मंगळवार, ३ मार्च, २०२६

2667. थोडं स्वतःसाठी ही जगा.

 महिन्याच्या पहिल्या तारखेला SMS येतो- Salary credited.
क्षणभर छाती भरून येते.
आणि लगेच दुसरा विचार येतो 
“चला, आता सुरू होईल गणितं.”
घरभाडं.
लाईट बिल.
पाणी.
EMI.
शाळेची फी.
उधारी.
कोणाचं तरी आजारपण.
कोणाचं तरी लग्न.
आणि शेवटी हातात काय उरतं?
एक सुप्त आशा “ठीक आहे, या महिन्यात नाही. पुढच्या महिन्यात स्वतःसाठी काहीतरी घेईन.”
जगात खूप जणांचं हे फक्त आर्थिक वास्तवच नाहीये, तर ते आयुष्याचं वास्तवदेखील आहे. कुणी आपल्याला शिकवलंच नाही स्वतःसाठी जगायला. लहानपणापासून शिकवलं गेलं,
“आधी घर.” 
“आधी कुटुंब.” 
“आधी जबाबदाऱ्या.”
कोणी कधीच शिकवलं नाही, 
“आधी तू.”
हळूहळू आपण इतके जबाबदार होतो की स्वतःची इच्छा असणं हे ही अपराध वाटायला लागतं.
नवीन कपडे दुकानात दिसतात. हात पुढे जातोआणि लगेच मन मागे ओढतं,
“नको… गरज नाही.”
आपण सगळे जबाबदार आहोत. आपण कुटुंबासाठी उभं राहतो, जबाबदाऱ्या पेलतो, तडजोडी करतो. पण हळूहळू आपण आपल्या स्वतःला ‘पुढच्या महिन्यावर’ ढकलत राहतो.
स्वतःचे शौक – पुढच्या महिन्यात.
स्वतःची विश्रांती – पुढच्या महिन्यात.
स्वतःची स्वप्नं – पुढच्या महिन्यात.
आणि तो “पुढचा महिना” कधीच येत नाही.
“या महिन्यात नाही… पुढच्या महिन्यात.” हे वाक्य भले आपल्याला आशा देतं-आपल्याला जिवंत ठेवतं, पण आयुष्य हळूहळू चोरून नेतं. आपण जगतो, पण आपल्याला  जिवंत असल्यासारखं वाटत नाही.
कारण पुढच्या महिन्यातही
तेच बिल्स असतात.
तेच EMI असतात.
तेच ताण असतात.
जेव्हा माणूस स्वतःला विसरतो, तेव्हा तो हळूहळू आतून थकायला लागतो. मानसिक थकवा ही एक न बोललेली वेदना असते. पैसे कमी असले तरी माणूस जगतो. पण आशा कमी झाल्या, तर जगणं अवघड होतं. एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस घ्या. सकाळी उठतो, धावपळ, ऑफिस, ट्रॅफिक, बॉसचा ताण, कामाचा प्रेशर. महिन्याच्या शेवटी पगार येतो. पण तो खात्यात जास्त वेळ थांबतच नाही. जसं पाणी गळक्या भांड्यातून निघून जातं, तसाच पगार जबाबदाऱ्यांमधून निघून जातो. आणि आपण स्वतःला समजावत राहतो, “अजून थोडं कष्ट करूया… नंतर बघू.”
पण नंतरचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांचं मोठं व्हर्जन असतं.
खरी समस्या पैशांची नाही.
समस्या कमी पगाराची नाही,
समस्या खर्चांचीही नाही.
समस्या आहे - स्वतःला कायम शेवटी ठेवण्याची.
आपण सगळ्यांना प्राधान्य देतो, आई-वडील, मुलं, जोडीदार, समाज, लोक काय म्हणतील.
पण “मी” हा शब्द आपल्या यादीत शेवटचा असतो, कधी कधी तर यादीतच नसतो.
स्वतःला विसरणं म्हणजे बलिदान नाही, ती हळूहळू केलेली आत्महत्या आहे. हे कटू आहे, पण खरं आहे.
दर महिन्याला स्वतःची इच्छा मारणं,
दर वर्षी स्वतःचं स्वप्न पुढे ढकलणं,
दर दिवस स्वतःला शेवटी ठेवणं,
हा त्याग नाही, हे हळूहळू स्वतःला मिटवणं आहे.
एक बाप. मुलांसाठी सगळं करतो. स्वतः २-४ जोडी कपडे वर्षानुवर्षं वापरतो. तीच-तीच चप्पल-बूट वापरतो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. एक दिवस त्याचा जीव जातो. मुलं रडतात, घर कोसळतं, आणि बापाच्या पश्चात बापाचे फाटके कपडे, तुटलेली चप्पल बघून सगळ्यांना जाणवतं,
“हा माणूस स्वतःसाठी कधीच जगलाच नाही.”
तो हिरो होता. पण स्वतःच्या आयुष्यात तो फक्त नोकर राहिला. तुम्ही स्वतःसाठी जगलात तर तुम्ही कुटुंबावर प्रेम कमी करत नाही. उलट, आनंदी माणूसच इतरांना आनंद देऊ शकतो. रिकाम्या माणसाकडून कुणालाच भरभरून काही मिळत नाही. रिकाम्या बॅटरीची पॉवरबँक  कोणतंही उपकरण चार्ज करू शकत नाही. तसाच थकलेला, तुटलेला माणूस कुणालाही पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही. स्वतःसाठी काही करणं म्हणजे काही स्वार्थ नाहीय. आपल्या समाजात एक गैरसमज आहे,
“स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा.” नाही.
स्वतःसाठी विचार करणं म्हणजे स्वतःला जपणं. पगार आला की थोडा खर्च स्वतःवर करायला शिका. तो खर्च भौतिक असायलाच हवा असं नाही. कधी स्वतःला वेळ द्या. कधी विश्रांती. कधी फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा. 
पण स्वतःला सांगा.
“मी ही महत्त्वाचा आहे.”
स्वतःचा आनंद पुढे ढकलू नका. नवं फोन, कपडे, सहल. सगळं लगेच शक्य नसेल. पण आनंदाला कायम ‘नंतर’वर ठेवू नका. स्वप्नं जिवंत ठेवा. स्वप्नं म्हणजे लक्झरी नाही. ती मानसिक गरज आहे.  लक्षात ठेवा.
जर आयुष्य सतत “पुढच्या महिन्यावर” ढकलत राहाल, तर एक दिवस असा येईल की आयुष्यच मागे वळून बोलेल,
“आता तुझा इथला वेळ संपला, इतकी वर्षं कुणासाठी जगलास आणि स्वतःसाठी किती जगलास?”
हे प्रश्न येण्याआधी थांबा. तो दिवस येऊ देऊ नका. जबाबदाऱ्या नक्की सांभाळा. नक्की कष्ट करा. पण स्वतःला विसरू नका. कारण  घर चालवणारा माणूसही कधी कधी स्वतःच्या आयुष्याचा मालक असायला हवा.कारण 
पगार संपला तरी चालेल पण तुम्ही आतून संपता कामा नये.

लेखकाच्या नावाचा उल्लेख नाही कुठेही, पण खरंच छान लेख आहे. एका ग्रूप वर आला होता. यात जरी पुरुषाला समोर ठेवून लिहिलं असलं तरी ते प्रत्येक व्यक्तीला लागू पडणारे आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष!
 🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...