मंगळवार, ३ मार्च, २०२६

2681. पाठव पुढचा पेशंट

 २२/२३वर्षांची ,एक नवविवाहिता आत आली.
“काय झालं?”
“तीन चार महिने झालेत ,नकोय!”
“पहिल्यांदाच आहे न ,मग का नकोय?”
“नकोच…”
“एकदा तपासते, मग बोलू “
“साडेपाच महिन्याच्या जवळपास झालेत, तारीख लक्षात नाही का?”
“नाही.”
“गर्भ मोठा झालाय ,आता गर्भपात होऊ शकत नाही.”
“काहीही करा ,पण मला यातून मोकळं करा.”
“मी करत नाही तीन महिन्यांपेक्षा मोठा गर्भपात. शिवाय तब्येतीला धोका असतोच. यावेळेस राहू दे ,डिलिव्हरी झाली की कुटुंबनियोजनाचं ॲापरेशन करून घे…”
“मुलगीच झाली तर…?”
“ते आताच कसं समजणार आणि दोन्ही शक्यता आहेतच की !”
“नवरा दारुडा आहे. काहीच काम करत नाही. “
“घर कसं चालतं?”
“सासू सासरे मजूरी करतात.”
“तु ?”
“मी घरीच असते. .मुलगा झाला तर नांदवणार, मुलगी झाली तर मायच्या घरी धाडणार. .नवऱ्याने स्पष्ट सांगितलंय.” बोलताबोलता ती एकदम रडू लागली.
एकदम कठीण प्रसंग...काय सल्ला द्यावा?
मुलगी झाली तर नवरा छळणार किंवा सोडून देणार. स्वतः अजून आईबापाच्या कमाईवर खाणारा मुलगा, मुलगा झाला तर नांदवणार. पण पोसणार कुणाच्या भरवशावर? शिवाय आईवडील किती दिवस सांभाळणार आणि किती प्रेमाने सांभाळणार माहेरी परत आलेल्या मुलीला. मुलगी झाली तर एकल पालक होऊन सांभाळणं.स्वतःला आणि मुलीला. अवघड तर आहेच !
“तुझी काय इच्छा आहे?”
“मला बाळ तर पाहिजे होतं. पण आता नको.”
“आता पाडणं तर शक्यच नाही, पण पाडलं तरी पुढच्या वेळीही असाच दबाव आणेल तुझा नवरा. त्यापेक्षा हेच राहू दे,औषधी बरोबर घे. 
“पण मुलगी झाली तर…”
“नवरा दारुडा आहे…काम करत नाही…मारतो… त्याला मुलगी नकोय. मग मुलगा झाला तर काम करेल , दारू सोडेल असा शब्द देतो का तो? “
“ ते कसं सांगू? त्यांचं घर आहे. ते त्यांच्या मर्जीचे मालक. सासू सासरेच काही बोलत नाहीत तर मला कोण बोलू देणार, विचारू देणार? “ तिचा असहाय्य स्वर .
“ अवघड आहे… “
“ मी तं म्हंते ह्ये खाली कर अन् घे फारकत. आमी हाय नं तुझ्या मागं .” पहिल्यांदाच तिची आई मधे बोलली…”
“ सोपं हाय का ते. समाज, बिरादरीचे लोक काय म्हनतील? “ सगळं हारलेले, लग्नाच्या कर्जाचा डोंगर दिसणारे हतबल वडील….!
“मंग काय पोरगी मरू देता? “ 
“ उद्या पोराला पोरगी कोन देईल.लगन झालेल्या पोरीची कटकट हाय म्हनल्यावर ?” 
बाबाला भविष्य छळत होतं, वर्तमान आईचं मन जाळत होतं ! पोरगी हतब ल!! 
“ हे तर पाडतां येत नाही . बाळाला बघून नवरा बदलला तर तुझं नशीब पण बदलेल. “ 
“ नाहीच बदलला तर ?” तिच्या डोळ्यांत चिंता...भीती.
“ मग तूच सोडून दे त्याला, त्याने सोडायची भिती धरून बसण्यापेक्षा. तुझी आई तर आताही न्यायला तयार आहे ना?”
“एखाद दोन वर्ष मी हायेच तुला संबाळायला. मग सोता पायावर उबी हो. खंबीर बन..रोज मार खाऊन लाचारीचा तुकडा तोडण्यापरीस त्ये बरं न्हाय का?” 
आईचा सल्ला अगदी योग्य ! पोरगी नजर चुकवणाऱ्या बापाकडे आशेने पहातेय. 
“आईचं बरोबर आहे. तुम्ही असं समाज बिरादरीचं नाव घेऊन जबाबदारी नाही टाळू शकत. तिला तुमच्या आधाराची गरज आहे आता.” 
“आदार… हूं… “ आईने सुस्कारा सोडत नवऱ्याकडे कुत्सितपणे पाहिलं. म्हणजे तीही या किंवा अशाच परिस्थितीतून गेलेली असावी असं वाटलं ! 
“मी हाये समर्थ तुजं करायला. तुह्यावानी रडत बसले असते तं कवाचीच व्हीर जवळ केली असती. तीन तीन पोरी झाल्यावर मी कायकाय आईकलं अन् सहन केलं त्ये माजं मला ठावूक. पन मी हारले न्हाई. म्हनून तुमी तिघीबी अन् मीबी आज जित्या हाओत. ”
म्हणजे अंदाज बरोबर होता तर ! तिनेही मुलासाठी त्रास सहन केला होता. पण कोण्या एखाद्या क्षणी खंबीर होऊन लढली होती!
“ हा नाही सुधारला तर  सरळ आईकडे जा आणि स्वतःच्या पायावर उभं रहा.” माझी नजर बाबांकडे !
“अन् पूडं कुणी भेटलाच समजदार, मोट्या मनाचा तर सरळ त्याचा हात हातात घे. बिगडलेल्या नवऱ्यासाटी सोताच्या जिंदगीचं मातेरं करू नगं. अन् माहेरी बी लाचार होऊन ऱ्हाऊ नगं. “
तिचे मलूल डोळे क्षणभर विस्फारले,चमकले ! मनातल्या मनात काहीतरी विचार पक्का झाल्याचं जाणवलं .नमस्कार करून ते सगळे बाहेर गेले. 
‘ती’ आजच्या कार्यक्रमाची यशस्वी गृहउद्योजिका या पुरस्काराची प्रथम मानकरी !! सोबत दहा वर्षांची गोड चुणचुणीत छोकरी !!! पूर्वीच्या मलूल चेहऱ्यावर आता आत्मविश्वासाचे तेज झळकत होते. लढाई अर्थात सोपी नव्हतीच  पण ती आता खंबीरपणाने लढत होती ….परिस्थितीशी … नशिबाशी ,आईच्या मदतीने !
तिचं नशीब त्यातल्या त्यात बरंच म्हणावं लागेल. कारण कित्येकींच्या नशिबात कुठे असतो माहेरचा खंबीर आधार?

©️रश्मी. rashmi lahoti

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...