आपल्या थरथरत्या हातांनी शंभराची नोट पुढे करत. त्या आजोबांनी कापर्या आवाजात दुकानातील माणसाकडे, एक लाल गुलाब मागितला.
"आज एक बी गुलाब शिल्लक नाय राह्यला आजोबा. लयच इक्री झाली आज. पोरं - पोरी निस्ती तुटून पडल्याली लाल गुलाबा वं."
"अरे बापरे... हो का?... बरं बरं"
आजोबांनी आजूबाजूला पाहिलं. मग वर डोक्यावरच्या सुर्याकडे पाहिलं. तिन्ही बाजूंना टळटळीत उन्हाशिवाय काहीही नव्हतं. रखरखीत रस्ते वाफा सोडत होते. आजोबांनी पुन्हा एकदा वर पाहत फडफडत्या डोळ्यांनी... हातातल्या काठीसकट हात जोडले, नी पुटपुटले ते काहीतरी. तेवढ्यात त्या दुकानातूनच लाल गुलाबाची एक पाकळी... हवेनी उडत येऊन, नेमकी त्यांच्या उपड्या हातावर चिकटली. आजोबांनी ती पाहिली. आपल्या हातातील काठी बाजूला खाली ठेवत, त्यांनी दुसर्या हातानी ती पाकळी अलगद चिमटीत पकडली. आणि जवळ आणत तिच्यावर, आपले ओठ टेकवले. क्षणात काहीतरी आठवून, ती पाकळी पुन्हा दूर केली त्यांनी नी म्हणाले.
"साॅरी गं बाई... टोचली असेल नाई माझी खुरटी पांढरी मिशी. बरं धन्यवाद हो तुला... ह्या वर्षीही मला गुलाब दिल्याबद्दल. काय म्हणालीस?... अगं ठिकेय की... फुल ना फुलाची पाकळी... ती वेळेवर मिळाल्याशी कारण. दरवर्षी ह्याच दिवशी... मी तुझ्यातर्फे गुलाबाचं फुल विकत घेऊन, माझं मलाच ते देतो. तुझ्या... तुझ्या शेवटच्या इच्छेप्रमाणे. गेली पन्नास वर्ष चाललेली ही प्रथा, म्हंटलं आज मोडतीये की काय. आपल्या लग्नाला अवघा एक महिना बाकी असतांना... त्या दिवशी मी असाच रस्त्याच्या त्या बाजूला उभा होतो, आणि तू हातात एक गुलाब पकडून माझ्याकडे येतच होतीस की... की एका भरधाव गाडीने उडवलं तुला. क्षणार्धात घडलेल्या त्या प्रकाराने मी, पुरता हादरलोच होतो. पण स्वतःला सावरत, धावतच आलो तुझ्यापाशी. तू रक्ताच्या थारोळ्यात पडलेलीस. तुझ्या हातात मात्र तसाच घट्ट धरुन होतीस, तू तो लाल गुलाब. मी तुझं डोकं मांडीवर घेतलं... तेव्हा मला तो गुलाब देत इतकंच म्हणालीस की, 'दरवर्षी आजच्या दिवशी एक गुलाब, माझ्यावतीने तुला घेत जा... अ हं... माझ्यातर्फे स्वतःला देत जा'... आणि डोळे मिटलेस तू. तेव्हापासून प्राणपणाने पाळतोय तुझा शब्द. आणि ते पन्नास गुलाब, अजूनही जपलेत बरं मी. सुकलेत, चपटे झालेत, काही करडे तर काही फिकट पडलेत... पण आहेत. आता ही पाकळीही जपेन हो, अगदी तशीच... तळहातावरच्या फोडासारखी."
एवढ्यात आजोबांच्या खांद्यावर, एक तळहात विसावला येऊन... गोरापान, सुरकुतलेला.
"मिळाला का हो गुलाब दरवर्षीप्रमाणे? चलायचं मं आता झालं असेल तर? लेकाने - सुनेने तंबी देऊन पाठवलंय ना, की उन्हात फार वणवण नाही करायची म्हणून. चला मग आता"
"हो... हो... चल... आणि बरं का... पुन्हा एकदा तुझे आभार, की तू आम्हा दोघांचा हा वेडेपणा. आपल्या लग्नाची गेली एकोणपन्नास वर्ष जपतीयेस."
आजी फक्त हसल्या. आजोबांचा हात कोपरातून धरत, चालू लागल्या त्या... 'ह्या गुलाबाच्या फुलाचा आपण, कधीच काटा व्हायचं नाही' हे जे त्यांनी लग्नाच्या पहिल्या वर्षीच ठरवलं होतं... ते आणिक एक वर्ष पाळल्याच्या समाधानात, तोषात.
🌹♥️ ---सचिन श. देशपांडे ✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा