बुधवार, ११ जानेवारी, २०२३

152. आज त्याच्या जगण्याचं कारण त्याचं एकटेपण आहे

 कोल्हापूर जिल्ह्यात एक छोटंसं शहर आहे इचलकरंजी. आजकाल या शहराची ओळख महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून देखील आहे. इथेच घडली ही प्रेमकहाणी. मी ही याच शहराचा असल्याने या कहाणीशी सर्वपरिचित आहे.
     एक मुलगी एका मुलावर प्रेम करायची. दोघांत वयांचं फारसं काही अंतर नव्हतंच मुळी. तिला तो प्रचंड आवडायचा. तिच्या नजरेत ते दिसायचं. दिसायला बरा होता पण स्वभावाने एकदम मस्त. इतरांपेक्षा वेगळा, एकदम साधी कपडे पण तरीसुध्दा वेगळा भासायचा. ती ही दिसायला खूपच सुंदर होती. ती हसताच तिच्या गालावर एक खळी पडायची. ते पाहिल्यावर भल्याभल्यांच्या काळजात धस्स व्हायचं. सलवार कमीज नेसणारी, अंगावर संपूर्ण ओढणी घेणारी असं तिला पाहिलं की भल्याभल्यांच्या नजरा तिच्याकडे वळायच्या. हळूहळू तिचा आपल्याविषयी असणारा कल याला समजून आला. तिचं प्रेम समजण्याइतका मूर्ख तर हा नक्कीच नव्हता. पण याच्यापुढे प्रश्न होता की पुढे काय? काय होईल जर आमचं प्रेम जमलं तर? अशा कित्येक प्रश्नांची तो स्वत:ला मागे खेचायचा. पण खरंच एक दिवस त्यानं तिच्या रोखलेल्या निरागस नजरेत पाहिलं, तो विसरला सर्वकाही. तिच्या त्या केविलवाण्या डोळ्यांना त्याने आपले जग बहाल केल. तिच्यासाठी काय पण करण्याची एक जबरदस्त भावना त्याच्या मनात घर करुन गेली आणि हा ही तिच्या प्रेमात पडला. त्याचा आपल्याविषयी बदलेला हेतू बघून तिच्या आनंदाला पाराच उरला नव्हता. तिने पुढच्या सुखी संसाराची स्वप्नेदेखील रंगवायला सुरवात केली.
     आता प्रश्न होता प्रेमाच्या पुढच्या पायरीचा आणि ती म्हणजे आपल्या मनातले प्रेम व्यक्त करायचं. तो विचार करायचा की तिचंही प्रेम माझ्यावर आहे ना मग तिने का ते व्यक्त करु नये. आणि ती विचार करायची की मी मुलगी आहे. मी जर त्याला प्रपोज केलं तर जग काय विचार करेल माझ्याविषयी. म्हणून प्रपोज तर त्यानंच कराव. याचा विचारात दोन वर्षे निघून गेली. कोणीही प्रेमामध्ये पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. दोघंही आपला अहंकार, दृष्टीकोन सांभाळत होते. पण यानं ठरवलं की आता खूप झालं. कोणालातरी पुढाकार घ्यायचाच ना मग मी का नाही? म्हणून यानं एक प्रेमपत्र लिहून एका पुस्तकामध्ये ते पत्र ठेवून एका लहान मुलीकडून तिच्याकडे पाठवून दिलं आणि खूपच उत्सुकतेने तो तिच्या उत्तराची वाट पाहू लागला. पण ती लहान मुलगी ते पुस्तक तशीच परत घेऊन आली आणि म्हणाली, ती दीदी म्हणतेय हे पुस्तक तीचे नाही आहे. त्यानं ते पुस्तक उघडलं. ते पत्र जसंच्या तसं होतं. खूपच वाईट वाटलं त्याला. कदाचित तिच्या लक्षात आलं नसावं. नंतर आपल्या प्रेमकथेचा पुढचा भाग त्याने नशिबावर सोपवला. दिवस, महिने, वर्षे उलटू लागली. नजरा भिडायच्या, एकमेकांशी प्रेम वाटायचं पण कोणीही प्रेमामध्ये पुढाकार घेत नव्हतं. तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली पण अजूनही त्यांच्या स्वभावात काही फारसा फरक पडला नाही. कधी बोलणार ते? काय होणार पुढे? शेवटी जे व्हायचं तेच झालं. तिचं लग्न ठरलं. आयुष्यात जन्मल्यापासून जितका रडला नसेल त्याहूनही कितीतरी जास्त त्याने एकाच दिवसांत अश्रू ढाळले होते. कदाचित तिचीही हीच अवस्था झाली असेल. ठरल्याप्रमाणे काही दिवसांत तिचं लग्न झालं. आमंत्रित असतानाही तो तिच्या लग्नाला गेला नाही. जाणार तरी कसा म्हणा? अपनेही जनाजे मैं कोई कैसे शामिल होगा ?
     आणि आता त्याच्यापुढे सर्वात मोठा यक्षप्रश्न होता. तिच्याशिवाय कधीही कल्पना केलेलं आयुष्य जगणं. खूपच कठीण होतं पण त्याच्यासमोर दुसरा पर्यायदेखील नव्हता. त्याने ते केलंही. ते म्हणतात  ना, कोणाचं आयुष्य कोणावाचून तटत नाही.फक्त दरवेळी जगण्याचं कारण बदलत जातं.  त्याच्या जगण्याचं कारण काल ती होती तर आज त्याच्या गजण्याचं कारण त्याचं एकटेपण आहे.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...