सहस्त्रावधी वर्षांपूर्वी शरयू नदीच्या तीरावर वसलेली अयोध्या नगरी, म्हणजे प्रेम, प्रसन्नता, मांगल्य, पावित्र्य आणि समृद्धीचे नंदनवनच. प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रहर, या नगरीला स्पर्श करण्यासाठी सतत अतुर असायचा. पण, ती अयोध्येची संध्याकाळ नव्हती, तर जणू काळजावर कोसळलेली एक भयाण सावली होती. मघाशी अत्तराच्या सुवासाने दरवळणारा राजप्रासाद आता एखाद्या स्मशानासारखा शांत झाला होता. ज्या मस्तकी उद्या सुवर्णमुकुट चढणार होता, त्या सुकुमार रामाचे पाऊल आज कोपभवनाच्या उंबरठ्यावर थबकले. आत पाऊल टाकताच समोरचे दृश्य पाहून साक्षात मृत्यूही थरथरला असावा. चक्रवर्ती सम्राट दशरथ भूमीवर एखाद्या उन्मळून पडलेल्या महावृक्षासारखे पडलेले होते, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा नव्हत्या, तर ते जणू पितृत्वाचे रक्तच सांडत होते. आणि समोर उभी होती—निश्चल, निष्ठुर, हातांत दोन वचनांची जळती मशाल घेतलेली राणी कैकयी !...
रामाचा शांत चेहरा पाहून राजांचे हुंदके दाटून आले, पण ओठांवर वचनाची बेडी होती. तेव्हा रामाने पित्याची ती व्याकुळता क्षणात टिपली आणि शांत स्वरात विचारले, "माते, काय आहे पित्यांच्या या मौनाचे कारण? माझ्याकडून काही अपराध घडला काय?" कैकयीच्या ओठांवर एक क्रूर हास्य उमलले आणि ती गर्जली, "रामा, तुझे पित्याने मला दोन वचने दिली होती, पण आता ते शब्दाच्या पाशात अडकले आहेत. त्यांना भीती वाटतेय की त्यांचा पुत्र वचनभंग करेल!"
त्या क्षणी रामाच्या डोळ्यांत एक वेगळेच तेज झळकले. तो म्हणाला, "माते, दशरथाचा पुत्र आणि रघुकुळाचा वंशज वचनभंग करेल, असा संशय तू मनातही धरू नकोस. सांग, काय आहे ते वचन?" जेव्हा कैकयीने चौदा वर्षांचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक हे दोन निखारे रामाच्या हातावर ठेवले, तेव्हा साऱ्या सृष्टीने श्वास रोखला. पण रामाच्या चेहऱ्यावर ना संताप होता, ना दुःख. त्याने शांतपणे आपल्या पित्याच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, ... — ... "पितृवचन हेच माझे शासन!" ... ...
ज्या राजपुत्राने एका क्षणात राजवैभवाचा त्याग करून, वलकल नेसली, त्याने जगाला हे सिद्ध करून दिले की, रक्ताच्या नात्यापेक्षा 'शब्दाचे नातं' अधिक थोर असतं. अयोध्येचा त्याग हा केवळ एका पुत्राचा त्याग नव्हता, तर तो 'वचन' नावाच्या तत्त्वासाठी दिलेला सर्वोच्च बळी होता. रामाच्या त्या एका निर्णयाने अयोध्येच्या सिंहासनापेक्षा 'रघुकुळाच्या वचनाला' अधिक उंचीवर नेऊन ठेवले. हेच ते मूल्य, ज्याने भारतीय संस्कृतीचा कणा ताठ ठेवला आहे... — "रघुकुल रीति सदा चलि आई, प्राण जाइ परु बचनु न जाई...!"
वचन हे केवळ ओठांतून बाहेर पडलेले शब्द नसतात, तर ते मानवी चारित्र्याचे 'अग्निहोत्र' असते. एकदा का शब्दाचे दान दिले, की मग काळ असो वा नियती, त्या शब्दाच्या रक्षणार्थ सर्वस्वाचा होम करण्याची सिद्धता असावी लागते. दशरथाची ती व्याकुळता आणि रामाचा तो धीरोदात्त निश्चय, आजही आपल्याला हेच सांगतो की, ज्याच्या शब्दाला धार नाही, त्याच्या जगण्याला कसलाही आधार नाही.
'वचन' हा शब्द केवळ संभाषणाचा एक भाग नसून, तो भारतीय तत्त्वज्ञानातील एक 'ब्रह्म' आहे. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिले तर, संस्कृतमधील 'वच्' (वक्ति) या धातूपासून 'वचन' या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. याचा अर्थ केवळ 'बोलणे' असा नसून, 'ज्याद्वारे सत्य प्रकट होते' असा होतो. वेदांच्या अमृतवाणीत शब्दाला 'वाग्ब्रह्म' म्हटले गेले आहे. ऋग्वेदाच्या सूक्तांमध्ये 'वाचा' ही अमोघ शक्ती मानली गेली असून, ती सत्याचे वहन करते. वचनाची व्याप्ती केवळ उच्चारणापुरती मर्यादित नसून, ती 'ऋत' (वैश्विक नियम) आणि 'सत्य' यांच्याशी जोडलेली आहे. उपनिषदांच्या गहन चिंतनात 'सत्यं वद' (सत्य बोल) ही केवळ आज्ञा नाही, तर ते एक आत्मिक व्रत आहे.
उपनिषदांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती 'वचन' देते, तेव्हा ती केवळ शब्द उच्चारत नाही, तर आपल्या संकल्पशक्तीला साक्षी ठेवून ब्रह्मांडाशी एक करार करत असते. 'यथा वाक् तथा चित्तं' म्हणजेच 'जशी वाणी तसे चित्त' असणे हेच खऱ्या वचनाचे लक्षण! तात्विक दृष्टिकोनातून, वचन हे 'सत्य' आणि 'शौच' (शुद्धता) यांचे संमिश्रण आहे. एखाद्याला दिलेला शब्द पाळणे म्हणजे आपल्या अंतरात्म्यातील ईश्वरी अंशाचा सन्मान करणे होय. ज्याप्रमाणे निसर्ग आपला ऋतू-चक्राचा शब्द कधीही मोडत नाही, तसेच मानवी जीवनातील वचनाचे पावनत्व हे सृष्टीच्या त्या 'अच्युत' नियमांचेच प्रतिबिंब आहे. त्यामुळेच, भारतीय परंपरेत 'दिलेला शब्द' हा केवळ ध्वनी नसून, तो आपल्या चारित्र्याचा आणि आत्मिकतेचा आरसा मानला जातो.
प्राचीन काळी माणूस स्थिरावला, तेव्हा हळूहळू समाज नावाची संस्था उदयास येऊ लागली. तिची पायाभरणी करायची तर, नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था, व्यापारासाठी चे व्यावहारिक संबंध किंवा इतर व्यासपीठाच्या निर्मितीसाठी, व्यक्तींमध्ये परस्पर विश्वास असणे गरजेचे. या विश्वासासाठी दिलेला शब्द, मग तो व्यक्तीला असो वा व्यक्ती समूहाला अथवा समाजातील महत्त्वाच्या संस्थांना, तो पाळणे ही बंधनकारक. त्या अर्थाने वचनाचे महत्त्व आपणा सर्वांच्या लक्षात येईल. म्हणूनच' आपण देखील दिलेला शब्द मोडू नकोस, या तत्त्वाचा आग्रह वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही पदोपदी धरत असतो. जागतिक संबंधांचे निर्वाह करण्यासाठी, दोन राष्ट्रे परस्परांशी जो करार मदार करतात, तो देखील याच वचनांच्या पायावर उभा असतो. या वचनाचे पालन किंवा भंग, यावरच वैश्विक शांती किंवा युद्ध अवलंबून असते. थोर पदाला पोहोचलेल्या अनेक व्यक्ती, अतिशय निस्पृह भावनेने, एखादे रचनात्मक किंवा वैचारिक कार्य सुरु करतात. ते कार्य करण्यासाठी देखील, राष्ट्राला, समाजाला, धर्माला, संस्कृतीला तथा नियतीला त्यांनी एक अलिखित वचनच दिलेले असते. त्या वचनाचे पालन व्हावे, म्हणूनच या व्यक्ती संपूर्ण समर्पण, आपल्या कार्याला देतात. न जाणो' समर्पण कमी पडले तर, दिलेल्या वचनाचा भंग होईल. ही प्रामाणिक, विशुद्ध भावना त्यांच्या मनी वसलेली असावी.
खरे पाहता वचन हे मूल्य, व्यक्तीच्या संस्कारांमधून झिरपत असते. आणि याच वचनावर त्याचा स्वभाव व व्यक्तिमत्व उठून दिसते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे आम्हाला सापडतात.
रक्ताने माखलेली भूमी, जळती शहरे आणि हजारो निष्पाप प्राणांचे आक्रोश—या साऱ्याच्या मध्यभागी एक राजा उभा राहतो. त्या दिवशी त्याने कुठलीही जाहीर घोषणा केली नाही.; पण स्वतःच्या अंतःकरणाला एक कठोर वचन दिले.—पुन्हा कधीही हिंसेच्या मार्गाने विजय मिळवणार नाही. — सम्राट अशोकच्या कृतीनुसार : वचन हे बाह्य जगाशी केलेले करारपत्र नसून, अंतर्मनात झालेल्या पश्चात्तापातून जन्मलेला नैतिक निर्णय असतो.
उपहास, दारिद्र्य आणि अपमान यांची रोजची परीक्षा चालू असताना, एक माणूस शांतपणे मार्गक्रमण करीत राहतो. परिस्थिती बदलावी म्हणून तो तक्रार करत नाही; उलट सत्य आणि भक्ती सोडणार नाही, हे वचन तो अधिक घट्ट धरतो. ... — संत तुकाराम यांच्या दृष्टीने : वचन म्हणजे सुखाच्या वेळी दिलेला शब्द नव्हे; तर दुःखातही न ढळणारी आत्मनिष्ठा.
सत्ता, सन्मान आणि सर्वोच्च पद हातात असूनही एक व्यक्ती दरवाजे उघडे ठेवते—विद्यार्थ्यांसाठी, प्रश्नांसाठी, संवादासाठी. “मी आधी शिक्षक आहे” हे वचन तो आयुष्यभर विसरत नाही, जरी जग त्याला राष्ट्राध्यक्ष म्हणत असले तरी. ... - ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मते : वचन म्हणजे पदाशी प्रामाणिक राहणे नव्हे; तर स्वतःच्या मूळ ओळखीशी निष्ठा राखणे.
जगभर गौरव, पुरस्कार आणि सन्मान मिळत असतानाही, एक स्त्री स्वतःसाठी काहीच साठवत नाही. तिने प्रभूला दिलेले वचन तिला झोपडपट्टीच्या अरुंद वाटेवरून कधी हटू देत नाही... —कारण तिचे आयुष्यच त्या वचनाने बांधलेले असते. ... - मदर तेरेसा यांनी दाखवून दिले की : वचन म्हणजे मोठेपणाची घोषणा नव्हे; तर स्वतःला इतरांच्या दुःखात विरघळवण्याची तयारी.
मृत्यू जवळ उभा आहे, वेळ कमी आहे, आणि पळून जाण्याची संधी उपलब्ध आहे. —तरी, काही लोक मागे फिरत नाहीत. “देश सुरक्षित ठेवू.” हे अलिखित वचन पाळत ते संकटाच्या मध्यभागी उभे राहतात. ... - २०११ मधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातील अभियंते असे करू शकतात. कारण : वचन कधी शब्दांत व्यक्त होत नाही; ते संकटाच्या क्षणी घेतलेला मौन, पण ठाम निर्णय असतो.
या साऱ्या उदाहरणांत एक समान धागा दिसतो— ... वचन पाळणारी माणसे परिस्थितीला दोष देत नाहीत; ती स्वतःची जबाबदारी स्वीकारतात. वचन म्हणजे भविष्यासाठी दिलेले आश्वासन नाही, ते वर्तमानात घेतलेला चारित्र्याचा निर्णय आहे. ... म्हणूनच वचन जपले गेले, की माणूस केवळ यशस्वी नाही ... तो विश्वासार्ह ठरतो.
एकीकडे वचन पाळता यावे म्हणून, संपूर्ण समर्पण देणारी माणसे असतात. तर दुसरीकडे, दिलेल्या वचनाचा भंग करण्यासाठी तत्पर असणारी मंडळी सुद्धा आपल्या अवतीभवती असतात की. ...
दरबारात चांदण्यांसारख्या झुंबरांची लखलख, सोन्याच्या नक्षीदार भिंती, आणि राजकारणाच्या गूढ नजरा—अशा वैभवाच्या मध्यभागी एक निमंत्रण येते. सुरक्षिततेचे आश्वासन, सन्मानाची हमी, आणि मैत्रीचा आव आणणारा शब्द. त्या शब्दावर विश्वास ठेवून एक स्वराज्यनिर्माता आग्र्याकडे प्रयाण करतो. पण वैभवाच्या आवरणाखाली डाव दडलेला असतो; संरक्षणाचे वचन कारस्थानाच्या सावलीत हलू लागते. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्या इतिहासातील त्या निर्णायक क्षणाची. आग्र्यात पोहोचल्यावर वचनभंगाचा डाव उघड होतो; पण राजपूती बाण्याची शपथ विसरत नाही. जयसिंगांचा सुपुत्र रामसिंग आपल्या पित्याने दिलेल्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे अस्तित्वच पणाला लावण्याची सिद्धता करतो. सत्तेच्या दरबारात जिथे शब्द हलके झाले होते, तिथे एक तरुण योद्धा वचनाला कवचासारखे उभे करतो.
या प्रसंगात दोन प्रवृत्ती स्पष्ट दिसतात... —सत्ता जपण्यासाठी वचनभंग करणारी आणि चारित्र्य जपण्यासाठी वचन पाळणारी. वचन म्हणजे राजकीय सोय नसते; ते मानमरातबाचा मूलाधार असते. जिथे वचनभंग होतो, तिथे साम्राज्याची ताकदही क्षीण होते; आणि जिथे वचनाचे पालन होते, तिथे व्यक्तीची कीर्ती काळालाही ओलांडते. सत्ता क्षणभंगुर असते, पण वचनाची पत शतकानुशतके जगते.
वचन पाळणे आणि वचन भंग, या दोन्ही खरंतर मानवी प्रवृत्ती. आपल्या अवतीभोवती अशा प्रवृत्ती आपल्याला सदाकाळ आढळतात. किंबहुना, आपल्या मनातच त्या छुप्या पद्धतीने वास्तव्यास असतात. दुसऱ्याने वचनाचे पालन करावे, दिलेला शब्द पाळावा. ही अपेक्षा आपण ठेवून असतो. तर दुसरीकडे, स्वतः मात्र दिलेले शब्द, दिलेले वचन सोयीस्करपणे विसरतो. किंवा लंगड्या सबबी सांगून, ते पाळणे कसे अशक्य झाले, हे पटवून देत असतो. आपल्या या प्रवृत्तीमुळे बऱ्याचदा अनेकांशी आपले संबंध दुरावतात. नातेसंबंधांमध्ये एक प्रकारची तेढ येते. अविश्वास निर्माण होतो. आपल्या शब्दाची पत घसरते व सामाजिक प्रतिष्ठा देखील कलुषित होते. पण ही इतकी छोटी बाब की, आपल्याला त्याचे भान देखील बर्याचदा नसते. सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात अशा दोन्ही ठिकाणी हे घडत असते.
निवडणूक जाहीरनाम्यात देखील राजकीय पुढारी वा पक्ष मोठी आश्वासने देतात. अनेक सार्वजनिक संस्था देखील कामाची शाश्वती देतात. परंतु आपण देत असलेले आश्वासन अथवा शाश्वती हे खर्या अर्थाने, सामाजिक वचन आहे. याचे भान न राहिल्याने किंवा ते सुटल्याने, सर्रास वचनभंगाचे कृत्य या व्यक्ती, पक्ष व संघटनांकडून होत असते. आणि मग, त्यांची प्रतिमा समाजात मलिन होऊ लागते.
तात्पर्य : वचन पाळणे ही गोष्ट, व्यक्तीची विश्वासार्हता व प्रामाणिकपणा यांची खऱ्या अर्थाने कसोटी असते.
तसे पाहता वचन हे नितांत शुद्ध आणि अस्सल भारतीय तत्त्वज्ञान. परंतु आधुनिक काळात, पाश्चात्त्य दृष्टिकोनातून आम्ही त्या शब्दाकडे नव्याने वळलो. आणि 'प्रॉमिस' नावाचा शब्द त्या जागी येऊन आमच्या पुढ्यात उभा राहिला. पाश्चात्त्यांचे हे प्रॉमिस इतके तकलादू की, त्याचा टिकाव लागावा म्हणूनच कदाचित, फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस खास "प्रॉमिस डे" म्हणून सेलिब्रेट करण्याचा घाट त्यांनी घातला. मग काय? बाजार शोधत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील तरूणाईला ताब्यात घेण्यासाठी, या दिवसाचा बिनदास वापरही केला. आम्ही फक्त आमच्या वचनाचे पावित्र्य विसरून, हा प्रॉमिस' मोरपिसासारखा अलगद उचलून, कळसूत्री बाहुल्यांगत नाचत आहोत. खरे तर कुठल्याही मूल्याला स्वतःचे असे निश्चित तत्त्वज्ञान असावे. एक दृष्टिकोन आणि विचार त्यामागे असावा. परंतु "प्रॉमिस"हा शब्द व त्याची सद्यस्थिती पाहता, निव्वळ थिल्लरपणा व उथळपणा आम्हाला सर्वत्र जाणवत राहतो.
नात्यांची प्रगल्भता, प्रामाणिकपणा व शाश्वती टिकवण्याच्या कामी वचन या मूल्याने दिलेले योगदान, प्रॉमिस या शब्दाला खऱ्या अर्थाने, राखता आले आहे का? आज प्रेमी युगले ज्या पद्धतीने परस्परांना, सॅंडविच खाताना एखादे "प्रॉमिस" मोठ्या गांभीर्याने देतात. तर पुढच्याच क्षणी, कॉफीचा घोट घेताना हेच "प्रॉमिस" मोडत असल्याची घोषणाही करतात. वचन मात्र एक नैतिक दडपण आपल्यावर कायम ठेवते. असा वचनभंग करण्याला सहजासहजी माणसे धजावत नाही. दोन्ही शब्दांचे अर्थ, अनुवाद करणारी मंडळी, एकसमान लावत असतील. तरी त्यामागील निश्चित भाव समजून घेणे नितांत गरजेचे. आमचे नाते किंवा ते नाते ज्या पायावर उभे राहते, तिथे निश्चितच गांभीर्य असावे. परस्परांप्रति स्नेह आणि समर्पण असावे. माणसे चालता चालता, सहज म्हणून शब्द देऊन टाकतात.आणि पुढच्याच क्षणी एका वळणावर, शब्द मोडीतही काढतात. तेव्हा तिथे वचन नाही तर, आजच्या भाषेतील "प्रॉमिस" असते. हा फरक आपण आपल्या सूक्ष्म नजरेतून सहज टिपू शकतो. मग तुम्हीच ठरवा, तुमचे स्नेहल नाते व सुदृढ संबंध, हे वचन नावाच्या मूल्यांवर उभे करायचे की, "प्रॉमिस" या शब्दा भोवती फुगडी खेळून सारेच संबंध उधळून टाकायचे. ...
2015 सालचा नोव्हेंबर महिना, दिवाळसण आटोपून माणसे कामाला लागलेली. सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी गावात, त्या दुपारी एक बातमी येऊन धडकते... - भारतीय लष्करात अधिकारी पदावर असलेला, गावचा सुपुत्र, 'कर्नल संतोष महाडिक' काश्मीरच्या कुपवाडा येथे, अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाला. संपूर्ण देश या अधिकाऱ्याच्या वीर मरणावर गौरव उद्गार काढत असले तरी, कुटुंब आणि गाव मात्र अक्षरशः शोकाकुल झालेले. मग रीवाजाप्रमाणे तिरंग्यात लपेटलेला संतोष महाडिकचा देह, त्याला दिली जाणारी लष्करी पद्धतीची मानवंदना, गावात निघालेली अंतयात्रा, आणि उठलेल्या चितेच्या ज्वाळा. सारे गाव डोळ्यात अश्रू आणत होते. प्रत्येक जण भावूक झालेला.. स्मृतींना उजाळा दिला जात असतो. पण, अशावेळी संतोषची धर्मपत्नी असलेली, स्वाती मात्र निशब्द, निश्चल आणि काहीशी अंतर्मुख. चितेच्या त्या ज्वाला पाहून, तिला अग्नीच्या साक्षीने दिलेलं वचन आठवतं... - पतीच्या प्रत्येक कर्मात सहभागी होण्याचं... आणि मग ती एक निर्णय घेते... त्या निर्णयाची अंमलबजावणी होते... >***ऑगस्ट 2017 उजाडतो... वय, लिंग आणि साऱ्याच मर्यादांवर मात करून, अंगावर भारतीय लष्कराचा पोशाख धारण करून, सितारे चमकवणारी, एक मध्यमवयीन स्त्री मीडियामध्ये झळकते. तिचं नाव असतं - (लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक)... तिने तिचे दुःख, तिची वेदना, पतीपासून मिळालेला विरह, खडतर प्रशिक्षणात पूर्णतः मिटवून टाकला... आणि उभी राहिली एक रणरागिणी... अग्नि समोर पतीला दिलेलं सहचारिणीचं वचन पाळण्यासाठी... किंबहुना, त्याहीपेक्षा पतीने राष्ट्राला रक्षणाचं दिलेलं वचन पुढे नेण्यासाठी.
- 'वचन' हे जिवंत असतं आणि मृत्यूनंतर देखील त्याचं अस्तित्व टिकून राहू शकतं.
- “ज़िंदगी के साथ भी,ज़िंदगी के बाद भी…”
"©® मनोज आहेर, नाशिक,
(9881602025, )
दिनांक 8 फेब्रुवारी 2026..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा