'का गं नाराज दिसतेस?' फोन ठेवल्याबरोबर अमन ने साक्षीला विचारले.
'काही नाही हो कोणीच यावर्षी भारतात यायला तयार नाही,' कसंनुसं हसत ती बोलली.
''हे बघ साक्षी मुलं मुलांचं जमत नसेल तर आग्रह करू नकोस. ती सर्व आपापल्या कामात व्यस्त असतील. तसंही आजकाल त्यांना घरी यायला आवडत नाही आणि आपणही त्यांच्या कडे जास्त दिवस राहू शकत नाही. गेलो तरी त्यांच्या गोष्टीत आपण लुडबुड केलेली त्यांना आवडत नाही. नातवंडांना पण लहान होती तोवर आपला लळा होता.आता त्यांना टोकलेलं, काही सांगितलेले आवडत नाही त्यामुळे आता आपणच दोघेच उरलोय एकमेकांचे. आजपर्यंत ज्या गोष्टी आपल्या करायच्या, बघायच्या राहून गेल्या त्या आता आपण करूया. तुला कागदाच्या बाहुल्या बनवायच्या होत्या ना.. तर आता निवांतपणे बनव... त्यांचे क्लासेस घे.. मी तुला मदत करेल. अगं आता आपण आपलं म्हातारपण छान एंजॉय करायचं.' त्यांनी तिला समजावले.
काय काय करायचे , कुठे फिरायला जायचे..दोघ मिळून ठरवू लागले होते. सगळं छान चाललं होतं आणि एकाएकी ताप आल्याचं निमित्त झाले. क्वचित आजारी पडणारे अमन असे आजारी पडले की महिनाभर दवाखाना करूनही त्यातून ते बरे होऊ शकले नाही. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांचं ब्रेनडेड झालंय ते कोमात गेलेत तेव्हा तर आभाळच कोसळले तिच्यावर. ज्या नातलगांसाठी अमन आयुष्यभर धावले त्या नातलगांनी कारणं सांगून काढता पाय घेतला. ज्या भावाबहिणींसाठी कष्ट उपसले होते ते पण आज सावलीलाही उभे नव्हते. तीन मुलं आणि एक मुलगी होती. ते सगळे बाहेरच्या देशांत वास्तव्याला. तिने मुलांना कळवले पण एकाचे ही येणं जमत नव्हते. या कठीण प्रसंगी तिच्या सोबत फक्त तिच्या दोन जिवाभावाच्या मैत्रीणी होत्या.
डॉक्टरांचे उपाय संपले होते. व्हेंटिलेटरवर मांसाचा गोळा होऊन अमन पडून होते. काय करावे तिला सुचत नव्हतं. दोन दिवसानंतर तिने कठोर निर्णय घेतला. ती डॉक्टरांशी बोलली. त्यांना दोघांनी केलेल्या देहदान संकल्पाची माहिती दिली. अमनचे सुस्थितीत असलेले अवयव आणि शरीर मेडिकलला दान केले. शेवटचं त्याला डोळेभर बघून ती जड पावलांनी घरी आली. मैत्रीणींनी मुलांना कळवले. आता नाईलाजाने जावंच लागेल म्हणून मुलं यायला निघाली.
महिनाभर दवाखान्यात तोंड न दाखवलेले नातलग त्यांच्या मरणाची बातमी ऐकून घरी आले. त्याचे शरीर का दान केले? याचा जाब विचारून तिला हैराण करु लागले. तिच्यावर आलेल्या दुःखाची जाणीव ठेवण्यापेक्षा तिने त्याचं देहदान करून किती वाईट केले हे तिच्या सासरचे ओरडून ओरडून बोलू लागले. तिच्या माहेरच्यांना पण ही बाब रुचली नव्हती त्यामुळे ते ही तटस्थ उभे होते. ती आत गेली. एक कागद घेऊन बाहेर आली.
'हा आहे देहदान केल्याचा संकल्प. अमन आणि मी आम्ही दोघांनी केलेला. त्यांची स्वतःची शेवटची इच्छा होती देहदान करण्याची ती मी केली. तुम्ही त्यांच्या शेवटच्या घटकेत दवाखान्यात आले असते तर तुम्हालाही कळले असते. पण तुम्ही कोणीच आला नाहीत म्हणून मला एकटीलाच निर्णय घ्यावा लागला.'
'तु आम्हाला कळवले का नाही?' अमनचा मोठा भाऊ बोलला.
भाऊ, अमन आजारी होते, त्यांना ऍडमिट केले तेव्हा सगळ्यांना फोन केला होता. तुम्ही येऊ बघून गेलात. त्यांची हालत दिवसागणिक खराब होत होती तेव्हाही मी सगळ्यांना फोन केला पण माझा फोन कोणीच उचलला नाही की कॉल बॅक पण केला नाही... आज जेव्हा सगळं संपलं तेव्हा आलात. मला जे योग्य वाटले ते मी केले.' तिचा इशारा सगळ्यांकडे होता.
'आपल्याकडे शरीराला अग्नी देण्याची परंपरा आहे.. नेत्रदान पर्यंत ठीक होतं... संपूर्ण शरीर दान करणे म्हणजे अविचारच आहे.' अमनचा लहान भाऊ बोलला.
'भाऊ, त्यांना हे अग्नी देणे प्रकार मंजूर नव्हता. त्यांनी ते वेळोवेळी स्पष्टपणे मला सांगितलेही होते.जे त्यांना मंजूरच नव्हते ते मी कसे करणार.'
आलेले सगळे शांत बसले. नेहमीच्या प्रकाराला फाटा बसल्याने आता काय करायचे? प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
शेवटी सासरच्या पैकी एक वयोवृद्ध गृहस्थ बोलले.
'अगं तिसरा दिवस तरी करशील ना?'
'काका त्यांनी लिहून ठेवलंय की माझा कुठलाच विधी करायचा नाही. त्याऐवजी एक ठराविक रक्कम दरवर्षी कोणा गरजूला देण्यात यावी.'
'अगं पण आता तो कुठं आहे बघायला?'
'ते जेव्हा बघायला होते तेव्हा कोणीच आजूबाजूला दिसले नाही त्यांच्या. आता ते नाही म्हणून मी त्यांच्या विचारांशी प्रतारणा करायची काय?' तिच्या सडेतोड प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. शेवटी सगळे गप्प झाले.तिच्या भावांनी सगळ्यांच्या जेवणाची सोय केली. जेवण करुन सगळी निघून गेली. तिस-या दिवशी सकाळी मोठा प्रत्यूश, नंतर सारंग, मुलगी राशी आणि सगळ्यात छोटा प्रज्वल सगळी एकामागे एक आली. सारंग आपल्या बायको मुलासह आलेला तर बाकीचे सर्व एकटेच आलेले.
मुलं आले ते जाण्याची घाई सोबत घेऊनच. ज्या वडिलांच्या जीवावर सोनेरी आयुष्याचे सुख उपभोगले त्या वडिलांच्या आजारपणात साथ द्यायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. आता वडिलांपश्चात आपली आई आता एकटी कशी राहील, कसे सगळं सांभाळेल याची साधी जाणीव त्यांच्या ठायी नव्हती. दोन दिवस कसेतरी त्यांनी काढले. तिस-या दिवशी..
'आई, मला अर्जंट काम आलेलं आहे त्यामुळे मला उद्या रात्रीच निघावे लागेल. प्रत्यूशदादाकडून सगळं समजावून घेशील काय करायचे ते,' छोटा प्रज्वल रात्री बोलला.
'मी चार पाचच दिवस आहे तोवर जेवढं जमेल तेव्हढे करून देईल. नंतर मामाला सांगेल.' प्रत्यूश बोलला.
'मला तर फारसं काही कळत नाही त्यामुळे मी इथे राहून काय उपयोग. मी पण परवा रात्री निघून जाईल.' राशी बोलली.
'आई, मी आहे दहा दिवस नंतर विनिताच्या घरी जाणार तिथूनच मी परत जाणार.' सारंग नेही आपले अपडेट दिले. ती गप्प बसून ऐकत राहिली. एक एक करत तिघे निघून गेले. आज शेवटचा मुलगा सारंग ही निघाला.
'आई, तु इकडे एकटी राहशील तर आम्हाला तुझी काळजी राहिल त्यापेक्षा तु आमच्या सोबत आली असती,' सारंग बोलला खरा पण विनिशाने त्याला डोळ्याने केलेली खुण सविताच्या नजरेने टिपली.
'बेटा, इकडे काही महत्त्वाची कामे आहेत ती आटोपली की येईल मी.'
'बरं जेव्हा तुला याव वाटेल मला सांग मी रिझर्व्हेशन करून देईल.'
'ठीक आहे बेटा.'
'काही लागलं तर फोन करशील.'
'हो.'
ठीक आहे येतो आम्ही.'
आज्जी तु येशील ना लौकर.' लहानगा विहान तिला आपल्या लहान लहान हातांची मीठी मारत बोलला.
'हो रे बाळा येणार मी,' त्याचा पापा घेत बोलली. कॅब आली. ती नजरेआड होईपर्यंत ती हात हलवत उभी राहिली. आत आली. पंधरा दिवस गजबजलेलं घर आज एकदम रिकामं रिकामं झालं. ती सोफ्यावर बसली. मान मागे टेकवली. डोळे पाझरू लागले. इतके दिवस अडवून ठेवलेले अश्रू आज बेफाम वाहू लागले. हुंदके देऊन तिने मनसोक्त रडून घेतलं. अमनचं अवेळी जाणे, नातेवाईक, आणि पोटच्या मुलामुलींची कोरडी वागणूक सगळं सगळं अश्रुंवाटे आज बाहेर पडलं. कितीतरी वेळ सुन्न मनाने ती तशीच बसून राहिली. उठून काही करावं तर पायात त्राण नाही. जेथे मनचं खचलंय तेथे शरीर तरी काय साथ देणार. बाहेरच्या अंधाराने घरात शिरकाव केला तेव्हा तिने उठून लाईट लावला. अंगात थोडी कणकण जाणवत होती. स्वयंपाकघरात जाऊन पाणी प्यायली. दारावर ठकठक झाली. तिने दार उघडले. दारात तिच्या दोन मैत्रीणी डबा घेऊन उभ्या होत्या. ती दोघींना बिलगून धाय मोकलून रडली. दोघी शांतपणे तिच्या पाठीवर हात फिरवत बसल्या. बराच वेळ कोणी कोणाशी बोलले नाही. तिघीही समदुःखी. काय बोलावं, कसं समजावं सगळंच कठीण. सगळ्यांनी दूर लोटले तरी आपण एकमेकींना कधीच दूर लोटायचे नाही असं मनात तिघींनी ठाम ठरवून टाकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा