याकडे चोरुन पाहत उभा होता. तिचे ते मोहक रुप पाहून त्यानेही डोळे मिटून देवाला प्रार्थना केली की  माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून मला हीच मुलगी मिळो. त्याने जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा पुन्हा एकदा ती मुलगी निघून गेली होती. तो पुन्हा एकदा तिला शोधतच राहिला.
          काही दिवसानंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. दोन तीन वर्षे मग अशीच निघून गेली. तो तिला थोडाफार विसरलाच होता. पण कुठेतरी याच्या मनातल्या भावना तिच्याप्रती तशाच होत्या. याच्या आई-वडीलांनी याच्यासाठी मुली पाहण्यास सुरवात केली. पण काही केल्या यात कुठली मुलगी पसंत पडत नव्हती. त्यामुळे याच्या आई-वडीलांनी याला वधू-वर सूचक मेळाव्यात पाठवलं. मनात नसतानाही आई-वडीलांच्या आग्रहाखातर तो मेळाव्यात गेला. खूपच गर्दी होती तिथे. प्रत्येकजण एकमेकांशी ओळख करुन ओळख वाढवण्याचा प्रयत् करत होते. हा मात्र तिथे एकाच जागी शांत उभा होता. लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा येथून बाहेर पडतोय असं झालं होतं त्याला. तेवढ्यात कोणीतरी मागून हाक मारली. त्याने मागे वळून पाहिलं तर तीच मुलगी तिथे उभी होती जिचा चेहरा हा मनात ठेवून जगत होता. कोणीतरी शांत परिसरात शंखानाद केल्यावर जसा आवाज व्हावा तसा आवाज तिला पाहिल्यावर याच्या हृदयात तारा हेलावून होत होता. ती म्हणाली, माझं नाव साक्षी. मी मूळची साताऱ्याची. पण मुंबईला जॉब करते. इथे माझे काका-काकू असतात. मी पदवीधर आहे. तर अशी आहे मी. तुमच्याविषयी काही सांगा ना. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. डोळे झाकून पाहिलेलं स्वप्न डोळे उघडताच समोर दिसावं अशी केविलवाणी अवस्था त्याच्या मनाची झाली होती. पण किती दिवसांनी तो उत्स्फूर्तपणे बोलू लागला. ओळख वाढविली आणि शेवटी त्या दोघांनी एकमेकांना पसंत केले आणि ही गोड बातमी दोघांच्याही आई-वडीलांनाही कळविली. बोलणी झाली आणि लग्नही अगदी थाटामाटात झालं. भेटी नशिबात नव्हत्या पण साथ मात्र नशीबात होती.
     काहीजण असतात ज्यांच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. पण काहीजण असे असतात त्यांच्या गाठी तर स्वर्गात बांधलेल्या असतात पण तो स्वर्ग त्यांनी त्यांच्या स्वत:च्या हातांनी घडविलेला असतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...