मंगळवार, १० जानेवारी, २०२३

147. अशाप्रकारे हृदयस्पर्शी नात्याची सुरवात झाली

        निवेदिताची अभिमन्यूशी ओळख झाली तीच एका उदात्त भावनेतून. अभिमन्यू अंध होता. त्याला परीक्षेत त्याचे पेपर लिहायला रायटर(सोबती) हवा होता. निवेदिता नेहमी तिच्या  कामांतून मदत करायची. त्यामुळे ही संधीसुध्दा तिलाच मिळाली आणि दहावीपासून आजपर्यंतचे चार्टर अकाउंटंटचे अंतिम पेपर तिच लिहत आली होती. ती त्याच्यापेक्षा जरा लहान होती. पण त्या दोघांमध्ये आता छान मैत्रीचं नातं गुंफलं गेलं होतं. अभिमन्यू हुशार होता. कोणत्याही गोष्टीत अपयश कसं हे माहीतच नव्हतं त्याला. त्यातून निवेदिताची साथ मिळाल्याने हुरुप येऊन तो दुप्पट उत्साहाने प्रत्येक गोष्ट करायचा. ती सुध्दा त्याला कायम प्रोत्साहन देत रहायची. तिच्यापुढे नेहमीच त्याचा आदर्श होता. दोघांच्याही घरी ते माहित होते आणि त्याबद्दल त्यांचं भरपूर कौतुकसुध्दा व्हायचं.
       यशावकाश अभिमन्यू सीए झाला. निवेदितासुध्दा फर्स्ट क्लास मिळवून बी.कॉम झाली. पण एवढं सगळ होताना निवेदिताच्या मनातला तो कोमल हलवा कोपरा अभिमन्यूने कधी व्यापला ते तिचं तिलाच कळालं नाही. खूप वेळा तिने त्याला विचारायचा प्रयत्न करुनही पाहिला होता पण तिला धाडसच होईना. तिला अभिमन्यूच्या मनातल्या विचारांचा नेमका अंदाज येत नव्हता. त्याने आतापर्यंत तसा कधीच दाखवलं नव्हतं. त्यामुळे तर ती अजूनही घाबरायची.
        एकदा ते दोघे असेच फिरायला म्हणून बाहेर पडले होते. वसंत ऋतू होता आणि निवेदिताला अजूनही तीचं मन मोकळ कारण जमलंच नव्हतं. ती नुसती चालत होती त्याच्याबरोबर. एका बेंचावर ते दोघे बसले. अभिमन्यू म्हणाला, वसंत खूप छान असतो ना?… कशी दिसतेय ही बाग? सांग ना ती एकदम रंगात येऊन सांगू लागली आणि तो ऐकू लागला, सगळीकडे हिरवगार आहे. छान फुल आहेत आणि फुलपाखरंसुध्दा आहेत. बराच वेळ बोलत राहिली पण अचानक भानावर येऊन ती थांबली आणि नुसतीच बसून राहिली. अभिमन्यू म्हणाला, का ! एकदम अशी गप्प झालीस? किती छान बोलत होतीस. सगळं मी पाहतोय असंच वाटत होतं. सांग ना पुढे तो एवढा म्हणेपर्यंत निवेदिताच्या गालावरचा अश्रू त्याच्या हातावर पडला. तो म्हणालाच, का रडतेस गं? ती पटकन डोळे पुसत म्हणाली, मी नाही रडत. तो म्हणाला, आता मात्र मी चिडीन हं. सांग काय झालं? मी विचार करत होते कीकी अगं बोल कीहे सौंदर्य नेहमीच माझ्या डोळ्यांनी पहायला आवडेल का तुला? अभिमन्यूला तिच्या मनातले कळायला दोनच क्षण लागले. तो काही बोलायच्या आतच ती पुन्हा म्हणाली, हे बघ, आयुष्य सोपे नाही ह्याची जाणीव मला आहे. पण मी त्या आयुष्याला नाही घाबरत तेंव्हा तू असशील माझ्याबरोबर. नाही राहू शकणार मी जर तू नाही म्हणालास तर, तुटून जाईन. …… आणि तिला हुंदका फुटला.
     अभिमन्यूने काहीच बोलता तिला जवळ घेतले आणि मूकपणे तिला थोपटत राहीला. आणि अशाप्रकारे अजून एका हृदयस्पर्शी नात्याची सुरवात झाली…!!!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...