मंगळवार, ३ मार्च, २०२६

2668. आजी ओरडत होती 'बाहेरची बाधा झालीय'

      आजी ओरडत होती 'बाहेरची बाधा झालीय', काळा अंगारा फासला होता. पण डॉक्टरांना दिसत होतं ते मृत्यूचं एक वेगळंच, भयानक रूप. 
पुण्याच्या त्या जुन्या दगडी RBD हॉस्पिटलवर बाहेरचा पाऊस एखाद्या राक्षसासारखा कोसळत होता. रात्रीचे ३ वाजले होते. ही वेळ हॉस्पिटलमध्ये "Devil's Hour" मानली जाते, कारण याच वेळी माणसाची जगण्याची इच्छाशक्ती आणि डॉक्टरांची सहनशक्ती, दोन्ही तळाला गेलेली असते. ओपीडी रूम नं. १७ मध्ये डॉ. अजित डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे चोळत बसले होते. सोबत डॉ. अनित पेंगुळले होते. हवेत तोच विशिष्ट वास-ओलावा, फिनाईल आणि बाहेरच्या मंदिरातल्या उदबत्तीचा धूर—मिसळून एक विचित्र 'हॉस्पिटल गंध' तयार झाला होता. बाहेर पॅसेजमध्ये ती जुनी लिफ्ट नेहमीप्रमाणे अडकली होती. खड-खड-खड... त्या आवाजाने शांतता भंग पावली. अचानक लाईट गेली. त्या २० सेकंदाच्या काळोखात पॅसेजमधून टक... टक... टक... असा आवाज आला. SNO सिस्टर सुरेखा राऊंडवर होत्या. त्यांची ती लंगडती चाल आणि निर्विकार चेहरा बघून नवीन डॉक्टरही रस्ता बदलत.
"डॉक्टर, तयार राहा. खालून कॅज्युअल्टी मधून फोन आलाय. एक 'केस' वरती येतेय," अंधारात त्यांचा आवाज आला.
आणि पाठोपाठ एक हृदय पिळवटून टाकणारी किंचाळी वॉर्डात घुसली.
"माझं बाळ... ओ डॉक्टर... बघा की हो, हे असं का करतंय!"
डॉ. अजित आणि डॉ. अनित खुर्चीतून उडालेच. ते धावत बाहेर आले. एका आजीने आणि बापाने त्या ४ दिवसांच्या तान्ह्याला छातीशी कवटाळलं होतं. अजितने बाळाला हातात घेतलं आणि त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. ते बाळ झोपलेलं नव्हतं, आणि ते रडतही नव्हतं. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते, बुबुळं वरच्या बाजूला गेली होती. हायपोक्सियामुळे (ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे) त्याला आकडी येत असावी, कारण त्याचे शरीर एखाद्या लाकडासारखं ताठ (Rigid) झालं होतं. पण सर्वात भयानक होता त्याचा रंग. ते बाळ गुलाबी नव्हतं. ते काळं-निळं (Deep Cyanosed) पडलं होतं. जसं काही त्याच्या शरीरातला रक्ताचा प्रत्येक थेंब गोठलाय.
"याला बाधा झालीय ! मी सांगत हुते, अमावस्या हाय, बाहेर नको काढू" सोबत आलेली आजी जोरजोरात रडत होती. तिने बाळाच्या कपाळावर काळा अंगारा फासला होता. पॅसेजमध्ये झाडू मारणाऱ्या वाणी मावशीने ते ऐकलं आणि भीतीने कोपऱ्यात सरकल्या. "पांढऱ्या पायाचं आलंय वाटतं..." त्या पुटपुटल्या.
"अनित, याला NICU मध्ये घे, पटकन!" डॉ. अजित ओरडले.
NICU मध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. डॉ. स्पृहा आधीच तिथे होती. तिने बाळाला वार्मरवर घेतलं. मॉनिटर जोडले.
बीप... बीप... बीप...
आकडा आला: Saturation: 65%.
"सर, हे कार्डियाक (Heart) आहे का? ऑक्सिजन लावला तरी सॅचुरेशन वाढत नाहीये!" स्पृहाचा आवाज रडवेल्या स्वरात आला. तिचं पुस्तकी ज्ञान इथे फेल ठरत होतं. बाहेर ढगांचा गडगडाट झाला. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब आदळत होते. वाणी मावशी आता NICU च्या काचेबाहेरून आत बघत होत्या. त्यांनी काचेवर बोट ठेवलं आणि ओठांनी काहीतरी इशारा केला... 'त्याच्यात बाहेरचं काहीतरी आहे...'
डॉ. अजित अस्वस्थ झाले. सायन्स की सुपरनॅचरल? कारण बाळाची लक्षणं कोणत्याही पुस्तकातल्या आजारासारखी दिसत नव्हती.
"स्पृहा, सॅम्पल घे. ABG आणि सेप्सीस वर्कअप पाठव," अजित म्हणाले.
स्पृहाने थरथरत्या हाताने बाळाच्या हातातल्या शिरेत सिरिंज खुपसली. आणि पिस्टन मागे खेचला.
त्या क्षणी NICU मध्ये जे दिसलं, त्याने डॉ. अनित सुद्धा दोन पावलं मागे सरकले. सिरिंजमध्ये येणारं रक्त लाल नव्हतं. बल्बमध्ये घेतल्यावर ते गडद... चॉकलेटी... जवळजवळ काळं (Dark Chocolate Brown) दिसत होतं. स्पृहाच्या हातून गडबडीत ती टेस्ट ट्यूब सटकली आणि फरशीवर पडली.
"शिट!"
काच फुटली आणि ते काळं रक्त पांढऱ्या टाईल्सवर सांडलं. पण ते रक्तासारखं पसरलं नाही. ते एखाद्या ऑईल पेंट (Oil Paint) सारखं घट्ट थिजलं होतं.
"सर..." स्पृहा मागे सरकली, तिचा आवाज भीतीमुळे फाटला होता. "हे रक्त नाहीये... हे... हे दुसरंच काहीतरी आहे! आजी खरं बोलत होत्या का? ही बाहेरची बाधा..."
डॉ. अजितही क्षणभर थिजले. सायन्सवरचा विश्वास डगमगणारा हा क्षण होता. बाहेरचा गडगडाट वाढला आणि लाईट्स पुन्हा लुकलुकल्या (Flickered). त्या सांडलेल्या रक्ताकडे बघून अजितला वाटलं, हे सायनाईड पॉयझनिंग (Cyanide) तर नाही? "नाही, सायनाईडमध्ये रक्त चेरी रेड (Bright Red) होतं..." अजित पुटपुटले.
मग काय? साप चावलाय? (Snake bite causing hemolysis?)
"स्पृहा, ASV (Anti-Snake Venom) काढ, लवकर !" अजित ओरडले. ते चुकीच्या दिशेला धावत होते.
स्पृहा फ्रीजकडे धावली.
तेवढ्यात अजितची नजर त्या रक्ताच्या डागावर पडली. तो डाग आता सुकायला लागला होता आणि त्याचा रंग 'चॉकलेटी ब्राऊन' झाला होता. त्या रंगाने अजितच्या मेंदूतली एक जुनी मेमरी ट्रिगर केली. 
मेडिकल कॉलेज, सेकंड इयर. डॉ. साने सर. हातात एक टेस्ट ट्यूब घेऊन उभे आहेत.
"मुलांनो, जेव्हा रक्ताचा ऑक्सिजन संपतो आणि लोह (Iron) गंजतं... तेव्हा ते रक्तासारखं नाही, तर 'बूट पॉलिश' सारखं दिसतं!"
बूट पॉलिश !
तीच शेड! तीच घट्ट कन्सिस्टन्सी !
अजितने स्पृहाला जोरात आवाज दिला. "थांब स्पृहा ! ASV नको ! साप नाहीये..."
"मग काय आहे हे?" स्पृहाच्या हातात अजूनही ASV ची बाटली होती.
"गंजल्यासारखं रक्त... Methemoglobinemia!" अजितचा आवाज कापला. "हे नायट्रेट पॉयझनिंग आहे."
अजित ओरडले. "आजीला विचारा, याला काय पाजलंय?"
आजीला आत खेचलं. "बाळ रडत होतं... म्या फक्त विहिरीचं पाणी आणि भगत बाबांनी दिलेली एक 'राख' मधात चाटवली..." आजी कबूल झाल्या.
"तेच !" अजितने कपाळावर हात मारून घेतला. "विहिरीच्या पाण्यातले नायट्रेट्स आणि त्या भस्मातली केमिकल्स! रक्ताचं ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम थांबलंय. बाळ गुदमरतंय... हवेअभावी नाही, रक्ताअभावी!"
"उपाय?"
"Methylene Blue. एक निळं औषध. तेच या काळ्या रक्ताला पुन्हा लाल करू शकतं."
पण खरा थरार आता सुरू झाला. स्टोअर रूमची चावी सिस्टर सुरेखा यांच्याकडे होती. डॉ. अनित आणि डॉ. अजित बाहेर धावले.
"सिस्टर, चावी द्या ! इमर्जन्सी आहे," अनित ओरडला.
सुरेखा मॅडम फाईलवरून नजर न हटवता म्हणाल्या, "रुग्ण मरत असतात डॉक्टर, पण नियम मोडले तर हॉस्पिटल बंद पडेल. आणि तसंही स्टोअर रूमची मुख्य चावी माझ्याकडे नाहीये. फार्मासिस्ट कांबळे घरी घेऊन गेलेत. आता सकाळी ८ वाजताच उघडेल."
"सकाळी ८ वाजेपर्यंत ते बाळ निळं पडून गारठलेलं असेल !" अनितचे डोळे रागाने लाल झाले.
"तो माझा प्रॉब्लम नाही," सिस्टर सुरेखा निर्विकारपणे म्हणाल्या.
अनितने अजितकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तो निर्णय दिसला जो घेताना कुठलाही डॉक्टर दहा वेळा विचार करेल.
"अजित, बाजूला सरक."
अनितने भिंतीला लटकवलेला Fire Extinguisher (अग्निशमन सिलिंडर) एका झटक्यात उचलला. तो जड सिलिंडर घेऊन तो स्टोअर रूमच्या दिशेने धावला.
"डॉक्टर ! हे सरकारी प्रॉपर्टीचं नुकसान आहे!" सिस्टर सुरेखा किंचाळल्या.
"धडाम !!"
तो लोखंडी सिलिंडर पूर्ण ताकदीने स्टोअर रूमच्या जुन्या लाकडी दरवाजावर आदळला. दरवाजाला भगदाड पडलं. अनितने हात घालून आतली कडी उघडली. आत मिट्ट काळोख आणि झुरळांचा वास होता.
"मोबाईलची टॉर्च लाव! पटकन!" अजित ओरडले.
त्या ढिगाऱ्यात त्यांनी 'M' सेक्शन शोधला. एक बॉक्स सापडला: Inj. Methylene Blue.
बॉक्स उघडला. आणि अजितच्या पायाखालची जमीन सरकली. बॉक्स रिकामा होता.
"शिट! स्टॉक संपलाय!" अजित हतबल होऊन ओरडले.
वरती NICU मधून मशीनचा बीप... बीप... आवाज आता जोरात ऐकू येत होता. अनितने वेड्यासारखं आजूबाजूला पाहिलं. एका कोपऱ्यात 'Scrap' (भंगार) बॉक्स पडला होता. त्यात एक धुळीने माखलेली छोटी ॲम्प्युल (Ampoule) चमकली. अजितने ती उचलली.
निळ्या शाहीने पुसटसं लिहिलं होतं: Methylene Blue.
पण...
Expiry Date: Dec 2025.
औषध एक्सपायर होऊन १५ दिवस झाले होते.
"अनित, हे एक्सपायर्ड आहे!"
अनितने ती कुपी हिसकावून घेतली. त्याने प्रकाशात ती धरली. आतलं द्रावण अजूनही स्वच्छ होतं. 
"१५ दिवसांनी काही फरक पडत नाही अजित. याची ताकद (Potency) थोडी कमी झाली असेल, पण हे औषध विषारी नक्कीच नाहीये. आणि तसंही. ते बाळ पुढच्या १० मिनिटात मरणार आहे. त्याला वाचवण्यासाठी आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल."
ते पुन्हा NICU मध्ये धावले.
स्पृहा सीपीआर (CPR) देण्यासाठी पोझिशनमध्ये होती. "सर, हार्ट रेट ४० वर आलाय ! आता किंवा कधीच नाही!"
अनितने ती एक्सपायर्ड कुपी फोडली. कच्च. काचेचा एक बारीक तुकडा त्याच्या बोटाला लागला, रक्ताचा थेंब आला, पण त्याने न थांबता औषध सिरिंजमध्ये भरलं. आणि बाळाच्या कॅन्युलामध्ये पुश केलं.
ते निळं औषध सलाईनच्या नळीतून पुढे सरकलं... एका सापासारखं... त्या बाळाच्या शरीरातल्या विषारी काळ्या रक्ताशी दोन हात करायला.
पुढची ३ मिनिटं, त्या वॉर्डात फक्त पावसाचा आवाज होता. वाणी मावशी काचेला नाक लावून बघत होत्या. सिस्टर सुरेखा दरवाजातून आत डोकावत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर 'मी सांगितलं होतं नियम पाळा' असा भाव होता.
आणि मग...
मॉनिटरवरच्या त्या हिरव्या रेषेने उसळी घेतली. ४०... ६०... ८०... ९८%!
बाळाच्या ओठावरचा जांभळा थर विरळ झाला आणि तिथे एक कोवळी गुलाबी छटा उमलली.
बाळाने एक मोठी उबळ दिली आणि जोरात रडायला सुरुवात केली, "ट्याँ... ट्याँ... ट्याह्या...!"
डॉ. अजित खुर्चीवर कोसळले. त्यांनी अनितकडे बघून थम्स-अप केला. बाहेर येऊन त्यांनी आजीला सांगितलं, "आजी, बाळाला भूताने झपाटलं नव्हतं, आणि एका निळ्या औषधाने आणि एका 'एक्सपायर्ड' रिस्कने वाचवलंय तुमच्या नातवाला."
पाऊस थांबला होता. पण पॅसेजच्या अंधारात, सिस्टर सुरेखा अजूनही तिथेच उभ्या होत्या. त्यांच्या हातात मोबाईल होता. त्या कोणालातरी मेसेज टाईप करत होत्या. कदाचित अनितच्या विरोधात 'प्रॉपर्टी डॅमेज'ची तक्रार. 
वॉर्ड नं. ७ मध्ये जीव वाचला होता, पण युद्ध अजून संपलं नव्हतं.
तुम्ही अनितच्या जागी असता तर काय केलं असतं?
१. नियम पाळून सकाळी ८ वाजेपर्यंत वाट बघितली असती?
२. दरवाजा तोडून 'एक्सपायर्ड' औषध देण्याची रिस्क घेतली असती?
(नक्की सांगा! मला माहितीये, उत्तर सोपं नाहीये!)
पुढच्या भागात:
"डॉक्टर, माझ्या पोटातील बाळ माझ्याशी बोलतं..." एक गरोदर बाई मध्यरात्री ॲडमिट होते.
सोनोग्राफी केली असता गर्भाशयात बाळच नाहीये !
मग तिच्याशी कोण बोलतंय? आणि पोटाचा आकार का वाढतोय?
वाचा थरारक भाग - "गर्भातील सावली"... लवकरच !

- डॉ. सुजित भरत पाटील
बालरोगतज्ज्ञ, पुणे.
टीप: ही कथा काल्पनिक असली तरी, यात वर्णन केलेली वैद्यकीय स्थिती (Methemoglobinemia) वास्तविक आहे. लहान मुलांना विहिरीचे पाणी उकळल्याशिवाय पाजू नये आणि कोणत्याही प्रकारची राख/भस्म चाटवणे टाळावे. तातडीच्या वेळी डॉक्टरांचा निर्णय अंतिम असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...