ती दहा वर्षाची असावी. स्कुल बसची वाट बघत ती बस स्टॅापवर उभी असे. गुलाबी रंगाचा कोट, डोक्याला गुलाबी हॅट, पाठीला बॅकपॅक लावले होते परंतु पायातले बूट अगदी जीर्ण झाले होते. एका बाजूनं फाटले होते. गारठलेले पाय सतत हलवून ती गरम ठेवायला बघत होती. हवा अतिशय गार झाली होती व सगळं गाव बर्फात लपेटलं गेलं होतं! खरंतर त्या बुटांचा अशा बर्फात काहीच उपयोग नव्हता.
केटीनं तिला बरेचदा त्या बस स्टॅापवर बघितले होते. केटी तिच्या लेकाला शाळेत पोचवण्यास गेली असताना तिने त्या मुलीला शाळेच्या ग्राउंड वर खेळतानाही बरेचदा बघितले होते.
त्या दिवशी मात्र केटीनं लेकाला शाळेत पोचवलं व घरी येऊन शाळेत फोन केला. शाळेच्या सेक्रेटरीला विचारलं, “ही दहा वर्षांची मुलगी फाटके बुट घालून एवढ्या थंडीत बसची वाट बघत उभी असते..ती विंटरचे बूट का घालत नाही? केवढी प्रचंड थंडी आहे बाहेर !!”
“त्या फॅमिलीची परिस्थिती फार कठीण आहे. रोजचं जेवणं पोटात जायची मारामार. मग विंटरचे बूट कसे परवडतील?” सेक्रेटरीने सोडलेला उसासा तिला फोनवरही जाणवला.
केटी तातडीने बुटाच्या दुकानात गेली. दहा वर्षांच्या मुलीसाठी गुलाबी रंगाचे, आत अगदी गरम असलेले, मऊमऊ, गुडघ्यापर्यंत उंच असे बर्फात घालायचे विंटरचे बूट तिनं विकत घेतले व त्या सेक्रेटरीला नेऊन दिले.
दुसरे दिवशी सकाळी बर्फ भुरभुरत होता..केटी तिच्या मुलाला पोचवायला शाळेत जात होती…
तिला ती मुलगी दिसली. नेहमीप्रमाणे ती स्कुल बसची वाट बघत बस स्टॅापवर उभी होती. गुलाबी रंगाचा कोट, डोक्याला गुलाबी हॅट, पाठीला बॅकपॅक लावलेला पण आज ती पाय हलवून गरम करत नव्हती..पायात नवे कोरे गुलाबी, गरम, मऊमऊ गुडघ्यापर्यंत उंचीचे विंटरचे बूट होते. एकदा असं वाकून एकदा तसं वाकून ती कौतुकाने त्या बुटांकडे बघत होती..चेहऱ्यावर हसू मावत नव्हतं..
ते बुट कुठून आले, कुणी दिले,आणि का दिले याची तिला कल्पना नव्हती! पण ते अजिबात महत्वाचं नव्हतं. एवढ्या बर्फात तिचे पाय आज गरम राहिले होते आणि ती आनंदात होती एवढचं महत्त्वाचं होतं.
ती बसमधून शाळेत पोचली.. शाळेच्या ग्राउंडवर मैत्रीणींचा चिवचिवाट सुरू होता.. तिच्याकडे बघताच मैत्रिणी म्हणाल्या, “अगं किती मस्त आहेत ग तुझे विंटर बुट? एकदम गरम असणार आहेत.. कुठून घेतलेस?”
ती प्रसन्न हसून म्हणाली, “एका देवदुताने भेट दिलेत! मी कित्ती लकी आहे ना?”
केटी डोळ्यातून वाहणारी आसवे पुसत घरी परतली. केटी सारख्या अनेक देवदुतांमुळेच हे जग फार सुंदर आहे.
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
Dedicated to all the angels like Katy who spread warmth in the world and make it so beautiful! 🙏सत्य घटनेवर आधारित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा