सोमवार, १६ जानेवारी, २०२३

172. पण तरीही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात.

         एक मुलगी होती... साधी सरळ, थोडीशी खट्याळ. नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली आणि एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वत:मध्ये गुंतलेला. अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्यांची छान मैत्री झाली. त्यातून त्यांचे फोन कॉल आणि मॅसेज चालू झाले. ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि मॅसेज करायची. जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा मॅसेज नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा. तिला विचारायचा, "का ग, काल तू फोन नाही केला, मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची." ती त्याला म्हणायची की, "नाही, माफ कर. काल नाही जमल फोन करायला." तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा. त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा. रोज त्यांचे फोन आणि मॅसेज चालू राहिले.
     त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे. तिने किती ही ठरवलं की आपण त्याला जास्त मॅसेज नाही करायचं.. तरीही त्याला मॅसेज केल्याशिवाय तिला करमत नसे. ती त्याला मॅसेज करायची. त्यांचे बोलणं वाढू लागलं होतं. ती एकटी असली की त्याच्याच विचारात गुंतायची. किती ही ठरवलं की नाही त्याचा विचार करायचा तरीही ती अधिकाधिक त्याच्यात गुंतत जात होती. कारण ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे तिला कळलं नाही. त्याच्या विचारात असताना त्याचे बोलणं आठवून स्वत:शीच हसायची. गाण गुणगुणत बसायची. "पाहिलं न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले." आता तिला त्याची सवय झाली होती. सतत त्याच्याशी बोलावंसं वाटायचं. आणि तिला त्याच्याशी बोलल्याशिवाय राहवत नसे. त्याच्या आवाजात ती आनंदी व्हायची. हळू हळू ती त्याचं पण ही ओळखू लागली. त्याचा मूड कसा आहे? का आहे? ह्याचं त्याला आश्चर्य वाटत होते. तो तिला विचारायचा, "अगं, तुला कसं कळलं की माझा मूड खराब आहे ते?" ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे... थोड फार तरी कळू शकतं." आशेने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली. त्याच्याशिवाय  तिच्या मनात कोणी नसे. तिला त्याच्याबद्दल सगळं माहित आहे... होते... तो कसा आहे?? त्याचा स्वभाव कसा आहे?? त्याचा दिनक्रमच तिला माहित झाला होता. तो कधी जेवतो? घरी किती वेळ असतो... मित्रांबरोबर किती वेळ असतो. कधी झोपतो, कधी उठतो... तिला ही वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करत आहे. पण तसं काही नव्हते.
     असंच एकदा तिने त्याला फोन केला. दोघांचे या गप्पा पण छान रंगल्या होत्या. आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं. पण काही केल्या तिला ते जमत नव्हते. मग त्यानेच तिला विचारले, "तू लग्न कधी करतेस?" त्यावर ती चटकन त्याला म्हणाली, "छे ! एवढ्यात लवकर नाही. अजून वेळ आहे बघू..." मग तिने त्याला विचारलं, "तू कधी करतोस लग्न..." तो तिला म्हणाला, "मी लग्न करणार नाही. मी एकटाच बरा आहे." ती खूप दु:खी होते. काही क्षण तिला काहीच सूचत नाही. हा असा का बोलत आहे. पण स्वत:ला सावरुन ती परत त्याला विचारते. "तू असा का बोलत आहेस... तुझ्या आयुष्यात काही घडलं आहे का?" तो दु:खी होऊन तिला म्हणतो, "होय... आणि आता मला कोणीच नको, मी एकटाच बरा आहे. खूप सुखी आहे." त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं आहे असं तिला वाटू लागलं. मग ते दोघे तो ‍विषय बदलून दुसऱ्या विषयावर बोलू लागतात. आणि ती त्याचं कोमजलेला चेहरा फुलवते. "सांग, कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ! रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?" तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडतो. तो तिला नकळत बोलून जातो. " तू खूप चांगली आहेस.  तुझं चांगलच होईल." पण ती मनातल्या मनात म्हणत असते, "माझे चांगले होईल पण जेंव्हा तू माझ्या सोबत असशील." कारण ती त्याला दु:खी पाहू शकत नव्हती. त्याला कळालं नव्हत की ती निष्पाप त्याच्यावर प्रेम करायची. तिच्या मनात एक आशा होती कधी तरी तो तिचा विचार करेल. कधी तरी त्याला तिच्या भावना समजतील. तिला नेहमी वाटायचं. आज न उद्या त्याला माझं प्रेम केलेलं समजेल आणि मी माझ प्रेम व्यक्त करेल.
     असेच दोन-तीन वर्षे निघून जातात. ती अजूनही त्याला तशीच कॉल-मॅसेज करत होती. तो मुलगाही काही बोलत नव्हता. ती त्याची वाट पहात होती. तिच्या मनात कोठेतरी आशा होती की तो पण तिच्यावर प्रेम करेल. गणेशउत्सव चालू होते. सात दिवसाचे बाप्पा त्याच्या गावी निघाले होते. ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती. तिच्या मोबाईलवर सारखे कॉल येत होते. समुद्रावर पोहोचल्यावर परत तिला एक कॉल आला. तिने तो घेतला. पलीकडून आवाज आला, "असलं कसलं तुझं आंधळं प्रेम... तू फसलीसस... तुला फसवलं गेलं." ती पूर्णपणे घाबरली होती. "का? काय झालं???" "अगं, तू ज्याच्यावर प्रेम करतेस त्याचं लग्न झालेलं आहे." तिच्या पायाखालची जमिनच सरकते. ती स्तब्ध होते. एका आडोशाला होताना तिच्या पायात काच रुतली. पायातून रक्त वाहत होतं तिला माहितच पडलं नाही. ती तशीच स्तब्ध बसते. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी व आई तिला शोधत येतात. तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते. "अगं, पायात काच गेली आहे, तुझं लक्ष कुठेय." आई मग पायातून काच काढते. पण तिचं हृदय त्या काचेप्रमाणे तुटलं होतं. तशीच जाऊन ती समुद्रात बसते. कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते.
     त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती त्याला कॉल करते. डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते, "ह्यापुढे मला कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करु नकोस." तो पार गोंधळून गेला होता की ही अचानक अशी काय बोलते म्हणून, "अगं, काय झालं..." ती म्हणते, "तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस." त्याला तिच्या बोलण्यातला अर्थ कळतो परत ती त्याला बोलते, "तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते..." तो म्हणतो, "हो... मला माहित आहे." तिला धक्काच बसतो. ती म्हणते, "काय???" तो म्हणतो, "हो, मला माहित आहे तू माझ्यावर प्रेम करतेस, आणि मीही तुझ्यावर प्रेम करतो. पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्तही. मला तुला फसवायचे नव्हते आणि मला तसे करता ही आले असते, पण म्हणून मी तुला काही बोललो नाही. मी पण तुझ्यावर खरं प्रेम केलयं. मला ही तुला बोलायचं होतं. पण मी घाबरत होतो की कदाचित हे सगळं समजल्यावर तू माझ्याशी मैत्रीही तोडशील. म्हणून मी तुला काही बोललो नव्हतो. मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती. मी तुला कधी मिळवू शकत नव्हतो पण मला तुला गमवायचं पण नव्हतं. म्हणून मी गप्प होतो. नशीब पण कसं आहे बघ ना? जेंव्हा वेळ होती तेंव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हते आणि जेंव्हा प्रेम आहे तेंवहा माझ्यासोबत वेळ नाही. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की तुझा पुढचा जन्म फक्त माझ्यासाठी असू दे." आणि तो शांत होतो. तिला हसावे की रडावे तेच कळत नव्हते. शेवटी ती त्याला म्हणते, "आज मी हारुन पण जिंकली आहे." आणि कॉल ठेवते. आजही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात. फरक एवढाच की ते प्रेम फक्त त्यांच्या स्वत:पुरत असतं. तिने त्याला कॉल-मॅसेज करणं सोडलं आहे. पण तो महिन्यातून पंधरा दिवसांतून एक दोन वेळा कॉल करुन तिची विचारपूस करतो. पण तरीही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात.
आयुष्यात कधी कोणी येऊ नये.
आले तर जावू नये.
जर नंतर अश्रूच द्यायचे असतील,
तर पहिल्यांदा कोणी हसवू नये.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...