मंगळवार, ३ मार्च, २०२६

2666. 'तथ्य'

 आईचं दहावं आटोपल्यावर, तो शांतपणे बसून होता बाजूच्याच कठड्यावर. अर्धा तास लागला होता जवळ जवळ, कावळा शिवायला. त्याला नक्की कळत नव्हतं की, आईचं नेमकं काय कमी झालं आपल्याकडून. कुठली इच्छा अपुर्ण ठेऊनच, आई गेली आपली. 
तेव्हाच त्याचा अठरा वर्षांचा मुलगा आला, नी बसला त्याच्या बाजूला. त्याच्या खांद्याभोवती हात ठेऊन, त्याला म्हणाला.
"बाबा... कावळा काही केल्या शिवत नव्हता म्हणून मी मनात बोललो की, मी माझ्या आई - बाबांपासून कधीच वेगळा रहाणार नाही... जसे माझे बाबा राहीले तुमच्यापासून. अगदी पंधरा मिनिटांवर का होईना, पण वेगळं राहणं हे वेगळं राहणंच असतं. आठ तासांच्या रात्रीत, पंधरा सेकंदही पुरतात ह्या वयात जिवाचं बरं - वाईट व्हायला. आज आपण आजी - आजोबांसोबत असतो तर आजीला जोराचा ठसका लागताच, मी पळत तिला पाणी दिलं असतं. पण आजोबांना कसं ते जमणार होतं ते? आजोबांनी हे ठसक्याचं मला मागाहून सांगितलं होतं, ह्या अटीवर की मी तुम्हाला सांगणार नाही. आणि म्हणूनच यापुढे मी आजोबांसोबत जाऊन राहीन, त्यांना कधीही एकटं सोडणार नाही असंही बोललो पुढे. मला खरंच माहीत नाही, ह्यात कितपत 'तथ्य' असतं. पण पुढल्याच क्षणी कावळा शिवला खरा".
लेकाचं हे ऐकून, त्याने गहिवरुन पाहिलं त्याच्याकडे. आणि हमसा हमशी रडू लागला तो. थोड्या वेळेनी शांत झाल्यावर, लेकाला म्हणाला... 
"त्या रात्री अडीचच्या दरम्यान, माझ्या स्वप्नात आई आली होती. आणि तीन वाजता ती गेल्याचा फोन आला बाबांचा. मलाही खरंच माहीत नाही, ह्यात कितपत 'तथ्य' असतं. पण कोणी आठवण काढली की, ठसका लागतो म्हणतात ना. मग आईला लागलेला तो शेवटचा ठसका, मी काढलेल्या तिच्या आठवणीचाच तर नसावा?". 
बाप - लेक निःशब्द होत आता, समोरच्या त्या पिंडाकडे बघत बसले होते. ह्या सगळ्यात 'तथ्य' असावं की नसावं, ह्या आपापल्या मनातून चाललेल्या द्वंद्वात. शेजारीच ठेवलेल्या पानावर आता, आणिक तीन - चार कावळे जमा झालेले दिसत होते.

- सचिन देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...