गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला जाणं भाग होतं.
सकाळी नऊच्या सुमारास मी साइटवर पोहोचलो. ओळखीची बरीच मित्रमंडळी आमंत्रण यादीत होती. गप्पागोष्टी आणि चेष्टा-मस्करीत तासभर कसा गेला ते कळलं नाही. हळूहळू मंडळी छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये विखुरली गेली. स्नॅक्स आणि कॉकटेलची रेलचेल होती.
थोड्याच वेळात त्या बेगडी वातावरणाला कंटाळून मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. रस्ता ओलांडून मी पलीकडच्या फुटपाथवर जाऊन उभा राहिलो.
‘पेशवा रेसिडेन्सी’… जितेंद्र गंगवानीच्या त्या दिमाखदार इमारतीकडे मी बघत राहिलो. सुरेख एलिवेशन असलेल्या त्या बिल्डिंगचे रंगकामही अगदी साजेसं झालं होतं. जितेंद्रनं चांगलीच मेहनत घेतलेली दिसत होती.
इमारतीवरून माझी नजर बाजूला वळली. उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला होता. माझी पावलं बाजूच्या पानटपरीकडे वळली. सिगरेटचं पाकीट घेऊन मी थोड्याच अंतरावर असणाऱ्या झाडाच्या सावलीखाली पोहोचलो. सिगरेट शिलगावत त्याचा एक दमदार कश घेत मी आजूबाजूला पाहिलं…
झाडाखालच्या दगडावर एक काळसर आणि कृश इसम बसलेला होता. एकटक नजरेनं तो रस्त्यापलीकडल्या दिमाखदार ‘पेशवा रेसिडेन्सी’कडे पहात होता. एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्धपणे तो बसला होता. त्याच्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवत नव्हती.
‘एवढं काय बघत असेल एवढं हा…?’ मी विचार करू लागलो. अशा बिल्डिंगमध्ये घर असण्याचं स्वप्नही तो बघू शकेल, असं त्याच्या अवतारावरून वाटत नव्हतं. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्या जवळ जात मी किंचित खाकरलो. पण त्याची समाधी भंग पावली नाही. पुन्हा एकदा जोरात खाकरून मी त्याची तंद्री मोडली. दचकून माझ्याकडे पाहात तो उभा राहिला. त्याच्याकडे पाहून मी त्याचा अंदाज घेऊ लागलो. एका डोळ्यानं तो आंधळा असावा; मात्र त्याच्या नजरेत काहीतरी अनामिक भाव होते.
त्याला सिगरेट देत मी त्याच्याकडे बघून हसलो. मोठ्या आश्चर्यानं माझ्याकडे कटाक्ष टाकत त्यानं नम्रपणे सिग्रेट घ्यायला नकार दिला.
“मला तुम्ही एवढी महागडी सिगरेट का देताय साहेब? मी तर साध्या बिडीला सुद्धा मोताद आहे.” उदास स्वरात माझ्याकडे न बघताच तो पुटपुटला. पुन्हा एकटक नजरेनं तो ‘पेशवा रेसिडेन्सी’कडे पाहू लागला.
“खूप छान बांधलीय ना ही इमारत?” त्याला बोलतं करण्यासाठी मी उदगारलो. उदासपणे हसत स्वतःशीच बोलल्यासारखा तो बोलू लागला…
“ही इमारत म्हणजे एक कबर आहे साहेब… माझ्या बायकोची कबर… मी बाजीराव आणि म्हणून तिचं नाव लग्नानंतर हौसेनं मस्तानी ठेवलं होतं साहेब!
“माझ्यासारख्या माणसाला अशी बायको मिळणे म्हणजे संजय भाटीच्या भाषेत ‘लंगूर के हाथ मे अंगूर!’…”
“कोण संजय भाटी?” त्याला आणखी बोलतं करण्यासाठी मी विचारलं.
“संजय भाटी या बिल्डिंगचा ठेकेदार होता साहेब! खूप मोठा ठेकेदार आहे तो. या मुंबईत त्याची डझनानं कामं चालू आहेत. मी त्याच्याकडे गेली वीस वर्षे काम करतोय… या बिल्डिंगवर मी बिगारी काम करत होतो. लातूरमधून मस्तानीला घेऊन मी इथं कामाला आलो. साईटवरच छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये आम्ही कामगार रहात होतो. सुतार, गवंडी, बिगारी सगळे इथंच राहायचे…”
बोलता-बोलता बाजी थांबला. शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतल्या पाण्याचा घोट घेऊन त्यानं पुढं बोलायला सुरुवात केली…
“हा संजय भाटी अतिशय हलकट स्वभावाचा! कामगारांच्या सुंदर आणि तरुण बायकांवर कायम त्याची नजर असे. संधी साधून प्रत्येक तरुण बाईवर त्यानं जबरदस्ती केली होती. अपवाद होता फक्त मस्तानीचा…
“मस्तानी खूप करारी स्वभावाची होती. संजय भाटी तिला टरकून होता. तशा एका प्रयत्नात त्यानं तिच्याकडून थोबाड फोडून घेतलं होतं… तेव्हापासून एखाद्या सापासारखा तो तिच्यावर डूख धरून होता.
“मस्तानी प्रत्येक वेळी मला दुसरीकडे काम बघायला सांगायची; पण दुसरीकडे जायची माझी हिंमत नव्हती. संजय भाटीची पन्नास हजारांची उचल माझ्या अंगावर होती. तशातच मस्तानीला दिवस गेले. लग्नानंतर इतक्या दिवसांनी बाळ होणार म्हणून ती मोहरुन गेली होती. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती. तिला सातवा महिना लागला आणि तो प्रसंग घडला…”
बाजी बोलता-बोलता भूतकाळात हरवला होता. त्याची तंद्री भंग न करता मी उत्सुकतेनं ऐकत होतो…
“क्यू बे 'अंधा कानून' आज पार्टी करेंगे क्या?’ एके दिवशी संजय भाटीनं मला विचारलं. एका डोळ्यानं आंधळा असल्यानं त्यानं माझं नाव ‘अंधा कानून' ठेवलं होतं. एका पायानं किंचित लंगडणाऱ्या रमेश सुताराला '‘लंगडा कुत्ता’, कायम अंग राखून काम करणार्या बाळू गवंड्याला ‘पोटभऱ्या बाळ्या’ अशी वेगवेगळी नावं त्यानं कामगारांना ठेवली होती.
“संजय भाटीची पार्टी म्हणजे भरपूर देशी दारू, तिखटजाळ मटण रस्सा आणि जोडीला ब्ल्यू फिल्म… महिनोंमहिने उन्हातान्हात कष्ट केल्यावर कधीतरी मिळणारी ही पार्टी कोण सोडणार? आम्ही सर्व कामगार आनंदानं नाचू लागलो.
“जास्त दारू पिऊ नका, जेवून लगेच घरी या… तो घाणेरडा सिनेमा बघत बसू नका!’ मस्तानीनं मला बजावलं होतं. मी मान डोलावून पटकन घराबाहेर पडलो. अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्टी होती.
“थोडा वेळ थांबून संजय भाटी निघून गेला. आमची विमानं उंच हवेत पोहोचली होती. मटणाची पातेली चाटून पुसून साफ झाली आणि आम्ही ब्ल्यू फिल्म बघू लागलो. माणसांची वासनांध जनावरं बनली आणि पार्टी संपली.
“झोपडीत शिरून मी मस्तानीला शोधू लागलो. एका कोपऱ्यात ती शांतपणे झोपली होती. अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. तिचे मादक सौंदर्य मंद प्रकाशात खुलून दिसत होतं. माझ्यातलं जनावर जागं झालं… मी अधाशीपणे तिच्यावर तुटून पडलो.
“मस्तानीच्या जोरदार किंचाळीने मी भानावर आलो… वेदनेनं व्याकुळ होऊन ती ओरडत होती. काहीतरी अघटित घडलं होतं. पटकन बाहेर येऊन मी शेजारील झोपड्यांमधल्या बायकांना उठवलं. त्या धावतच मस्तानीच्या मदतीला गेल्या.
“मी केलेल्या जबरदस्तीमुळे पोटात मूल वर सरकलं असावं! मस्तानीची स्थिती नाजूक बनली होती. मला काहीच सुचेनासं झालं. आपल्या हातून केवढी मोठी चूक झालीय, हे उमगून मला अक्षरशः रडू फुटलं.
“मस्तानीला दवाखान्यात न्यायला हवं होतं. माझ्याकडे तर फुटकी कवडीही नव्हती. आठवड्याचा पगार शनिवारी होणार होता… अखेर सर्व धीर एकवटून मी संजय भाटीला फोन केला.
“हॅलो, कौन है बे…?” झोपाळलेल्या स्वरात संजय भाटी बोलला._
“मै बाजीराव बोल रहा हूं साब… मेरे औरत की तबीयत बिगड गई है। डॉक्टर के पास जाना पडेगा। मुझे पैसा चाहिए। मै आपके घर अभी आता हूं।”
“मै सुबह साईट पे आता हू फिर देखेंगे। अभी अपना सोने का टाइम है। सुबह तक तेरी औरत मर तो नही जायेगी ना? साला हरामी… रात को फोन करता है।’ शिव्या देत संजय भाटीने फोन ठेवला.
“सारी रात्र मस्तानी मरणयातना भोगत होती. हताशपणे बघत बसण्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हतं. पहाटे-पहाटे तिची शुद्ध हरपली.
“सकाळी नऊ वाजता संजय भाटी ऐटीत आला. मी गयावया करत त्याच्याकडे पैसे मागू लागलो. थंडपणे माझ्याकडे पाहात तो म्हणाला, ‘पहिले ही तेरे पे पचास हजार है। मेरा धंदा है, धरमशाला नही। और वैसेभी तेरी औरत तो देवता है। उसको क्या होगा? अपने आप ठीक हो जायेगी।’
“माझ्या पायाखालची जमीन सरकली. खूप विनवण्या करूनही संजय भाटीला दया येत नव्हती. अचानक तो म्हणाला, ‘अगर तेरी औरत मेरे पाव पकड के पैसे की भीक मांगेगी, तो मै पैसा दे दूंगा। जा बोल उसको।”
“मस्तानी शुद्धीवर नाही. तिच्याऐवजी मी तुमचे पाय धरतो’, हे डोळ्यात प्राण आणून सांगितल्यावर संजय भाटीनं कसेबसे पैसे दिले.
“मस्तानीला दवाखान्यात नेलं खरं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मूल पोटातच दगावलं होतं. मस्तानी कशीबशी मरणाच्या दाढेतून बाहेर आली. पण त्यानंतर तिचा या जगाशी जणू संबंधच संपला. दगावलेल्या बाळाच्या आठवणी हेच तिचं आयुष्य बनलं. माझ्याकडेही ती अनोळखी नजरेने पाहात असे ! “तिला असं रोज थोडं थोडं मरताना पाहून माझ्या हृदयाला घरं पडत असतं… शेवटी तिला वेड लागलं. बाळाचं नाव घेऊन त्याला ती जोजवत असे ! बेभान झाली की तिला सांभाळणं मोठं मुश्कील होई. अशाच भ्रमात एकदा दहाव्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि सगळं काही संपलं.
“संजय भाटीनं पोलिसात प्रकरण दाबून टाकलं आणि थोडीफार भरपाई देऊन मलाही कामावरून काढून टाकलं.”
खोल सुस्कारा सोडून बाजी काही वेळ गप्प बसला. काय बोलावं हे मला सुचेना. तेवढ्यात एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा बाजीचा आवाज आला,
“देवाचा कानून सुद्धा अंधाच आहे साहेब ! माझ्या लाडक्या मस्तानीचा बळी माझ्या वासनेनं आणि तिच्या एकनिष्ठपणामुळं गेला. तिनं निडरपणे संजय भाटीसारख्या सापाला डिवचलं आणि त्याची किंमत तिला मोजावी लागली. आज या बिल्डिंगचं उद्घाटन आहे. आज कदाचित माझी मस्तानी मला दिसेल. तिची वाट पाहणं एवढंच माझ्या हातात आहे.”
अजूनही पापणी सुद्धा न लावता तो त्याच्या मस्तानीच्या राजवाड्याकडे एकटक बघत होता. सुन्न मनानं मी तिथनं निघालो. बाजीला धीराचे चार शब्द सांगण्याचं भानही मला उरलं नव्हतं !
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर उघडला आणि बातमी वाचली.
‘बांद्र्याला काल रात्री पेशवा रेसिडेन्सी या नव्या इमारती समोरील रस्त्यावर भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडी खाली सापडून बाजीराव घोरपडे नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी पोलिस करीत आहेत.’
शेवटी बाजीरावला त्याची मस्तानी भेटली होती.
‘पेशवा रेसिडेन्सी’च्या साक्षीनं !
— मिलिंद अष्टपुत्रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा