'हॅलो, खुशी प्लीज तुला वेळ असेल तर आज तु येऊ शकतेस का?' रेखाचा गळा दाटलेला स्वर ऐकून खुशी ने लगेच विचारले.
'काय झाले रेखा?'
'प्लीज आज वेळ काढते का थोडा.' तीने परत अजीजीने विनवणी केली तसं खुशीने म्हटले,' ठीक आहे.. मी लगेच निघते. कुठे भेटायचे?'
'माझ्याच घरी ये.'
तु ऑफिसला नाहीस का?'
'नाही.'
'ओके. मनिषा येतेय का?
'हो गं तु पण ये.'
'ठीक आहे.पोहचते मी.' म्हणत तिने कॅब बुक केली. टीम लिडरला तब्येत बरी नाही म्हणून सांगितले. एरवी ती अशी कधीच सुटी घेत नसे म्हणून त्याने विचारले,' काही काळजीचं कारण असेल तर मी ड्रायव्हरला सांगतो तुला ड्रॉप करेल तो.'
'नाही.. बस थोडं तापासारखं वाटतंय..काही सिरीयस नाही मी कॅब बुक केलीय.' म्हणत ती बाहेर पडली. थोड्या वेळाने कॅब आली आणि ती बसली. चाळीस मिनिटं लागतील. पोहचायला.
काय झाले असेल तिला...
आपल्याला का असे तातडीने बोलावले....
तो अनिल तर द्यायला आला नाही ना परत...
एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात गर्दी करू लागले.
तिला रेखा सोबतची पहिली भेट आठवली. नुकतीच ती ऑफिसला बदली होऊन आली होती. तीस बत्तीसची, ठेंगणी, निमगोरी, मोठे मोठे बोलके डोळे. बघताक्षणी आपल्याला ती आवडली होती. तिचे बोलके डोळे आपल्याला जरा जास्तच आवडले होते. लंच ब्रेक मध्ये ती तिच्या टेबलवरच बसली होती. मी स्वतः जाऊन तिच्याशी ओळख केली होती. नंतर जेव्हा ती माझ्या रूमवर आली तेव्हा माझी रुममेट असलेल्या मनिषाशीही तिची ओळख झाली. ही ओळख पुढे घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली आणि हळूहळू एकमेकींच्या जीवनात डोकावणे सुरू झालं. काय असतं ना आपल्या मनातील काही गोष्टी ज्या आपण कधीच कोणासोबत शेअर करू शकत नाही त्या आपण जीवाभावाच्या मैत्रिणी सोबत आपण सहज शेयर करू शकतो. मनातल्या गोष्टी शेअर केल्यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका तर होतोच पण त्याचबरोबर ब-याच वेळा डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी जीवाभावाची मैत्री उपयोगी पडते.
माझीच गोष्ट सांगते एक वर्षापूर्वी मला एक मुलगा फेसबुक वर भेटला. आम्ही मेसेज वर बोललो, नंतर भेटायला लागलो. दिसायला उमदा, बोलायला मधाळ. जवळपास चार महिने आम्ही भेटलो. या चार महिन्यांत मनाने आणि शरीरानेही जवळ आलो. त्याचे आईवडील एका रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडल्याचे त्याने सांगितले होते. एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबात मोठं असं कोणी नव्हतं. त्याचा सरळ साधा स्वभाव मला आवडला. सगळं व्यवस्थित होतं म्हणून मग मी त्याच्या मागे लग्न करूया.. लग्न.करुया.. म्हणून लागली. तो काहीना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. त्यानंतर तो मला टाळू लागला, माझा फोन उचलायचा नाही आणि एक दिवस त्याच्या एका मित्राकडून कळलं की त्याचं लग्न झालेलं आहे. फक्त टाईमपास म्हणून त्याने माझा वापर केला. पण मी तर खरं प्रेम केलं होतं. हा शॉक माझ्यासाठी फार मोठा होता. मी अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेली.घरी मी कोणाला काय आणि कसे सांगणार होती. रेखा नवीनच बदली होऊन आली होती पण माझ्या या कठीण काळात ती माझ्या खूप जवळ आली. मनिषा आणि रेखा या दोन मैत्रिणींनी मला सावरले. नाहीतर मी काय केले असते काय माहित.
रेखाच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार झालेला तिने आम्हाला सांगितला होता.ती अगोदर ज्या ठिकाणी रहायची तिथे तिची ओळख एका मुलाशी झाली. तो मुलगा तिच्यापेक्षा चार पाच वर्षे लहान होता. सुरवातीला तिने त्याला खूप दिवस टाळलं पण हळूहळू ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. तो लग्न करायला तयार होता पण त्याच्या घरचे अजिबात तयार झाले नाही. एकतर ती वयाने त्याच्या पेक्षा मोठी होती आणि त्यातल्या त्यात दुस-या जातीची पण होती. त्याच्या आईने आकाश पाताळ एक केलं आणि त्याचं लग्न त्यांच्याच जातीतील मुलीशी लावून दिले. लग्न होऊन महिनाच झाला होता तर तो तिच्याकडे आला.. खूप रडला स्वतःचं डोकं भिंतीवर आपटले, स्वतःच्या हातावर चाकूने घाव केले. ती घाबरून गेली आणि त्याच्या या बेफाम वर्तनाला बळी पडली. तो त्याच्या लग्नानंतरही तिच्यासोबत पुर्वीसारखाच राहण्याचा प्रयत्न करू लागला. तिने विरोध केला तर मी आत्महत्या करून घेईल असे म्हणायचा. स्वतःला इजा करून घ्यायचा त्यामुळे ती त्याला शरण जायची. तिचे आईवडील तिचं लग्न जमवू बघत होते पण हा तिला धमकी द्यायचा की तु लग्न केलेस तर मी आत्महत्या करेल.. शेवटी त्याच्या वागणूकीला कंटाळून तिने स्वतःची बदली इकडे करून घेतली. गेले वर्षभर ती निवांत आयुष्य जगत आहे. लग्नही जमल्यासारखेच आहे आणि आज अचानक असं काय झाले असेल... कार थांबली आणि ती विचारचक्रातून बाहेर पडली. बाहेर मनिषाची स्कुटर दिसली.
चला मनिषा पोहोचलीय मनात तिला बरं वाटले.तिने दाराची बेल वाजवली. दार मनिषा ने उघडले. डोळ्यांनीच खुणावत तिला काय झाले म्हणून विचारले.
'अनिल.. खुसफुसत ती बोलली.
'वाटलंच होतं. ती पण खुसफुसली आणि आत आली. रेखाचे डोळे सुजलेले होते. कदाचित खूप रडली असेल.
नजर शुन्यात हरवलेली.
"खुशी,अनिलचा आला होता आज... परत तेच सर्व हवं आहे त्याला. हिने नाही म्हटले तर म्हणाला की तुझे फोटो वायरल करेल, तूझ्या ऑफिस समोर जीव देईल.मनिषा बोलली.
'हे अतिच झाले आता. स्वतःच्या घरच्यांना समजवता आले नाही त्याला आणि लग्न केलं... मग कशाला आता हिच्या आयुष्यात वादळ उठवतो आहे.'
'घरात सगळं मिळत असले तरी बाहेर तोंड मारण्याची सवय असते काही लोकांना. रेखा आज जर तु याला बळी पडली ना तर तु परत त्याच दलदलीत रुतून पडशील. एकदा जर का तु पध्दतशीरपणे ही सिच्युएशन हॅंडल केलीस ना तर नंतर मग तो परत कधी इकडे येण्याची हिंमत करणार नाही.'
'काय करू गं तेच तर समजत नाही आहे.' रेखाच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले.
'असं रडून होणार नाही.. काही तरी ठोस करावेच लागेल.. ?' खुशी बोलली. सगळे गप्प बसून विचारात हरवले. गॅलरीत जाऊन मनिषाने कोणाला तरी फोन केला. बराच वेळ बोलून आत आली.
'हे बघा एक उपाय सुचवला आहे माझ्या आतेभावाने.' दोघींच्या प्रश्नार्थक नजरा तिच्यावर खिळल्या. तिने सविस्तर सांगितले.
'बघूया ना गं.. बुडत्याला काठीचा आधार.. काय म्हणता.' मनिषा म्हणाली.
'चालेल,' खुशी बोलली. थोडा दिलासा आला सगळ्यांच्या चेहऱ्यावर.
'रेखा, केव्हा येणार आहे म्हणाला तो.' मनिषाने विचारले.
'शुक्रवारी रात्री येणार आहे.. आणि इथे दोन दिवस राहणार आहे. मला विनाकारण इथे बदनाम करेल गं तो.' रेखाचा चेहरा काळजीने काळवंडला.
'रेखा, असं हारून कसे चालेल. यावेळेस हार मानलीस ना तु तर मग तो तुला आयुष्यभर छळेल.. या सारखी गिधाडे समाजात भरपूर आहेत यांच्या पासून आपण नेहमी सावध रहायला पाहिजे... एकदा तु चुक केली आता परत नको करूस... यावेळी गिधाडाची मान अशी मुरगळायची की नंतर तो तुलाच काय कोणालाही त्या देणार नाही.' मनिषा ठाम स्वरात बोलली.
शुक्रवारच्या अगोदर मनिषा एकदोनदा काही जणांना घेऊन रेखाच्या घरी येऊन गेली. शुक्रवारी सायंकाळी रेखाला अनिलचा फोन आला.
' डार्लिंग मी वर्षभरापासून तुझा शोध घेत होतो फायनली भेटलीस... तु मला विसरली असशील पण मी तुला विसरलेलो नाही.. माझं ऐकलं नाही तर मी काहीही करू शकतो..कळलं का काहीही.. येतो रात्री नऊ वाजता... छद्मीपणे हसत तो बोलला आणि फोन कट केला. रेखाचं हृदय वेगाने धडधडू लागले. सर्वांगाला घाम फुटला, गळा सुकून गेला. इतक्यात परत फोन वाजला. घाबरून तिने बघितले तर मनिषाचा फोन होता.
'हॅलो.'
'हॅलो, रेखा घाबरू नकोस आम्ही तुझ्या घराच्या आसपासच असणार.. काय बोलायचे आहे ते तुला माहीत आहे ना?'
'ह...ह..हो,' रेखा चाचरत बोलली.
'द्याट्स लाईक ए ब्रेव्ह गर्ल.' म्हणत फोन ठेवून दिला. रात्री पावणेदहाच्या सुमारास दाराची बेल वाजली. रेखाला धडकी भरली पण मनिषा चे वाक्य तिच्या कानावर आदळले..
आज हिंमत नाही केलीस तर... तिने चेहेरा शांत ठेवून दार उघडले.
'माझीच वाट बघत होतीस वाटते.. म्हणत त्याने तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तशी ती मागे आली.
'ओहो... मेरी बिल्ली मुझीसे म्याँव.. मागे वळून त्याने दार बंद केलं.
'तुला काय वाटले मी तुला शोधू शकणार नाही.. तो जवळ येत बोलला.
'अनिल, तुझं लग्न झालंय आता हे सगळं थांबव प्लीज.'
मी इथे ही तुझी किटकिट ऐकायला आलो नाही.' म्हणत जबरदस्तीने तिचा हात पकडून तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात दाराची बेल वाजली तसा तो थांबला.
'इतक्या रात्री कोण आले?' त्याने एकदम हळू आवाजात विचारले.
'माहित नाही.'
'जो पण आहे त्याला लवकर घालव.' म्हणत तो पडद्याआड उभा राहिला. रेखाने दार उघडले. दारात पोलीस उभे.
'रेखा मॅडम, तुम्ही ठीक तर आहात ना? एक सायको चोर या दिशेने आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.'
'अं...मी....'
'रेखा मॅडम काय झाले? तुम्ही घाबरलेल्या दिसताय?'
'का.. का...काही नाही इन्स्पेक्टर.'
'नाना, घराची झडती घ्या बरं.' ऐकताच अनिल बाहेर आला.
'तुम्ही कोण?' इन्स्पेक्टरांनी कडक आवाजात विचारलं.
'मी.. मी.. यांचा नवरा आहे.' अनिल जे सुचेल ते बोलला.
'तुम्ही आणि यांचे पती....अहो या तर इन्स्पेक्टर राजेशच्या धर्मपत्नी आहेत. नाना पकडा याला.. हाच तो सायको चोर दिसतोय... नाना पकडायला धावला तसा अनिल त्याला हिसका मारून दाराबाहेर पळाला.. पोलीस त्याच्या मागे धावले.
'रेखा काय झाले.. पोलीस का आले होते?' समोरच्या काका काकुंनी विचारले.
'अहो एक चोर घरात घुसला होता. बरं झाले ऐनवेळी पोलीस आले म्हणून वाचले मी.' रेखा बोलली. मनिषाच्या आतेभावाने नाटकात काम करणा-या त्याच्या मित्रांच्या मदतीने रचलेले हे छोटेसे नाटक चांगलेच कामात पडले कारण त्या दिवसानंतर अनिल कधीच रेखाच्या वाटेला आला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा