शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

176. प्रेमाची चेष्टा

      आज मी खूप खूश होतो. त्याला कारणही तसंच होतं. जे स्वप्न मी उराशी घेऊन जगत होतो ते स्वप्ना आजापासून आकाराला येणार होतं. मस्त कॉलेज कॅम्पस, लेक्चर चुकवून सिनेमा बघणे, झकास मित्रमैत्रिणींचा ग्रुप, सिगारेट चायने सजलेली गप्पांची मैफिल, एखादं प्रेमप्रकरण... सारं कसं सालं मनातच राहिलं होतं. आता कुठे ते अनुभवता-जगात येणार होतं.
     सकाळी जरा लवकरच उठलो अगदी सहालाच आंघोळ वगैरे आटोपून निघालोच - आपल्याच धुंदीत. आपल्याच मस्तीत. नव्या कोऱ्या सॅकचा गंध अजूनही हवेत तसाच विरत होता. नवाकोरा ब्रँडेड शर्टख्‍ मस्त निळी पँट आणि कानात नवीन हेडफोन्स, अगदी कशाचीच कमतरात पडू दिली नव्हती मी माझा नवा लूक साकारताना. कारण काय तर एका कॉलेजच्या गर्दीत आपण उठून दिसावं. मूड आणि विचारांच्या गर्दीत कॉलेज कधी आलं हे कळालंच नाही. तसा मी कॉलेजला नवखा नव्हतो. पण माझं ज्युनिअर कॉलेज अगदी जुन्याच टाईपच होतं. कंटाळवाणी ड्रेस, कडक नियम आणि सक्तीची हजेरी. मला तिथे असं कधी वाटलंच नाही की मी कॉलेजला जात आहे ते... इथे कसं सालं मस्त... मोकळं-मोकळं... अल्लड नि भारलेलं...
     तशी माझा प्रवेश एखाद्या बी ग्रेड सिनेमापेक्षाही फ्लॉपच ठरली. आमच्या क्लासमध्ये चक्क सहाचजण आले होते. बाकींच्यांनी विशेष साखरझोप स्वीकारली होती. काहीही असो, पण मी खूप होतो. दोघा तिघांच्या ओळखी झाल्या. बरं वाटलं जरा... दुसऱ्या दिवशी क्लास थोडा भरलेला वाटला पण आपल्याच दुनियेत रमलेले सगळेच एकमेकांना  अगोदर अगोदरपासून ओळखत होते. आम्ही चार पाच जणच तिऱ्हाईत. काही का असेना, भविष्यामध्ये यांच्यातलाच ग्रुपमधला मी एक सदस्य असेनस. यांच्यातलं कुणीतरी मला नोट्स देईल. आणि काय नि काय माझं वेंड मन स्वप्नातच रमलं होतं जणू.
     इतक्यात एक डार्क पर्पल टॉप घालून एक मुलगी आतमध्ये आली. दिसायला सुंदर नव्हती पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक ॲटीड्युड होता ऐश्वर्या राय जणूच. कुणीतरी ओरडलं की हिला अर्थशास्त्रमध्ये 88 आहेत आणि अख्या क्लासमधून 12 वीला हिलाच जास्त मार्क्स आहेत... असो मला काय करायचं...??? म्हणायला गेलो तर एक मुलगी धड नवहती. हा पण एक होती गोरीपान, सालसं, निरागसं, प्रचंड बडबड करणारी... पण ती मला दादा म्हणायची.
     नव्याची नवलाई संपलेली. किंबहुना काळाबरोबर ती जुनी झालेली. सारीच स्वप्ने धुळीला मिळालेली. मी जसा विचार केला होता तसं काही घडलेच नाही. हा पण एक बरे झाले. निदान चार-पाच मित्र तरी लाभलेच तेवढेच. आर्ट ऑफ लिव्हींगच्या क्लासला कंपनी द्यायला, आमचा आर्ट ऑफ लिव्हींग म्हणजे हुक्का पिणे, स्मोकिंग वगैरे वगैरे (ह्यामध्येसुध्दा पुढाकार माझाच) "हर एक फ्रेंड कमीना होता है" हे म्हणतात ते काय उगाच नाही. पहिले वर्ष असेच सरले. अभ्यासाच्या नावाने बोंबाबोंब अन उसनी आलेली फर्स्ट सेमची ए.टी.के.टी. सेकंड इयरला आल्या-आल्याच क्लीअर केली. सेकंड इयरची सुरवात जरा बरी झाली. क्लासमधलेही जरा जरा मोकळे मोकळे बोलून लागले  होते. आमच्याच क्लासमध्ये अतुल नावाचा अतिहुशार प्राणी होता. खरतर या अतिहुशार प्राण्याची मला कीवच यायची. काय नुसता तो अभ्यास नि अभ्यास. फर्स्ट रँक कधी जगण नाही शिकवत आपल्याला. कोण सांगणार यांना, तसा माझा त्याच्याशी लांबलांबपर्यंत काहीच संबंध नव्हता. पण सेकंड इयरला आल्यापासून आमचचा हा अतिहुशार प्राणी चक्क ऐंजॉय करायला लागला होता. ती गोरीपान चुलबल, डार्क पर्पल आणि हा हुशार कबुतर... मस्त मित्र झाले होते.... आशिकी... लव्ह टँगल अशा यांच्याबद्दलच्या गप्पांना क्लासमध्ये ऊत यायचा पण मला त्याचे काहीच देणेघेणे नव्हते. थर्ड सेम असंच सरत गेलं.
     एव्हाना आमच्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या क्लासला काय चालत हे सर्वांना माहित झालं होतं. टवाळकी करणे, लेक्चर बंद करणे यामुळे माझी इमेज थोडी खराब झाली होती. पण काळजी कोणाला होती??? कॉलेज लाईफ पूर्णपणे ऐंजॉय करायचे होते मला. अन ते मी करत होतो. चौथे सेमिस्टर सुरु झाले तशी एक आनंदाची बातमी माझ्या कानावर आली. आमच्या कॉलेजची औद्योगिक भेट म्हणून गोव्याला होणार होती असं कळलं. मी तर आनंदाने वेडाच व्हायचा बाकी होतो. लगेच ग्रुप तयार झाले कोण कोणाबरोबर रुम शेअर करणार हे बाकीच्यांनी ठरवूनही टाकले. मी एकटाच.... आता कुणाला पकडायचं... तर आमचा हा अतिहुशार प्राणीही एकटाच आहे असं कळलं. मग काय गोड बोलून मी नाही त्यांनीच पटवलं मला...
     गोव्यामध्ये जाम मजा केली आम्ही. मस्त ग्रुपही जमला... डार्क पर्पल... चुलबुल, अतिहुशार अतुल आणि मी... गोव्यातले ते सुवर्णीय क्षण कसे सरले हे कळलेच नाही. डार्क पर्पल तशी खूप चांगली होती. जसा मी विचार केला होता तशी ती अजिबात नव्हती. गोव्यावरुन आल्यानंतर एकत्र खाण-पिणं वाढू लागले. हल्ली डार्क पर्पल आणि मी खूप जवळ येऊ लागलो होतो. आम्ही एकमेकांचे चांगले जवळचे मित्र झालो होतो. मी तिला सर्वकाही शेअर करायचो. नाही केले तर मला करमायचे नाही. ती मला नोट्स देई. काही अडलं तर शिकवी. कधी कॉफी तर कधी पाणीपुरी शेअर करी. हळूहळू तिचं मोकळं वागणं आवडू लागलं होतं मला आणि ज्याची मला भिती वाटत होती तेच झालं. कसा कोण जाणे मी तिच्या प्रेमात पडलो. दिवस सरत राहिले. वर्षसुध्दा सरलं. ही गोष्ट मी माझ्या मित्रांना सांगितली. त्यांनीही प्रोत्साहन दिलं अन् प्रपोज मारायला सांगितलं. एव्हाना तिलाही हे कळून चुकलं होतं. फक्त भावना व्यक्त व्हायच्या बाकी होत्या. हल्ली ती मला टाळू लागली होती. छोट्या छोट्या कारणांवरुन ती भांडे.
     एकेदिवशी तिने मला बोलते करण्याचा प्रयत्न केला पण मी नाही बोललो काही. मी गुपचुप एक लेटर लिहलं होतं. योग्य वेळ आल्यावर तिला मी देणारच होतो. पण तिला ह्या प्रकरणावर लवकरात लवकर पडदा पाडायचा होता मग मी ही जास्त न थांबण्याचा निर्णय घेतला. तिला मी कॉलेजच्या ग्राऊंडवर बोलावलं. पण छे !!! ती अतुल आणि चुलबुलला घेऊन आली होती. केवढा हा अविश्वास??? जी व्यक्ती माझ्याबरोबर निसंकोचपणे फिरायची, मला शिकवायची, सावरायची आज त्याच व्यक्तीला माझ्याशी एकांतात बोलताना ऑकवर्ड वाटत होतं. माझं मन थाऱ्यावर नव्हतं मुळी. थोडेफार होते ते ही ह्यामुळे गळून पडलेलं. मी मुकाट्यानं लेटर काढलं आणि तिच्या हातात दिलं. ती लेटर वाचू लागली. काय फालतूगिरी आहे अशा अविर्भावात ती त्या दोघांनाही लेटर दाखवत हसू लागली. केवढी ही क्रूर चेष्टा माझ्या प्रेमाची... माझ्या भावनांची...माझ्या प्रामाणिकपणाची.. मला शिकवणारी.. समजवणारी हीच का ती माझी मैत्रीण??? क्षणभर माझं मन भांबावलं.. रडू यायचं बाकी होतं नव्हे, ते ही आलं होतं. मी पटकन ते लपवून निघालो.
     त्यानंतर मी कॉलेजला न जाण्याचा आणि कुणाशीच न बोलण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसानंतर तिचा फोन आला. मला समजावत होती ती. काय समजवणार होती ती मला??? मी आधीच समजून चुकलो होतो. मी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं. चौथ्या दिवशी माझा हात लिफ्टमध्ये अडकून जखमी झाला आणि त्याचा माझ्या मित्रांनी वेगळाच अर्थ काढला. झालं.... सगळा सत्यानाश झाला. 10 दिवसानंतर कॉलेजला प्रेजेंटेशनसाठी गेलो तर अख्ख्या कॉलेजला मी प्रपोज मारल्याचं आणि नकारामुळे नसं कापल्याचं माहित झालं. एव्हाना तिनेही हे सारं तिच्या घरी सांगितलं. कुठल्या तोंडाने मी तिला खरं सांगणार होतो. सांगायला गेलो तर तिचा अविश्वास मला थांबवायचा. मैत्री तरी का ठेवू मी??? त्यानंतर फक्त प्रेझेंटेशनला कॉलेजला जाणं... कुणाशीही न बोलणं... आणि शक्यतो तिला टाळणं... शेवट शेवटला ती असाईनमेंट सबमीट करताना दिसायची. अन माझ्या मनात एक थंड शिरशिरी यायची. तशी ती आजही दिसली की येते. म्हणूनच मी हे सारं प्रकरण माझ्या आयुष्यातून डिलीट केलं ते कायमचंच !!! 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...