घर म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि भिंतींची रचना नव्हे. घर ही एक जिवंत ऊर्जा-रचना आहे जी त्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना, भावनांना आणि कर्मांना शांतपणे स्वीकारत असते. प्रत्येक घर सतत एकच शब्द उच्चारत असते.
“तथास्तू.”…
माणसाचे विचार, शब्द, भावना आणि कृती यांतून निर्माण होणारी स्पंदने (Vibrations) घराच्या अवकाशात साठत जातात.
क्लेश, वाद, भीती, चिंता, दुःख या भावनांतून निर्माण होणारी स्पंदने जड, स्थिर आणि बोथट असतात;
तर श्रद्धा, कृतज्ञता, आनंद, भक्ती आणि शांती यांतून निर्माण होणारी स्पंदने सूक्ष्म, हलकी आणि प्रवाही असतात.
घर हे या दोन्हींचा साक्षीदार असते.
वस्तूंमध्ये साठणारी स्मृती.
वास्तुशास्त्र असे सांगते की घरातील प्रत्येक वस्तू फर्निचर, भांडी, कपडे, दगड, लाकूड आपल्या क्षमतेनुसार त्या जागेतील स्पंदने शोषून घेत असते. म्हणूनच अनेक वेळा असे अनुभव येतात की, एखाद्या जुन्या घरातील वस्तू नवीन ठिकाणी नेल्यानंतर, अचानक अस्वस्थता, उदासीनता किंवा अनामिक ताण जाणवू लागतो. ही कल्पना काल्पनिक नसून, अनुभवसिद्ध आहे. परंतु ज्या जागेत सात्त्विकता, साधना आणि सकारात्मक ऊर्जा अधिक प्रबळ असते. तिथे हळूहळू त्या वस्तूंमधील जड स्पंदने नष्ट होऊ लागतात. जागा वस्तूंना शुद्ध करते आणि वस्तू माणसाला प्रभावित करतात.
अग्नी : रूपांतरणाचा साक्षात स्रोत
होम, हवन आणि यज्ञ यांना वास्तुशास्त्रात केवळ धार्मिक विधी मानलेले नाही. ते ऊर्जा-शुद्धीचे सर्वोच्च साधन आहेत.
होमाच्या प्रक्रियेत
• अग्नी
• मंत्रोच्चार
• औषधी वनस्पती
• तूप
यांचा एकत्रित संयोग होतो.
या संयोगातून निर्माण होणारी उष्ण, सूक्ष्म आणि प्रसारित ऊर्जा घरातील जड, स्थिर आणि नकारात्मक स्पंदनांना तोडून टाकते. अग्नी हे केवळ जाळणारे तत्त्व नाही ते रूपांतरणाचे तत्त्व आहे.
नकारात्मक → सकारात्मक
स्थिर → प्रवाही
जड → सूक्ष्म
म्हणूनच नवीन घरात प्रवेश करताना, दीर्घ आजार, आर्थिक अडचणी, सततचे वाद किंवा मानसिक तणाव असल्यास
होम-हवन हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो.
पूजा : देवासाठी नव्हे, वास्तूसाठी
पूजा ही देवासाठी नसून वास्तूसाठी असते. हा वास्तुशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे. मंत्र, स्तोत्र, भजन हे केवळ शब्द नाहीत. ते विशिष्ट ध्वनी-तरंग (Sound Frequencies) आहेत. योग्य उच्चारात, श्रद्धेने आणि सातत्याने केलेले मंत्रपठण.
• नकारात्मक स्पंदने बाहेर ढकलते
• काही स्पंदने नष्ट करते
• काही स्पंदनांचे रूपांतर करते
घरात नियमितपणे दीपप्रज्वलन, नामस्मरण आणि साधना झाली, तर घर जिवंत राहते. जिथे पूजा थांबते, तिथे हळूहळू जडता वाढू लागते हे अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेले सत्य आहे. जागा माणसाला निवडते. निसर्गातील सर्व हालचाल स्पंदनांवर आधारित आहे. माती, पाणी, दगड, झाडे हे सर्व आपल्याशी सूक्ष्म संवाद साधतात.
आपण जिथे राहतो, ती जागा अनेक वेळा आपल्याला निवडते. ज्या जागेची स्पंदने आपल्या कर्माशी सुसंगत असतात, तिथे आपोआप स्थैर्य, शांती आणि प्रगती मिळते. पण जिथे आपले अस्तित्व त्या जागेशी विसंगत असते,
तिथे…
• मन अस्वस्थ राहते
• निर्णय चुकतात
• अडथळे वाढतात
अशा ठिकाणी दीर्घकाळ जबरदस्तीने राहिल्यास, ती जागा माणसाला अनुभव देत-देत शेवटी बाहेरही ढकलते.
कर्म, वास्तु आणि भोग
काही जागांमध्ये आपण पूर्वकर्मामुळे प्रवेश करतो. त्या ठिकाणी येणारे त्रास, अपयश आणि वेदना हे कर्मक्षयाचे साधन असते. त्या काळात
• बुद्धी पूर्ण क्षमतेने चालत नाही
• योग्य-अयोग्य निर्णय कळत नाहीत
• माणूस नकळत कर्मभोग पूर्ण करतो
धर्म, साधना, जप-तप कर्म टाळत नाहीत पण ते सहज आणि सहनशील करतात. कर्म भोगावेच लागते; धर्म फक्त त्याची धार कमी करतो. वास्तुशास्त्र म्हणजे भीती किंवा अंधश्रद्धा नाही. ते म्हणजे ऊर्जा, कर्म आणि निसर्ग यांचा समन्वय आहे. घर शुद्ध ठेवायचे असेल तर
• भिंती नाही, स्पंदने स्वच्छ ठेवा
• वस्तू नाही, विचार शुद्ध ठेवा
• उपाय नाही, नियमित साधना ठेवा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा