"माझ्या
स्वप्नात तू, प्रत्येक श्वासात तू....
हृदयाच्या स्पंदनात तू, नाहीस तर फक्त जीवनात
तू...."
त्याला आवडलेली ही माझी पहिली चारोळी होती. केशव त्याचे नांव आणि मी राधिका.
आम्ही बरीच वर्षे एकत्र शिकलो. पण तेंव्हा त्याला माझी ओळख होती का नाही हे माहित
नाही. पण मी पहिल्या नजरेत त्याच्यात गुंतले होते. अतिशय हुशार, सगळ्यांचा आवडता
आणि गोड स्मित हास्य असलेला मुलगा. सगळ्यांशी त्याची मैत्री होती. सगळ्यांमध्ये
मिळून मिसळून रहायचा. कुणाच्याही मनात त्याच्याबद्दल द्वेष असू शकत नव्हता. माझा
आणि त्याचा समोरासमोर बोलण्याचा योग तसा कधी आला नाही. कॉलेज संपले आणि आमचा त्या
ना होऊन होणाऱ्या भेटीचा काळ ही संपला. चार वर्ष झाली गोरेगांव सोडून. मीरा रोडला
शिफ्ट झाले होते मी आणि माझी फॅमिली. पण या चार वर्षांत त्याची ती गोड छवी मनातून
कधीच नाहीशी झाली नाही. अंतर फार नव्हते पण भेटीचा योग कधी आलाच नाही. कित्येकदा
मी काही ना काही कारणाने गोरेगांव गाठत होते पण प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर
फक्त त्यालाच शोधणारी माझी भिरभिरी नजर हताश होऊन परत आली होती.
एकदा माझ्या आजोबांची प्रकृती जरा खालावली
होती. त्यांना पहायला म्हणून मी पुन्हा एकदा गोरेगावला गेले. फार काही नाही,
वयानुसार होणारा सांधे दुखीचा त्रास. तरी माझ्या मनात त्यांच्या व्यतिरिक्त इतर
काहीच विचार नव्हते. गेल्या चार वर्षांत जे झाले नाही ते आता का होईल असा विचार
करुन मी नाका समोरची वाट धरुन चालत होते. पण यावेळी देवाने काहीतरी नक्कीच योजले
होते असावे. मी नजर वर करुन पाहिले आणि समोर तो उभा होता. आपल्या मित्रांच्या
घोळक्यात, त्याचा असे अचानक पाहून माझ्या मनाचा आनंद मनात मावतच न्हवता. क्षणभर तर
माझा श्वासच थांबला होता. मूर्खासारखी मी एक टक त्याला बघत राहिले होते. कदाचित
तोही मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावर खिळलेल्या माझ्या नजरेने
त्याचेही लक्ष वेढले असावे... तो तिथेच उभा होता आणि मी पुढे निघून गेले. पण फक्त
त्या वळणावरच.... कारण मी पुढे कधी जाऊच शकले नाही.
तुला जेंव्हा भेटतो, तेंव्हा तुला पाहतच
रहावसं वाटते. अन क्षणभर हे आयुष्य, पुन्हा पुन्हा जगावसे वाटते. त्याने लिहलेली
ही पहिली चारोळी. कुणासाठी होती हे माहित नाही पण आमच्या त्या भेटीचा तो क्षण
आठवला की नकळत त्याची ही चारोळी माझ्या ओठांवर रेंगाळू लागते. माझ्या आयुष्यातला
तो एक अविस्मरणीय क्षण... माझ्या अधुऱ्या कादंबरीची सुरवात ठरला.
काही दिवसांनी मला नवीन जॉबची ऑफर आली,
दादरला आणि मी ही तिथे रुजू व्हायचे ठरवले. काही दिवसांतच मी त्या रोजच्या लोकल
ट्रेनचा प्रवासात आणि नवीन नोकरीत रुळले, रमले होते. एकदा मला उशीर झाला आणि मी
नेहमीचे लेडीच कंपार्टमेंट चुकले म्हणून मग नाईलाजाने जेंन्ट्स कंपार्टमेंट मध्ये
चढले. तश्या माझ्या व्यतिरिक्त बऱ्याच
स्त्रिया होत्या तिथे, म्हणून मला जरा हायसे वाटले. गर्दी फार होती आणि सारेच
अनोळखी चेहरे होते. पुढचे स्टेशन आले आणि लोकांची चढ-उतार सुरु झाली. मी ते पहात
होतेच. तेवढ्यात माझी नजर चमकली आणि एक जागी स्थिरावली. ज्या दिशेंनी मी पहात होते
तिथूनही ओळख पटली. असा प्रतिसाद देणारे हसू दिसून आले. काही वेळाने ती व्यक्ती
माझ्याजवळ आली. ती व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून केशव होता.
तो : कुठे
निघाली आहेस?
मी :
जॉबला... काही दिवसांपूर्वीच जॉईन झाले आहे.
तो : हं...
तरीच... कारण आधी कधी दिसली नाहीस ना ट्रेनमध्ये...
मी : हो, पण
तू ओळखलेस मला... ह्याचच मोठं नवल वाटतंय मला.
तो : ओहहह..
थट्टा करते आहेस माझी. आणि तू सुध्दा कसं एका नजरेत ओळखलंस मला. मग मी तुला कसा
नाही ओळखणार
मी : बरं...
तू कुठे निघाला आहेस?
तो : मी ही
ऑफिसलाच जात आहे... दादरलाच...
मी : बरं...
आपल्या ग्रुपमधील अजून कोणाशी भेट होते का रे?
तो : हो...
बरेच जण अजूनही संपर्कात आहेत. आम्ही पिकनिक ला वगैरे एकत्र जातो आणि विशेष करुन
आम्ही मुले रोज कट्ट्यावर भेटतोच.
मी : छान...
ऐकून बरे वाटले.
तो : हं...
सर्वजण जवळ आहेत. तूच काय लांब जाऊन बसली आहेस.
मी : टोमणे
नको मारुस.. मी काय मुद्दाम थोडीच गेली आहे.
तो : हो गं, कळते
मला. मी फक्त मस्करी करत होतो.
मी : हं...कळले
मलाही ते, पण माझ्याशी कधी तू इतके मोकळ्या पणाने बोलला नव्हतास. आज काही विशेष
आहे का? मला तर वाटायचे की तू मला
नीटसं ओळखत ही नसशील म्हणून.
तो : ओह...
आता तू टोमणे मारत आहेस का? तू
राधिका... आपल्या वर्गातील एकुलती एक एकलकोंडी मुलगी. बघ मला नाव ही आठवणीत आहे.
हहह, खर तर मी बोलतो ग पण आपल्यात तशी संवादाची वेळ कधी आलीच नाही ना. म्हणून
संकाचे वाटायचा. आणि तू तरी कुठे बोलायचीस तेंव्हा...
मी : हम्म्म्म...
काही क्षण शांततेने निघून गेले आणि पुढच्या
स्टेशनला जेंव्हा गाडी थांबली तेंवहा पुन्हा माणसांचा एक लोंढा वाऱ्याच्या वेगाने
त्या डब्यात शिरला. काय ती गर्दी... त्या गर्दीत मी स्वत:ला सावरुन उभा राहण्याचा
निरर्थक प्रयत्न करीत होती. काही वेळाने मला जाणवले की समोरची व्यक्ती माझ्याकडे
वाईट नजरेने पहात आहे. आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या की स्त्रियांमध्ये एखाद्याची
वाईट नजर, वाईट स्पर्श ओळखण्याची शक्ती असते. कदाचित त्यामुळेच ती नजर मला असह्य
होत होती. काही वेळाने माझी ती अवस्था केशवलाही जाणवली म्हणून त्याने मला खुणेने
विचारले की काय झाले? पण मी
काही न बोलता फक्त त्या व्यक्तीकडे एक नजर टाकली आणि चेहरा फिरवला. केशवने त्या
व्यक्तीकडे पाहिले आणि तो समजून गेला की नक्की काय भानगड आहे. क्षणाचा विलंब न
करता त्याने आपला हात माझ्या दंडावर ठेवला आणि मला जरा स्वत:जवळ ओढले. क्षणभर मी
गोंधळलेच पण केशवचा त्या स्पर्शात एक आधार जाणवला... आपलेपणा होता मित्रत्वाचा.
त्या क्षणात केशवने त्या व्यक्तीला जाणीव करुन दिली की मी एकटी नाहीये. त्या
व्यक्तीनेही केशवला एक नजर पाहिले आणि आपली पाठ फिरवली.
जीवात जीव आला होता माझ्या जणू मी एका नजर
कैदेतून मुक्त झाली होती. आणि केशवचा तो आपुलकीचा स्पर्श मला वारंवार त्याच्याच
चारोलीची आठवण करुन देता होता.
हात असाच
राहू दे हाती, संपू नये कधी हा रस्ता. स्पर्श असाच होत रहावा, नकळसा
म्हणण्यापुरता.
पुढे दादर स्टेशन आले आणि आम्ही दोघेही
ट्रेनमधून बाहेर पडलो. आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागलो. दिवसभर मी
मात्र सकाळचा तो प्रसंग आठवून स्वत:वर स्वत:शीच हसत ही होते आणि केशवने लिहिलेली
चारोळी आठवून स्वत:शीच लाजत होते.
दुसऱ्या दिवशी स्टेशनवर वेळेवर पोहोचले पण
संभ्रमात पडले, वाटले लेडीज कंपार्टमेंट सोडून पुन्हा त्याच डब्यात चढावं का? कदाचित पुन्हा केशवशी भेट होईल, मनात थोडी
हुरहुर होती. मग तेच केलं जे मन सांगत होतं. म्हणजे ट्रेनचा डबा चेंज केला.
गर्दीतून वाट काढत मी एक कोपरा पकडून उभी राहिले. कधी एकदाचा केशव येतोय असं झालं
होतं मला. नजर अगदी ट्रेनच्या दारावर खिळून राहिली होती. एक क्षण वाटले की मी काही
मूर्खपणा तर केला नाही ना मुद्दाम जेंन्ट्स कंपार्टमेंट मध्ये येऊन... आणि
दुसऱ्याच क्षणी जर तो आलाच नाही तर... हा प्रश्न मनात डोकावून गेला..
ओळखीचा शहरात
अनोळखीपणे वावरणारी, लोकांच्या गर्दीत सैरवैर तुला शोधणारी... असेल जी एक नजर
तुझ्यासाठी पाणवणारी, ती.. फक्त तुझी आणि तुझीच कादंबरी.
कदाचित त्या
दिवसांत देव माझ्यावर जरा जास्तच खूश असावा. कारण गोरेगांव स्टेशन आले आणि
लोकांच्या गर्दीतून वाटत काढत आत येताना मला पुन्हा तो दिसला आणि माझ्या काळजाचा
ठोका पुन्हा चुकला. पाहिले त्याने मला आणि तो माझ्याकडेच येत होता.
तो : हाय...
आज पुन्हा उशीर झाला तुला?
मी : हाय...
हम्म्म्म... नाही. आज मुद्दामच ह्या डब्यात चढले. पुन्हा कोणी ओळखीचं भेटेल या
आशेवर.
तो : ओके..
बरंच काव्यात्मक बोलायला लागली आहेस.
मी :
हम्म्म्म्म... तसं काही नाही. सहजच बोलून गेले.
तो : ठीक
आहे... कसा गेला कालचा दिवस?
मी : गुङ..
छान गेला आणि तुझा कसा गेला?
तो :
चांगला... हाहाहा... मी हा प्रश्न तुला मुद्दामच विचारला. कसली घाबरली होतीस काल
आणि तरी ही पुन्हा आज या डब्यात एकटी चढलीस म्हणजे मानले पाहिजे तुला
मी : त्यात
काय नवल आहे. नेहमीच थोडे तसे नग भेटतात. आणि मी काही घाबरले वगैरे नव्हते हा,
फक्त जरा अस्वस्थ झाले होते एवढंच...
तो : काहीही
हा, नाही स्वत:शी बोल खोट हवं तर पण माझ्याशी बोलू नकोस, पकडली जातेस.... तुझे
डोळे तुझ्या शब्दांची साथ देत नाहीत.
मी :ओह...असे
का...!! पण तूही काव्यात्मक बोलून
गेलास की आता.
तो : तुझ्या
संगतीचा परिणाम ना... मग अजून काय होणार?
मी : ओह...
दोन दिवसांत माझ्या संगतीचा परिणाम झाला तर तुझ्यावर...
तो :
हाहाहा... तसं नाही गं, मस्करीत बोललो.. तू भांडणारच आहेस का माझ्याशी...
मी :
हा..हा.. हा.. (आश्यर्च) मी कुठे भांडत आहे तुझ्याशी. तूच माझी थट्टा करतोस
मघापासून.
तो : ओके..
ओके... आता नाही करणार तुझी थट्टा.. पण कसली लहान मुलांसारखी रुसतेस आणि गाल
फुगवून बसतेस. म्हणून मजा वाटते तुला चिडवायला...
मी : हो का!!!
तो :
हो...हा... हा... हा.... दोघेही खळखळून हसलो आणि दादर स्टेशन आले देखील.
किती लवकर
वेळ निघून जाते त्याच्यासोबत... मला त्याचं वेड लागलं होतं. नाही !! ते तर आधीपासूनच होतं ना... बहुदा आजार
वाढलाय माझा... माझं स्मित म्हणत होतं,
"ऐ वक्त
रुक जा, थम जा ठहर जा... वापस जरा दौड पिछे...
मैं छोड आयी, खुद को जहाँ पे, वह रह गया मोड
पिछे...
कहाँ मैं.. कहाँ तू... ये कैसा है जादू..."
स्वत:शीच गुणगुणत राहावसं वाटतं होतं. खूप छान सरत होते दिवस... एकदा आम्ही
दोघ ट्रेनचा दाराजवळच उभे राहिलो. छान वारा लागत होता आणि नकळत माझ्या ओठातून
गाण्याचे बोल निघाले.
मी :
तुम्हारी नजर क्यूँ खफा हो गयी, खता बक्ष दो, गर खता हो गयी...
हमारा इरादा तो कुछ भी ना था, तुम्हारी खता खुद
सजा हो गयी.
तो : सजा ही
सही, आज कुछ तो मिला है... सजा मे भी एक प्यार का सिलसिला है...
मोहब्बत का
कुछ भी अंजाम हो... मुलाकात की इबतेदा हो गयी...
मी : पुढे...
तो :
हम्मम्म... पुढे गाणं ऐकायचं आहे?
मी : हो,
म्हणजे अरे काल ना मैने प्यार किया सिनेमामधील अंताक्षरीमध्ये ऐकले होते मी हे.
छान वाटले पण मला तेवढेच येते ना.
तो :
हा..हा...हा.... बर भेट कधी मोकळ्या वेळेत मग ऐकवेन...
मी :
स्मित हास्य करत... बरं..बरं..
(खडुस
कुठचा... पण फार छान गातो.)
होळीचे दिवस होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मला
वाटले म्हणून मी ऑफिसला जाताना त्याच्यासाठी आईने केलेल्या पुरणपोळ्या घेऊन गेले.
पण तो आलाच नाही !!!! असं पहिल्यांदाच झालं होतं एवढ्या
दिवसांत की आमची भेट चुकली होती. जसं गोरेगांव स्टेशन पास झालं आणि तो आलाच नाही.
तेंव्हा मला काही सूचेनासे झाले होते. मग विचार केला की रंग खेळून दमला असेल
म्हणून आज ऑफिसला दांडी मारली असेल. तेवढ्या दिवसा पुरते मी स्वत:ला हे कारण
सांगून समजविले होते. पण दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ही तो आला नाही. आता मात्र
माझा जीव कासावीस झाला होता. आजही कसा नाही आला, असा अचानक काही ना सांगता नाहीसा
कसा होऊ शकतो हा, आजारी तर नसेल ना? काय झालं असेल काहीच कळत
नव्हते. बर त्याचा फोन नंबर ही मी घेतला नव्हता. काय करावं काहीच कळत नव्हते. दोन
दिवस झाले मी त्याला पाहिले नव्हते. नुसते तर्क लावून डोकं फुटायची पाळी आली होती.
तिसरा दिवस उजाडला होता. मग शेवटी ठरवले की जर आज हा नाही आला तर मी सरळ
गोरेगांवला जाणार आहे, त्याचं घर नव्हते माहीत मला पण आठही दिशांना त्याला
शोधण्याची माझी तयारी होती.
अनोळखी असते
साद परकी पण भास चाहुलीचा तुझ्याच वाटे,
ना माझा कुणी
तू ना मी तुझी तरीही जपले हे अनामिक नाते,
गुंतले माझे
मन तुझ्यात असे तुजवाचून जगणे अधुरे वाटे...
आज पुन्हा पहिल्या दिवसासारखी माझी नजर एक टक
फक्त ट्रेनच्या दाराकडे लागून राहिली होती. जसं गोरेगांव स्टेशन आले तसे लोकांच्या
गर्दीतून वाट काढत तो आत आला आणि मला पाहून नेहमीसारखा गोड हसला. पण मी हसायच्या
मूडमध्ये अजिबात नव्हते.त्याला पाहून माझा जीव भांड्यात पडल्यासारखे झाले होते खरे
पण मला ते दाखवायचे मात्र नव्हते. डोळे पाणावले होते. माझ्या डोळ्यांचं मलाच कधी
काही कळत नाही कुणास ठाऊक का सतत असे भरुन येतात. माझ्या शेजारी येऊन म्हणतो कसा,
तो : काय गं,
काय झालं अशी घुब्ब करुन रागात असल्यासारखी का दिसते आहेस, पुन्हा कोणी काही बोलले
का की घरी काय झालं?
मी : मी
तुझ्यावर चिडले आहे. तू आहेस माझ्या रागाचं कारण. दोन दिवस कुठे होतास तू. असा ना
सांगता कुठे गेलेलास, मला किती काळजी वाटत होती. बरं, कुणाला विचारावं असं कोणी नाही. तुझा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे
किंवा ऑफिसचा पत्ताही नाही. मग काय करावं मी, तुच सांग. तू आजारी तरी नसशील ना? ऑफिसची वेळ बदलली का? आणि माहित नाही काय काय विचार करुन करुन वेड लागायची पाळी आली होती. नशीब
माझं जे आज तरी आलास. तुला ना धरुन मारावंसं वाटत आहे मला..
तो : शांती
शांती शांती... अगं श्वास तरी घे, किती चिडशील. बोलताना दम नाही लागत का तुला...?
मी : तू
चेष्टा करु नकोस हा, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये.
तो : अग
सुट्टी होती ना होळीची दोन तीन दिवस म्हणून गावी जाऊन आलो. आणि अचानक प्लॅन झालं
गं मग कसं सांगणार मी तुला.
मी : ओह...
बरं..
त्याचं कारण
ऐकले आणि पुढे काही बोलावलेच नाही मला. मनात स्वत:चाच वागण्याचा विचार करु लागले.
मी जरा अतिरेकचं केला का?
पण त्या नंतर
तो दर वेळी कुठे जायच्या आधी मला सांगू लागला त्या दिवशी आमचे नंबर ही बदलले गेले.
ते एक बर झालं म्हणजे पुढे जीवाला घोर नको. पुढचा पूर्ण प्रवासात तो माझे रागाने
फुगलेले गाल बघुन हसत आणि मला चिडवत होता... दुष्ट कुठला...
थोडासा
खट्याळ पण जीवलग आहे.
ओठांवर चुकून
कधी कडू आलेच तरी मन संध्या आभाळ आहे.
क्षणात दु:ख
विसरावे एवढे निरागस भाव लपलेल्या डोळ्यांत आहे.
प्रेम...
कुणीही नकळत करु लागले असेच काही वेगळे तुझ्यात आहे...
फार छान मैत्री झाली होती आमच्यात. नव्याने
ओळखू लागलो होतो आम्ही एकमेकांना. मला त्याच्या सवयी, आवडी-निवडी, दिनक्रम सारेच
कळू लागले होते. तशी तर आधी ही माझ्या दिवसाची सुरवात त्याच्यापासून आणि शेवटही
त्याच्यापाशीच होत होता. पण तेंव्हा तो फक्त माझ्या विचारात असायचा पण आता तो
सत्यात आहे. आता माझ्या सकाळची सुरवात त्याला गुड मॉर्निंग म्हणून होते आणि
दिवसाचा शेवट त्याचा गुड नाईटने पूर्ण होतो. एकदा ऑफिसमधून घरी जात असताना अचानकच
आमची भेट झाली. शनिवार होता म्हणून दोघांचेही ऑफिसचे काम लवकर संपले होते.
मी : हाय...
तूही आज लवकर निघालास?
तो : हो...
शनिवार आहे ना...
मी :
हम्म्म्म....
पुढे काही
सुचलेच नाही. दोघेही शांतपणे वाट चालत होतो. जवळच कुठेतरी टपरीवर त्या प्रसंगाला
साजेस असेच गाणे वाजत होते. अवघ्या दोनच ओळी माझ्या कानावर पडल्या पण नकळत मी त्या
गुणगुणू लागले.
मी : का रे
दुरावा, का रे अबोला... अपराध माझा असा काय झाला.
तो : अपराध
ना माझा, अपराध ना तुझा,
शब्द झाले
परके, म्हणूंनी ओठांवर हा अबोला
मी : ए तू जे
बोलतोस ते ह्या गाण्याच्या पुढच्या ओळी आहेत का?
तो : नाही
गं. मी तर हे गाणं नीटसे कधी ऐकले ही नाही आहे, फक्त तुझ्या गाण्यावरुन जे तोंडात
आले ते बोललो
मी : ओके...
मग मी पण प्रयत्न करते.
तो :
हम्म्म्म.... कर कर.
काही
क्षणानंतर,
मी : ओठांची
कळी खोल जरा, मनातले सारे बोल जरा.
संपेल मग
मैलोनचा दुरावा, ना राहणार अन कोणताच अबोला.
तो : ए छान
होतं ग... थांब मी पण प्रयत्न करतो यमक जुळविण्याचा.
मी : हो...
ठीक आहे.
पुन्हा काही
वेळानंतर,
तो : बोलताना
तुजपाशी, उगा शब्द माझे का घुटमळती,
जे जमले ना
ओठांना, नजरा ती कोडी उलगडती.
मी :
हम्म्म... सुंदर... वाट बघ
तो :
हम्म्म्म.... लवकर बोल...
मी : मला
शब्दांत बांधण्याची, तुझी अदा निराळी
पण ही नजर
कोडी सुटण्याआधी, गाठ आयुष्याची सैल ना व्हावी.
भिती ही
जाणून घे, जी दडली आहे माझ्या धरी.
तो :
हम्म्म्म... थांब जरा.
मी : हा हा.
तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा घे... मी वाट बघते...(डोळा मारत)
तो : आहेत ही
युगायुगांची नाती, बंध जीवनाचे असे का तुटले???
हात घेऊनी
हात नेईल तुला दूर देशी, एका प्रश्नाचं उत्तर दे फक्त,
होशील का तू
माझी...?
हे ऐकूण
माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. काय बोलावं काहीच कळेना. तो चारोळीतून बोलून गेला पण
मला तर त्याच्या तोंडून नेहमी हेच ऐकायचे होते.
तो : का काही
सुचतय का पुढे...
मी :
(शब्दांचा, सर्व सराव करत अडखळतच बोलले)
ना... नाही... आणि बघ स्टेशनही आले. ट्रेन येईल थोड्या वेळात.
तो : हो खरंच
की. बोलता बोलता लक्षातच नाही आले.
थोड्या वेळात
ट्रेन आली. पुन्हा ती गर्दी. पण मी हरवले होते, अजून त्या धक्क्यातून सावरलेच
नव्हते. त्याच्या मनात तसे काही नव्हतेच. पण एका लहानशा खेळामध्ये नकळतच तो किती
मोठी गोष्ट करुन गेला. मी अजून ही विचारात होते तेवढ्यात त्याने हाक मारुन मला
भानावर आणले.
तो : चल मी
निघतो, माझं स्टेशन आले आहे. नीट जा घरी.
मी :
हम्म्म्म... बाय..
तो निघून
गेला आणि मी पुन्हा हरवले.
श्वास थांबला
क्षणभर माझा, हृदयाचा ठोका ही चुकला होता.
शब्द तुझा तो
भेटून मनाला, काळजात घाव करुन रुतला होता.
निरुत्तर
केलेस ज्या प्रश्नावर मला, उत्तर त्याचे ततू जाणतचं होतास.
तरीही का असा
तूत अजाण होऊन, कोड्यात मला गाठत होतास.
सोमवार पर्यंत मी स्वत:ला सावरले होते, मधला सुट्टीचा एक दिवस मी स्वत:ला
समजावण्यात घालवला होता की तो जे काही बोलला तसा त्याचा हेतू अजिबात नव्हता आणि हे
तू चांगलेच जाणतेस, म्हणूनच तुझा लाईफचा तो एक क्षण शक्य तितक्या लवकर विसरुन जा.
सकाळी ट्रेनमध्ये तो आला. त्याची ती गोड स्माईल घेऊन, तर सर्व नॉर्मल आहे असं
दाखवण्यासाठी त्याला हाय केले.
मी : हाय...
तो : हाय...
तुझा रविवार कसा होता?
मी : ठीक..
नेहमीसारखाच.. आणि तुझा?
तो :
नेहमीसारखाच...
मी : छान
ना.. काल संध्याकाळी किती वाजता आलास घरी क्रिकेट खेळून... तुला भानच राहात नाही
ना खेळताना.. मग आहे, रात्री पाय दुखत होते गं.
तो :
हाहाहाहा... तू कसे ओळखलेस, खरंच पाय दुखत होते गं. पण मी काय करु. मी क्रिकेटसाठी
पूर्ण वेडा होतो.
मी : मला
माहीत आहे... मला माहीत आहे. मग आता कसे आहेत?
तो : ठीक
आहेत.
मी :
अहाहाहहा.. मूर्ख
काही दिवसांनी मला त्याच्या वागण्यात थोडा
फरक जाणवू लागला. तो मला दुर्लक्ष करत नव्हता पण मी त्याच्या नजरेआड होत चालली
होते. सतत आपल्याच विश्वात दंगलेला असायचा किंवा फोनवर मॅसेज करत तरी असायचा.
त्याचं वागण बघून मला वाटले की तो प्रेमात तर पडला नाहीये ना कुणाच्या... मी
विचारले ही तसे त्याला "तू प्रेमात पडला आहेस का?"
अबोल तर तू
नेहमीच होतास, पण आता पुरता निशब्द झालास,
आपल्या
विश्वात रमलेला असतोस, कधी अचानक परका भासतोस.
जणू तू तो
नाहीस ज्याला मी माझा म्हणत होते, मान्य आहे मला की तसे खरे कधीच नव्हते.
पण एक नाते
होते आपल्यात, आपलेपणाचे. मनाला जोडणारे अन मनातले सारे जाणणारे
ज्याला
कोणतेच बंधन नव्हते, आता कुठेतरी हरवले आहे ते.
अचानक हे काय
वेगळेच सुचले हिला, हेच मनात वाटत असेल ना तुला
पण माझ्याही
मनात एक प्रश्न आहे, अडला विचारु का???
खरं सांगशील
तू कुणाच्या प्रेमात पडला आहेस का???
तो : मला
नाही माहीत, कदाचित तुझीच नजर बदलली असेल माझ्याकडे बघण्याची.
मी : माझी
नजर नाही, तुझा स्वभाव बदलला आहे सध्या.
तो : तुला
असं वाटण्याचं कारण कदाचत तुझी माझ्याकडून असणारी एखादी अपेक्षा असू शकते.
मी :
अपेक्षा...! तुला
नक्की काय म्हणायचे आहे.
तो : तू
प्रेम करतेस माझ्यावर???
मी : ....
हो... कदाचित हो... म्हणून मला त्याचसाठी असुरक्षितता जाणवत असावी.
तो : ओके.
काय बोलून
गेले मी.... काही वेळ शांतच राहिलो दोघेही.
मी :
हम्म्म्म्म.. मला माफ कर. मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही कळत मला की मला
तुझ्यासाठी ज्याची जाणीव होते ते नक्की काय आहे. पण तुझा हा तुटकपणा मला सहन होत
नव्हता रे... माझं काही चुकले असेल तर मला माफ कर... सॉरी... मला फक्त तुला
गमवायचे नव्हते. माझ्यासाठी एक गोष्ट करशील??
तो :
हम्म्म्म... बोल.
मी : आपण तू
मला विचारलेल्या प्रश्ननंतरच माझ उत्तर विसरुन जाऊया.
तो : ओके. मी
वचन देतो... आपण नेहमी कायमचे मित्र राहू.
काही
दिवसानंतर नेहमी सारखेच आमचे बोलणे चालले असताना तो मला म्हणाला
तो : मला
तुला काहीतरी सांगायचं आहे. पण आता नाही संध्याकाळी निवांत सांगेन. ऑफिस सुटल्यावर
भेटू.
मी : ठीक
आहे.
दिवसभर लक्षच
लागत नव्हतं कशात. काय सांगणार आहे तो संध्याकाळी. त्याचा स्वरही गंभीर होता. कधी
कधी त्याच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही मला... संध्याकाळी भेटलो तेंव्हा तो
पुन्हा थोडा गंभीर होता. मी एकटक त्याला पहात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा
प्रयत्न करत होते. काही वेळानंतर दीर्घ श्वास घेत तो माझ्याकडे न पाहताच म्हणाला,
तो : आय एम
इन रिलेशनशीप ( मी नाते संबंधामध्ये आहे.)
एक कर्कश्य आवाज
यावा असे माझ्यात काहीतरी तुटले होते. वेगात एक लोकल आमचा समोरुन तिचा हॉर्न वाजवत
जात होती, माझ्यासाठी सार जग स्थिर झाले होते.
माझे शब्द
तुझ्यापासून होते, माझे सूरही तुझ्यापासून होते.
तू वाट बदलली
अन मी वाट चुकले,
अडखळून लेखणी
शाही विखुरली, विसरुन सरगम सुरांची तार तुटली.
काय प्रतिक्रिया द्यावी, काहीच कळत नव्हते.
एका क्षणात डोळ्यांत पाणी साचले होते. तो अजूनही माझ्याकडे पाहत नव्हता. ते एक बरं
झालं होतं. कदाचित त्याला माझं अपराधी असल्यासारखं वाटत असेल म्हणून तो माझ्या
नजरेला नजर देणं टाळत असावा. मग मी ही त्याची नजर चुकवून डोळे पुसले आणि त्याला
म्हणाले,
मी : अभिनंदन
!!! अरे इतकी गोड बातमी ही आणि
अशी थंडपणे काय सांगतो आहेस आणि कधी झालं हे...
तो जरा
गोंधळलाच असेल. पण माझी प्रतिक्रिया ऐकून त्याच्या चेहऱ्यावरची उदासिनता नाहीशी
झाली होती.
तो :
सोमवारी... माझ्या ऑफिसमध्ये आहे ती. खूप गोड आहे. सोमवारी तिला प्रपोज केलं आणि
ती हो म्हणाली.
मी : अरे
व्वा... छान !!!...
नांव काय तिचं?
तो :
अनामिका.
काय नशीब आहे माझं. इतकी वर्ष ज्याला
मनात साठवले होते त्यावर माझा काहीच हक्क राहिला नव्हता. तसा तो हक्क कधी नव्हताच माझ्याकडे पण... पण एक गोष्ट मनापासून मान्य करते की यात
दोष कुणाचाच नव्हता. ना माझा, ना केशवचा आणि ना त्या नांव नसलेल्या अनामिकेचा...
सार काही फक्त घडत गेलं होतं.
तू आधारासाठी
हात दिला होतास, मी आयुष्य भराची साथ समजले.
चूक माझीच
होती म्हणूनच, तुला न मिळवताच गमवून बसले.
मी : पार्टी
घेतली असती तुझ्याकडून आत्ताच पण उशीर झाला आहे ना खूप. चल निघूया आपण.
तो : हो,
चल...
त्याच्यासमोर तर मी खूप खंबीरपणे असे दाखवले
की मला खूप आनंद झाला आहे. पण मी पुरती बिथरले होते. रात्रभर खूप रडले. हुंदके
आवरताच येत नव्हते. कुणाच्याच प्रश्नाचं उत्तर नव्हते माझ्याकडे. कित्येक दिवस
कुणाशी धड बोलतही नव्हते. कुणाशी बोलण्यासाठी मी भानावर तर असले पाहिजे ना, शुध्द
हरपली होती माझी.
भेट समजून जो
क्षण मी मनात जपला होता, ज्यामुळेच देवावर पुन्हा विश्वास मी केला होता.
आज वाटते तो
क्षण आयुष्यात का आला होता, माझ्या स्वप्नांचा खेळ का देवाने मांडला होता
पण एक दिवस ठरवले की जे व्हायचे होते ते
झाले. नाहीतरी मी त्याला प्राप्त करु शकत नाही हे मी केंव्हाच स्वीकारुन झाले होते
आणि कधी ना कधी हे मला ऐकावे लागणारच होते. काही दिवसांनी ऑफिसला जायला निघाले पण
पुन्हा पहिल्या दिवसासारखी संभ्रमात पडले की कोणत्या डब्यात चढावं, कसे सामोरे
जाणार होते मी पुन्हा त्याच्या... त्याला पाहून माझे रडू आवरले गेले नाही तर ???? पण मनाची पक्की तयारी केली आणि त्याला
सामोरे गेले. तो जसा ट्रेनमध्ये चढला तसा नेहमी सारखीच त्याची नजर माझा ओळखीचा
चेहरा शोधत होती. त्याची नजर माझ्यावर पडताच मी त्याच्याकडे बघून स्मित हास्य
केले. माझ्याजवळ येत तो म्हणाला,
तो : कशी
आहेस?
मी : छान,
आणि तू?
तो : मी
सुध्दा ठीक आहे. दु:खी आहेस का? माझा राग येत असेल ना तुला?
मी : नाही
रे... दु:खी का असेन आणि तुझ्यावर का म्हणून रागवेन मी...
तो : मग इतके
दिवस ऑफिसला का नाही गेलीस, त्या दिवसानंतर नाहीशीच झाली होतीस.
मी : अरे तसे
काही नाहीये. काही दिवस गावी गेले होते. योगायोग म्हणजे यावेळी माझं तुझ्यासारखच
झालं. अचानक नियोजन झालं आणि आम्ही रात्रीच निघालो म्हणून तुला सांगताही आले नाही
आणि गावी नेटवर्क प्रॉब्लेम आहे रे. मग पुन्हा तिथूनही कळवता आले नाही.
तो :
ओहहहह... मग तुझे डोळे का सुजले आहेत??? पाणावलेलेही दिसत आहेत. माझ्याशी नजरा का चोरत आहेस???
काळीज तुटले
की रडणे सोपे असते, पण खरी परीक्षा तर
तेंव्हा असते.
जेंव्हा खोटे
खोटे हसावे लागते अन् त्याच्या काळजाच्या तुकड्यांमध्ये,
अश्रूंनाही
लपवावे लागते.
मी : काहीही
हा केशव, तुला असं वाटत आहे कारण तू माझी काळजी करतोस. त्याबद्दल आभारी आहे पण मी
ठीक आहे. अरे जे झालं ते घडणार होतच फक्त त्यावेळी मी तयार नव्हते. आणि डोक दुखत
आहे, आणि डोळ्यांचं म्हणशील तर काल रात्रीच आलो ना आम्ही परत तर झोप पूर्ण झाली
नाहीये म्हणून डोकं दुखत आहे आणि म्हणूनच
माझा चेहरा तुला असा वाटत असेल. नको करुस माझी काळजी. मी मजेत आहे. आणि हो मी
तुझ्यासाठी खूप खूश आहे, कधी तरी भेटव मला तुझ्या अनामिकेशी... आवडेल मला ... आणि तुमची कथा लिहायलाही आवडेल.
मी बरी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी किती
बोलून गेले होते मी पण पटले शेवटी त्याला. कधी कधी खोटे बोलावे लागते,
समोरच्याला त्रास होऊ नये म्हणून.
तो : हो...
नक्की.
माझे शब्द अन
त्या शब्दांचा ओघ तुला नेहमीच कळत होता.
ठाऊक होते
तुला की माझ्या मनातले भाव कधीच खोटे नव्हते.
अन् मलाही
माहित होते की तुझ्या मनातली परी मी कधीच नव्हते.
तरीही माझे
हे वेडे मन आहे अजूनही याच प्रश्नात गुंतलेले,
तुला क्षणभर
ही कधी, माझ्यावर प्रेम करावेसे नाही का वाटले...
त्या दिवसानंतर आमच्यात सार नीट सुरळीत रहावं हा एवढाच प्रयत्न मी करु लागले. मला त्याला गमवायचे नव्हते, फक्त मित्र म्हणून का असेना पण मला तो माझ्या आयुष्यात हवा होता त्याला म्हणालेली ना, म्हणूनच लिहिली ही माझ्या प्रेमाची अधुरी कांदबरी आणि त्याच्या प्रेमाची सुरवात...
- लेखिका : Kally (कॅली)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा