मंगळवार, ३ मार्च, २०२६

2646. आधुनिक काळातील ऋषी

 आदरणीय प्रा. मधुकरराव उपलेंचवार सर.
      तुम्ही देव पाहिला आहे कां हो देव? जो आपल्या, लहान वयातील अत्यंत गरीब भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करुन, त्या भक्तांस, समाजातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित पातळीवर आणून ठेवतो. असा देव?
      मी प्रत्यक्ष पाहिला आहे असा देव.. विश्वास नसेल, तर चला माझ्या सोबत.. मी तुम्हाला दर्शन घडवितो या देवाचे..
     हिंगणघाटपासून फक्त सांत किलोमीटर अंतरावर, सातेफळ या लहानशा ग्रामी,  एक भव्य निवासी शाळा आहे.. ज्ञानदा हायस्कूल व ज्यूनिअर काॅलेज... त्या आवारातच रहातो हा देव..  त्या देवाचे नांव आहे, आदरणीय प्रा. मधुकरराव उपलेंचवार..आधुनिक काळातील देवतुल्य ऋषी.. वय वर्षे 87
     या ज्ञानदा शाळेला शाळा म्हणणे म्हणजे तिचा अपमानच आहे.. कारण, ही नेहमी सारखी शाळा नसून, विद्यापीठ आहे विद्यापीठ.. "माणूस" घडविणारे विद्यापीठ.. या विद्यापीठात फक्त अभ्यासक्रम शिकविला जात नाही... येथे शिकविल्या जाते, माणूसकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव, आणि उच्च कोटीची नैतिकता.. जी आज आपण हरवून बसलोय...
      पुण्याच्या एस्.पी.काॅलेज मधून बी.एस्.सी. व नंतर एम्. एस्.सी (फिजिक्स) शिक्षण घेऊन, वरोरा येथील मा. बाबासाहेब आमटे, यांचे निमंत्रणावरुन वरोरा काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कामावर रुजु झालेल्या या ध्येयवेड्या माणसाने, एक स्वप्न उराशी बाळगले होते.. ते म्हणजे ग्रामीण भागातील मुले, शिक्षणासाठी शहरात आल्यावर, त्याला रहायला माफक दरात वसतिगृह आणि माफक दरात जेवण उपलब्ध करुन देणे.. कारण लहान गांवातून आलेल्या गरीब मुलांना निवास आणि भोजन हाच प्रमुख प्रश्न सतावत असतो.. 
     अनेकानेक प्रकारचे कष्ट सोसून, वरोरा येथेच, काॅलेज समोर पंधरा मुलांचे वसतीगृह निर्माण करण्याचा संकल्प करणार्या या तरुण प्राध्यापकाचे त्यावेळी  वय असेल जेमतेम 26 वर्ष..
     पुण्यात शिक्षण घेत असतांना, असे थोर सत्कर्म करणारे, डाॅ. ग. श्री. उर्फ अण्णासाहेब खैर.. यांचेकडून प्रेरणा घेऊन, त्यांनाच गुरु स्थानी ठेवून, सरांनी हेच आपले जिवन ध्येय ठरविले होते.. केवळ नोकरी करुन प्रपंच करणे त्यांना मान्यच नव्हते.. 
प्रपंच सुखनैव करावा ! 
परंतु काही परमार्थ वाढवावा !!
परमार्थ अवघाची बुडवावा !
हे विहित नव्हे !!
    हे दासबोधातील वचन अंगीकृत करुन, हा ध्येय वेडा माणूस झपाटून गेला.. कामाला लागला.. तो आजतागायत.. अगदी वयाचे 87 व्या वर्षी सुध्दा..
      आजमितीस वरोरा, बुटीबोरी, हिंगणघाट व सातेफळ असे चार जागी जवळपास 800 मुलामुलींची निवास व भोजन व्यवस्था उभी आहे..
       हे कार्य करीत असतांना, नुसती निवास व भोजन व्यवस्था आता त्यांना पुरेशी वाटत नव्हती..तर..  ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर व अन्य श्रेणीतील घरातील मुलांमुलींना शहरासारखे उच्च शिक्षण, निवास, भोजन सुविधा मिळून ते चांगले संस्कारित नागरिक घडावे.. हा नवा ध्यास सरांनी घेतला.. आणि याच साखळीत आज सातेफळला दिमाखात उभे आहे हे ज्ञानदा विद्यापीठ..  त्यांच्या मनातील माणूस घडविणारे विद्यापीठ..
     हे विद्यापीठ म्हणजे एक अत्यंत अद्भुत प्रकरण आहे.. गोयंका नामक दानशूराने, सरांना चार एकर जागा दान दिली.. या चार एकरच्या प्रशस्त आवारात आहे ही निवासी शाळा.. सहावी पासून बारावी पर्यंत... मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृहे.. स्वतंत्र भोजनालये.. जवळपास सहाशे मुलं मुली निवासी आहेत.. वसतीगृहांच्या समोरच भव्य शाळा.. मोठ्ठे पटांगण.. आतील रस्ते, शिस्तबद्ध झाडे.. पालक विद्यार्थी मेळावा किंवा स्नेहसंमेलन घेण्यासाठी एक भव्य नितांतसुंदर बांबुचे हवेशीर सभागृह..
     या विद्यापीठातून सरांनी नैतिक मुल्ये जगणारी एक नवीन पिढीच तयार केली.. इतकी.. कि आजही त्या पिढीचे आपल्या शाळेवर आणि आपल्या सरांवर तितकेच प्रेम आहे.. शाळेतील कर्मचारी, शिक्षक, वसतीगृहाचे वाॅर्डन्स्.. हे सगळेच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत..
    आणखीन एक.. या शाळेला शासकीय अनुदान नाही.. लोकाश्रयावर आहे ही संस्था.. आर्थिक पाठबळही माजी विद्यार्थांचेच जास्त.. जे उच्च शिक्षण घेऊन आज समाजात उच्च पदांवर कार्यरत आहेत.. माजी जिल्हाधिकारी इ.झेड. खोब्रागडे पण याच शाळेचे माजी विद्यार्थी.. तर सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर ही याच शाळेचे विद्यार्थी.. एक ना अनेक शेकडो माणसे घडविली या महात्म्याने.. कुठपर्यंत यादी द्यायची?
     आज आपण अनुभवतो की शिक्षण क्षेत्रात, शाळा संस्थापक आपल्या नातेवाईकांनाच विश्वस्त म्हणून ठेवतात.. आपलीच मुले, मुली, जावई, बायको.. कारण शाळा  हा व्यवसाय झालायं ना..
     अशा या भ्रष्ट व्यवस्थेत या महात्म्याने शाळेच्या घटनेत दुरुस्ती केली.. "संस्थेच्या विश्वस्त मंडळात केवळ माजी विद्यार्थीच राहतील.. अन्य नाही." इतका विश्वास आहे आपल्या मुलांवर सरांचा.. कारण तशीच सेवाभावी पिढी घडविली आहे सरांनी.. शाळेचे सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष  आणि सर्व विश्वस्त हे शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत.. आहे ना आश्चर्यकारक?
    काही शिक्षक निवासीही आहेत.. त्यांच्या साठी पण निवासस्थाने आहेत.. अर्थातच ते ही माजी विद्यार्थी.. 
      आम्ही शाळेच्या आवारात सरांशी बोलत बसलो होतो.. एक बाई आवारात झाडू लावत होती.. सरांनी तिला हाक मारुन बोलावले.. आमचा फोटो काढायला.. आणि तीची ओळख करुन दिली.. ती माजी विद्यार्थीनी असून जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे.. आपली नोकरी सांभाळून या आपल्या शाळेतही काही तास शिकवते.. आज रविवार.. रविवारी शाळेत श्रमदान असते.. सर्व शिक्षक मुले शाळेचे आवार झाडून स्वच्छ करतात.. त्यात या शिक्षिकाही हातात लांब झाडू घेऊन आवार झाडीत होत्या.. हे असे संस्कार कुठे बघितले आपण?
     या शाळेच्या सर्व विषयांच्या प्रयोगशाळा अगदी अद्ययावत आहेत.. संगणक कक्षात चाळीस संगणक आहेत.. वायफायने समृद्ध..  गणित या विषयाची शाळेत प्रयोगशाळा कुठे बघितली आहे तुम्ही?.. पण इथे गणिताची प्रयोगशाळा आहे.. पहाण्यासारखी आहे.. सर्व शिक्षण प्रात्यक्षिक आधारित आहे.. जिना चढतांना प्रत्येक पायरीवर गणिताचे विविध सूत्रे लिहून ठेवली आहेत.. जिना चढतांना अनायसे वाचन होतेच..
     सर्व विद्यार्थांना सकाळी 5.30 वाजता उठावे लागते.. सकाळी खेळ, व्यायाम (अगदी मल्लखांब सुध्दा), योगासने, मग नियमित शाळा, सायंकालीन मैदानी खेळ.. रात्री जेवण करुन 8.30 ते 10.30 अभ्यासिका.. त्या अभ्यासिकेत बसून सर्वांनी आपापले होम वर्क, अभ्यास अगदी कंपल्सरी.. हे दोन तास सर्व अभ्यासिकेत मग्न.. पिन् ड्राॅप सायलेन्स.. लक्ष ठेवायला मुलंच आहेत माॅनिटर.. रात्री 10.30 ते पहाटे 5.30 झोप..
    सर्व सुरळीत चालण्याकरिता मुलांच्याच विविध समित्या.. सांस्कृतिक समिती, स्वच्छता समिती, व्यवस्था समिती.. या प्रमाणे.. समिती प्रमुखास काम सांगितले की अल्पावधीत ते झालेच म्हणून समजा..
     रोज सायं प्रार्थना.. त्यात एक दोन विद्यार्थांचे सुविचार कथन.. हे सुविचार त्यांनाच शोधून पाठ करावे लागतात.. त्यात क्षमा नाही.. सहा सातशे विद्यार्थांचा सतत वावर असणार्या आवारात कुठेही मुलांचे मोठ्याने बोलणे, ओरडणे, अकारण धावणे, भांडणे, मारामारी.. कुठेच अजिबात नाही.. आपण जर डोळे मिटून या आवारात बसलो, तर या आवारात सहा सातशे विद्यार्थ्यांचा वावर आहे, हे तुम्हाला जाणवणार ही नाही.. आवारात आलेल्या अनोळखी लोकांना रस्त्यात भेटणारा प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी अगदी कमरेत वाकून  दोन्ही हांत जोडून "नमस्कार सर" हे म्हणणारच.. 
       आवार स्वच्छ.. भोजनगृहे स्वच्छ.. मुले स्वच्छ आणि स्वावलंबी.. त्यांची वागणूक एकदा आपण अनुभवावीच अशी..
    अशी जबरदस्त पिढी घडविली आहे सरांनी की बस.. एक शिक्षक, माजी विद्यार्थी सांगत होते.. पदवी मिळविल्यावर बी.एड. ला ॲडमिशन मिळाली.. त्यावेळी साडेचार हजार फी होती.. पैसे नव्हते.. सरांकडे आलो.. सर म्हणाले थांब.. त्यांची एक आर.डी. मॅच्युअर झाली होती.. रु. 4550 ची.. त्यातील रु.4500 सरांनी मला दिले.. त्यामुळे मी बी.एड. करुन नोकरी करु शकलो.
 अशा एक नाही तर शेकडो आहेत सक्सेस् स्टोरीज.. म्हणून सर्वांचा खूप जीव आहे सरांवर..
     शाळेचे सहसचिव आहेत श्री लकी खिलोसिया.. वय अवघे 30.. पण मोठा जबरदस्त उमदा तरुण.. अत्यंत कष्टाने शिक्षण पूर्ण केले.. सरांनी शाळेतच नोकरी दिली..पण ज्या शाळेला आता मी काहीतरी देणं लागतो, त्याच शाळेतून पगार कसां घ्यायचा? दिली नोकरी सोडून लकी सरांनी .. आज वडनेर च्या काॅलेज मध्ये प्राध्यापक आहेत..नोकरी घर सांभाळून उर्वरित वेळ शाळेची सेवा..सहसचिव या नात्याने.. सरांचेच वसतीगृहात राहून शिक्षण घेणार्या या तरुणाने, या शाळेची शासन मान्यता मंत्रालयात खेटे घालून मिळवून दिली.. त्यावेळी या तरुणाचे वय होते अवघे 23 वर्ष.. काय संस्कार दिले सरांनी बघा.. लहानशा वयात मोठी क्षमता असणारे तरुण निर्माण केले सरांनी.. लकी सरांचा एकच वर्षापूर्वी विवाह झाला असून पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आहे बरं.. 
     या शाळेत कमवा व शिका ही पण योजना आहे.. होस्टेल फी भरायला पैसे, नसतील, तर लहान वर्गांना शिकवा.. त्याचे मानधन मिळेल.. त्यातून होस्टेल फी भरा..
या योजनेचा लाभ घेत शिक्षण पूर्ण केलं आहे लकी सरांनी.. देखणा व उमद्या स्वभावाचा माणूस आहे लकी सर.. 
     माजी विद्यार्थांनी सरांची एकसष्टी केली.. त्यावेळी निधी गोळा करुन सरांना 60 हजार रुपयांची थैली दिली.. काय करावे सरांनी? जवळचे 40 हजार टाकून शाळेला देणगी दिली एक लाखाची..
   सरांची सत्तरी आली.. पुन्हा माजी विद्यार्थांनी मोठा कार्यक्रम घेतला.. सर आता थकत चालले आणि स्कुटीवरुन प्रवास करतात.. म्हणून माजी विद्यार्थांनी सात लाख रुपये गोळा करुन सरांना सरप्राईज एक कार प्रेझेंट दिली.. सरांना भरुन आले.. पण ही गोष्ट सर मोठ्या कौतुकाने सांगतात..
     असे सर.. आणि असे विद्यार्थी.. मी तरी नव्हते बघितले कधी.. उपलेंचवार सर हा साधा माणूस नाही.. आधुनिक काळातील ऋषी आहे ऋषी.. अनेकांचे दैवत.. अनेकांचे मनातील देव.. उपलेंचवार सर..
     मी स्वतः गुरुजी एज्युकेशन फाऊन्डेशन या संस्थेचे काम करतो.. आमच्या मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन आम्ही नेहमीच नागपूरला घेत असतो.. लकी सरांचे निमंत्रणावरुन या वर्षी आमचे स्नेहसंमेलन आम्ही सातेफळला घेतले..  रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी.. तेव्हा अनुभवला आम्ही हा स्वर्ग..
    एकदा तरी या सातेफळच्या स्वर्गात जाऊन या.. एकदा तरी दर्शन घ्या.. या देवतुल्य आधुनिक ऋषींचे..

मोहन वराडपांडे, नागपूर.
9422865897.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...