मंगळवार, ३ मार्च, २०२६

2651. स्वप्नपूर्ती

     आयुष्यभर नोकरी करून भाड्याच्या घरात राहून आयुष्य घालवलेल्यांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न असते आणि ते सर्वांचे पूर्ण होतेच असं नाही. ज्यांचे झाले ते नशीबवान, ज्यांचे काही ना काही कारणाने राहिलेले असेल ते हिरमुसले होऊन आपले राहिलेले आयुष्य कंठत राहतात. आपलं हे स्वप्न पुर्ण व्हावे यासाठी कुणी मदतीला आलं आणि त्यांच्या सहाय्याने आपली स्वप्नपूर्ती झाली तर भरून नक्कीच भरून पावल्यासारखे वाटेल नाही का? अशाच एका स्वप्नपूर्ती ची ही कहानी. 
-----------------------------------------------------------------------------------------------
“सर, ओळखलंत का मला?” सदानंद सरांच्या घरात शिरत राजने विचारले.
“राज, अरे शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी ना तू, तुला कसे विसरणार मी. तू कसा आहेस? कुठे असतोस? काय करतोस? लग्न केलंस का?"
“अहो, किती प्रश्न विचारतात? तुम्ही काही तोंडी परीक्षा घेताहेत का? राज आता तुमचा माजी विद्यार्थी आहे आणि तुम्ही देखील निवृत्त झाला आहात,” सावित्रीबाईंनी सरांना वास्तवाची जाणीव करून दिली.
“सर, मी पुण्याला एका आयटी कंपनीत काम करतो. ३ वर्षे अमेरिकेत होतो. एका मित्राच्या लग्नासाठी काल इथे नाशिकला आलो. तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आज मुद्दाम थांबलो. सर, एक विचारू?”
“विचार ना. प्रश्न विचारण्याची तुझी सवय अजूनही आहे रे. विचार, विचार.”
“सर, तुम्हाला काही टेन्शन आहे का?”
“राज, किती मनकवडा रे तू? खूप नाही पण आहे थोडंसं टेन्शन. अरे, बंगल्यात राहावं अशी सावित्रीची खूप कधीपासूनची इच्छा आहे. नोकरी करताना ते शक्य नव्हतं पण आता निवृत्त होताना पीएफ, ग्रॅच्युइटी, शिल्लक रजा वगैरेचे चांगले पैसे मिळाले. विचार केला, करूया बायकोची इच्छा पूर्ण.”
“सर, खूप छान विचार करताहेत तुम्ही,” राज म्हणाला. “पण मग यात टेन्शन ते काय?”
“अरे, एक बंगला पसंत पडला, पण माझी पुंजी कमी पडते रे.”
“सर, किती कमी पडतात?”
“थोडेथोडके नाही, पुरे एक लाख कमी पडतात.”
“सर, इतकंच ना? मग मी देतो ना तुम्हाला एक लाख.”
“राज, तू खरंच देशील?” म्हणताना सरांना गहिवरून आलं.
“सर, तुमच्या मदतीमुळेच तर मी शिकू शकलो. मी लगेच पैसे ट्रान्स्फर करतो. मला तुमचा क्यूआर कोड द्या.”
“राज, मला म्हाताऱ्याला कुठलं जमतं रे ते?”
“ठीक आहे सर, मी पैसे एटीएम मधून काढून देतो तुम्हाला. सर, कुठे घेताहेत तुम्ही बंगला? सगळी कागदपत्रं नीट बघितली असतीलच तुम्ही.”
“आग्रा रोडला आहे, आणि तुझ्या वर्गातला तो त्यावेळचा सगळ्यांत बेशिस्त मुलगा वरद मला हा बंगला मिळवून देतोय. हल्ली हेच काम करतो तो. आणि बरंका, पैसेही चांगले मिळवतो तो. नुकतीच नवी कोरी चारचाकी घेतली त्याने.”
“सर, पण तरी कागदपत्रं व्यवस्थित बघायला हवे. आयुष्याची पुंजी लावताय तुम्ही.”
“राज, अरे तो माझा विद्यार्थी आहे म्हणून माझा फायदा करून देतोय. बरं, देतोस ना मला एक लाख रुपये? पैसे परत मिळण्याची काळजी करू नकोस. तीन महिन्यांनी माझी एलआयसी पॉलिसी मॅच्युअर होतेय, दोन लाख मिळतील मला. अगदी त्याआधी मला वरून बोलावणं आलं तर, त्यापेक्षा जास्त पैसे सावित्रीला मिळतील. सावित्री, दे बरं राजचे पैसे परत.”
“सर, काय बोलतात तुम्ही? अहो सर, आम्हाला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे. खूप दिवस तुम्ही रहा, अगदी ठणठणीत.”
“आलोच मी तासाभरात,” म्हणत निघालेला राज दोन तास झाले तरी परतला नाही.
“अहो, मी देईन पैसे म्हणणारे खूप असतात, पण प्रत्यक्ष पैसे द्यायची वेळ आल्यावर ते माघार घेतात.” कमी बोलणाऱ्या पण माणसं पटकन ओळखणाऱ्या सावित्रीबाई म्हणाल्या.
“सावित्री, राज त्यातला नाही. येईल तो. कदाचित एटीएम बंद असेल.”
रात्रीचे आठ वाजले तरी राज आला नाही.
“सदा, वरदला विचार आपण एक लाख दोन महिन्यांनी दिले तर चालेल का?”
“मला नाही वाटत चालेल म्हणून, पण विचारतो मी त्याला उद्या सकाळी,” सदानंद म्हणाले.
नेहमीच्या सवयीप्रमाणे दोघांनी गरम दूध-हळद घेतले आणि ते कॉटवर अंग टाकणार तेवढ्यात सदानंदांचा फोन वाजला. “सावित्री, राजचा फोन असणार. बहुतेक तो उद्या सकाळी पैसे आणून देईल.”
तो फोन राजचा नव्हता तर वरदचा होता. वरदने जे सांगितलं ते ऐकून सदानंद आणि सावित्रीबाईंना खूप मोठा धक्का बसला.
“सर, त्या मॅडम बंगला तुम्हाला द्यायला नाही म्हणताहेत.”
“वरद, अरे पैशाची सोय झाली. तुला तुझ्या वर्गातला राज आठवतो का? तो देतोय मला एक लाख रुपये.”
“सर, राज कधी भेटला तुम्हाला?”
“आजच आला होता तो. मी पैशाचं विचारल्यावर लगेच हो म्हणाला रे तो. तुम्ही माजी विद्यार्थी किती प्रेम करतात रे माझ्यावर.”
“सर, तुम्ही सगळ्या जगाकडे चांगल्या नजरेने पाहातात. बाहेरचं जग तसं नाही हो सर. अहो, तुमच्या त्या राजनेच घात केला. तो बंगला राज घेणार आहे. तुमच्या हातातोंडाशी आलेला घास तो बळकावतो आहे.”
कुठे वरद आणि कुठे राज? दोघेही विद्यार्थीच. एक फायदा करून देतोय तर दुसरा स्वतःचा फायदा करून घेतोय. 
रडवेल्या झालेल्या सदानंदांना सावरत सावित्रीबाई म्हणाल्या, “सदा, तू आयुष्यभर फक्त शिकवत राहिलास रे पण माणसांना ओळखणं मात्र शिकला नाहीस.”
सावित्रीबाईंची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही याची सदानंदांना खंत लागली.
दुसऱ्या दिवशी राजने तीन-चार वेळा फोन केला पण सावित्रीबाईंनी सदानंदांना फोन घेऊ दिला नाही. “कशासाठी घ्यायचा त्याचा फोन? मदत करायचा मोठा आव आणला त्याने.” चिडलेल्या सावित्रीबाईंनी राजचा नंबर ब्लॉक केला.
बंगल्याचे स्वप्न विसरायचा प्रयत्न सावित्रीबाई करत होत्या पण सदानंदांनी मात्र स्वतःला इतका त्रास करून घेतला की त्यांनी अंथरूण पकडले. शिकवताना कधीही न थकणारे सदानंद सर, आता स्वतःच्या मनाच्या ओझ्याने थकले होते. अनेक विद्यार्थी घडवणारा हाडाचा शिक्षक आज हरला होता. वाईट म्हणजे त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यानेच त्यांचा विश्वासघात केला होता.
     या गोष्टीला साधारणतः महिना झाला. दारावरची बेल वाजली. सावित्रीबाईंनी दरवाजा उघडला.
“सरांना बरं वाटत नाही, तू नंतर ये,” सावित्रीबाई म्हणाल्या.
“सावित्री, अगं कोण आहे?” क्षीण आवाजात सदानंदांनी विचारले.
“तुमचा आवडता विद्यार्थी राज आहे. एक महिन्यापूर्वी एटीएममधून पैसे काढायला गेला होता तो आज उगवला,” सावित्रीबाई कुत्सितपणे म्हणाल्या.
“पाठव त्याला आत,” सदानंद म्हणाले.
“सर, मी हे आणले आहे…”
“राज, आता तुझ्या पैशाचा काही उपयोग नाही रे. माझ्यासाठी ते कागदासमान आहेत.”
“सर, हे पैसे नाहीत, कागदच आहेत. तुम्ही बघा तर.”
“कसले कागद?”
 “सर, तुम्हाला घ्यायचा होता त्या बंगल्याचे कागद.”
“राज, तो बंगला तुला लखलाभ होवो. तू रहायला येणार की भाड्याने देणार?”
“सावित्री, मी नाही पण माझ्या विद्यार्थ्यांने तुला आवडलेला बंगला घेतला आहे. तोंड गोड कर त्याचं. राज, एक विनंती करू? एक दिवस, फक्त एक दिवस माझ्या सावित्रीला तिथे राहू दे,” म्हणताना सदानंदांचा आवाज रडवेला झाला होता.
“सर, असं का म्हणतात तुम्ही? तुम्ही आणि बाई कायम तिथे रहा.”
“भाडं किती द्यायचे आम्ही?” राजच्या हातावर साखर ठेवत कुत्सितपणे सावित्रीबाईंनी विचारले.
“बाई, घरमालक का कधी भाडं देतो स्वतःला, स्वतःच्या घरात राहायला?”
“राज, काय म्हणायचे काय तुला? कसली असंबद्ध बडबड करतोस? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?”
“बाई, तुम्ही आणि सर काय बोलतात ते मला समजत नाही. मी कितीदा फोन केला पण सरांनी फोन उचलला नाही. किती काळजी वाटत होती मला.”
“राज, का काळजी करतोस आमची? आम्ही कोण रे तुझे?”
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बाईंनी दार उघडले. “कोण तुम्ही? कोण हवे तुम्हाला?” समोर उभ्या असलेल्या आधुनिक तरुणीला बाईंनी विचारले.
“मी नेहा. तुम्हाला हवा असलेला बंगला माझा आहे. त्याचे पैसे घ्यायला आले आहे.”
“राज, बघ बाबा. या बाई कसले पैसे मागतात ते.”
नेहाला आत नेत राज म्हणाला,
“सर, ही माझी मामेबहिण. तुम्हाला हव्या असलेल्या बंगल्याची मालकीण.”
“राज, तो बंगला आम्हाला हवा होता पण आम्ही तो विचार मनातून काढून टाकला कारण वरदने सांगितले की तुला तो बंगला घ्यायचा आहे. आता तुझ्या बहिणीचा बंगला तो. ती आम्हाला कशाला देईल? ती तुलाच देणार ना,” म्हणताना सरांचा राग मावळला होता.
“सर, त्या दिवशी मी पैसे काढायला एटीएममध्ये गेलो तेव्हा नेहाचा फोन आला. तिने बंगला विकत असल्याचे सांगितले. ‘नेहा, इतका छान बंगला का विकतेस?’ मी विचारले. ‘राज, बंगल्याचे टायटल क्लिअर नाही. त्यामुळेच मी बंगला विकतेय. एजंटने एका निवृत्त माणसाला गळाला लावले आहे. दोन लाख कमिशन घेणार आहे तो.’ सर, वरद तुमची फसवणूक करत होता.
मी नेहाला सांगितले की माझे सर तो बंगला विकत घेणार आहेत. नेहा ओशाळली. मीच तिला सांगितले की वरदला सांग, राज बंगला घेतोय म्हणून. सर, मी बंगल्याचे टायटल क्लिअर करून घेतले. आता तुम्ही बंगला खरेदी करा, अगदी निर्धास्तपणे. नेहाला आता दोन लाख रुपये कमिशन द्यावे लागणार नाही म्हणून ती तुमच्याकडून दोन लाख रुपये कमी घेईल.”
हे सर्व ऐकून सर आणि बाई अवाक झाले. कुठे राज आणि कुठे वरद. दोघेही विद्यार्थीच ना. एक स्वतःचा फायदा करतोय तर दुसरा सरांचा फायदा करतोय.
कृतकृत्य होऊन सरांनी राजला आणि बाईंनी नेहाला प्रेमाने जवळ घेतले. अपुरे राहिल असे वाटणारे स्वप्न आता पूर्ण होणार होते.
“सर आणि बाई, चला आपण बंगला पाहून येऊ या,” राज आणि नेहा म्हणाले.
बंगला अगदी दुरूनच उठून दिसत होता, नुकत्याच केलेल्या रंगरंगोटीमुळे. बंगल्यापाशी पोहोचताच सरांना आणि बाईंना मोठा धक्का बसला कारण बंगल्याला नाव होते - “स्वप्नपूर्ती”.
“नेहा, रंगकामाचा खर्च मी देईन,” सर म्हणाले.
“सर, त्याची काहीच आवश्यकता नाही. राजने वरदला खडसावले आणि वरदने चूक मान्य करत चुकीचे प्रायश्चित्त म्हणून रंगकाम स्वखर्चाने करून दिले,” नेहा हे सांगत असतानाच वरद आला.
राज आणि वरद दोघेही विद्यार्थी होते - एक चूक दाखविणारा आणि दुसरा चुकीचे प्रायश्चित्त घेणारा.
आयुष्यभर स्वप्नं पहायला शिकवणाऱ्या शिक्षकाचं, अखेर एक स्वप्न पूर्ण झालं होतं. स्वप्नपूर्तीचा आनंद देणाऱ्या त्या जोडीकडे प्रेमाने पाहताना सरांचे आणि बाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि नेहाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो स्वप्नपूर्तीचा भावनिक क्षण अगदी अचूक टिपला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...