शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

132. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते

         पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी त्या वेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायचा. शाळा सकाळची सात ते बारा वाजेपर्यंत आणि क्लास तीन ते पाच वाजेपर्यंत. क्लासमध्ये माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासूनच तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टीचा राजा म्हणूया. आमच्या क्लासमध्ये आमच्या शाळेशिवाय इतर मुले-मुली पण असायचे. राजा पण दुसऱ्या शाळेतला होता. आम्ही क्लासमध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळ्या स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साईडचा भांग पाडला की दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होती. त्यावेळेला सुध्दा आम्हाला वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला एखादे चुकून चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पहिल्या दिवशी क्लासमध्ये आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावरपण आम्ही खूप धमाल करायचो. त्यावेळेला त्याच्याकडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणाऱ्या मुला-मुलींकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो. अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.
          आमच्या क्लासमध्ये एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजूक अंगाने नाजूक शिडशिडीत बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हीच ह्या कथेची राणी. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. दोघे रहायलापण बाजूबाजूच्या सोसायटीमध्ये होते. राजाच्या बिल्डींगच्या बाजूने पोलिस वाहतूक चालू होती. तिचे वडील पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्टवर होते. त्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी बिल्डिंगमध्ये रहायला मिळाले होते. राजामुळे माझी आणि तिची ओळख झाली.  मी , राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुपमध्ये घेतलेच नाही. क्लास सुरु व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कट्टयावर गप्पा मारत बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती ती म्हणजे राजाचे राणीकडे बघणे आणि राणीने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आतासारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मॅसेज पोहचवायला एक तर मित्र-मैत्रिणी नाहीतर ग्रंथालयातील पुस्तके. मोबाईल काय असतो हे तर दूरदूरपर्यंत माहीत नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनएल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळीची भिस्त त्या नंबरवर असायची. फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, वगैरे गोष्टी अजून साता समुद्रापारच होत्या. त्यामुळे एखाद्या मुलीबरोबर मैत्री करायची असेल तर धाडस केल्याशिवाय पर्याय नसायचा. अन्यथा मुलगी धाडस करुन रक्षाबंधनला राखी बांधायला यायची.
        तर अशा जमान्यात राजा आणि राणीच्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे, डोळ्यांच्या खाणा-खुणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर राणीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लासमध्ये आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाहीत तर चलबिचल होणे, कधी राजा उशीरा आला की राणीचे क्लासच्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे. मग राजा आत येऊन जागेवर  बसेपर्यंत राणी  त्याच्याकडे एकटक पहात राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणीकडे पहायचा. मग राणी खुणानेच विचारायची, का रे? एवढा का उशीर झाल? राजा मग मान हलवून डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करुन सांगायचा, काही नाही गंअसंच. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हांला समजून येऊ लागले होते. पण कोणीच काही बोलले नव्हते. आम्हां सगळ्यांनाच त्यांची जोडी आवडत होती. पण जोपर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तोपर्यंत आम्हांला पुढाकारही घेता येत नव्हता.
         तरी आम्ही सपोर्ट करायला कधीच सुरवात केली होती. ग्रुपमध्ये बसलो असताना आम्ही खास करुन दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेंव्हा राजाच्या होणाऱ्या ओझरत्या स्पर्शाने राणीची कळी खुलायची आणि तिचे गोरे गोरे गाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघून राजाची स्वारी एकदम खूश होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळेजण राणीच्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणीला सोडत सर्वात शेवटी राणीचे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डींग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रिणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणेकरुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणेकरुन इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकांकडे बघणे, गप्पा मारता ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हांला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डींगच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.
         आमच्या नजरेसमोर त्यांच्या प्रेमाचा वृक्ष बहरु लागला होता. पण दोघांनीही एकमेकांना अजून मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनास आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणीला तिच्या बिल्डींगजवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेंव्हा राजाने न राहवून मला विचारले, अरे यार ! आजकाल मला कसेतरी होते आहे. राणीला घरी सोडले की जीव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोट्स घेऊन झोपतो. तेंव्हा कठे झोप येते. काय होते तेच समजत नाही. तिला पण असेच होत असेल का रे? मी म्हटले, मित्रा तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्या विचारुया. आता घरी जा. दुसऱ्या दिवशी तो लवकर आला पण त्याला तिला विचारायचा धीरच झाला नाही. मी म्हटले, राहू दे. जसे चालले आहे तसे चालू दे. दोन-तीन महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबूली दिली नाही. सर्व नेहमी सारखे चालले होते. पण बैचेनी वाढत होती. शेवटी राजाने धाडस करायचे ठरवले आणि मागणी घालायची ठरवले. खूप विचारांती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्कीलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहले. दोन दिवस ती चिठ्ठी घेऊन तो तसाच फिरत होता. धाडसच होत नव्हते.
        चौथ्या दिवशी तो क्लासमध्ये लवकरच आला. थोडा टेन्शनमध्ये दिसत होता. मला वाटले की प्रपोज करायचे आहे म्हणून टेन्शनमध्ये आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार ! ती आज शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींगखाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरीमध्ये दिसली. पण तिने बघूनसुध्दा न बघितल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झालं नव्हतं रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोज करणार आहे ते? म्हणून रागावली असेल का?
मी म्हणालो, रीलॅक्स... शांत हो. टेन्शन घेऊ नकोस, ती आता क्लासला येते का ते बघूया मग काय ते समजेल. आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एक नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहऱ्यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जागेवर जाऊन बसली होती. आम्ही पण जाऊन बसलो. कधी एकदा क्लास संपतोय आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसाबसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसून राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाऊन बसलो. तिच्या मैत्रिणी पण लांब जाऊन बसल्या. राजा उठला आणि तिच्याजवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मूठ उघडली तर तिच्या हातात अगोदर एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्यासाठी आहे. राजाने आपली चिठ्ठी तिच्या हातात दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली आणि भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली आणि माझ्याकडे बघून तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो पण खूश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांनापण एकाच दिवशी प्रपोज करावासा वाटला.
         दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खूप खुश होतो. पण राणीच्या मनात काहीतरी वेगळे होते. तिने चिठ्ठी वाचली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. डोळ्यात अश्रू आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी हातात घेऊन ती राजाकडे दोन मिनिट बघत राहिली आणि मटकन खाली बसली. व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही. आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्कीलीने तिने हुंदका आवरला आणि राजाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मी ही चिठ्ठी तुला दोन दिवसांपूर्वीच लिहली होती. पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तू खूप आवडतोस रे !  पण ...... आणि ती थोडावेळ बोलायची थांबली. हमसून रडायला लागली. ती पंधरा सेकंद आमच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. ती म्हणाली, माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापूरला जायचे आहे. तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमिनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाईपण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काही चर्चा करण्यात अर्थ नव्हता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लासमधून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींगखाली पोहचलो. दोघेही काही न बोलता एकमेकांकडे तसेच बघत राहिले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, उद्या किती वाजता निघणार आहेस? ती म्हणाली, सकाळी सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघून जाऊ. तसंच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
      राजा सायकलवर सोडायला आला. बिल्डींगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. दुसरे काय करु शकणार होतो? त्याच्या जागी जर मी असतो तर मीही काही वेगळे केले नसते. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही. अरे पण ती वाट बघत राहिली तर? तो म्हणाला, नाही बघणार... आणि वाट बघितली तर ती समजून जाईल. असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.
         पुढचे चार-पाच दिवस क्लासला आलाच नाही. मित्रांना विचारले तर ते म्हणाले राजा शाळेतपण आला नव्हता. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन बघूया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतपणे चादर घेऊन गादीवर पडला होता. आईने सांगितले, अरे दोन दिवसांपासून तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेले तर म्हणाले काही झाले नाही. पण दिवसभर झोपूनच आहे. मी त्याच्या बेडजवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून. मी विचारले, काय झाले? राजा म्हणाला, काही नाही रे! तुला माहितच आहे ना... मी म्हणालो, तू गेला होतास का सकाळी तिला निरोप द्यायला.
        त्यावर तो म्हणाला, हो... गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागून बघत होतो. ती खूप शोधत होती रे मला. सारखी माझ्या बिल्डींगकडे बघत होती. तिला वाटले की मी येईन. मला समोर जायचे धाडसच झाले नाही. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेंव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होतं. तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणि हात उंचावून टाटा केला. तिने पण केला. डोळ्यांत पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू शकलो नाही रे. आता ती कधीच भेटणार नाही याचे दु:ख वाटतेय. मन नुसतं तुटलंय. छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणून रागवली असेल ना रे?
        सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यांत पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजूला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, उद्या शाळेत जा. क्लासला यायला सुरवात कर. जरा बरे वाटेल. राजा मग पुढे एकच आठवडा क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघून ढसाढसा रडायचा. तिची खूप आठवण यायची म्हणून त्याने क्लासच सोडून दिला मला कधी कधी भेटायचा. चेहऱ्यावरचे तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडीलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटून गेला. म्हणाला, पुण्यापासून कोल्हापूर जवळ आहे. कधी तरी जाऊन येईन. बघू, नशिबात असेल तर भेट होईल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...