सोमवार, २ जानेवारी, २०२३

117. प्रेमविवाह

 अनुप आणि सुमन एकमेकांसाठी अक्षरश: वेडे झाले होते. कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट झाली होती. एकमेकांना पाहताक्षणी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मग काय, एकमेकांच्या डोळ्यांत पाहत मोठमोठी प्रेमपत्रं लिहिण्यात, एकमेकांशी उसासे टाकण्यात कॉलेजचे दिवस भुर्रकन उडाले कळालेच नाही. यथावकाश दोघांनी लग्न केलं. सुरवातीचे काही दिवस आपल्याच इंद्रधनुषी विश्वात गुरफटलेल्या या प्रेमीजीवांकडे पाहून कुणालाही हेवा वाटला असता. पण हळूहळू आपल्या जोडीदाराकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे त्यांच्या लक्षात येऊ लागले. एकमेकांचे दोष ठळकपणे दिसू लागले.आपला जोडीदार आपण समजतो तसा नाही हे समजू लागले. प्रेमाचे रंग उडून जाऊ लागले. मग दोघे एकमेकांवर चिडू लागले. रोज वादावादी, भांडणे, अखेर घटस्फोटापर्यंत वेळ आली.
     अनेक प्रेमविवाहांची अखेर शेवटी अनुप आणि सुमन यांच्यासारखी घटस्फोटातच होते. गंमत म्हणजे ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमाच्या आणाभाका घेऊन केलेली लग्ने अधिक प्रमाणात मोडतात, याची कारणे काय असावीत?
प्रेमविवाह होण्याची कारणे :
1. अलीकडे प्रेमविवाह करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. चित्रपट, दूरदर्शन, कादंबऱ्या(उदा. मिल्स ॲन्ड बून), नाटके यांतून प्रेमात आकंठ बुडालेले नायक-नायिका त्यांचा राजा राणीचा संसार पाहून अनेकांना आपणही प्रेमात पडावे आणि विवाह करुन सुखी व्हावे असे वाटते.
2. खरे तर ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमविवाह अधिक टिकतात अशी एक समजूत आहे कारण ठरवून केलेल्या विवाहात एका अनोळखी माणसाबरोबर तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे त्याच्याबरोबर पटेल की नाही अशी भिती मनात असते. प्रेमविवाहात आपण आपल्या जोडीदाराला पूर्वीपासून पूर्णपणे ओळखत असल्याचा एक भ्रम आपल्या मनात असतो जेंव्हा एकमेकांविषयीची खरी ओळख (म्हणजे लग्न झाल्यापासूनची) होऊ लागते.
3. एकमेकांकडे पाहून आकर्षित होण्याव्यतिरिक्त प्रेमात पडण्याची इतरही कारणे असतात. काही वेळा जोडीदाराला त्याच्या कुटुंबियांकडून प्रेम, जिव्हाळा, मिळालेला, नसतो. अशा वेळी त्याला किंवा तिला आपण प्रोत्साहन द्यावे अशी एक जबरदस्त इच्छा आपल्या मनात असते.  
4. एखाद्या व्यक्तीला स्वत:विषयी विश्वास नसतो. कधी-कधी त्या व्यक्तीच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड असतो. अशा वेळी आपल्या प्रेमात कुणीतरी पडले आहे ही भावनाच त्याला किंवा तिला उत्तेजीत करणारी असते आणि मग अशा व्यक्ती सहज प्रेमात पडतात.
5. आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडते. त्यावेळी अनेकजण प्रेमात पडतात. पालकांचा मृत्यू, एखादा गंभीर आजार, नोकरी-धंद्यात आलेले अपयश, कौटुंबिक समस्या वगैरे अशी प्रेमात पडण्याची काही कारणे आहेत.
6. स्त्री जेंव्हा समोरच्या पुरुषात आपल्या पित्याला आणि पुरुष समोरच्या स्त्रीत आपल्या आईला पाहतो तेंव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एखादीचा पिता कुटुंबात वर्चस्व गाजवणारा, आक्रमण आणि चंचल वृत्तीचा असेल तर असे स्वभाव विशेष व्यक्तीच्या प्रेमात पाडतात. अर्थात प्रेमात पडणारी कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीच्या प्रेमात ठरवून पडत नाही. तर त्याच्या नकळत हे घडत असतं.
प्रेमविवाह मोडण्याची कारणे :
1. प्रेमविवाह मोडण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचं आणि सर्वत्र आढळून येणारं कारण म्हणजे प्रेमात पडलेलं जोडपं आपल्या जोडीदाराविषयी भलभलत्या कल्पना बांधून असतं. त्याच्याकडून ती अवास्वत अपेक्षा ठेवतं. वास्तविकतेची जाणीव ते ठेवत नाहीत. प्रेमात पडलेल्या व्यक्ती नेहमीच एकमेकांना आपल्या उत्कृष्ठ वागणुकीत प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपली चांगली बाजू दाखविण्याचा ते जाणूनबुजून प्रयत्न करतात. दिसण्यात, पेहराव्यात, आपण चांगले दिसू यांकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. सुरवातीच्या काळात हे चित्र अल्हाददायक असतं. आपल्या जोडीदाराचे दोष, अवगुण यांच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. तिला किंवा त्याला आपला जोडीदार कसा आहे हे लग्नाअगोदर माहित असतं. त्याच्याबरोबरच आपण त्या व्यक्तीला स्वीकारतो. लग्नानंतर तो हळूळू सुधारेल अशी तिची अपेक्षा होती आणि त्यानंही तिला आपण नक्की सुधार असं आश्वासन दिलं होतं. पण त्याला सुधारायचं नव्हतं. लग्नानंतर हळूहळू आपली बायको आपणाला ॲडजस्ट करेल असं त्याला वाटू लागतं.  लग्नानंतर असे मतभेद वादावादीला कारणीभूत ठरतात. आणि त्याचा परिणाम घटस्फोटात होण्याची शक्यता असते. म्हणूनच लग्नापूर्वी आपल्या विषयीची सर्व माहिती मोकळेपणानं जोडीदाराला सांगणं आवश्यक ठरतं. म्हणून आपण कसे आहोत?, आपल्या आवडी-निवडी, आपला स्वभाव या सगळ्यांविषयी आपल्या जोडीदाराला मोकळेपणाने सांगा.
2. प्रेमविवाह मोडण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा जोडपी एकमेकांना गृहीत धरतात. आपण काही बोलल्याशिवाय आपल्या जोडीदारानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे अशी त्यांची काहीची अपेक्षा असते. अनेक वेळा आपण आपल्या नवरोजींची आपल्या बायकोविषयीची शेरेबाजी ऐकतो. आम्ही एकमेकांना इतकी वर्षे ओळखतो. आतापर्यंत तिला माझ्या आवडी-निवडी माहीत व्हायला हव्यात. मी आफिसमधून घरी उशीरा आलो तर तिनं समजून घ्यायला हवं ही किंवा अशीच शेरेबाजी. मात्र नवरोजी ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की दुसऱ्याचं मन ओळखण्याची कला प्रत्येकाकडं असतेच असे नाही.
3. एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात. प्रेमविवाहात तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणं म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं हा आपला हक्कच आहे, असं त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्याचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखवण्याचा प्रकार असतो. मला काय वाटतं हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही ?असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही. माझ्या आई-वडीलांविषयी तू असे बोलतेस/बोलतोस? अशा उद्गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो. यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहूनही अधिक अपमान कसा करता येईल? याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा आणि बायको वर्चस्व गाजवणारी असेल हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होते. म्हणून पती-पत्नींनी एकमेकांना आवर्जन टाळायला हवे आणि समजा कधी दुखावलं तर आपला अहं बाजूला सारुन जोडीदाराची माफी मागायला हवी.
4. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेच प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघांच्याही भिन्न व्यक्तीमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तीमत्वांची खरी ओळख पटते आणि मतभेदाला सुरवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तीमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकते. उदा. जोडप्यांमधील एकजण बोलका, मनमिळावू, सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा भिडू अबोल, दुसऱ्याविषयीच्या भावना व्यक्त करणारा, त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम, जिव्हाळा दाखवणारा असेल तर यांमुळे त्या जोडप्यात  मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरुध्द उत्साह, विश्वास विरुध्द संशय अंतर्मुखता विरुध्द बहिरमुर्खता वगैरे सारखे स्वभाव विशेष विवाह मोडण्यात कारणीभूत ठरतात. पती-पत्नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशय किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निमार्ण होतात.
          थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून जर केले असते तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाह पूर्वी एकमेकांची खरी ओखळ पटवून घेण म्हणून आवश्यक असत. विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजूतीची आपोआप नाहीशा होतील. घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरुन जावे लागणार नाही.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...