मंगळवार, ३ मार्च, २०२६

2698. हडळ... !!!

 मी नववीत असेन बहुधा.  साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावसं वाटतं, मन भरून येतं, पण रडू येत नाही तसंच काहीसं.  त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागानं दिवसभर जेवलो नव्हतो, तिनेही बोलावलं नाही. रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे ७ वाजते असावेत.  अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत 'पहले आप पहले आप' म्हणून निरोप देत असावेत. 
निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला, काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो-धो पाऊस सुरू झाला. मी चिंब...! 
पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. घर कसलं ? पत्रे, गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता. 
आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे ! 
आम्ही जिथे रहायचो. तिथे एक पन्नाशीची बाई रहायची. शेजारच्या आयाबाया तिला 'हडळ' म्हणायच्या. 
ती दिसायलाही होती तशीच. डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळे बुब्बुळ नव्हतंच, अख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं, या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले, तोंडात मोजके दात, त्यातून समोरचा एक पडलेला. दुसरा ओठातूनही बाहेर आलेला, अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा, की काळ्या रंगानं लाजावं...! 
एकूण अवतार भेसूर ! 
त्यात बोलण असं की भांडल्यासारखं, प्रत्येक वाक्यात शिवी. 
कुणीही हिच्या नादी लागत नसे, समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना, अपशकून व्हायचा त्यांना. कोणत्याही सण समारंभात हिला जाणीवपूर्वक बाजुला ठेवायचे. लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल, अशी भिती घालायचे. तिला जादुटोणा येतो, तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं. हे घर तिचंच ..! 
मी नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात रॉकेल भरून, जुनी नाडी टाकून, उजेडासाठी वात पेटवलेली असे. गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता. 
ती चुलीशेजारीच बसली होती. त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात.. केस तसेच पिंजारलेले. चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भितीदायक ! 
मी घाबरलो. पण बाहेर पडायची सोय नव्हती. 
'काय रं?' घोगऱ्या आवाजात ती गरजली. 
'काय नाय, ते आपलं भायेर पाऊस म्हणून..' मी पायाने जमीन टोकरत चाचरत बोललो. 
ती बसली होती. समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डबा मिळत असे. त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग असत. कुणी डाळी तांदुळ त्यात साठवत असत, कुणी बाहेर शौच्यासाठी जाताना टमरेल म्हणूनही वापरे. तिनं याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं. 
डबा काटवटी शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती. 
मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती, मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाहण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला. दोन हाताच्या तळव्यात धरून या लचक्याला तिनं गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूंनी ढोलकी बडवतात तसं... 
एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटाएवढ्या आकाराची पोळी तयार झाली. माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते, हिनं हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी आता माझी खात्री पटली. 
यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यात पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरन फिरवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं, तिनं आधी ते पदराला पुसलं. उलथन्यानं तव्याला थोडं ढोसून चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली. 
आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला. ती टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो, तस्साच ! 
तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतंच. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोंबरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग ! 
मी आशाळभूतपणे भाकरीकडे पहात होतो. 
तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, 'खातु का भाकर ?' छ्या... छ्या... नको मला.' एकदम हो कसं म्हणणार ?
एखादी गोष्ट मनापासून हवी असताना... ती मिळत असताना , नको म्हणणं काय असतं, हे त्या नको म्हणणारालाच कळेल.
तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच, मनात असलं नसलं तरी ! डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे.
तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, 'हिकड ये...' 
'जावू का नको?' मी घुटमळलो.
'ये रं ल्येकरा, माज्याजवळ बस... ये हिकडं... जमिनीवर हात आपटत ती बोलली.....तीच्या बोलावण्यात आर्तता होती. 
मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता. 
तरीही जवळ बोलावून भाकरीबरोबर ही मलाच खावून टाकणार नाही ना? या विचारानं मी घाबरलो. 
तिनं पुन्हा हाक मारली.
मी पाय ओढत तिच्या दिशेनं घाबरत निघालो . मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालातल्या मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी मला बघून ? मी आणखी घाबरलो. 
आता पळायची सोय नव्हती. तिनं माझे हात धरले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं. 
चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं. ती पुन्हा हसली. ओठाबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. 'कवापस्नं जेवला न्हाईस?' डोक्यावर हात फिरवत मायेनं तिनं विचारलं. 'सकाळपस्नं...' मी चाचरत बोललो. 
शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिन ती पदरानं पुसली. त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहीत नव्हतं. 
तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं. अंगावर शहारे आले. 'तू भाकर खायाला सुरवात कर, मी तवर भाजी करते.' या वाक्यान माझी तंद्री भंगली.
तेवढ्यात तिनं, बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली, दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, 'रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर, डोस्क्याला त्याल लावावं.. कसं भुतावानी झाल्यात क्यास...!' असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. 
मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं, वाटलं, मला सांगते तर मग ही का लावत नसेल डोक्याला तेल?
"भुतावानी" हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो. 
तिला याचं काही सोयरसुतक नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळात टाकली, वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं. त्यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली.
बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं...! 
मेथी गरम तेलात पडली, अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर 'छिस्स' असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलो नाही. विसरूच शकत नाही. 
यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, त्याच पदराला पुसलं. भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसता पहात होतो.
माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत म्हणाली, 'खा ल्येकरा खा. सकाळधरनं उपासी हायस बाबा...'
यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं, मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. 'अन्न हे पूर्णब्रह्म' याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडूंब भरलं होतं, मनही ! 
मी सहज पाहिलं. काठवठीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती, डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली. 
गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही. 
चुलीजवळ बसून मला घाम आता होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, 'मावशी, आता तू काय खाशील ?'
आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. गरागरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते, हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा तिनं घाम पुसला. या पदरातून मला वास आला, शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा ! 
या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती.
जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजात टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली.
पदरालाही किती पदर असतात ना? वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो ? 
प्रत्येक आई-मुलाचं नातं, पदरापासून सुरु होतं... पदराशी संपतं ..!  या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य ! 
आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही. 
इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेकानेक फाईव्ह स्टार हॉटेलात राहिलो. जेवलो. मेनूकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी, कोफ्ता, कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. छे! 
स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो.. चांदणं नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी! 
चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून....करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाता दुषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच, पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते. 
लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे, का तर तिचा चेहरा भेसूर होता. 
आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात. 
पण कोणताही रंग न लावता 'नाटकं' करतात काही मंडळी, त्यांना काय म्हणावं? 
एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं ? 
ज्यांना आपण आयुष्यभर 'चुकीची माणसं' समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी 'बरोबर अर्थ' समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय? 
दुसऱ्याच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे 'अनुभव' असं कौतुकान सांगणाऱ्यांना काय म्हणावं?
असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर 'हडळ' म्हणून शिक्का मारतात. एखाद्याला बहिष्कृत करतात. 
या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो. 
वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता....जवळ कुणी जायचंच नाही. 
मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली. 
तिनं ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी... गूढ.. गालातल्या गालात !
'काय आणून देऊ म्हातारे तुला ?' मी हातात हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिनं क्षीणपणानं बोट दाखवलं. 
'लुगडं?' मी बरोबर ओळखलं.
मी झट्दिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची दोन-चार लुगडी घेऊन येण्यासाठी.. 
तिने हातानंच खूण करत कुठे चाललास असं विचारलं. मी ही खुणेनंच सागितलं, 'लुगडं घेऊन येतो...!' 
तिनं मला परत खुणेनच जवळ बोतावलं. मी खाली वाकलो. ती. कानाजवळ येऊन एकेक शब्द तोडत बोलली, 'जुनं तुज्या आजीचं लुगडं मला नगो, नव्वंकोरं आन तुज्या पैशाचं.. घडी मीच मोडनार... मरनाऱ्या मान्साला जुनं दिऊ न्हाई काई... माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं, ह्येजातच माझा आनंद...' हे बोलून ती पुन्हा गूढ हसली. 
तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अतिप्तता..! 
बरं तिनं कसं ओळखलं ती मरणार आहे ते....?
मी विद्यार्थीदशेत ... नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी ? पण पुढच्यावेळी आलो की घेऊन येईन असे सांगून मी उठलो होतो. 
पुढे काही वर्षांनी  डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं. 
म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते, ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन... गाव खरंच सुधारलं होतं.
शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेनं विचारलं, 'म्हातारी कुठंय?' तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता, 'कोन ? ती हाडळ व्हय ? आरं ती मेली की कवाच... कोन नव्हतं तिला...' 
पुढचं मला ऐकूच आलं नाही. 
कोण नव्हतं तिला? कसं सांगू...? 
ती मेली नाही... माझ्या मनात ती कायम जिवंत आहे...!
कोण कसं नव्हतं ? मी होतो की तीचा, मनातून तिनं मुलगा मानलं होत मला ? 
आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही..!!!
प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं, म्हणून ती तशी गूढ हसली असेल का ? 
यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो. पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो. 
मला भीती वाटते आणि लाजही ! 
पटकन् समोर येऊन ती दे माजं नवकोरं लुगडं अशी पटकन पुढ्यात येऊन मागेल ही भीती... आणि मी तिला ते कधी देऊ शकलो नाही याची लाज. 
डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे. पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की! 
माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही....! या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची 'लक्ष्मी' होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत.. बाकीचे नुसतेच धनिक ! 
नोटा आणि नाण्यांचे धनी !! 
तिच्या पडक्या घराला तोक हाडळीचं घर म्हणतात, मी त्याला आईचं स्मारक समजतो. 
ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली. 
तिच्या घराजवळनं जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा....
पण का कोण जाणे...? त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच... आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट... माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे. गालातल्या गालात.. तसंच गूढ..!!! 
आणि मी पाय ओढत एकटाच मी तिथून चालायला लागतो, कुढत ... आई नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा...!!!

डॉ अभिजीत सोनवणे 
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे 
9822267357
sohamtrust2014@gmail.com
*(An ISO 9001: 2015 certified organisation)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...