मंगळवार, ३ मार्च, २०२६

2686. प्रामाणिक लोकांसाठी....!

 कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरू होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच. सुंदर वेलीच्या खोडावर बांडगूळ वाढावा अगदी तस्से. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना पण नसते.  मग तुमची प्रगती लोकांच्या डोळ्यात सलते आणि ती त्यांच्या डोक्यात भणाणू लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि ती व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. 
     मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे. तुम्ही भांबावता. हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागतां. शब्दाला शब्द वाढतात. त्यांची धार तिखट होते. विरोधकांना आयते खाद्य मिळते आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे नक्कीच खचून जातात. आपल्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत आजवर सांभाळलेले संतुलन आपण गमावून बसतो.
     नुकसान हे नेमके याचं क्षणाला होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल. विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायम जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सलं मात्र खोलवर दडलेली मात्र कायम असायलाचं हवी. ती विसरतां कामा नये. कारण तीचं भविष्यात पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरते. यश पचविणे एक वेळ सोपे. पण प्रत्येक आरोप रिचवणे खूप कठीण. “हेचि फळ काय मम तपाला ? “ याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे शक्य तितके नक्कीचं सोपे नाही. कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे.. ?
    वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती लागते ते केवळ शांत राहायला. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही. जे लोक आपला स्वार्थ साधे पर्यंत सोईनुसार वागणार. आपलं स्वार्थ साधल्या नंतर समोरच्या मध्ये खरं काय नि खोटं काय हे सवडीने बघणार. पण आपल्यातील चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतल्या नंतर. तो पर्यन्त आपल्यातील दोष जगाला दाखवुन लोकांची कानं भरणार.
''पण आपण त्यांच्यासाठीच उत्कृष्ट आहोत जे आपल्याला ऊत्क्रुष्ठ समजतात हे कायम ध्यानात ठेवा..!
''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. लोकांचे काय घेऊन बसताय ! काही लोकं देवालापण नावे ठेवायला मागे पुढे बघत नाहीत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...