सुनीताला नेहमीप्रमाणे पहाटे पाचला जाग आली. डोळ्यासमोर कामं दिसू लागली की आपोआप डोळे उघडत. जवळच लेक रहात असे. चार वर्षांच्या गोड नातीला, क्षमाला, आजींकडे सोडून ती कामाला जात असे. तेवढ्यात घरातील सगळी कामं पटापट उरकायला हवी होती. आयुष्यभर विमानतळावर सिक्युरिटीमधे काम केलं. ड्यूटी कधी रात्री दोनला सुरू व्हायची तर कधी पहाटे पाचला. मुलं लहान असताना तर दिवस व रात्र म्हणजे काय हेही कळत नसे. मुलगा मोठा होऊन परदेशी निघून गेला. मुलगी जवळच रहात होती. क्षमा झाली तेव्हा सुनीतानं सेवानिवृत्ती घेतली व लेकीला खूप मदत केली. लेकीनं मॅटर्निटी लिव्ह संपल्यावर क्षमाला सुनीताकडे ठेवायला सुरवात केली ती आत्तापर्यंत ! सतीश बरोबर लग्न होऊन आता चाळीस वर्ष झाली होती पण सतीश कामानिमित्त बरेचदा दुबईत असे.
परदेशातील मुलगा, सून, नातवंड वर्ष-दोन वर्षात एकदा भेटत. त्या महिन्यात श्वास घ्यायला वेळ होत नसे. ती परत गेली की आठ पंधरा दिवस लागत सगळी दमणूक निघायला ! खरंतर सतीशची विमानतळावर नोकरी होती ती बरी होती पण दुबईची भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवली अन् तेव्हापासून सिंगल पेरेंट झालो हे सुनीतास जाणवतं असे. संसाराचा गाडा एकटीने ओढताना आता शरीर व त्याहून मन दमून गेलं होतं.
अलिकडे आयुष्य आपण कसं घालवलं हा विचार सतत मनी येत असे. चंदनासारखे झिजलो आपण सर्वांसाठी! सासु सासऱ्यांचं केलं, नणंदोचं लग्न केलं, मुलांचे शाळा, अभ्यास, सहली, आजारपणं, त्यांची लग्नं, कार्य करताना साठी आलेली कळलीच नाही. पैलतीर दिसू लागला आणि आयुष्याचं सार्थक कशात आहे हे विचार प्रबळ झाले. नुकतंच युट्यूब वर ॲपलच्या स्टीव्ह जॅाब्जचं भाषण ऐकलं..”Your time is limited.. जे करायचं ते लगेच करा..”
खरच आता मन व शरीर काही वेगळंच मागत आहे. आता कुठलीही गडबड नको आहे. कुठलाही गोंधळ नको आहे. जे हवय ते करताना कोणत्याही शंका कुशंका नको आहेत.. लेकीला काय वाटेल? जग काय म्हणेल? कुठलं जग? जे दर दोन मिनिटांनी बदलत राहतं त्या जगाची पर्वा करायची?
क्षमाच्या मिठीत विरघळून जाणं कितीही आनंदाचं असलं तरी त्यातून बाहेर पडायचं आहे. काल परदेशी असलेला लेक विचारत होता.. आई मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यावर येशील का? आम्ही दोघं कामाला जातो.. घरात कुणी आहे म्हटलं की आम्ही निर्धास्त! बाबा रे, तू परदेश निवडलास ना? मग तिथली लोकं जे करतात तसंच कर असं तोंडात आलं होतं पण नेहमीच्या सवयीने विचार करते म्हटलं.. क्षमाचं काय हा लेकीचा प्रश्न आलाच. सतीशला कसलासा मोठ्ठा प्रॅाजेक्ट सुरू आहे त्यामुळे त्याला हे सारं बोलायला वेळ नाही. जवळच्या मंदिरात मी प्रसाद करून देत आले आहे. पुजारी लगेच म्हणाले की बाकी काही करा पण प्रसादाची आबाळ करू नका..म्हणजे नक्की कुणाची आबाळ? गाभाऱ्यातील श्रीराम कधीच काही मागत नाही. तो केवळ भावाचा भुकेला आहे. सुनीताने उठून दात घासले. कडक चहा केला. लॅपटॅाप उघडला. कन्याकुमारीचे तिकिटं काढलं. तिथेच एक छान Air bnb शोधलं.. भरपूर वारं असलेलं समुद्रकिनाऱ्यावरील टुमदार घर सुरेख दिसत होतं. एक आठवड्याचा तिथे जाण्याचा प्लॅन बनवला. तेवढ्यात लेक क्षमाला घेऊन आली..
“अग, तू त्या नव्या डे केअर वाल्यांशी बोललीस का? मी बघून आले आहे. फारच छान आहे ते रेनबो डे केअर. क्षमाला खूप आवडेल.”
लेकीचा चेहरा बदलला.. नाही ग आई.. काळजी वाटते मला. त्यापेक्षा तुझ्याकडे सोडणं सोपं आहे ! मी तुला महिन्याचे पैसे देणार आहे आता.
महिन्याचे पैसे? मला पैसे नको आहेत. मला वेळ हवाय. कारण बाई ग my time is limited..मनात आलचं !
मी कन्याकुमारीला आठवडाभर चालले आहे. नंतर दोन महिन्यानी पॅरीसला एका टूर बरोबर जातेय. तू क्षमाला डे केअर मधे घाल. मी अधून मधून बघेन तिला..जेव्हा जरूर पडेल तेव्हा !
“हे काय नवीन आता?” असं काहीतरी पुटपुटत लेक बाहेर पडली.
“मी उन्हाळी सुट्ट्या साठी तुझ्याकडे येऊ शकत नाही रे !” तिनं लेकाला टेक्स्ट केला.
सतीशचा अचानक फोन आला. तू काय करते आहेस? नातवंडांचे किती प्रेमाने करत होतीस. एकदम काय झालं?”
“सतीश, तू आता रिटायर हो. क्षमाचं बघ तुला बघायचं असलं तर. मला काही ट्रिप करायच्या आहेत. हो आणि तिकडच्या नातवंडांना सुध्दा तुझी गरज आहे. तिनं शांतपणे फोन खाली ठेवला.
क्षमा गळ्यात पडली. “आजी, तू कुठे चाललीस? मी येऊ तुझ्या बरोबर? कल्याकुमाली ला?” क्षमाच्या बोबड्या बोलात ती क्षणभर अडकली पण सावरली.
“नाही ग राणी.. तिथं आजी एकटीच जाणार आहे आणि कुणी नाही. तुझ्या आईला केव्हाच सांगितलंय पण ती विसरली वाटतं. आता तू नव्या शाळेत जाणार ना? तिथं खूऽऽऽप मित्र मैत्रीणी भेटतील!”
“नवी शाला नवी शाला” म्हणत क्षमा नाचत होती. जेवण करून ती झोपली. सुनीतानं सर्व प्लॅन पक्का केला. मन व शरीर सुखावलं होतं.
हिंदी महासागर, सिंधु सागर व गंगा सागर यांच्या संगमावर वसलेले कन्याकुमारी व तिथलं विवेकानंद शिला स्मारक केव्हापासून बघायचं होतं. कन्याकुमारीला जाताच तिथं ती स्वत:साठी विसावणार होती. आयुष्यात पहिल्यांदाच. तिथलं सौंदर्य डोळे भरून पहायचं होतं. जिथं स्वामीजी तीन दिवस ध्यानात होते त्या शिळेस हात लावून कदाचित तिथली काही स्पंदनं आपल्याला काही सांगतील असं वाटतं होतं. Air bnb मधील सात्विक जेवण करून देणारी गंगा नावाची बाई तिला खात्री देत होती की मी बनवलेले जेवण तुम्हाला आवडणारच. समुद्राचा संगम असा कुठे बघायला मिळतो? त्या वाळूत त्या शिळेवर कदाचित स्वामीजी उभे असतील. आजही या क्षणी..विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. अद्वैतांचं तत्वज्ञान समजून घेऊन आपल्या आयुष्यात आणायचं होतं..
शरीर व मन तेच मागत होतं. एक उद्दीष्ट हवं होतं. ताण, अति विचार बंद करायचे होते. स्वत:चं स्वत: ला शोधायचं होतं. त्यासाठी आई, आजी, पत्नी, बहिण, सासू वगैरे अनेक भूनिकांतून बाहेर पडणं जरूरीचं होतं…
खरंतर उशीरच झाला होता पण better late than अजिबात never..
तिनं लॅपटॅाप बंद केला..
क्षमा उठली होती.. “आजी, काय करत्यैस?” त्या निरागस बोलातील निर्मळता जाणवून तिनं तिला जवळ घेतलं.
“आजी गावाला जाईल तेव्हा तू शाळेत जाशील ना?” त्या मोठ्या डोळ्यात बघत तिनं विचारलं.
“हो आजी.. तू मज्जा कलून ये. पण लवक्कल ये हं..” क्षमानं आजीला घट्ट मिठी मारली.
लेकीकडून असंच उत्तर येण्याची ती आता वाट बघत होती.
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा