फार फार जुनी आठवण आहे.
एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. त्याना तीन मुलगे. तिघंही अभ्यासात हुशार, वृत्तीनं शांत आणि अभ्यासू. वडील एका दुकानात कारकून तर आई तब्येतीनं खंगलेली; त्यात नजरेनं अधू !
मोठा यशवंत मधला विद्याधर तर धाकटा सदानंद.
तिघांची शाळा एक, माध्यम एक, इयत्ता मागं-पुढं. काही खर्च एकदम यायचे. म्हणजे, शाळेच्या सुरुवातीला तिघांचा गणवेशाचा खर्च, पुस्तकं सेकंडहँड असली, तरी पैसे तर मोजावेच लागायचे.
तिघांचे गणवेश, चपला, कंपासपेट्या, इतर सामुग्री. कितीही बेगमी केली तरी तारांबळ उडायचीच. त्यात तिघंही दिसायला सुंदर. मदनाचे पुतळेच जणू!
मोठ्यानं दोन्ही वेळा स्कॉलरशीप मिळवली होती. मधल्यानंही पहिली स्कॉलरशीप सहज मिळवली होती आणि धाकटा सदा स्कॉलरशीप नक्की मिळवणार, याची शिक्षकांना खात्रीच होती.
पण तरी धाकट्या सदावर एका शिक्षिकेची खफा मर्जी होती. कारण संस्कृत भाषेसाठी मिळणारी शिष्यवृत्ती त्यानं जिद्दीनं मिळवली होती, ज्यावर त्या शिक्षिकेच्या मते त्यांच्या कन्येचा हक्क होता. केवळ तीन गुणांनी तिची शिष्यवृत्ती गेली होती, जी त्या काळात खूप प्रतिष्ठीत मानली जायची.
मग आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन भरलं, त्यातही सदानंदाला ग्रुप लीडर केलं गेलं. त्या शिक्षिकेच्या मुलीनं सबमीट केलेल्या प्रोजेक्टपेक्षा ठीबकसिंचनाच्या प्रोजेक्टला प्रदर्शनात स्थान दिलं गेलं, जे सदानंदानं मांडलं होतं. त्या शिक्षिकेच्या मुलीला सदानंदाच्या हाताखाली काम करावं लागलं.
जे तिनं हसतमुखानं केलं. वेळप्रसंगी सदानंदाचा ओरडा खाऊनही तिच्या चेहर्यावरचं हास्य कमी झालं नाही… पण बाईनी त्याचं ओरडणं बघितलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. हा आपल्या मुलीचा अपमान करतो, म्हणजे एका अर्थी आपलाच पाणउतारा करतोय असा त्यांनी ग्रह करून घेतला.
…आणि मग त्या त्याची पाठ धरल्यासारख्याच वागायला लागल्या. पण तो कुठंच ‘सापडत’ नव्हता. त्याच्या प्रयोगाच्या वह्या कायम अप-टू-डेट असत. निबंध रेखीव अक्षरात लिहिलेले असत. त्यात त्याच्या विचारांची आणि बुद्धीमत्तेची चमक दिसत असे. तोंडी परिक्षेत तो अव्वल होताच पण सांस्कृतिक कार्यक्रमातही तो बाजी मारून जायचा. जितका तो व्यवस्थित राही, तितका या शिक्षिकेचा जळफळाट होत होता.
एका मागून एक शिष्यवृत्त्या मिळवत सदानंद नववीत पोहोचला होता. योग होता म्हणा किंवा त्या शिक्षिकेनं योग जुळवून आणला म्हणा, लागोपाठ तीन वर्ष हीच शिक्षिका सदानंदाच्या वर्गावर आली आणि त्यांची कन्या त्याची सहाध्यायी होती.
ती आपल्या आईला ओळखून होती आणि सदानंदलाही ओळखत होती. इतका ब्रिलियंट असून घरच्या परिस्थितीमुळं तो कायम विवंचनेत असल्यासारखा असायचा. कितीदा तरी ‘डबा आणायला विसरलो’ सांगत तो हसतमुखानं उपाशी राहायचा.
मुलीचा जीव तुटायचा… पण हे सगळं ऐकून तिची आई म्हणायची, ‘तरी माज किती दाखवतो…!’ जैसी जिसकी सोच…
सदानंद क्रिकेट चांगलं खेळायचा. त्याच्या गल्लीत तर तो खेळायला नसेल, तर खेळ काय कधी कधी मॅचही रद्द व्हायची. बाकी कशावरून नाही पण या क्रिकेटच्या वेडापायी धाकटा आपल्या बापाचा ओरडा खायचा.
या शिक्षिकेनं सदानंदचं नाव कौतुकानं नव्हे, तर त्याचं लक्ष डायव्हर्ट होण्यासाठी शाळेच्या टीमसाठी सुचवलं. त्यानं आनंदानं त्या शिक्षिकेच्या मुलीकडे बघितलं. त्याच्या नजरेत आनंद होता; आत्मविश्वास होता. पण त्या मुलीच्या नजरेत ना आनंद होता ना उत्साह. तिनं बरोबर संधी साधली. सदानंदनं तिच्याकडे बघितल्यावर तिनं अगदी त्याला कळेल इतपत ‘नाही, नाही…’ अशी मान हलवली. त्यात सल्ला होता, अधिकार होता, आत्मियता होती!
तिनं ‘नाही’ अशी हलवलेली मान नेमकी बाईंच्या नजरेतूनही सुटली नाही. आणि अपेक्षीतरित्या सदानंदनं आपलं नाव मागं घेतलं. ‘बाबा रागवतील’ असं कारण पुढं केलं.
“अरे, खेळाचे वेगळे गुण मिळतील, जे निकालात धरले जातील!” बाई म्हणाल्या.
तो म्हणाला, “बाई, पण मी अभ्यासातच मेहेनत घेऊन पैकीच्या पैकी मार्क मिळवायचा प्रयत्न करेन.”
शिक्षिकेनं उगीचच त्याच्या या बाणेदार उत्तरालाही उद्धटपणा समजून उभा दावा साधला. आता तर त्या त्याचा भर वर्गात पाणाउतारा करायची संधीच शोधायला लागल्या. त्यांचा छद्मीपणा त्यांच्या शिक्षिकेच्या भूमिकेला न शोभणारा होता… पण बोलणार कोण?
पण त्यांच्या मुलीनं सदानंदाला धीर दिला, समजावलं… “आता ‘आयआयटी’शिवाय दुसर्या कशाकडेही लक्ष द्यायचं नाही. तुझी योग्यता खूप मोठी आहे. माझी आई असली, तरी मला तिचं वागणं कळतंय. ते तू मनावर घेऊ नकोस.”
तिच्या बोलण्यानं तो सुखावला… पण एकूण ते त्याचे दिवसच खडतर होते.
नेमका तेव्हाच मोठ्या भावाला अपघात झाला. त्या धक्क्यानन आई आजारी झाली. तिलाही ॲडमिट करावं लागलं.
भाऊ एका हॉस्पिटलमधे,आई दुसर्या हॉस्पिटलमधे… धावपळ करायला आणि काळजी घ्यायला घरात फक्त हे दोन भाऊ. कारण वडील आईजवळून हटत नव्हते. घर सांभाळायचं, शाळा सांभाळायची, आणि पुन्हा दोन पेशंट्सचं औषधपाणी बघायचं… स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होताच कुठं!
तर त्या धावपळीत एकदा त्याला शाळेचा गणवेश घालून शाळेत येता आलं नाही… आणि त्या शिक्षिकेला त्याचा पाणउतारा करायची नामी संधी मिळाली.
तिनं स्प्ष्ट सांगितलं, “गणवेश नसेल, तर वर्गात बसायची गरज नाही… चला उठा!”
तो ही तरूण होता. जे झालं त्यात त्याची चूक नव्हती, नाईलाज होता. या बाई समजून घेणार नाहीत, याची त्याला खात्री होती. आपल्या पाठीशी कुणी उभं राहणार नाही, आपल्या बाजूने कुणी बोलणार नाही, याचीही त्याला जाणीव होती… कारण शाळेतच काय इतर ठिकाणी सुद्धा लांब राहून गंमत बघणार्यांची संख्या जास्त असते.
म्हणूनच स्वत:ची आणखी शोभा करून घेण्यापेक्षा निघालेलं बरं, म्हणत तो दप्तर घेऊन निघाला तेव्हाच वर्गात एक कोवळा आवाज कमालीच्या करारी स्वरात गरजला…
“थांब सदानंद ! वर्गाबाहेर जायची काही गरज नाही.”
त्याच्यासकट सगळा वर्ग त्या मुलीकडे अवाक होऊन पाहत राहिला. ती त्या शिक्षिकेचीच मुलगी होती. हेमांगी उपाध्ये.
तिनं आपल्या बाईंसमोर म्हणजे स्वत:च्या आईसमोर शाळेची दैनंदिनी धरत विचारलं, “यात शाळेच्या दोन्ही अधिवेशनांचे सर्व नियम दिले आहेत… पण कुठेच गणवेशाशिवाय आल्यास वर्गात बसायचं नाही, असा नियम नाही! उलट विद्यार्थ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गणवेशाशिवाय येण्याची मुभा यात नमूद केली आहे.”
घरच्या विपरीत परिस्थितीमुळे आपला वाढदिवस आहे हे ही त्या पोराच्या लक्षात नव्हतं. पण ती मुलगी त्याचा वाढदिवस लक्षात ठेऊन दिवस मोजत होती.
सगळ्या वर्गात एकच कल्लोळ माजला आणि त्या शिक्षिकेला न जुमानता सगळी मुलं सदानंदाच्या भोवती जमली. कळल्यावरही त्याला शुभेच्छा देण्याची तयारी त्या शिक्षिकेनी दाखवली नाही.
हेमांगी खंबीरपणे आपल्या आई समोर उभी राहिली. बाईंनी उपहासानं विचारलं, “ओह ! म्हणजे ‘आज डब्यात गोडाचा शीरा हवा… गोडाचा शिरा हवाच’ हा तुझा हट्ट याच्यासाठी होता तर!”
ती म्हणाली, “हो ! पण आता यातला एकही घास मी त्याला देणार नाही.”
बाई फणकार्यानं निघून गेल्या.
मधली वर्षही निघून गेली, सदानंद ‘आयआयटी’मधून उत्तम गुणांनी पास झाला. त्यानं ‘पीएचडी’ही पूर्ण केली. भारत सरकारनंही त्याच्या विद्वत्तेची कदर केली. त्याच्या संशोधनाला मान्यता देत अधिकार दिले.
पण अजूनही त्याच्या वाढदिवसाला जगभरातून शुभेच्छा आल्या, तरी त्याच्या घरी त्याची बायको त्याचा आवडता गोडाचा शिराच करते.
म्हणजे त्याची बायको कोण ???
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा