मंगळवार, ३ मार्च, २०२६

2649. नऊची लोकल

      सकाळी सकाळी दुबईहून आलेला लेकाचा फोन काकांना घ्यावासा वाटला नाही. मुलगा दुबईला बोलवतोय पण आपलं मन तिथं रमत नाही.
‘पूजा करतोय..’ असा मेसेज त्यांनी बोलणं टाळण्यासाठी पाठवला. फोन वाजायचा थांबला. पण काकूंना हे वागणं आवडलं नाही, असं त्यांना वाटलं.
फोन फेकून द्यावा, असं काकांना हल्ली वाटू लागलं होतं. दोन-दोनशे मित्र फेसबुकवर? सगळं मृगजळ! खरं जिवाभावाचं, कुणी नसलेलं हे फोनमधलं जग! अजूनच एकटं करतं! 
काकूंचं निधन होऊन वर्ष होत आलं होतं. काकांना अजूनही एकट्यानं जगणं जमत नव्हतं. चार चौघांसारखा संसार केला. खूप काम केलं आयुष्यभर ! एकच मुलगा. तोही दुबईत. तसे फारसे मित्र नव्हतेच कधी. एक मित्र होता नाही म्हणायला. पण तो सेवानिवृत्तीनंतर त्याच्या गावी गेला होता.
काकांनी चहा केला. समोर दोन कपबशा ठेवल्या. दोन टोस्ट केले. टोस्टला भरपूर लोणी लावलं. थोडं लसणीचं तिखट त्यावर भुरभुरलं. एक टोस्ट व चहा काकूंसाठी ठेवला. एक स्वत:ला घेतला. डोळ्यातील पाणी पुसत तो पोटात ढकलला.
“हे कसलं जगणं हो? समोर आहे ते खाताना आनंद, कृतज्ञता असावी. डोळ्यात पाणी कसलं?” काकूंचा आवाज ऐकून काका दचकले.
”आठवतंय का मी पूर्वीपासून काय म्हणत आलेय? काम करा हो हवं तेवढं. पण चार माणसं जोडा. दोन जिवाभावाचे मित्र हवेतच. रोज कामासाठी बाहेर पडता; किती लोक भेटतात दिवसभरात. पण माणसं जोडण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या सुख दु:खात सहभागी व्हावं लागतं. असं अलिप्त राहून मैत्री नाही होत!” काकूंचं बोलणं उडवून लावलं होतं आपण.
आधीच आपला अबोल स्वभाव ! कामात डोकं बुडवलं की झालं. कुणाची गरज पडत नाही. लग्नकार्य वगैरेला गेलं की भेटतात चार लोकं, नातेवाईक. बास झालं ! असेच आपण जगलो. आता आपला एकटेपणा दूर करायला कोण येणार?
“तयार व्हा आणि कामाला जाण्यासाठी नऊची लोकल जशी पकडायचात तसे जाऊन बसा. बघा कुणी मित्र भेटतो का… बोला लोकांशी. उठा, उठा… कुणी कुणाला आयुष्यभर पुरत नसतं.” काकूंचा आवाज वाढलाय असं वाटल्यानं ते उठले..
“चहा, टोस्ट खाणार आहेस की मीच खाऊ?” त्यांनी प्रश्न विचारला पण उत्तर आलं नाही. त्यांनीच खाऊन टाकला व तयार होऊन नेहमीप्रमाणे नऊ ची लोकल पकडली. लोकल मध्ये कुणी मैत्री करण्यालायक दिसलं नाही. जो तो आपला फोन मध्ये अडकलेला ! जीवनाच्या वेगात फरफटणारा. सेकंद काट्यावर चालणारा. संसारातली ठिगळं जोडण्यासाठी धडपडणारा. डबे करून, सकाळचं आवरून नोकरीसाठी बाहेर पडलेल्या बायका… सकाळीच दमून गेल्या होत्या.
पेटीवर अत्यंत गोड सुर वाजले म्हणून काका तिकडे बघू लागले.
“जनम सफल होगा रे बंदे,
मन मे राम बसा ले…
बोले राम, बोले राम,
आ जा राम, बोले राम…”
जगजीत सिंगचं भजन म्हणत एक दहा वर्षाचा मुलगा लोकलमधे इकडे तिकडे हिंडत होता. चार पैसे मिळवत होता.
काकांचा वेळ जरा बरा गेला. नेहमीच्या स्टॅापवर उतरून ते नेहमीच्या संतोष हॉटेलमध्ये गेले. सोबत तो दहा वर्षांचा मुलगा होता. त्याला त्यांनी पोटभर खाऊ घातलं. पोट भरताच त्या लेकरानं काकांना वाकून नमस्कार केला. काकांचं पोट तो पोर मनापासून खाताना बघूनच भरलं होतं..काळा रंग, बोलके व संकोचानं भरलेले डोळे…
“उद्या नऊच्या लोकलला परत भेटू आपण. कुठं राहतोस? नाव काय तुझं?” काका त्या रापलेल्या चेहऱ्याकडे बघत होते.
“छोटू म्हन्त्यात मला.” ते पोर बोललं. “एकलाच फलाटावर ऱ्हातो…”
कसं राहात असेल हे पोर एकटं? काकांच्या पोटात कालवलं.
“मी तुला राम म्हणत जाईन. किती सुंदर गातोस. केवढं मनोरंजन करतोस लोकल मधल्या लोकांचं… शाब्बास!” काकांनी त्याच्या पाठीवर शाबासकी दिली. पोराचा चेहरा उजळला.
“कुणी शिकवलं तुला गायला?” काका त्याच्या मनात डोकावून बघत होते.
“परभू रामानं… त्योच प्येटी माज्यासाठी फलाटावर ठ्येवून गेला एक दिवस.”  काका अवाक् होऊन ऐकत होते.
संतोष हॉटेलचा मालक दिनकर काकांना गेली तीस वर्षं ओळखत होता. त्याला काकांनी या मुलाला एक भजन म्हणू देत का विचारलं… मालकानं दिनकरकाकांच्या विनंतीला मान दिला.
“राम नाम की ज्योत जगाकर
अपना भाग रचा ले
मन मे राम बसा ले…
बोले राम, आ जा राम, बोले राम !”
काय गात होतं पोरगं… सुंदर आवाज ! पेटीवर सराईतपणे फिरणारी बोटं ! जगण्यासाठी परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवतो. म्हणून तर आज आपण उभं आहोत.
सारेजण कौतुकानं पाहत होते. कुणी त्याचा विडिओ काढत होतं. दिनकरनं रामला रोज गाशील का विचारलं. काकांनी किती पैसे द्यायचे याचं बोलणं केलं. मुलगा रेल्वे स्टेशन वर एकटा राहतो, हे कळताच दिनकरनी त्याला त्याची काही सोय होईपर्यंत हॉटेलात रात्री झोपायला ये, सांगितलं.
”दिनकर, गेलं वर्ष ‘ही’ गेल्यामुळं मी नैराश्यात घरात बसून होतो. ही रोज सांगायची. ‘उठा, बाहेर जा आणि मित्र शोधा…’ आज बाहेर पडलो आणि हा राम भेटला. करायचं म्हंटल तर किती करण्यासारखं आहे माणसाला.
‘हा मुलगा कुठल्या टोळीतला असेल का?’ ‘याला मदत केली तर आणखी चार मुलं मागं येतील का?’ ‘गुंड मागं येतील का?’ या विचारात माणूस मदतीचा मैत्रीचा हात पुढं करत नाही. दुर्दैव आपलं… का नाही आपण काही करत इतरांसाठी?’ काका स्वत:च्या विचारात हरवले होते!
“काका, शेजारी पोलिस स्टेशन आहे. तिथले इन्स्पेक्टर शिंदे साहेब एकदम ए-वन आहेत. कितीतरी वेळा येतात इथं च्या प्यायला. त्यांना उद्या भेटू व एकदा रामची माहिती देऊ. आपल्याला कधी काही मदत लागली तर ते देतील!” 
दिनकर हुशार होता… ”काका, येत चला असंच… मी वाट बघतो!”
काकांनी दिनकरला मिठी मारली. लोकलमधून परत घरी येताना पायात उत्साह होता. दुसरे दिवशी सकाळी चहा टोस्ट करताना त्यांनी काकूंची प्लेट बनवली नाही पण दोन कप चहा थर्मास मध्ये भरून घेतला. लोणी व जॅम लावून दोन सॅंडविच बनवले व घाईघाईने ते नऊच्या लोकलसाठी बाहेर पडले.
राम वाट पहात होता. त्याला सॅंडविच व चहा दिला. दिवस दिवस उपाशी असणारं ते पोर तृप्त झालं. त्याचे सूर आज कालपेक्षाही उत्तम लागले…
“अच्युतम केशवं कृष्ण दामोदरम्…
कौन कहते है, भगवान आते नही?
तुम मीरा के जैसे बुलाते नही…”
त्यानं गाताना पुढं होऊन काकांना नमस्कार केला… जणू काही काकांच्या रूपात ‘केशवं कृष्ण दामोदर’च त्याच्या आयुष्यात आला होता.
काकांच्या शेजारी बसलेले गृहस्थ संगीताचे शिक्षक होते. त्यांनीही रामच्या सुरात सूर मिसळले. रामचं भजनं ऐकत असताना सारे गुंग होऊन गेले होते.
भजन संपलं. काका पाच पन्नास लोकांकडे बघून म्हणाले, “मित्रांनो, रोज एकत्र प्रवास करता पण एकमेकांशी बोलत नाही कुणी… करा हो चौकशी शेजारी बसलेल्याची ! मित्र जोडा… फोनमधे डोकं खुपसून बसू नका. ते मृगजळ आहे. मी असाच होतो…”
काका स्वत:च्या आयुष्याची कहाणी सांगत होते. लोक लक्ष देऊन ऐकत होते. राम कौतुकानं शेजारी उभा होता. रामला संतोष हॉटेलमध्ये पोहोचवून काका इन्स्पेक्टरांना भेटले. त्यांनी रामला नगरपालिकेच्या शाळेत भरती केलं. अतीव समाधानानं काका घरी आले.… रवा साजूक तुपात भाजून गोडाचा शिरा केला… वेलदोडा, बेदाणे, बदामाचे तुकडे घालून. दोन बशींत शिरा घातला. थोडासा रामसाठी डब्यात ठेवला.
“अगं, ऐकलंस का माझ्या नव्या मित्राबद्दल…” काका सगळी कहाणी सांगत होते, “बरं, झोपतो ग… नऊच्या लोकलला पोचायचंय सकाळी!”
रामचा फोन आला… “काका, नक्की येताय नव्हं उद्या? मला लई भ्या वाटतंया शालेत जायाला…”
“काही काळजी करू नको… येतो मी.” काका शांतपणे झोपून गेले… पहाटे उठून तयार होऊन नऊची लोकल गाठण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी… मैत्रीचा हात जिथं खरोखर गरजेचा आहे, तिथं पुढं करण्यासाठी !
काकू फोटोतून स्मितहास्य करत होत्या. याचसाठी केला होता अट्टाहास…  आता खरंच शेवटचा दिस गोड झालाय !

- ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...