मंगळवार, ३ मार्च, २०२६

2606. मातृभाषा

      वनिता घाईघाईने घरी पोचली. लॅच उघडून सूरज च्या खोलीत शिरली. सरोज पाच वाजताच घरी जाते, म्हणजे या वेळी सूरज तिने सकाळी दिलेले शब्द पाठ करत असेल असा तिचा अंदाज होता. पण सूरज खोलीत नव्हता. ती तीनही खोलीत फिरली, पण सूरज दिसेना, ती ग्यालरीत आली आणि तिला सूरज दिसला. तो बाहेर कॉलनीतील झाडावर काही तरी पहात होता.. खुणा करत होता.. ती चिडली, सकाळी दिलेले शब्द पाठ न करता हा नुसता टाईमपास करत होता बहुतेक..
'सूरज.. काय चाल्लंय? तिने रागाने विचारले. तिच्या मोठ्ठ्याने ओरडण्याने तो दचकला. मग म्हणाला
'मॉम.. तो बघ बर्ड...मघापासून या फांदीवरून त्या फनंदी वर उदया मारतोय. 
वनिताने वाकून पाहिले, एक चिमणी उड्या मारत होती.
'अरे ती चिमणी आहे.. चिमणी.. स्प्यारो...स्प्यारोचे स्पेलिंग सांग.
'S.. P.. O.. R. W..
'अरे आज सकाळीच मी स्प्यारो चे स्पेलिंग पाठ करायला दिलेले ना? म्हणजे तू आज काही केल नाहीस.
'अग मॉम.. मी केलेला स्टडी, हवं तर सरोजताई ला विचार, तिने विचारले सर्व शब्द.
'सरोज दहावी नापास, तिला काय येतंय? तू चल...मी घेते स्टडी.
सुरजच्या हाताला पकडून तिने फरफटत बेडरूममध्ये आणले आणि स्वतः सकाळी दिलेले शब्द त्याच्याकढून पाठ करून घेऊ लागली.
तिला तिच्या नवऱ्याचा विशालचा राग आला. रोज रात्री नऊ नंतर घरात येणार.. येणार तो येणार दमलेला, थकलेला. डोळयांवर झोप घेउंन, मग या मुलाचा अभ्यास कोण घेणार? दोन ठिकाणी ऍडमिशन मिळाली नाही, आता निदान सेंट थॉमस मध्ये तरी? किती स्पर्धा आहे केजीसाठी? या महानगरीत एवढी मुले कशीकाय जन्माला आली, असा तिला प्रश्न पडला. जावे त्या स्कुलमध्ये असंख्य पालक ऍडमिशनसाठी रांगेत उभे. मग मुलांचे इंटरव्हू, पालकांचे इंटरव्हू.. पालकांचा बॅकग्राउंड... पालकांचे कॉलेज.. एक ना दोन..चांगले स्कुल हवे तर हे सर्व सोपस्कार पार पाडायलाच हवेत. मागील शाळेत विशाल मराठी मिडीयम मध्ये शिकला म्हणूंन त्याच्या मुलाची ऍडमिशन रद्द केली. बापाच्या शाळेमुळे मुलाला ऍडमिशन नाही?
काय चालले आहे?
एकीकडे तव्यावर पोळ्या लाटता लाटता ती सुरजचा अभ्यास घेत होती..
'डे म्हणजे दिवस.. नाईट म्हणजे रात्र.. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र.. आता डेचे स्पेलिंग सांग..
"D.. E.. Y..
'ओके, तिला हायस वाटलं. म्हणजे काल घेतलेले शब्द त्याला आठवत आहेत. मग दुपारला काय म्हणतात?
'नून..
तिला आनंद झाला.. तसा हुशार आहे तो, आपल्यावर गेलाय.. आपले आईवडील बँक ऑफिसर आणि विशालचे शाळामास्तर. कुणी सूरजला त्याच्या वडिलांच्या आईवडिलाबंद्दल प्रश्न विचारला की तिला टेन्शन येई.
    बेल वाजली. तिने ओळखले नवरा आला. तिने दरवाजा उघडला. बाहेर दमलेला, थकलेला विशाल उभा होता.
'सकाळी तुला सांगितलेलं.. जरा लवकर ये.. उदया मुलाला घेऊन जायचे आहे. या तरी स्कुलमध्ये ऍडमिशन मिळते का नाही कोण जाणे?
'हो हो.. येतच होतो, पण भांडुप आणि मुलुंडच्या मध्ये एक मालगाडी घसरली, त्यामुळे सगळ्या गाड्या लेट.
'मग ओला करून येता येत नाही काय? मनाला काही काळजी हवी.. मी बघा..
'म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला काळजी नाही. गेला महिना मी धड ऑफिसला गेलेलो नाही. बॉसचे बोलणे खातोय. दोन ऍडमिशन्स पंधरा दिवसात झाल्या.. त्याची किती तयारी?
'बर आज सर्व सर्टिफिकेट्स आणल्या ना? तुमचे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट?
'हो बाई हो.. माझे आता डोके खाऊ नकोस.
'आता थोडा वेळ मुलाचा अभ्यास घ्या.. अजून तो चुकतोय..
'अग आता त्याला झोपूदे.. सकाळी सातला बाहेर पडायला लागेल.
'झोपूदे काय झोपूदे.. अजून त्याने ऍनिमल्स स्पेलिंग्स सांगितली नाहीत.
'पण ऍनिमल स्पेलिंग्स विचारणार आहेत का? मागच्या  मुलाखतीत स्कायचा कलर विचारला होता?
'आता काय विचारतील कोण जाणे? त्याना काय ते काहीही विचारतील.
'मी काल चौकशी केली.. या शाळेत पाच लेडीज असतात म्हणे मुलाखतीला.. एक हेडमिस्ट्रेस आणि चार इतर, वेगवेगळ्या विषयातल्या..
'बघू, काय होते..
'सूरज.. सूरज .. झोपणाऱ्या सुरजला उठवून वनिता त्याला ऍनिमल्सचे प्रश्न विचारू लागली.
पेंगुळेल्या डोळ्यांनी सूरज उत्तरे देत होता, कधी बरोबर कधी चूक. बाजूला बसलेला त्याच्या बाबाला.. विशालला वाईट वाटतं होते, आपण शाळेत प्रवेश घेतला तेंव्हा.. त्या खेडेगावात सातवीपर्यत दोन शाळा.. पालक आपल्या मुलाला शिक्षकांच्या स्वाधीन करत होता..ना प्रवेशपरीक्षा ना फी.. शिक्षक मुलांना शिक्षा करत होते, पण पालकांची कधी तक्रार नाही, आणि आज.. नुसता बाजार.. शिक्षणाचा बाजार...
    मुलाला अगदीच झोप आवरेना तेंव्हा वनिताने त्याला झोपू दिले.. पण तिला कोठे झोप यायला? तिला मुलाची.. सुरजची काळजी वाटू लागली, दोन स्कुल्स मध्ये ऍडमिशन मिळाली नाही - आता उदया काय होईल? नाहीतर एखाद्या भिकारड्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. तिला तिच्या आईची आठवण झाली... आई रोज म्हणते आहे.. सूरजला चांगल्याच चांगल्या शाळेत घाल.. पण?
  पण गेले चार दिवस सूरजची मुलाखतीची तयारी करून घेतो आहोत.. पण त्या पाचजणी काय विचारतील कोण जाणे? त्यांना काय.. मजा बघायची असते.. मुलाची आणि पालकांची. पालक हायपर झालेले असतात याची त्यांना कल्पना असते.. बराच अभ्यास घेतला आपण? महिने.. दिवस.. त्त्यांची नावे.. रंग.. पशू.. पक्षी.. सण...
   अजून काय राहील? नेमक आपल्या शहरांची लोकसंख्या विचारली तर? रेल्वे स्टेशन्स विचारली तर? तिला वाटले सुरजला उठवावे.. तिचा हात त्याला उठवायला गेला.. पण तिचा लाडका बाळ गाढ झोपी गेला होता.. तिने हात मागे घेतला आणि त्याच्या केसातून हात फिरवीत राहिली.
  वनिताला झोप येईना.. उदया काय होईल याची काळजी होतीच.. शिवाय पहाटे उठून नाश्ता करायचा होता.
तिच्या मनात आले.. आपण होतो चार वर्षाचे.. तेंव्हा आपल्याला काय येत होते? महिने.. वर्षे.. दिवस.. रंग.. आकडे.... छे.. काहीच नाही. मग माझ्याच छकुल्याच्या मागे हे का? मघा मी घरात आले तेंव्हा तो झाडावरची पाखरे पहात होता.. चिमण्या... इकडून तिकडे उडणाऱ्या.. मुलांना पण चिमण्यासारखे उडायचंय असत ना? पण आपण दुष्ठ आई बाबा त्यांचे पंखच छाटून टाकतो..
     तिला रडू आले.. तिने तिच्या पिल्लाला जवळ घेतले.
अर्धवट झोप झालेली वनिता उठली, तिने पाहिले तिचा नवरा  विशाल आधीच उठला होता आणि आंघोळ करून तयार होता. वनिताला वाईट वाटले.. हल्ली रोजच आपण नवऱ्याला टाकून बोलत असतो.. खरं तर त्याला पण काळजी आहे.. धडपडत असतो.. खरं म्हणजे त्याला अशा स्कुल्स पसंत नाहीत.त्याचे वडील प्राथमिक शिक्षक. त्यामुळे त्याला वाटतं असते आपल्या मुलाने पण अशाच एखाद्या मराठी शाळेत जावे.. पण सध्याचा काळ... जिकडे तिकडे इंग्लिश.. आई म्हणते.. मुलाला स्मार्ट बनवायचे असेल तर तशीच शाळा हवी.
वनिताने सुरजला जागे केले.. आळस देत देत तो उठला.. विशालने त्याच्या हातात ब्रश दिला आणि अंघोळीला पाणी काढले. तोपर्यंत वनिताने चहा केला.. दूध गरम केल आणि गोड शिरा करून तो डब्यात भरला.
विशालने ओलावरून गाडी मागवली आणि तिघे स्कुल्स च्या दिशेने निघाली.वाटेत गाडीत वनिता मुलाला अनेक सूचना करत होती.. सूरज झोपा काढता काढता उत्तरे देत होती, त्याने बरोबर उत्तर दिले तर ती खूष होत होती.. चुकला तर चिडत होती.
     ती तिघे स्कुल्सच्या ऑफिस च्या दिशेने गेली.. तेंव्हा तिथे मुलांची आणि पालकांची गर्दी होती. सुरजचा नंबर बाविसावा होता.एक एक मूल आणि त्यांचे पालक आत जात होते.. इंटरव्हिव्ह देत होते.. बाहेरचे पालक त्यांच्याकडे आत काय विचारतात याची चौकशी करत होते. आत पाच स्त्रिया मुलाखती घेत होत्या.
  . शेवटी सूरजचा नंबर आला... तिघे आत गेली. त्या पाचजणाच्या पॅनल समोर बसली.त्यांनी सुरजची फाईल उघडली.
सुरज विशाल कारखानीस?
वय चार वर्ष दोन महिने... 
आई वनिता कारखानीस.. बँकेत नोकरी..
वडील विशाल कारखानीस... इंजिनीअर.. बरोबर?
'येस मॅडम...
मग त्यातील एक बाई विचारायला लागल्या...
"सुरज.. तूझ्या घराच्या बाल्कनीतून काय दिसत?'
'पक्षी.. चिमण्या..
'त्यांची नावे तुला येतात का?
'पोपट..सुतार पक्षी..'
'तुला पाळीव प्राणी माहित आहेत काय?
'होय.. गाय.. बैल.. कुत्रा..
'त्यांची माहिती सांगशील?
आतापर्यंतची उत्तरे इंग्लिश मध्ये देणारा सुरज गाई ची माहिती सांगायला लागला.. पण मराठीतून..
'माझ्या आजोबाकडे गाय आहे.. माझे आजोबा तिला चारा देतात.
ती दूध देते.. तिचे एक लहान बाळ आहे..
रंगवून रंगवून सुरज गाईची माहिती मराठीतून सांगत होता.. वनिता मनातून चिडली होती.. सुरजला इंग्लिश.. इंग्लिश असे खूणवत होती.. पण गाय आणि आजोबा यांचे वर्णन करताना सूरज थकत नव्हता.. त्यातील काहीजणींना मराठी तेव्हढे कळत नव्हते.. पण अनुजा केळकर त्या पॅनल मध्ये होती. ती लहान मुलांच्या मानसिक आरोग्यची तज्ज्ञ होती. ती कौतुकाने त्याच्याकडे पहात होती. तिने पुढचा प्रश्न मराठीतून विचारला..
'पावसाळ्यात आकाशात रंगाचे पट्टे दिसतात.. त्याला काय म्हणतात?
'इंद्रधनुष्य..
'इंद्रधनुष्य कसे दिसते?
रंगून रंगून सूरज सांगत राहिला आणि अनुजा केळकर कौतुकाने पहात राहिली.
मग अनुजाने पुन्हा विचारले..
'तुझी आई तुझे लाड करते तेंव्हा तुला काय म्हणते?
'सोन्या..
  त्या पाचजणी एकमेकींशी खालच्या आवाजात बोलत राहिल्या.. मग त्यांचे एकमत झाले बहुतेक.. पुन्हा अनुजा केळकर बोलू लागली..
'मी. आणि मिसेस कारखानीस.. मी अनुजा केळकर.. मी लहान मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणारी डॉक्टर आहे आणि या स्कुल्सच्या डायरेक्टबोर्डवर पण आहे.. मी गेले काही वर्षे या स्कुल्समध्ये येणाऱ्या मुलांची टेस्ट घेत असते..मी तुमच्या सूरजची पण आता टेस्ट घेतली, मला एव्हडी टेस्ट पुरेशी आहे.. आम्ही तुमच्या मुलाची निवड केली आहे.. पण..
  वनिताने एव्हडे ऐकले मात्र.. ती भयंकर खूष झाली.. केव्हडे टेन्शन उतरले. पण.. काय म्हणत आहे.. म्हणून तिने कान टवकारले..
  अनुजा केळकर पुढे बोलू लागली.
'या मुलाला आमच्या स्कुल्स ला ऍडमिशन घेतलात तर पुढे त्याची प्रगती यथातथाच होईल म्हणजे तो सर्वसामान्य मुलगा होईल पण त्याला आमच्याच संस्थेच्या मराठी मिडीयम शाळेत प्रवेश घेतलात तर हा मुलगा असामान्य होईल. चॉईस तुम्ही घ्या..
'काय? मराठी मिडीयम? पण सगळीकडे इंग्लिशचा बोलबाला असताना मराठी मिडीयम? त्याने तो जगाच्या मागे पडणार नाही का? वनिताने काळजीने विचारले.
'मराठी मिडीयममध्ये शिकल्याने मुले मागे पडतात हा चुकीचा समज आहे.. या मुलाचा कल त्याच्या मातृभाषेकडे आहे, असे मला स्पष्ट दिसतेय.. आणि मी तुम्हाला वेगळे सांगते असे समजू नका.... मी माझ्या दोन्ही मुलांचा कल पाहिला आणि त्यांना आमच्याच संस्थेच्या मराठी मिडीयम शाळेत घातले... हा बघा दोघांचा फोटो.. आमच्या मराठी शाळेतील युनिफॉर्ममध्ये.. अनुजा केळकरने मोबाईल मधील आपल्या दोन्ही मुलांचे फोटो दाखवले..
'हा अनिश.. आठवीत आहे, पुढे वैमानिक होणार आहे.. आणि ही नीला.. सहावीत आहे... तिला लेखक व्हायचंय.
'काय? लेखिका? हा काय करिअर चॉईस आहे?
'का नाही? लेखनाला खूप मागणी आहे.. आणि मी माझ्या दोन्ही मुलांच्या करिअरसाठी त्यांच्या मागे रहाणार आहे.. मला वाटते तुमचा मुलगा पण विविध भाषा शिकेल, त्यात त्याची करिअर दिसते.. बघा.
मी दोन्ही चॉईस दिले आहेत..
'पण मराठी मिडीयममध्ये?
'तुम्ही बारकाईने वेगवेगळे शिक्षणतज्ञ् काय म्हणतात ते पहा.. अगदी भारतातले नारळीकर किंवा माशेळकर आपल्या मातृ भाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्याचा सल्ला देतात.. तेंव्हा मराठीतून प्राथमिक शिक्षण घेण्याने तुमचा मुलगा मागे पडेल हे मनातून काढून टाका.. आणि दोन दिवसांनी तुमचा निर्णय कळवा..
पॅनल मधील सर्वांनी मान डोलवली आणि पुढील मुलासाठी बेल वाजवली.
वनिता आणि विशाल द्विधा मनस्थितीत बाहेर आली. छोटया सूरजला थोडेफार समजले होते. विशाल खूष होता.. कारण त्याचे तेच मत होते, पण वनिता आणि तिचे आईबाबा?
   गाडीत दोघे चूप होती. काय निर्णय घ्यावा हे वनिताला समजत नव्हते. केळकरबाई म्हणाल्या ते पण पटत होते. शिवाय त्यानी थोडया वेळात सुरजची टेस्ट घेतली होती. त्त्यांचा सल्ला विसरून इंग्लिश मिडीयममध्ये प्रवेश घेतला आणि सूरज सामान्य निघाला तर. आयुष्यभर ती बोच राहील.
घरी पोचेपर्यत वनिताच्या आईचा फोन आला. वनिताने तिला सर्व सांगितले तसेच केळकरमॅडमनी दिलेला सल्ला पण सांगितला आणि केळकरमॅडमची दोन्ही मुले मराठी मिडीयममध्ये शिकत असल्याचे सांगितले..
'अग बाई...असं म्हणतात काय त्या डॉक्टर? मग काय विचार केला तुम्ही?
'आम्ही पण गोंधळून गेलोय..म्हणजे मी... कारण विशाल आणि त्याचे आईबाबा नेहेमीच मातृभाषेबंद्दल बोलतात.. त्याना तेच हवेय.
'त्याच्या बाबांना आणि आजी आजोबांना हवे आहेच.. मग तु एकटी कशाला विरोध करतेस? पण मला वाटते तू सूरजला विचार.. सध्याच्या लहान मुलांना पण समज असते.
वनिताला ते पटले. तिने सूरजला जवळ घेतले आणि विचारले.
'सोन्या.. खरं सांग.. तुला मराठीत शिकावेसे वाटते की इंग्लिशमध्ये?
'मला मराठी आवडते.. मॉम.. म्हणजे आई.
'होय सोन्या..तू मराठी शाळेत जाशील... तुला जेथे आवडते तेथे तू जा.
दुसऱ्या दिवशी विशाल...वनिता ने सुरजची मराठी मिडीयम मध्ये ऍडमिशन घेतली.


प्रदीप रामदास केळुस्कर
9422381299 / 9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...