संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दारावरची बेल वाजली. सुनेत्रा ऑफिसमधून आल्यावर, आंघोळ करून, नुकतीच बाथरूममधून बाहेर आली होती. यावेळी कोण आलं बरं? सुधीरला, तिच्या नवऱ्याला, बँकेतून घरी यायला नऊ तरी वाजायचे. अमेय, तिचा लेकही त्याच सुमारास यायचा कंपनीतून.
ती कपडे जरा नीट करत दार उघडायला गेली. दाराची साखळी अडकवून तिनं बाहेर डोकावलं आणि तिचे हातपायच गळले. दारात पोलीसचा युनिफॉर्म घातलेली एक व्यक्ती उभी होती. मनात नाही नाही ते विचार येऊन गेले एका क्षणात. तिच्या त्या संभ्रमित मुद्रेकडे बघत ती व्यक्ती म्हणाली, "मॅडम घाबरू नका अशा ! अहो मी चंदू शिंदे, ओळखलं का मला?" डोक्यावरची टोपी काढून त्या माणसाने आता हातात घेतली होती. पण सुनेत्राला काही ओळख पटत नव्हती.
" एम. आय. डी. सी. च्या ब्रँचचा सखाराम आठवतोय का? कँटिनवाला! मी त्याचा भाचा, चंद्रकांत शिंदे, त्याच्या बहिणीचा मुलगा." सखारामची ओळख सांगितल्यावर तिनं दार उघडलं आणि त्याला घरात घेतलं. सावधगिरी म्हणून दार उघडंच ठेवलं.
चंद्रकांतनं आपलं ओळखपत्र दाखवलं, तिच्या मनातली शंका दूर करण्यासाठी. "मॅडम, मी चंदू. तुमच्या मदतीमुळेच माझ्या जीवनाला दिशा मिळाली. कुलकर्णी काकांकडचं काम तुम्हीच मिळवून दिलं होतं तेव्हा."
कुलकर्णीकाकांचा संदर्भ ऐकला आणि सुनेत्रा ला चंदूची ओळख पटली. "अरे, कसं ओळखणार मी तुला? एवढासा बच्चा होतास तेव्हा, आणि आता हा असा दांडगोबा! बरं थांब हं, आधी पाणी आणते तुला प्यायला. बस सोफ्यावर आरामात. आता इथे जेवूनच जायचं हं!" असं म्हणत सुनेत्रा किचनकडे वळली.
चंदूची पहिली भेट झाली, तो प्रसंग जसाच्या तसा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. १९९४-९५ मध्ये ती डोंबिवली एम. आय. डी. सी.तल्या एल. आय. सी. च्या शाखेत अधिकारी होती. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे उशिरापर्यंत थांबून काम करणं, हे समीकरण वर्षानुवर्ष ठरलेलंच. नऊ वाजता जेवणाचे डबे आले होते. 'जरा वेळानं जेवायला उठू' असं सगळे म्हणाले खरे, पण साडेनऊ होत आले, तरी कोणी उठलं नव्हतं.
"सचिन, अजित, नेहा अरे जेवायला या ना! सरिता, विजय, तुम्हीपण या बघू. काम होत राहील, आधी सगळ्यांनी गरम-गरम जेवून घ्या." सुनेत्राच्या आवाजावरून आता उठायला हवं हे समजून, सगळीजणं पटापट जेवायला आली.
रात्रीच्यावेळी हाॅटेलचं मसालेदार जेवण नको वाटायचं. म्हणून घरगुती जेवण मागवलेलं. त्यामुळे सगळे पटापट, छान जेवून, परत कामाला भिडले. हात धुवायला म्हणून सुनेत्रा बेसिनकडे निघाली, एवढ्यात तिचं लक्ष दाराजवळच उभ्या असलेल्या चंदूकडे गेलं. चंदू दहा-बारा वर्षाचा, सखारामनं चार-पाच दिवसांपूर्वी गावाहून येताना, बरोबर आणलेला मुलगा. तो मोठ्या आशेने त्या डब्यांकडे बघत होता.
सुनेत्रानं त्याला विचारलं, "बाळा, जेवलास का तू?" त्यानं नुसती मान हलवली नकारार्थी आणि तिला कससंच झालं, 'एवढंसं पोर अजून उपाशी आहे आणि आपण सगळे पोटभर जेवलो' या विचाराने.
ती त्याला हाताला धरून आत घेऊन आली. एका प्लेटमध्ये डब्यात राहिलेलं जेवण नीट वाढून त्याला म्हणाली, "जेवून घे बाळा." पण तो प्लेट घेऊन," मामासंगट जेवतो" असं म्हणत कँटिनच्या छोट्या रूमकडे गेला.
पुढचे तीन-चार दिवस तर खूपच ताण होता कामाचा. पण तिने आठवणीने चंदूला, सगळ्यांबरोबर जेवायला दिलं होतं. चंदूही सखारामच्या मागे शेपटासारखा फिरत होताच. क्लोजींग झालं आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जरा उसंत मिळाली. त्यावेळी सुनेत्राने सखारामकडे चंदूबद्दल चौकशी केली.
कुडाळजवळचं आडेली हे सखारामचं गाव, कोकणात. पन्नास-साठ घरं जेमतेम असतील तिथं. सखू, त्याची बहिण, गावातच दिलेली. साप चावल्याचं निमित्त झालं आणि दगावली, दोन वर्षांपूर्वी. चंदू तिचाच मुलगा.
चंदू च्या बाबानं सहा महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं. तोही जेमतेम पस्तिशीचाच आणि घरातलं पहायलाही बाईमाणूस हवंच ना ! पोट भरण्यापुरती शेती होती थोडी. शिवाय घरच्या ओसरीवर चंदूच्या बाबानं छोटंसं किराणा दुकान थाटलं होतं. चारदोन आंबा, फणस, नारळ अशी झाडं असतातंच कोकणात घरोघरी. खाऊन-पिऊन सुखी होते झालं!
चंदूची सावत्र आई काही दुष्ट वगैरे नव्हती. पण गावात चौथीपर्यंतच शाळा होती. म्हणून पुढं शिकण्यासाठी सखारामच त्याला डोंबिवलीत घेऊन आला होता. म्युन्सिपालटीच्या शाळेत नाव घातलं होतं त्यानं चंदूचं! जूनपासून चंदू तिथं शिकणार होता. सध्या सुट्टी होती म्हणून मग मामासोबत ऑफिसात येत होता चहाचे रिकामे ग्लास उचलण्यासारखी छोटी-मोठी मदत करत होता. दोन वर्षे जमेल तशी सुनेत्राही त्याला मदत करत राहिली; कधी वही-पुस्तक, कधी कपडे, अशी !
चंदूही दरवर्षी साठ टक्क्यांच्या आसपास मार्क मिळवत होता. सुनेत्राबद्दल त्याला आपुलकी निर्माण झाली होती. एखाद्या दिवशी तिनं सुट्टी घेतली तर त्याला करमायचं नाही. सुनेत्राच्या ओळखीचे कुलकर्णी काका तसे सधन होते. त्यांची डोंबिवलीत मिठाईची दोन दुकानं होती. स्वतःचा बंगला होता. त्यांचे वडील पंचाहत्तरीचे. त्यांना वाचनाचा नाद, पण आता नजर कमजोर झाल्याने वाचणं जमत नव्हतं. शिवाय एकट्यानं कुठं बाहेर जाणंही त्यांना जमत नव्हतं. कुलकर्णी काकांना त्यासाठी एखादा मदतनीस हवा होता.
सुनेत्रानं चंदूबद्दल त्यांना सांगितलं, तर त्यांनी त्याला आपल्याकडेच ठेवून घ्यायची तयारी दाखवली. त्याचा शाळेचा खर्च काही त्यांना जड नव्हता. सखारामचीही परिस्थिती बेताचीच होती. सुनेत्राने 'चंदूचं भलं होईल' हे सुचवल्यावर तो या गोष्टीला तयार झाला.
त्याने चंदूच्या आई-बाबांनाही राजी केलं. गावातच असल्यामुळे मामा-भाच्यांना कधीही भेटता येणार होतंच. चंदूची अशी सोय झाली आणि त्याच वर्षी सुनेत्राची प्रमोशन मिळून भोपाळला बदली झाली. त्यामुळे ती तिकडे गेली.
सहा महिन्यानंतर तिच्या नवऱ्यानेही आपली बदली भोपाळला करून घेतली आणि मग पुढची दहा वर्षे ते भोपाळलाच राहिले. अमेय पुण्यात हाॅस्टेलला होता, इंजिनियरिंग काॅलेजला. मग डोंबिवली शाखेशी आणि चंदूशीही काही संपर्क राहिला नाही तिचा.
इकडे रोज चंदू सकाळी शाळेत जाण्याआधी आजोबांना पेपर वाचून दाखवायचा. शाळेतून आला की जेवून, तो आजोबांच्या खोलीत बसून गृहपाठ करून टाकायचा. संध्याकाळी जवळच्या बागेत त्यांना फिरायला न्यायचा. त्याआधी किंवा रात्री त्यांना हवं असेल ते पुस्तक वाचून दाखवायचा. त्यामुळे आजोबांशी त्याची गट्टी जमायला वेळ लागला नाही. आजोबाही त्याला गणितं सोडवायला मदत करू लागले. अभ्यासातली काही अडलं तर समजावून सांगायचे. इंग्रजीची स्पेलिंग त्याच्याकडून छान पाठ करून घेतली त्यांनी. अधून-मधून इंग्रजीतही बोलायचे, त्याला सराव व्हावा यासाठी.
या सगळ्याचा परिणाम म्हणून चंदूची अभ्यासात छान प्रगती होऊ लागली. एस. एस. सी. ला तर त्याने पंचाहत्तर टक्के मार्क मिळवले. कुलकर्णी काकांनाही आनंद झाला त्याच्या प्रगतीचा. त्यांनी त्याला डोंबिवली काॅलेजला अॅडमिशन घेऊन दिली. त्याला 'भाषा' विषयांची गोडी असल्याने आर्ट्सला अॅडमिशन घेतली. बारावीची पहिली सहामाही संपली आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने आजोबा गेले.
चंदूला खूप दुःख झालं. पण त्याही परिस्थितीत कुलकर्णी काकांनी त्याला धीर देऊन, आधार दिला. बारावीची परीक्षा झाल्यावर मात्र त्याने अडेलीला, घरी जायचं ठरवलं. कुलकर्णी काकांनी त्याचं रेल्वेचं रिझर्वेशन तर करून दिलंच, शिवाय दहा हजार रूपयेही दिले बाबांच्या उपचारासाठी.
त्याचे बाबा तिकडे आजारी झाले होते. त्यांच्या यकृताला सूज आली होती. ते बिछान्याला खिळले होते. चंदूने आईच्या बरोबरीने त्यांची सेवा केली. कुडाळच्या हाॅस्पिटलमध्ये नेऊन सर्व तपासण्याही करून घेतल्या. आठ दिवस ते अॅडमिट होते, पण उपचारांचा काही उपयोग झाला नाही आणि ते गेले.
चंदूवर आईची आणि घराचीही जबाबदारी येऊन पडली. बाबांच्या आजारपणात शेतजमीन गहाण ठेवून आईनं पैसे उभे केले होते. ते कर्ज चुकवण्यासाठी जमीन विकायचं ठरवलं. घरखर्च चालवण्यासाठी चंदूला हातपाय हलवणं भागच होतं. त्या लहानश्या गावात काम मिळणं कठीणच होतं. दुकानातून चार पैसे मिळत होते पण त्यात भागणं शक्य नव्हतं.
जून महिन्यात बारावीचा रिझल्ट लागला. चंदू पंचावन्न टक्के मिळवून पास झाला. त्याच सुमारास पेपरात पोलीस भरतीची जाहिरात वाचनात आली आणि चंदूनी अर्ज भरला. नशिबाने साथ दिली आणि सर्व चाचण्या पार करून चंदूला नोकरी मिळाली. पहिलं पोस्टिंग रत्नागिरीला झालं आणि नंतर मात्र महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. त्याची बदली होत राहिली. मधल्या काळात लग्नही झालं. हेडकाॅन्स्टेबलचं प्रमोशन ही मिळालं. बारावीनंतर काॅलेज सुटलं खरं, पण मुक्त विद्यापीठाच्या द्वारे त्याने आता पदवी परीक्षाही दिली या वर्षी. मागच्या आठवड्यात बदलीची आॅर्डर आली आणि चार दिवसांपूर्वी तो डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनला हजर झाला. पूर्वीचं सारं आठवलं आणि सुनेत्राच्या सोसायटीत जाऊन तिची चौकशी करावी, म्हणून तो आज आला होता आणि चक्क तिच्या भेटीचा अलभ्य लाभ झाला होता. मागच्या वर्षीच सुनेत्रा आणि तिचे मिस्टर मुंबईला आले होते परत आणि डोंबिवलीच्या जुन्या घरीच रहात होते. गप्पा मारता मारता एकीकडे सुनेत्राचा स्वैपाक झाला होता. सुधीर आणि अमेयही दाखल झाले होते घरी. त्यांची ओळख करून दिली एकमेकांशी आणि मग जेवणंही पार पडली.
सुनेत्रा, चंदूला सोडायला जिन्यापर्यंत आली होती.
चंदू तिला म्हणाला, "काल कुलकर्णी काकांच्या घरी गेलो होतो. काका-काकू तर गेले दोन वर्षांपूर्वी. त्यांची दोन्ही मुलं परदेशात आहेत. त्यांनी बंगला विकून टाकलाय. तिथे आता सातमजली टाॅवर होतोय. त्या घराच्या आठवणीच राहिल्यात आता. असो. मॅडम, तुम्ही माझ्या घरी नक्की या हं. पत्ता पाठवतो व्हाटसअप वर."
"अरे हो येईन की. पण कोण कोण असतं तुझ्या घरी? गप्पांच्या नादात मी विचारलंच नाही बघ!"
"इतके दिवस आईपण होती, सहा महिन्यांपूर्वी गेली ती. आता माझी बायको आणि पाच मुलं असतात घरी."
"पाच मुलं?" सुनेत्रानं पटकन् विचारलं.
"माझी स्वतःची एकच मुलगी आहे. दोन मुलं आणि दोन मुली दत्तक घेतली आहेत. परिस्थितीमुळे पोटासाठी चोरी करताना पकडली गेलेली आणि गुन्हेगारीचा शिक्का लागलेली.
माझ्या बायकोनंही त्यांना आपलं मानलंय. तिला माझी आधीची कथा माहित आहे ना ! कोण जाणे, मला तुम्ही आणि कुलकर्णी काकांसारखी देवमाणसं भेटली नसती तर माझ्यावरही त्यांच्यासारखी वेळ येऊ शकली असती. त्या ऋणातून थोडंसं तरी उतराई व्हायची इच्छा आहे माझी. चला येतो मी." चंदू भरकन् जिना उतरून खाली गेला.
सुनेत्रा भारावल्यागत तिथेच खिळून उभी राहिली. गालावर ओघळणारे अश्रू पुसण्याचंही भान तिला उरलं नव्हतं.
©प्रणिता खंडकर.
9833479845.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा