आपण श्वास घेतो,खातो, बोलतो, चालतो, हसतो आणि कधी थोडंसं रडतोही. म्हणून आपण 'जीवंत' आहोत हे निर्विवाद सत्य आहे. पण जीवंत असलो तरी,खरंच आपण जगतोय का?
कारण बहुतेक माणसे फक्त 'जगण्याचा यांत्रिक कार्यक्रम' पूर्ण करत असतात.जगण्याचा 'अनुभव' घेत नाहीत. सकाळी उठायचं, मोबाईल हातात घ्यायचा, ऑफिसला धावायचं, स्क्रीनकडे बघत काम करत राहायचं, थोडं उसनं हसायचं, थोडं रागवायचं, मग रात्री थकून बेशुद्ध असल्यासारखं झोपायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. जणू कुणी आपल्या जीवनाचं 'रीप्ले बटन' दाबून ठेवलंय.
हे आयुष्य नाही ही तर पुनरावृत्ती आहे. ही पुनरावृत्ती माणसाला जिवंत ठेवते,
पण जगण्याचं सार हरवून टाकते.जणू कुणीतरी आपल्याला 'जीवन' नावाचं मशीन देऊन ‘Start’ बटण दाबलंय आणि आपण सेट केलेल्या ठरावीक मोडवर धावतो आहोत.
पण मानसशास्त्र सांगतं. मनुष्याचं अस्तित्व फक्त श्वासावर नाही,तर ‘अनुभूतींवर’ टिकलेलं आहे. जो जगण्याचा आनंद अनुभवतो, जो प्रत्येक क्षणात अर्थ शोधतो आणि तोचं खऱ्या अर्थानं 'जीवंत' असतो.
मानवी मेंदू दोन भागांत जगतो.
एक स्मृतीत आणि एक कल्पनेत.
पण 'आत्ता' जगण्यासाठी या दोन्हींपासून काही काळ दूर राहणं आवश्यक असतं.
ज्याला आताच्या प्रत्येक क्षणात जगता येतं, तो पूर्णत्वानं कार्यरत असतो. जो फक्त 'आत्ता' जगतो. त्याला मानसशास्त्रज्ञ Carl Rogers 'Fully functioning person' म्हणतो.
तो म्हणतो, “A fully functioning person lives in the present moment, not in what was, or what might be.” म्हणजेच, पूर्णत्वाने जगणारा माणूस हा पूर्णपणे वर्तमान क्षणात जगतो.
पण मित्रहो....
आपण मात्र भूतकाळाच्या ओझ्यात आणि भविष्याच्या काळजीतचं जगत असतो. आपण आपलं वर्तमान हे फक्त ‘पार्क’ करण्याचं ठिकाण बनवलंय !
आजकाल बहुतांश लोकांसाठी 'life satisfaction' म्हणजे फक्त पैसा, दर्जा, गाडी, किंवा सोशल मीडियावरील ‘likes’ हेच बनलंय.
पण मानसशास्त्रज्ञ Abraham Maslow यांनी सांगितलंय, “Self-actualization begins when you stop chasing what others expect from you.”
जेव्हा तुम्ही समाजाच्या अपेक्षा बाजूला ठेवता आणि स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला लागता, तेव्हाचं तुम्ही जगायला सुरुवात करता. आपल्या संतांनी हेच अधिक साध्या,पण खोल शब्दांत सांगितलंय.
संत ज्ञानेश्वर म्हणतात... “आनंदेची ओढ लागली, तोच भक्त जीवंत आहे.” त्यांनी जगण्याचा अर्थच बदलून टाकला.
जगणं म्हणजे फक्त भोगणं नाही; जगणं म्हणजे भावनांचा, संबंधांचा आणि आत्मजागृतीचा प्रवास आहे. त्यांनी सांगितलंय,जीवनाचं सौंदर्य बाहेर नाही,तर अंतर्मनात आहे.
मानसशास्त्रज्ञ Viktor Frankl, ज्यांनी नाझी छावणीत मरणासमोर जगण्याचा अर्थ शोधला. ते म्हणतात, “Those who have a ‘why’ to live can bear almost any ‘how’.” ज्याच्याकडे जगण्याचं कारण असतं, तो कोणतीही वेदना सहन करू शकतो.
हेच आपल्या संतांचे 'प्रसन्नतेचं तत्त्वज्ञान' आहे-
“आनंद हा परिस्थितीवर नाही, दृष्टीवर अवलंबून असतो.” आज माणूस सर्व सुखसोयींनी वेढलेला आहे पण मन रिकामं आहे. घरात प्रकाश आहे,पण अंतर्मनात अंधार आहे. पैसे, गाड्या,दर्जा सगळं आहे पण समाधान नाही. का? कारण आपण ‘जगणं’ विसरलो आहोत. आपण फक्त ‘जगायचं नाटक’ करत आहोत. आजची पिढी जगत नाही, ती फक्त survive करतेय. कामाचा ताण, अपुरी झोप, असुरक्षितता, तुलना,सोशल मीडियाचा दबाव यांनी जीवन ‘emotionally flat’ केलं आहे. लोक हसतात, पण मन रिकामं असतं. फोटो सुंदर येतो पण चेहऱ्यावरचं तेज कृत्रिम असतं. अशा माणसांना मानसशास्त्रात emotionally detached individuals म्हणतात.
शरीर इथे पण मन मात्र कुठेतरी दूर. ते सतत ‘auto-pilot mode’ वर जगत असतात. त्यांना स्वतःशी संवाद साधायला वेळ नसतो कारण 'silence' म्हणजे त्यांच्यासाठी भीती बनलेली असते. पण मानसतज्ञ सांगतात...
जर तुम्ही स्वतःशी शांत बसू शकत नाही तर तुम्ही कोणाशीही खऱ्या अर्थानं जोडू शकत नाही.
वरील सारा लेख प्रपंच वाचून अनेकजण विचारतील,“मग जगायचं तरी कसं?”
उत्तर सोपं आहे.
जगणं म्हणजे मोठं काही करायचं नाही.फक्त 'आत्ता'चा आस्वाद घ्यायचा.जगणं म्हणजे या क्षणात राहणं. मुलांच्या हास्यात, फुलांच्या सुगंधात, आईच्या आशीर्वादात, पावसाच्या स्पर्शात, चहाच्या घोटात, मित्रांच्या टोळक्यात किंवा स्वतःच्या एकांतातही. जे आहे, ते मनापासून अनुभवणं. प्रत्येक गोष्टीत दडलेला आनंद शोधणं. त्यासाठी मोठी कमाई,मोठा प्रवास, किंवा मोठं यश लागत नाही.फक्त जाणीव लागते. मनुष्याला 'अर्थ' मिळाला की जीवन आपोआप आनंदी होतं. कधी प्रेमात, कधी सेवेच्या कार्यात, कधी लेखनात, कधी साधनेत...जो आपल्या आयुष्याला 'अर्थपूर्ण' बनवतो, तोच खरा जगतो. मन जेव्हा हे सारं अनुभवायला लागते तेव्हा जीवन जागं होतं.
त्या क्षणात आपण 'Alive' नव्हे, तर 'Awake' होतो. Mindfulness नावाचं आधुनिक मानसशास्त्रीय तंत्रही हेच सांगतं, वर्तमान क्षणात रहा, कारण तिथेच खरं जीवन आहे.
संत नामदेव म्हणतात,“आनंदे भरीतो विश्व,भावे देव ओळखावा.” हा 'भाव' म्हणजेच मानसशास्त्रातील 'Emotional Awareness.' आपल्या भावनांना ओळखणं, स्वीकारणं आणि त्यांना जगणं, हेच जगण्याचं मानसशास्त्र आहे.
जीवंत राहणं ही देहाची गरज आहे पण जगणं ही आत्म्याची गरज आहे.
संत नामदेव म्हणतात,“जगाचा जीव झाला मजमध्ये,मी झालो जगात.”
जगण्यातून आत्मज्ञानाची अनुभूती आणि आत्मज्ञानातून जगण्याचा खरा आनंद हीच खरी परिपूर्णता आहे.
श्वास फक्त देह जिवंत ठेवतो पण अनुभूती आत्मा जागृत ठेवते.
फरक इतकाच - जगणं ही एक प्रक्रिया आहे पण जाणीव ही साधना आहे.
म्हणून दररोज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारुया-
“मी खरंच जगतोय का?”
जर या प्रश्नाचं उत्तर मनापासून 'हो' आलं तर समजायचं, आपण जीवनाच्या योग्य मार्गावर आहोत.
जीवंत राहणं आणि जगणं यातील फरक आपण नक्कीच ओळखला आहे...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा