सोमवार, १६ जानेवारी, २०२३

168. प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेता?

     अतुल आणि जयश्री हे कॉलेजचे मित्र होते. पण कॉलेज संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले. जयश्रीचं लग्न झालं आणि अतुल नोकरीसाठी धावाधाव करु लागला. चार-पाच वर्षांच्या बरोजगारीनंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली. पण हा मूळचा रत्नागिरीचा असल्यामुळे तिथं ओळखीचं असं नव्हतंच कोणी. पण मुंबईत गेल्यावर कळलं की इथेच कुठेतरी जयश्रीचं सासर आहे. काही दिवस राहण्याची सोय होईल या अर्थाने त्याने जयश्रीचा पत्ता शोधून काढला. घरात प्रवेश करताच जयश्री दिसली. जयश्रीचा रिकामा गळा आणि मोकळं कपाळ त्याच्या मनात काहूर निर्माण करुन गेलं. अतुलला पाहून जयश्रीला देखील आश्चर्य वाटलं. पण थोड्या वेळच्या शांततेनंतर त्याने जयश्रीला तिच्याबद्दल विचारलं. ती म्हणाली, "आमच्या लग्नानंतरच्या तीन वर्षात एका अपघातात ते गेले." तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हतं त्याला. शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करु शकत नव्हता. त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी तिला सांगितली. तिला खूप आनंद झाला. पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली, "तू  इथेच रहा ना थोडे दिवस म्हणजे मलाही सोबतच होईल. पण तो म्हणाला, "अगं, तुझे मिस्टर नाही आहेत आता. लोक उगाचच गैरसमज करुन घेतील, त्यामुळे नको." "अरे लोकांना हजार तोंडं असतात, पण सत्य तर एकच असतं ना. त्यामुळे तू इथे बिनधास्त रहा. मी लोकांची पर्वा नाही करत." त्यानंतर ते दोघे एकत्रच राहू लागले. दोघांचीही कामाची वेळ जवळपास सारखीच असल्याने ते एकत्र जेवण करु लागले. एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. कंटाळवाणं आयुष्य जगणाऱ्या जयश्रीला जीवनात रंग चढू लागला. एकमेकांसोबत मस्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे भासू लागले.
     अतुल सकाळी उठायला उशीर व्हायचा म्हणून जया त्याच्यासाठी नाष्टा तयार करुन तो टेबलावर ठेऊन जायची. नंतर अतुल तो नाष्टा करुन जॉबवर जायचा. हळूहळू त्या दोघांना एकमेकांची सवयच झाली. लोक त्यांच्याविषयी काय काय बोलायचे? पण त्यांनी कधी लक्षच दिलं नाही. अतुल हळूहळू जयश्रीच्या प्रेमात पडला होता. शेवटी त्याने एक दिवस जयश्रीला त्याच्या मनातली गोष्ट बोलून दाखविली. जया लगेच त्याच्यावर भडकली, "मी तुला एक चांगला मित्र मानत होते. पण तू असं बोलून आपल्या मैत्रिला कलंक लावला आहेस. एक विवाहीत स्त्रिला असं विचारणं तुला शोभतं का अतुल?" "अगं, पण तुझा नवरा या जगात नाहीये आणि तसंही आपण एकमेकांना चांगली साथ देऊ आयुष्यभर..." "पण मला हे मंजूर नाही. मी माझ्या नवऱ्यावरअजूनही प्रेम करते आणि मी त्याला विसरु शकत नाही." "ठीक आहे. जशी तुझी इच्छा." असं बोलून तो झोपी गेला.
      सकाळी जया उठून त्याच्यासाठी नाष्टा तयार जॉबवर निघून गेली. दुपारी लंच टाईममध्ये जेंव्हा ती घरी आली तेंव्हा तो नाष्टा तसाच टेबलावर होता आणि एक चिठ्ठी तेथे होती. त्यामध्ये त्याने आत्तापर्यंत दिलेल्या आधाराबद्दल जयश्रीचे आभार मानले होते आणि तो तिथून निघून गेला होता. तिने अतुल जिथे काम करतो, तिथे त्याची चौकशी केली. पण कळलं की अतुल राजीनामा देऊन काम सोडून गेला आहे. दिवसामागे दिवस जात होते. तसतसं अतुलच्या नसण्याची जाणीव तिला होऊ लागली. जेवताना त्याच्याबरोबर केलेली मस्ती, एकमेकांसोबत केलेले छोटेमोठे वाद तिला आठवू लागले. हळूहळू तिला त्याच्याशिवाय राहणं कठीण होतं गेलं. त्याची आठवण सतावू लागली. सर्व गोष्टी समोर असायच्या पण मन सैरभैर असायचं. कशातच लक्ष लागणासं झालं. तिने तिची ही स्थिती तिच्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीनं सांगितलं की,"तुचं प्रेम जडलंय त्याच्यावर. जर खरंच या परिस्थितीतून तुला बाहेर यायचं असेल तर अतुलशी तू लग्न करुन टाक आणि तसंही तू या समाजाला जुमत नाहीस. त्यामुळे त्यांची तू अजिबात परवा न करता एकदा अतुलशी बोलावंस." तिचं म्हणणं जयाला पटलं. दिवसभराची रजा टाकून ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली. तिथे त्याची म्हातारी आई होती. याआधी आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच. अतुलविषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या, "तो सकाळपासून बाहेरच आहे, कुठे गेलाय ते माहित नाही. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. जया तिची वाट पहात होती. जेवणेही त्यांनी उरकून घेतली. पण अतुल अजून आला नव्हता. सायंकाळचे चार, चाराचे पाच वाजले. दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहायचं होतं. शेवटी वैतागून जयाने आईचा निरोप घेतला आणि ती मुंबईच्या गाडीत बसली. गाडी चालू झाली. त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती. गाडीतून जाताना शेवटी तिला तिचं कॉलेज दिसलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी थांबवून ती थोडा वेळ उतरली. कॉलेजचे गेट, क्लास हे बघून आपण केलेला दंगा, मागे बसून मैत्रिणींच्या काढलेल्या खोडी, कॉलेजचे तास चुकवून कँटीनमध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवू लागल्या.
     त्या निश्चल स्टेजकडे पाहून अचानक तिला कॉलेजचा तो दिवस आठवला. ज्यावेळी अतुलने "गुलाबी आँखे" हे गाणं गायलं होतं. जे तिला प्रचंड आवडलं होतं. बंद वर्गावरुन नजर फिरवत असताना तिची नजर एका अशा वर्गावर जाऊन थांबली होती ज्याचा दरवाजा उघडा होता. तिला वाटलं कदाचित तिथं कोणीतरी असावं. ती आत गेली तर खिडकीतून सुसाट येणाऱ्या वाऱ्याने एका बेंचवर ठेवलेली एक वही जिची पाने आपोआप पलटत होती. तिने ती खिडकीची दारे बंद केली आणि ती वही आपल्या हाती घेतली. जेंव्हा तिनं पाहिलं की यात लिहलेली कविता कुठेतरी वाचली आहे तेंव्हा तिच्या लक्षात आलं की ही कविता अतुलनेच लिहली होती. जेंव्हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता त्याच वेळी ही कविता त्याने सर्वांसमोर वाचली होती. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की अतुल इथेच कुठेतरी आहे. तिने कॉलेजभर तिची शोधाशोध सुरु केली. तो कुठे सापडत नव्हता. शेवटी ती टेरेसवर त्याचा शोध घेत गेली. अतुल टेरेसच्या कडावर दोन हात टेकवून येणाऱ्या हवेची झुळुक डोळे झाकून अनुभवत होता. त्याला पाहताच जयाच्या डोळ्यांतले अश्रू थांबले नाहीत आणि आनंदाच्या भरात पळत जाऊन तिने अतुलला मागून मिठी मारली.
     अतुलने डोळे मिटलेच होते. तो म्हणाला, "आलीस तू. किती वाट पाहिली मी तुझी. मला माहितं होतं माझं तुझ्यावरचं नितांत प्रेम तुला इथे येण्यासा भाग पाडेल आणि माझ्या प्रेमावर असलेला माझा विश्वास मला तुझी वाट पाहण्यास भाग पाडत होता. काय जादू आहे या प्रेमात... आता नाही ना सोडून जाणार? "नाही रे माझ्या राजा. कधीच नाही. तू दूर गेल्यावर कळलं की तू किती जवळ आहेस माझ्या हृदयाच्या.... त्यामुळे मी कधीच तुला नाही सोडून जाणार......
     होती अतुल आणि जयश्रीची प्रेमकहाणी. अतुलने जयश्रीच्या मनात पेरलेलं प्रेमाचं बीज आणि त्यानंतर मिळालेल्या दुराव्यानंतरही त्याने त्या बीजाचं एक ना एक दिवस रोप होईल, रोपाचं वृक्ष होईल ही ठेवलेली आशा महणजेच त्याने ठेवलेला त्याच्या प्रेमावरच्या या विश्वासानेच त्याचं प्रेम मिळवून दिलं. तर मित्रांनो, या कथेतून घ्यायचा बोध एवढाच की, "माझं या मुलीवर प्रेम आहे/ मुलावर प्रेम आहे." या वाक्यातल्या बाकीच्या गोष्टी ठीक आहेत हो, पण प्रेम...... प्रेम या शब्दाचा अर्थ तुम्ही काय गृहीत धरता ते महत्वाचं आहे. प्रेम या शब्दात अक्षरे जरी अडीच असली तरी त्या अडीच अक्षरांसोबत खूपशा गोष्टी जोडलेल्या असतात ज्यांचा आपण रिलेशनशिपमध्ये असताना कधीही विचार नाही करत. त्या गोष्टी म्हणजे विश्वास, समजून घेणे, वेळोवेळी प्रेमाची जाणीव करुन देणे, कठीण प्रसंगी साथ न सोडणे, त्याग, निष्ठा, आपुलकी,...... एका असामान्य महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या हे शब्द डोक्यावरुन जातील पण खऱ्या प्रेमाची जाणीव असणाऱ्यांना त्यांचा अर्थ आणि महत्व नक्कीच समजेल.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...