शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

182. प्रेमपत्र

 प्रिय,

      तू माझ्या आयुष्यात आलास, तेंव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. कळलंच नाही की मी केंव्हा प्रेमात पडले. मी प्रथम तुला होकार दिला. तेंव्हाही मला वाटलं नव्हतं की मी प्रेमात पडले आहे. या 14 फेब्रवारीला आपल्या प्रेमाला तीन वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही आपण नवीन असल्यासारखं वाटतं. या तीन वर्षांत बरंच काही घडून गेलं. थोडं रुसण, थोडंस हसणं... तरी आपल्यातील नावीन्य काही कमी झाले नाही. आपण एकमेकांमध्ये एवढं सामावून घेतलं आहे की फक्त चेहऱ्याच्या हालचालींवरुन काय बोलायचं आहे हे कळतं. तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस असं तुला का वाटतं? तू माझ्यासाठी भरपूर काही केलं आहेस. आज मी जे काही आहे त्याचं पूर्ण श्रेय तुलाच आहे. आज आपण अशा वळणावर उभे आहोत की पुढे काय होईल याची कल्पना नाही. आपला विश्वास आपलं प्रेम हीच सर्वांत मोठी शक्ती आहे. आपल्यातील निस्वार्थी, निरपेक्ष प्रेमामुळेच आपण एकत्र आहोत. तू म्हणतोस ना, की आपलं प्रेम फार वेगळं आहे. ते खरंच वेगळं आहे. आपण एकमेकांवरचे हक्क एकमेकांना पूर्णपणे दिलेले आहेत. पण कोणत्याही अटी आणि वचनामध्ये आपण एकमेकांना बांधलं नाही. प्रेमाला कधीही मोजमाप नसतं. फक्त भरपूर प्रेम करत रहायचं असतं. कधीकधी वाटतं, की तू एवढं करतोस, तर मीच कमी नाही पडणार ना? कुठे कमी किंवा काही चुकलं, तर मला नक्की सांग. खरंच मला माझं प्रेम व्यक्त करता येत नाही. तुझ्यासारखं छान लिहता-बोलता येत नाही. तू म्हणतोस ना, काहीतरी लिहीत जा. ज्या गोष्टी आपण बोलू शकत नाही त्या लिहून व्यक्त करता येतात. म्हणून हे फक्त तुझ्यासाठी. आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंस, मला समजून घेतलंस, खूप खूप प्रेम केलंस. आता फक्त एकच मागणं आहे, "हृदयाचा ठोका चुकला तरी तू मात्र चुकू नकोस. प्रेमाचं नातं परी, साथ कधी सोडू नकोस."

 फक्त तुझीच जीवनसाथी





संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...