मी एकटीच सोफ्यावर काॅफीचा कप हाती घेऊन बसले होते. रिकामी असले की माझ्या डोक्यात नेहमीचेच विचार येतात . ते विचार माझी पाठ कधीही सोडत नाही. त्या विचाराने मी आणखीच अस्वस्थ होते.का कुणास ठाऊक त्या विचारांनी मला नेहमी अस्वस्थ वाटते. चुकले का माझे काही?.... नाही. माझे काही चुकले नाही. आयुष्यभर आपण या घरात रिप्लेसमेंट म्हणून आलो. रिकामी जागा भरायची म्हणून आलो आहोत. कुणी दुसरी येणार होती, ती आली नाही म्हणून तिच्या ऐवजी मला आणले होते. का?..... का? पण माझ्याच बाबतीत असे का व्हावे ? मला भावना नाही का ? पण कोणाला दोष देऊ ? नवऱ्याला ?.... आई-वडिलांना ?.....की मला स्वतःला ? "
मी रंगाने सावळी आहे. माझी उंची कमी आहे. पाच फूट. त्यात मी जाड. माझे चेहऱ्याचे फीचर्सही आकर्षक नाही. थोडक्यात लग्नाच्या बाजारात माझा शेवटचा नंबर. अनेक स्थळांकडून नकार आलेला. पण आई-वडिलांनी स्थळ शोधण्याची जिद्द सोडली नाही. एखाद्या स्थळाचा नकार आला की ते निराश व्हायचे. पण परत नव्या जोमाने नवीन स्थळ बघायचे. खरं तर मलाही स्वतःला दाखवून घ्यायचा कंटाळा आला होता. लग्न करूच नये असे मला वाटू लागले. छान नोकरी चालू होती. माझा पगारही चांगला होता. पण माझ्यामुळे पुढच्या दोन्ही बहिणीचे लग्न अडत होते. खरंतर त्या दिसायला माझ्यापेक्षा चांगल्या होत्या. फार सुंदर नाही पण चारचौघींसारख्या नक्कीच होत्या.
एक दिवस प्रसाद त्याच्या आई-वडिलांबरोबर मला बघायला आला. पण त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तो सतत नजर चुकवत होता . त्याच्या आई-वडिलांनी जुजबी प्रश्न मला विचारले. नंतर चहा पोहे घेऊन त्यांनी निरोप घेतला. निरोप देतो म्हणाले आणि ते गेले. प्रसाद दिसायला चांगला, गव्हाळ रंगाचा, स्मार्ट, इंजिनियर, एमबीए झालेला,शिवाय एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. घरची आर्थिक स्थितीही चांगलीच होती.खाऊन पिऊन सुखी. अशा स्थळाकडून आपल्याला नकार नक्की. असे मनाशी म्हणत मी माझा लग्नाळू मुलीचा बुरखा बाजूला ठेवला आणि काहिही झाले नाही असे समजून रोजच्या कामाला सुरूवात केली.
चौथ्या दिवशी सकाळी सकाळी प्रसादच्या वडिलांचा फोन..... मुलगी पसंत आहे म्हणून. सगळ्यांनाच अनपेक्षित उत्तर आल्यामुळे धक्का बसला. बाबांनी परत फोन करून खात्री करून घेतली. कुणीतरी आपल्या मुलीला होकार दिला आणि होकार मिळाला तोही एवढ्या स्मार्ट, हुशार मुलाकडून ! कुणालाही माझ्या भाग्याचा हेवा वाटावा असा तो त्यांचा आनंद होता . आई-बाबा , दोघी बहिणी आनंदात होते . पण मला उगीच हुरहुर वाटत होती . एवढ्या चांगल्या मुलाने ज्याच्यात काही कमी नव्हती अशा मुलाने मला होकार दिला होता. घरात सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. पण का कुणास ठाऊक मला बेचैन वाटत होते. त्याने आपल्याला का होकार दिला असेल , हा प्रश्न माझ्या मनाला पोखरत होता. मी बाबांना तसे विचारले तर बाबा म्हणाले,
" त्यांना आपलं कुटुंब आवडलं असेल. तू एवढी कमावती आहेस ते आवडलं असेल. किंवा तुमच्या पत्रिका चांगल्या जुळल्या असतील. आणि हे बघ फार विचार करू नकोस."
बाबांनी विषय थांबवला. पण मला मात्र चैन पडत नव्हते. कसा बसा प्रसादचा फोन नंबर मी बाबांकडून घेतला . पण बाबांनी तंबी दिली ,
" वेड वाकडं बोलू नकोस. जरा जपून बोल."
आणि मी लगेच दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या प्रसादला फोन केला आणि संध्याकाळी निवांत बोलता येईल अशा हॉटेलात बोलावले. प्रसादने ' हो येतो ' असे म्हणून लगेच फोन ठेवला.
संध्याकाळी मी ठरलेल्या हॉटेलमध्ये वेळेवर पोहोचले. एका टेबलावर जाऊन मी बसले. पाठोपाठ प्रसादही आला आणि माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला. निळा शर्ट आणि नेव्ही ब्लू पॅन्ट घातलेला प्रसाद स्मार्ट, दृष्ट लागेल असा दिसत होता. मीही त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिले.पण लगेच स्वत:ला सावरत त्याच्यावरची नजर काढत त्याला काय घेणार म्हणून विचारले. त्याने निर्विकारपणे म्हटले, ' काहिही' मी वेटरला काॅफीची ऑर्डर दिली. नंतर पुढाकार घेऊन मीच त्याला विचारले ,
" प्रसाद तू मला होकार का दिलास याचं खरं खरं कारण सांग. तुझा उदासीन चेहराच सांगतो तुला मला होकार देऊन आनंद झालेला नाही. तुला माझ्यात इंटरेस्ट नाही . मग होकारच का दिलास ? एक सांगते मी माझ्याकडून नकार देणार नाही . माझ्या फॅमिलीच्या दृष्टीने माझं लग्न होणं महत्त्वाचं आहे. कारण माझ्या दोन्ही बहिणीही लग्नाच्या आहेत . माझे झाल्याशिवाय त्यांचं लग्न होणार नाही." भडाभडा बोलून मी थांबले.
" खरं सांगू , मलाही तुझ्यापासून काहिही लपवायची इच्छा नाही. माझा लग्न करण्याचा इंटरेस्टच कमी झाला आहे. माझी कॉलेज पासूनची रोहिणी नावाची मैत्रीण होती. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि पुढे लग्न करणार होतो पण तिचे वडील श्रीमंत कारखानदार. त्यांनी आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी एका मोठ्या बिझनेस मॅनच्या मुलाशी तिचे लग्न करून दिले.मला खूप वाईट वाटले . रागही आला. नंतर माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मागे लागले. पण मी आलेल्या सर्व चांगल्या स्थळांना सतत रागाने नकार देत राहिलो. आता अशी वेळ आली आहे की, आता मला एकही स्थळ सांगून येत नाही. आले तरी माझ्याविषयी कळले की नकार देतात. माझ्या आई वडिलांना काहिही झाले तरी माझे लग्न करायचेच आहे. पण तुलाही नकार द्यायचा असेल तर दे. पण मला तुझ्यापासून काही लपवायचे नाही." असं थोडं वैतागतच प्रसाद बोलत होता.
" म्हणजे मी रिप्लेसमेंट म्हणून तुला हवी आहे." मीही जरा चिडूनच बोलले.
" काहीही समज. मी खरे ते तुला सांगितले आहे."
बेफिकीरपणे प्रसाद बोलला आणि पुढे काहिही न बोलता तो कॉफी घेऊन निघाला. मीही तिरीमिरीत घरी आले . बाबांना म्हणाले ,
" बाबा, प्रसादने मला रिप्लेसमेंट म्हणून होकार दिला."
" माहित आहे मला ."
असं बाबांचं निर्विकारपणे बोलणं ऐकताच मी उसळून म्हणाले,
" काय तुम्हाला माहीत होतं? मग तरी तुम्ही त्यांना बोलावलं ? आपला होकार दिला ?"
यावर बाबा गप्प बसले. मलाही काय समजायचे ते समजले.
शेवटी सर्वांच्या इच्छेप्रमाणे लग्न पार पडले . सगळे आनंदात होते. लग्नात मी आणि प्रसाद मात्र बाहुलाबाहुली सारखे उभे होतो.प्रसादला माझ्यात इंटरेस्ट नव्हता. आणि मला आपण रिप्लेसमेंट आहोत या विचाराने संताप येत होता. लग्नात प्रसादची मान फुटभर खाली होती. कदाचित त्याला मी मॅचिंग वाटत नसावी. त्याला लाज वाटत असावी. म्हणूनही असेल .
लग्न होऊन मी प्रसादच्या घरी आले. सासू-सासरे चांगले होते. माझ्याशी प्रेमाने वागत होते. प्रसादनेही कधी त्रास दिला नाही. पण आम्ही दोघेही मनाने दूरच होतो. 'दोन ध्रुवावर दोघे ' अशी आमची स्थिती. दिवस जात होते. तसतसे प्रसाद माझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. ते माझ्या लक्षात येत होते. पण इगोमुळे मी तिकडे दुर्लक्ष करीत होते.आम्हां दोघांची नोकरी चालू होती. सर्वांच्या दृष्टीने सर्व छान , ओके होते. पण माझे मन ओके नव्हते. रिप्लेसमेंटची सल मनातून जाता जात नव्हती. एकटी असले की विचारांचे काहूर माजायचे.
पुढे आम्हाला मुलगा झाला.... ' ओम .' तो आजी आजोबा व माझ्याजवळ मोठा होत होता. पण.... पण ओमला प्रसादपासून हेतूपुरस्सर मी दूर ठेवत होते. ओमला प्रसादची ओढ, प्रेम वाटू नये याची मी पुरेपूर काळजी घेत होते. मला प्रसादला एकटे पाडायचे होते. ओमचा अभ्यास घेणे, त्याच्याबरोबर खेळणे सारे मी करत होते.कधी प्रसाद त्याला खेळवू लागला किंवा त्याचा अभ्यास घेऊ लागला तर मी लगेच ओमला माझ्याकडे बोलावून घ्यायचे. आणि मी त्याचा अभ्यास घ्यायचे.त्याच्याबरोबर खेळायचे. दिवस जात होते. तसतसा ओम मोठा होत होता. प्रसादही माझ्याशी मनापासून जुळवून घेण्याचा शिकस्तीने प्रयत्न करत होता.मला ते जाणवत होतं. पण माझ्या मनातील सल मात्र काही केल्या कमी होत नव्हती.
ओम इंजिनीयर झाल्या नंतर त्याने एमबीए केलं व त्याला बंगलोरला जॉबही मिळाला. ओम घरातून गेला आणि घरातलं चैतन्य गेल्यासारखं वाटू लागलं. त्याचा नियमीत फोन येत असे. मी प्रसादला त्याच्याशी कसे बोलता येणार नाही याची काळजी घेत होते. ओमचा फोन आला आणि त्यावेळी जर प्रसादच्या हाती फोन असेल तर मी लगेच त्याच्या हातून फोन काढून मीच ओमशी बोलत असे.माझे बोलणे झाले की मी लगेच फोन बंद करत असे. पण अशावेळी सुद्धा प्रसाद शांत असे. त्याच्या डोळ्यात मात्र कारुण्य दिसत असे. पण तरी मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते.
मी सासू-सासरे दोघांचे कर्तव्य म्हणून सारे करत होते . पण मनात त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून मला आणले हा राग होताच. हे तेही जाणून होते. त्यांनी मला बरेच समजावले . माया लावली. पण माझ्या मनातील अढी शेवटपर्यंत गेली नाही. सासू-सासरे दोघेही पाठोपाठ गेले. घरात आम्ही दोघेच.... प्रसाद व मी राहिलो. पण दोघेही 'दोन ध्रुवावर दोघे आपण ' असेच होतो. काही वर्षांनी प्रसाद रिटायर्ड झाला. मीही दोन वर्षांनी रिटायर्ड झाले. घरात आम्ही दोघे असूनही अजूनच एकटेपणा जाणवू लागला. प्रसाद माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पण मी कधीही त्याला रिस्पॉन्स दिला नाही. कामापुरता आमच्यात संवाद होता. कुठे बरोबर जाणे नाही नाटक सिनेमा नाही. आमचे जगणे एकट्याचेच होते. आमचे आपापले विश्व होते.
एक दिवस प्रसादला छातीत दुखू लागले त्याला मी हॉस्पिटलला नेले. ट्रिटमेंट सुरू झाली . तो ओमची सारखी आठवण करत होता. पण मी ओमला कळवले नाही. एक दिवस प्रसादने हात जोडले.म्हणाला,
" खरं सांगतो. तुला रिप्लेसमेंट म्हणून आणली. पण मागचे सर्व विसरून मी नकळत तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. पण तुझ्याकडून कधीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. तरी मी मनापासून सांगतो, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले. पण तू मला एकटे पाडले. मला आता तरी माफ कर."
त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आले. नंतर ओमला कळवण्यासाठी मी फोन हाती घेतला. त्याला प्रसाद हॉस्पिटलला ऍडमिट आहे सांगितले. तो लगेच निघतो म्हणाला . ओम येत आहे हे सांगण्यासाठी मी प्रसादचा हात हाती घेतला. पण.... पण प्रसाद पैलतीरी गेला होता.
ओम आला. प्रसाद व ओमची भेट झाली नाही. ओमने सर्व सोपस्कार केले. सगळे पाहुणे गेल्यानंतर घरी मी व ओमच होतो. एक दिवस दुपारी जेवण झाल्यानंतर तो माझ्याजवळ येऊन बसला. म्हणाला ,
"आई , मला बोलायचे आहे तुझ्याशी."
" बोल ना काय बोलायचं आहे."
" आई खरं तर बाबा म्हणाले होते. या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही. तुला दुखवायचे नाही. तसा मी त्यांना शब्दही दिला होता . पण ते आता गेले. त्यामुळे आता मी बोलू शकतो. आई , बाबांनी मला तुमच्या लग्नाची पार्श्वभूमी सांगितली. तुझ्याशी लग्न केल्यानंतर ते तुझ्याशी प्रामाणिक राहिले. त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. उलट त्यांना तुझ्या बाबतीत जे झाले त्याचे गिल्ट वाटत होते. त्यांना हळुहळू तुझ्याबद्दल प्रेमही वाटायला लागले होते . पण तू त्यांना कधीच रिस्पॉन्स दिला नाहीस. खरं तर त्यांनी तुला त्यांच्याशी लग्न करायची जबरदस्ती केली नव्हती. परिस्थितीमुळे तुही लग्नाला तयार झालीस. पण आपण रिप्लेसमेंट आहोत हे तुझ्या मनात इतके खोलवर रुतले होते की, तू सगळ्यांचा राग करत होतीस. सासर, माहेर दोन्हीकडचा. आजी आजोबा तुला मुली सारखे प्रेमाने वागवत होते . पण तुला त्यांची किंमत नव्हती. माहेरची पण माणसं तू कधीच तोडलीस. बाबांना तर एकटं पाडण्याचा तू चंगच बांधला होतास . मला सुद्धा त्यांच्यापासून दूर करायचा प्रयत्न करत होतीस. लहानपणी ते माझा अभ्यास घेऊ लागले किंवा माझ्याशी खेळू लागले की तू लगेच मला बोलावून स्वतः अभ्यास घ्यायचीस किंवा माझ्याबरोबर खेळायचीस. त्यांनी माझ्यासाठी आणलेला खाऊही तू मला खाऊ द्यायची नाहीस. आम्हा दोघांना बोलू द्यायची नाहीस. पण तुला दुखवायचे नाही म्हणून ते गप्प बसत होते. त्यांचे पित्याचे हृदय मला मिठीत घेण्यासाठी आसुसलेले असायचे . माझ्याशी बोलण्यासाठी , माझे लाड करण्यासाठी त्यांचे पित्याचे हृदय तळमळत होते. मग बाबा मला मधल्या सुट्टीत येऊन माझ्यासाठी खाऊ आणून स्वतःच्या हाताने भरवायचे. मला मिठीत घ्यायचे. त्यावेळी त्यांचे डोळे भरून यायचे. हे सारं कॉलेज संपेपर्यंत चालू होते. मी तुला त्याविषयी कधी बोललो नाही. मी बंगलोरला गेलो तरी तू मला त्यांच्याशी बोलू द्यायची नाहीस. म्हणून मी त्यांना ऑफिसमध्ये फोन करून बोलायचो. आम्ही मनाने खूप जवळ आलो होतो. आताही तू माझी व बाबांची भेट होऊ नये म्हणून मला कळवले नाहीस. त्यांच्या अंतकाळीही तू तुझा राग सोडला नाहीस. नशीब माझे की, एकदा तू औषध आणायला गेलीस तेव्हा ते माझ्याशी नर्सच्या फोनवरून बोलले होते. नशिबाने तेवढे तरी माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. मी निघायची तयारी करत असतांनाच ते हास्पिटलमधे असल्याचा तुझा फोन आला. आई दुष्टपणाची हद्द तू पार केलीस. आई, तुझ्या बाबतीत जे घडले ते वाईट झाले. पण त्या रागाच्या भरात सगळ्यांना तू जाळू पाहत होतीस. बाबांना एकटे पाडण्याच्या नादात तूच एकटी पडली आहेस. हे तुझ्या लक्षात येते का ? आता आजी-आजोबा गेले. बाबा गेले . आता तरी शांत हो. सगळ्यांवरचा राग सोड . तू कशीही वागली असलीस तरी मी तुला अंतर देणार नाही. तसे बाबांनी माझ्याकडून वचन घेतले होते. ते मी शेवटपर्यंत पाळीन . ते सतत शेवटपर्यंत तुझाच विचार करायचे. पण तू काय केलेस ? ते तू तुझ्याच मनाला विचार . असो, आता तू इथे एकटी राहू नकोस. माझ्याबरोबर बंगलोरला चल. मी तुला अंतर देणार नाही. "
ओमचे बोलणे ऐकले आणि मी मनाने कोसळलेच. मी जीवनात काय मिळवलं ? अहो, जर मी कुणाला काही दिलंच नाही तर मला काय मिळणार? खरंच जे मला आधी कळायला हवे होते ते मला आता कळतं की, या संसाराच्या प्रवासात प्रसादच्या मनात माझे स्थान रिप्लेसमेंट म्हणून नव्हते तर..... खरच मी वेळीच स्वत: ला सावरले असते तर माझाही संसार चारचौघींसारखा सुखाचा झाला असता. माझा इगो आडवा आला हेच खरे. खरंच प्रसाद मला माफ कर .... पण आता मला हे गिल्ट मनाशी घेऊनच पुढे जगावे लागणार आहे.
स्मिता भलमे
( ' रिप्लेसमेंट ' ही कथा ' संवाद मिडिया ' 2025 या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा