मंगळवार, ३ मार्च, २०२६

2642. दुःख कुरवाळले तर अजून वाढतं.

 'मिनल...मिनल... आईचा आवाज ऐकून मिनल हातातले पुस्तक बाजूला ठेवून धावत आली.
 'काय झालं आई?'
'अगं जरा ही भाजीची वाटी समोरच्या काकूंना नेऊन देतेस का?
 'हो दे.' म्हणत तिने आईच्या हातातली वाटी घेतली.
 'आणि हो गप्पा करत बसू नकोस. लवकर येशील.' 
 'मग तुच घेऊन जा.' ती लटका राग दाखवत आईला म्हणाली.
 'अगं बाबांचा नाश्ता आणि टिफीन अजून व्हायचा आहे नाहीतर मीच गेले असते. तुझी परीक्षा आहे ना पुढच्या आठवड्यात म्हणून म्हटले.. जा आणि लवकर ये,' आई म्हणाली.
'चल येते देऊन मी पटकन,' म्हणत मिनल वाटी घेऊन निघून गेली.
 'काकू... काकू... फाटक उघडून आत येत तिने आवाज दिला.
 'ये गं मिनल आत ये.. काकूंनी आवाज दिला. तशी ती आत गेली. काकू किचनमध्ये काम करत होत्या. 
 'काकू, आईने भाजी पाठवली आहे.'
'कशाला गं तुझी आई त्रास घेते.' म्हणत त्या उठल्या आणि तिच्या हातातली वाटी घेऊन स्वयंपाक घरात गेल्या. ती पण त्यांच्या मागे मागे गेली.काकूंनी भाजी दुसऱ्या वाटीत काढली आणि वाटी स्वच्छ धुवून पुसून घेतली. 
'आज ना माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्याला शेवईची खीर  खुप आवडते म्हणून मी बनवली होती.' बोलत सगळी खीर वाटीत टाकून त्यांनी वाटी तिला दिली. 
'काकू अहो सगळी खीर कशाला... तुमच्या साठी ठेवा थोडी.'
'मला गोड चालत नाही गं. मी तुला आता आणून देणारच होते तर तुच आलीस.'
'दादाला माझ्याकडुन शुभेच्छा द्याल काकू.' 
'नक्की. मी सकाळी फोन केला होता पण त्याने उचलला नाही. बिझी असेल बहुतेक.' बोलतांना गळा दाटून आला त्यांचा.
'काकू तुम्ही व्हॉट्सॲप वर मेसेज पाठवून द्या.. दादा वाचेल तर कॉल करेल.' ती त्यांना समजावत म्हणाली.
'आजकाल मुलं फार बिझी झालीत गं.' क्षीण हसत त्या बोलल्या.
मिनल त्यांच्याशी गप्पा मारत बसली. ती घरी आली तर त्यांना फार बरे वाटायचे. घरात तिचा चिवचिवाट रहायचा.. थोडा वेळ तरी घराला जीवंतपणा यायचा. काही वेळ गप्पा करून ती जायला निघाली.
'काकू निघते मी.' 
'बरं बेटा... येत जा तेव्हढचं मनाला बरं वाटतं.'
'काकू, एक गोष्ट बोलू तुम्हाला राग तर येणार नाही.' ती चाचरत बोलली.
'बोल गं राग कशाला येणार.'
'काकू, काका गेल्यानंतर तुम्ही बाहेर पडणेच बंद केलं.. या चार महिन्यांत तुम्ही एकदम अशक्त आणि निस्तेज दिसू लागल्या आहात. काका असतांना तुम्ही किती छान रहायच्या, तुम्हां दोघांची जोडी कॉलनीत सगळ्यांना आवडायची. पण काका गेल्यानंतर तुम्ही स्वतःला एकदम घरात कोंडून घेतले. काकू जाणा-या सोबत आपण जाऊ शकत नाही पण तुम्हाला असे बघून आज काका असते तर त्यांना किती वाईट वाटले असते. तुमची मुलं दूर आहेत. ती आपापल्या कामांत बिझी असतात. कदाचित तुमच्याशी रोज बोलत नसतील. त्या गोष्टीचं दुःख वाटून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेत आहात.. दुःख केल्याने दुःख कमी हो नाही तर ते वाढतच जातं. काकू जे आहे त्यात आनंद माना.. सकाळची सुरुवात आज माझा दिवस छान जाईल.. तसाच माझ्या परिवारातील प्रत्येकाचा दिवसही छान जावो असे मनातल्या मनात म्हणा..बघा तुम्हाला किती छान वाटेल. जाणा-यासोबत आपण जाऊ शकत नाही आणि आपली वेळ आल्या शिवाय आपणही जाऊ शकणार नाही त्यामुळे जोपर्यंत आहोत तोपर्यंत छान जगण्याचा प्रयत्न करायचा. काकू रोज सकाळी जेव्हा तुम्ही दोघं सकाळी फिरायला यायचे ना तेव्हा काका हसून मला नेहमी गुड मॉर्निंग म्हणत...माझी सकाळची सुरुवात आनंदाने व्हायची... मला वाटतं तशीच सकाळ परत तुम्ही जगायला हवी आणि परत तुमच्या आयुष्याची घडी नव्याने बसवायला हवी.'
सुमती शांतपणे तिचं बोलणं ऐकत होत्या.. 
'काकू, मी काही चुकीचे बोलले असेल तर सॉरी.'
'नाही गं.. तु काहीच चुकीचे बोलली नाहीस.' त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले तशी मिनल कावरीबावरी झाली.
'काकू, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास झाला.. प्लीज सॉरी.'
'अगं, काकांची आठवण आली म्हणून पाणी आले डोळ्यांत.. तु काळजी करू नकोस.'  थोड्या वेळाने मिनल घरी निघून गेली.
मिनल गेल्या नंतर  त्या बेडरूममध्ये आल्या आणि एका फोटो समोर उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बत्तीस वर्षांची साथ..हार्ट ऍटॅकचं निमित्त झाले आणि सतिश अगदी अकस्मात निघून गेले. दोन मुलं परदेशात स्थायिक झालेली. मुलांनी त्यांना सोबत चलण्याचा आग्रह केला पण तिथले थंड हवामान त्यांना मानवायचे नाही त्यामुळे त्या मुलांसोबत गेल्या नाही. त्यांच्या अचानक जाण्याने त्या एकप्रकारे कोलमडून गेल्या. गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. सतिश त्यांना नेहमी म्हणायचे की तु आपल्या मैत्रीणी बनव. त्याच्यासोबत फिरायला जा‌, पिकनिक, सिनेमाला जा तुझं मन रमेल. पण त्या त्यांना म्हणायच्या की तुम्ही असल्यावर मला चिंता कसली.. त्यांच्या काही मैत्रिणी होत्या. त्यातल्या कोणी मुलांजवळ रहायला गेल्या होत्या तर कोणी नोकरीतून निवृत्त झाल्यावर परत आपल्या गावी गेल्या होत्या तर कोणी इथले घर विकून दुसरीकडे रहायला गेल्या होत्या.  कॉलनीतील बरीच लोकं इतरत्र रहायला गेली होती. आजूबाजूला नवीन लोकं रहायला आली होती. त्यांच्याशी त्यांची फक्त तोंड ओळख झाली होती. सतिश असतांना त्यांना कधी एकटेपणाचा जाणवला नाही. पण आजकाल एकटं घर त्यांना खायला उठायचं. घरातल्या चार भिंतीत जीव गुदमरायला लागला होता. एकटेपणाची जाणीव अक्षरशः जीवघेणी वाटायला लागलेली. 
 'सुमती, अगं बाहेर निघ... चारचौघात मिसळ.. कोणाशी गप्पा मार... आपण जेव्हा बाहेर जातो, लोकांमध्ये वावरतो तेव्हा आपण आपला एकटेपणा काही काळासाठी विसरतो. मला तु अशी उदास राहिलेली आवडत नाही गं... माझ्या सुमतीने नेहमीच प्रसन्न रहायचे कळलं.. सुमती जेव्हा कधी अशी उदास असलेली दिसायची तेव्हा सतिश त्यांना असेच म्हणायचे. आजही फोटोतून सतिश त्यांना हेच सांगत आहेत असे जाणवले. 
दुसऱ्या सकाळी त्या लवकर उठल्या आणि मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडल्या. कॉलोनीतील काही जूने चेहेरे दिसले. त्याच्याशी त्या बोलल्या. चार महिन्यांनंतर त्यांच्या आयुष्यात परत नवी उर्जा घेऊन सकाळ आली होती. फिरतांना मिनलही धावतांना दिसली. त्यांना बघून ती त्यांच्या जवळ आली त्या तिच्याकडे बघून गोड हसत बोलल्या,''गुड मॉर्निंग.'
तिनेही हसून गूड मॉर्निंग म्हटले आणि अंगठा दाखवला.
 'काकू, सायंकाळी मी येणार तुमच्याकडे कॉफी प्यायला.'
'हो गं नक्की ये.'
फिरून त्या घरी आल्या आणि फोटोकडे बघितले. सतिशरावांच्या चेहऱ्यावर त्यांना समाधान जाणवले. मनातल्या मनात त्यांनी आजचा दिवस माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी आनंदाचा जावो असे म्हटले आणि सुखाची अनुभूती त्यांच्या मनाला प्रसन्न करून गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...