मंगळवार, ३ मार्च, २०२६

2629. ते...

 किरव्याचा पाडा. माझ्या घरापासून काही किलोमीटर असला तरी दर महाशिवरात्रीला मी हमखास जातोच. मी हाडाचा शिवभक्त आहे. किरव्याचा पाडा या लहानशा गावातलं ते जागृत शिवमंदिर...गेली कित्येक वर्षे मी आवर्जून जातो. महाशिवरात्रीला तिथे जाण्यामागची अनेक कारणं आहेत. त्यापैकी दोन मुख्य कारणं म्हणजे, ते देवस्थान जागृत आणि स्वयंभू आहेच आणि महाशिवरात्रीलाही तिथे फारशी गर्दी नसते. सबंध दिवसात जास्तीत जास्त शंभर दीडशे पायरव असेल. इतर दिवशी तर सोमवारची चार डोकी सोडली तर तिथे गुरवाखेरीच कोणी येत नाही. गेल्या वर्षी महाशिवरात्रीला मी संध्याकाळी घरुन पूजेचं साहित्य घेऊन निघालो. मला यंदा मध्यरात्री निशीथकालात पूजा करायची होती. मला वाचून म्हणता येणारी दोन पाच स्तोत्र पीडीएफ डाऊनलोड करुन मोबाईलवर घेतली आणि निघालो.
     पोहोचेपर्यंत साडेदहा वाजले होते. पूजेचा कालावधी मला वाटतं १२.२२ की कायसा होता. लोकं दिवसभरात येऊन गेली होती. गुरव विडी फुंकत बाहेर बसला होता. मला येताना बघून जागचा उठला, या या म्हणाला. “परांजपे, आज उशीराने आलात म्हंजे मध्यरात्रीचा पूजेचा बेत दिसतोय. काल पाठक गुरुजी रुद्राभिषेक करेन म्हणाले होते पण आज गेलेत नाशकास...तुम्हाला वेळ मिळेल छान...काय करायचीये तेवढी करा पूजा हो हो” बाजूच्या त्याच्या घरात जाऊन चहा आणून दिला. मी तोपर्यंत दर्शन घेऊन आलो... लोकं येणं बंद झाले...
मध्यरात्र सुरु झाली. मी आत गाभाऱ्यात जाऊन बसलो. ॐ नमः शिवाय म्हणून मी सुरुवात केली. आधी शिवस्तुती म्हणली ..गुरव बाहेर व्हरांड्यात बसला आहे हे मला जाणवत होतं. माझी शिवस्तुती संपत आली आणि माझ्या पाठीमागे चाहूल लागली. कोणीतरी आलं हे जाणवलं... मी सरकलो. त्याक्षणी कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. बर्फासारखा थंड स्पर्श, मी शहारलो. मागे वळून बघितले तर एक अतिशय तरुण आणि कमालीचं देखणं जोडपं उभं होतं. त्या तरुणाने माझ्या खांद्यावर हात ठेवून “तुमचं चालू दे... सरकू वगैरे नका” असं सुहास्य वदनाने सांगितले. मी प्रत्युत्तरादाखल हसलो. ते दोघे बाजूने येऊन माझ्या समोर, त्या शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूला बसले. इतकं सुंदर कपल मी आजवर बघितले नव्हते. चांदीच्या थाळीत त्या स्त्रीने सर्व साहित्य आणलं होतं... त्यांची आणि माझी पूजा सुरू झाली. माझं बिल्वाष्टक त्यांनी ऐकलं. दोघे माझ्याकडे जुनी ओळख असल्यासारखे हसत होते. पुरुष साधारण सहा फूट उंच, सावळा, धारधार नाक, सशक्त आणि देखणा होता तर त्याची बायको देखील थोडी उंच, गोरीपान, तरतरीत नाक असणारी होती. दोघांची वस्त्रप्रावरणेही उंची दर्जाची होती. पूजा संपल्यावर मी दोघांची चौकशी करणार होतोच इतकं कुतुहल मला वाटलं होतं....गंमत म्हणजे दोघांचे डोळे मात्र निळसर होते. 
     आता माझी दोन स्तोत्र शिल्लक होती. तोच मला त्या स्त्रीने हाताने थांबण्याची खूण केली. मी थांबलो. ती म्हणाली “महाशय, आम्हा उभयतांना इतरत्र जायचे आहे. थोडा अवकाश होतो आहे तर तुमची हरकत नसेल तर आम्ही एक स्तोत्र म्हणून आमची पूजा संपवतो. तुम्हालाही हे स्तोत्र येत असेल तर आपणही म्हणावं” तिची विनंती इतकी लाघवी आणि सुस्वर होती की मी नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. दोघांनीही खड्या आवाजात एक अपरिचित शिवस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. या कालं जितगर्वं, कृतादरः सततं हे शब्द माझ्या लक्षात राहीले. स्तोत्र संपल्यावर मी चौकशी केली तशी ते कंठाष्टक स्तोत्र आहे असं तो पुरुष म्हणाला. दोघे उठले. दोघांनीही शिवलिंगाला साष्टांग नमस्कार केला. दोघांची शरीरं कमालीची लवचिक होती. याक्षणी मला दोघांनीही चंदन अत्तर लावलं होतं हे जाणवलं. दोघांनी मलाही नमस्कार केला. मी ही केला. निघताना त्या स्त्रीने मला अतिशय सुहास्य चेहऱ्याने मिठाईचा प्रसाद दिला. ती पांढरी बर्फी होती. खा आत्ताच अशी खूण तिने केल्यावर मी लगेच तो तुकडा ग्रहण केला. अतिशय निराळीच चव होती. त्या बर्फीला भीमसेनी कापराचा आणि चंदनाचा गंधही होता ते आजही आठवतंय. दोघे माझ्या पाठीमागून गाभाऱ्याबाहेर गेले आणि एक तेज झळाळत गेल्याचा भास झाला. पुढच्या तीन सेकंदात मी उठून ताडकन उभा राहिलो आणि धावत गाभाऱ्याबाहेर आलो... बाहेर नीरव शांतता होती. गुरव बाहेर बसला होता... काय झाले? तो दचकून उठला... तो दोघे कुठे गेले? बाहेर अक्षरशः चिटपाखरुही नव्हते. कसलीही हालचाल नव्हती... कोणीच येऊन बाहेर गेल्याचा कसला मागमूसही नव्हता.... गुरवाच्या मते तो समोरच होता बसलेला.... ना कोणी आलं ना कोणी गेलं.... मी घडलेली इत्यंभूत हकीकत त्याला सांगितली... तो त्याक्षणी माझ्या पायावर कोसळला... मला त्याने साष्टांग नमस्कारच केला... मला काही समजलं नाही.
“शेठ...आमची ही चौथी पिढी इथे सेवा करते आहे...माझ्या खापरपणजाला दर महाशिवरात्रीला रात्री पूजा करायची सवय होती... आम्ही सगळेच करतो म्हणजे... पण वेळ पुढेमागे...” तो नीट बोलू शकत नव्हता. थरथर कापत होता “माझ्या खापरपणजाला दिसले होते हे दोघे. तेव्हाही असंच कंठाष्टक म्हणले होते... असाच प्रसाद दिला होता... तुम्ही वर्णन केलं तेच दोघे... पतीपत्नी...”
“क्काय? तुम्ही काय म्हणताय? पण ते काही क्षणात गेले कुठे?” आता मी घामाघूम झालो.
“त्यांनी नेहमीप्रमाणे पूजा केली. ते दरवर्षी करतातच. कधी दिसत नाही, दर्शन नाही देत. सकाळी पिंडीवर पूजा असते. आज तुम्हाला दर्शन दिलं”
“अहो पण ते उभयतां आहेत कोण”
“तुमचा विश्वास बसणार नाही परांजपे. आज इच्छाधारी नागनागिण जोडपं दिसलं तुम्हाला दर्शन दिलं. प्रसाद दिला स्वहस्ते. तुम्ही भाग्यवान आहात. गेल्या दोनशे वर्षात त्यांचं दर्शन, सहवास, त्यांच्या दिव्य मुखातून कंठाष्टक ऐकण्याचा लाभ आणि प्रसाद घेणारे तुम्ही दोघंच... माझा खापरपणजा आणि दुसरे तुम्ही” मी स्तब्धपणे त्याच्याकडे बघत मटकन खालीच बसलो.

(समाप्त)
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...