मंगळवार, ३ मार्च, २०२६

2662. निघून गेलेली सावली

 "आई, आता पुण्यातच राहा. बंगलोरमध्ये कामाच्या घाईत मी वेळ देऊ शकत नाही."
शुभमचं वाक्य ऐकून सुलभा ताईंनी शांतपणे मान डोलावली.
काहीशा हसऱ्या चेहऱ्याने, पण डोळ्यांत क्षणभर ओल आली.
शुभमला ती दिसली नाही. तो आधीच फोनकडे वळला होता.
सगळं आयुष्य मुलासाठी काढून, वयाच्या सत्तरीत त्या पुन्हा एका नवीन आयुष्याच्या पायरीवर उभ्या होत्या.
मुलगा मोठा झाला, कमावता झाला.
पण आयुष्यभर आईने उरलेलं सगळं गुंफून ठेवलेलं नातं, आता स्वतःचं वय गाठत होतं.
नवऱ्याचं अचानक निधन झालं.
माणसं जरा थांबली, सांत्वना दिली, आणि निघून गेली.
घर, ज्यात दोन पिढ्या घालवल्या, आठवणींनी भरलेलं – विकावं लागलं.
"आई, ते जुनं गावातलं घर विकून टाक. मी पुण्यात बघतो एक चांगली जागा."
तेव्हा सुलभा ताईंनीही काहीच विचारलं नाही.
फक्त विचारलं – "तुला वेळ होईल का माझ्यासोबत राहायला?"
शुभम म्हणाला – "पुणं सोयीचं होईल दोघांसाठी."
आता, त्याच मुलाने प्रेमाने, काळजीने, व्यवस्थेने सांगितलं –
"पुण्यात तू एकटी नको राहूस." तू इकडेच ये.
पण त्या वाक्याच्या आड एक अधुरी जाणीव दडलेली होती –
"आई, तू इथं राहा, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही."
सुलभा ताईंनी कपाट उघडलं, आणि जुन्या साड्या उचलायला लागल्या.
एका साडीच्या घडीत शुभमचा लहानपणीचा शाळेचा रिबन सापडला…
ती साडी अलगद डोळ्यांशी नेली.
क्षणभरात ती मुलाची आई परत झाली –
आता तीच आई नवीन शहरात एकटी राहणार होती, जिथं आठवणी नव्हत्या… फक्त भिंती.
घर मोठं होतं. सुखवस्तू. प्रिया – सून – नोकरी करणारी, सोज्वळ. नातू – रियांश – दुसऱ्या वर्गात.
पण घरात त्यांच्यासाठी जागा होती, "सुलभा ताईं" म्हणून. ‘आई’ म्हणून नव्हे.
पहिल्याच दिवशी, त्यांनी प्रियेच्या स्वयंपाकात मदत करायला विचारलं.
प्रिया सौम्य हसली, पण थोडीशी संकोचलेली –
"आई, मी ऑफिसहून येताना थकलेली असते, माझं एक ठरलेलं पॅटर्न असतं, "तुम्ही आराम करा ना!"
ती म्हणाली आणि लगेच AirPods कानात घातले.
किचनमध्ये automatic rice cooker सुरू झाला, आणि गॅसवर ready-to-eat पॅक गरम होऊ लागला.
सुलभा ताई काहीच बोलल्या नाहीत.
पण त्यांच्या डोळ्यांतला उत्साह मंद झाला.
"आई, तुम्ही आराम करा,"
हे वाक्य "आई, तुमचं काही काम नाहीये इथं" असं अनाहूतपणे कानावर पडून गेलं.
सुलभा ताई परत आपल्या खोलीत आल्या.रेस्ट पॅटर्न मधे.
सुलभा ताईंचं सगळं प्रेम आता रियांशभोवती फिरत होतं.
सकाळी दूध, संध्याकाळी फळं… आणि संध्याकाळी गच्चीत खेळणं हे त्यांचं दिवसाचं गोड वेळापत्रक होतं.
ती रियांशला झुला झुलवत, गाणी म्हणत –
"अरे माझा पोपट राजा, आई कुठं गेली?"
तो हसून म्हणायचा – "ऑफिस!"
एक दिवस, गच्चीवर जाण्याच्या तयारीत असताना प्रिया म्हणाली –
"आई, त्याला उन्हं लागून जाईल… त्याला उन्हाचा त्रास आहे."
सुलभा ताईंनी गप्प बसून खेळण्याची चप्पल बाजूला ठेवली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी विचारलं –
"रियांशला वर घेऊन जाऊ का ग, थोडा खेळवते?"
प्रिया म्हणाली –
"आई, आज त्याचे ऑनलाइन क्लास आहेत… तुम्ही त्याला disturb करू नका."
‘डिस्टर्ब करू नका’… हे दोन शब्द सुलभा ताईंना दिवसभर बोचत राहिले.
रियांश आता डोळ्यांवर चष्मा घालून स्क्रीनकडे बघायचा, आणि सुलभा ताई त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायच्या.
पण आता तो उठून बिलकुल यायचा नाही.
कदाचित त्याला आईनंच सांगितलं असेल…
त्या रात्री सुलभा ताईंनी त्यांच्या जुन्या चष्म्याच्या डब्यात एक कागद ठेवला.
त्यावर लिहिलं होतं –
"मी रियांशला खेळवते, पण त्याच्या आयुष्यात अजून फक्त एक 'notification' बनून राहायचं नाहीये."
दुसऱ्या दिवशी, रियांशला त्यांनी झोपताना गोष्ट सांगितली.
"एक राजा होता…"
"आजी, प्लीज! मला कार्टूनचं अॅप लाव ना!"
शुभम आतून ओरडला, "आई, त्याला गोष्टींपेक्षा मोबाईलवर कार्टून आवडतात आता."
रोजचे संवाद मर्यादित… "आई, पाणी पाज." "आई, भाजी झाक."
आईला ‘होते’ होण्याची सुरुवात झाली होती.
 ‘आई’ असणं, ‘असणं’ न उरतं
प्रत्येक दिवशी सकाळी शुभम आणि प्रिया दोघंही ऑफिसला निघायचे.
सुलभा ताई दररोज आपल्या कोपऱ्यात शांत बसायला लागल्या.
कधी तरी त्या दिवसभरात बोललेलं एकमेव वाक्य असे –
"रियांशने जेवलं का?"
प्रिया कधीच आईशी भांडत नाही. पण संवादही फारसा नाही.
ना एकत्र स्वयंपाक, ना एकत्र टीव्ही. ना एकत्र चहा.
प्रिया आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करते, मदर-इन-लॉचा उल्लेख “She’s there... in her room mostly.” असा करते.
शुभम हल्ली आईशी कमी बोलतो. केवळ आवश्यक उत्तरं.
प्रिया तर हसते, पण शब्दात एक अलिप्तपणा असतो.
"आई, फ्रीजमध्ये ठेवताना भाजी व्यवस्थित झाकून ठेव. वास येतो."
"आई, तुला काही लागलं तर maid ला सांग. आम्ही मिटींगमध्ये असतो."
"आई, थोडं टीव्हीचा आवाज कमी ठेव ना. रियांश अभ्यास करतोय."
आवाज कमी केला जातो. आईच्या अस्तित्वाचा.
 फ्लॅशबॅकमधली ‘आई’
एका दुपारी कपाट आवरताना शुभमचे जुने फोटो सापडले.
पहिलं बक्षीस, नाट्यस्पर्धा, पाढे म्हणताना…
त्या फोटोला पाहून डोळे भरून आले.
“हाच मुलगा. छोटा असताना माझ्या मांडीवर झोपायचा. त्याच्या तापात मी रात्रभर जागी राहायचे… आणि आता मी जर गप्पा मारल्या, तर disturb वाटतं त्याला?”
:✍🏽सुलभा ताई पुन्हा डायरी उघडतात —
"मी कधी तिची सासू झालोच नाही… फक्त घरातली एक 'म्युट' व्यक्तिरेखा आहे."असचं वाटत.
"मुलं मोठी झाली की आईचं वय लागतं… पण नातं मागेच राहतं का?"मुलं मोठी होतात. उंच वाढतात, जग बघतात, शिकतात, करिअर करतात… पण त्या वाढीच्या सावलीत एक शहाणी बाई हळूहळू वयात येते — ती म्हणजे आई.
कालपर्यंत जी पाटीवर अक्षरं गिरवत होती, ती आज मोबाईलवर टाईप करायला शिकते… मुलांसाठी.
कालपर्यंत जी नकार देत होती, आज ती समजून घेते… मुलांसाठी.
पण तिच्या आयुष्याचा काटा मात्र पुढे सरकत राहतो — हळूहळू, नि:शब्द.
मुलं विचारतात — "आई, तू शांत का झालीस?"
आई हसते… तिच्या चेहऱ्यावर थकव्याची लकीर असते, पण डोळ्यात अजूनही तेच प्रेम.
"शांत नाही ग, फक्त आवाज थोडा हळू झाला आहे. तुम्ही मोठे झालात ना!"
पूर्वी घरात कुठेही वळलं की तिची नजर आपल्यावर असे.
आता तीच नजर दरवाज्याकडे लागून बसते — 'मुलं कधी येतील' या विचारात.
एकेक करून सगळे मोठे होतात, आपापल्या आयुष्यात रमतात, आणि तिचं आयुष्य तिथेच थांबून राहतं.
ती आता विचार करत नाही की काय खायचं, काय आवडतं.
ती विचारते — "तुला काय हवंय?"
ती स्वतःसाठी कपडे घेत नाही, पण तुमच्या खरेदीत ती रमते.
ती आता काही मागत नाही — कारण आता ती 'मुलांची आई' राहिलेली असते, 'स्वतःची व्यक्ती' नव्हे.
पण प्रश्न राहतो —
"मुलं मोठी झाली की आईचं वय लागतं… पण नातं मागेच राहतं का?"
नाही… नातं मागे राहत नाही.
ते कुठेही जात नाही… फक्त दुर्लक्षित होतं.
ते जपायचं असतं…
एवढंच की, जेव्हा आपण म्हणतो — "आई, वेळ नाही गं" — तेव्हा तिच्या दिवसाचा सगळ्यात मोठा अपमान होतो.
कारण तिच्या वेळाचा प्रत्येक क्षण आपणच होतो.एवढं लिहून आजचा दिवस परत  एक चांगल्या आठवणीत गेला.
डायरी बंद करते.
रविवारी सर्वजण बाहेर गेले. आई घरीच.
शुभम म्हणाला, "आई, तुझी तब्येत हल्ली फारशी चांगली नसते, थोडं विश्रांती घे."
त्या संध्याकाळी सुलभा ताईंनी प्रिया आणि शुभमला चहा दिला.
तेवढ्यात प्रिया चहा घेत म्हणाली –
"आई, थोडं कमी साखर घालायचं होतं. माझं डाएट चालू आहे."
सुलभा ताई मनातल्या मनात म्हणाल्या –
“तिच्या डाएटचा विचार करताना माझ्या नजरेच्या अश्रूंनी कुणालाही ‘कॅलोरी’ वाटत नाहीत…”
एका दिवशी सुलभा ताईंनी शुभमला विचारलं –
"माझं जुने गावातलं घर आठवतं का रे तुला? चल एकदा जाऊया. थोडं आठवणींमध्ये फिरून येऊ."
शुभम मोबाईलवर पाहत म्हणाला –
"आई, मी ट्रॅव्हल प्लॅन करत नाही. खूप बिझी आहे."
प्रिया हसून म्हणाली –
"आई, तुम्ही तरी तिथे जाऊन काय करणार? गावात काय उरलंच आहे?"
सुलभा ताईंनी मान डोलावली. "हो बाई… काहीच नाही उरलं."
पण त्या रात्री त्या उठून बसल्या. शेल्फमधून जुनं कपड्यांचं बॅग काढली. चार साड्या, औषधं, डायरी, आणि एक जपलेली फोटोफ्रेम – शुभम आणि त्याच्या वडिलांची.
सकाळी घरात शांतता होती.
आईचं रूम चा दरवाजा उघडा.
सामान नाही. फक्त एक चिठ्ठी:
"शुभम,
तुझ्या आयुष्यात मी अडथळा नाही,
म्हणूनच अडथळा नको वाटावा म्हणून निघतेय.
तू चांगला आहेस, प्रिया चांगली आहे.
फक्त माझ्या 'आई' असण्याचा अर्थ आता तुमच्या व्याख्येत बसत नाही.
म्हणून मी नजरेआड होतेय.
रियांशला सांग – त्याची आजी परत एक गोष्ट सांगायला कधीतरी येईल."आईची माया अजूनही असते" असं एक वाक्य नक्की असेल.
तोपर्यंत, मी एका जुन्या घरात, एका गोधडीखाली,
आई म्हणून अजूनही तुझ्यासाठी प्रार्थना करत राहीन.
– तुझी आई""अजून ही तुझीची. "
शुभम काहीच बोलू शकत नाही. प्रिया म्हणते, "तुमचं नातं होतंच ना? ती कुठेही गेली असेल, परत येईल."
पण तो दिवसभर आईचा आवाज शोधतो — "शुभम, जेवलास का रे?"
"तुला पाणी आणून ठेवते रे!"
"थोडं थांब, थंडी पडतेय बाहेर!"
कोणीच काही बोलत नाही आता.
आता आवाज गेला… आणि पोकळी राहिली.
 प्रिया विचारच करत राहिली,
“तिनं कधीच तक्रार केली नव्हती… पण त्यांनी असं का केलं?”
रियांश दररोज विचारतो –
"आजोबा गेले… आता आजी पण गेली ?"
प्रिया आणि शुभम काहीच बोलत नाहीत.
ते दोघंही एका अशा वास्तवात गुरफटलेत,
जिथे आई गेली हे बोलायचं नाही,
पण ती होती हे विसरायचंही नाही.
त्या रात्री, रियांशच्या पाटीवर एक चित्र होतं –
एक मोठ्ठं घर, त्याच्या बाजूला आजी, आणि तिच्या हातात गोष्टीचं पुस्तक.
खालच्या कोपऱ्यात एका लहानशा अक्षरांत लिहिलं होतं –
"आजी परत येईल, गोष्ट सांगायला !"
शुभम शांत होतो.
"ती जाताना काहीच घेऊन गेली नाही. पण मागे सगळंच पोकळ करून गेली." ति असे पर्यंत कोणालाच कळली. नाही.
कधी कधी लोक नातं संपवत नाहीत.
ते फक्त इतकं दुर्लक्षित केलं जातं की,
ते स्वतःच त्या नात्याच्या चौकटीतून बाहेर पडतात –
जेणेकरून त्यांना दोष दिला जाऊ नये…
तुटणं तर झालेलंच असतं ना?
फक्त त्याचा screenshot कुणाकडेच नसतो.
ना स्टेटसला लावायला,
ना आठवणीत जपून ठेवायला…
"तुला काय हवंय?"
हे कधीच ती सांगणार नाही… पण तिला अजूनही आपल्या आवाजाची, आपल्या स्पर्शाची, आपल्या संवादाची गरज असते.हें विसरू नका.

सौ तृप्ती देव



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...