श्री सिद्धिविनायक मंदीरातल्या वाघरे साहेबांचा त्या वेळी रात्री पावणे अकराला मला फोन आला. तीस वर्षंपूर्वी रात्रीचे अकरा पावणे अकरा म्हणजे तसा अंमळ उशीरच !
फोन कशासाठी आला होता?
काळजीपोटीच आला होता.
काळजी कसली? तर मी आणि उमा लग्न करणार होतो. त्यानी आत्मियतेनं दोघांची पत्रिका बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं, आमची पत्रिका अजिबातच जुळत नाही, उलट एकमेकाला मारकच आहे !
माझा ज्योतिषशास्त्रावर मनापासून विश्वास...मनापासून श्रद्धा. वाघरे पण आत्मियतेनं पत्रिका बघणारे. ते सांगतायत, ‘लग्न करू नका…!’
क्षणभर दोघांचा विचार करून मन विचलीत झालं. मग जसं आपण सेकंड ओपिनियन घेतो, तसं एक-दोघांकडे जाणं झालं. त्यांचंही हेच मत होतं की, लग्न करू नये !
‘लग्न करीन तर हिच्याशीच’, असा माझा काही पण नव्हता. असला पण बीण करण्याचं माझं वयही नव्हतं. बत्तीस वर्ष पूर्ण होती आणि सारासार विचार करण्याची बुद्धी शाबूत होती.
उमालाही चांगली स्थळं सांगून येत होती. एक दोघानी प्रपोझही केलं होतं... पण जितकं कळत गेलं, पत्रिका जमत नाही... तितकी उमा ठाम होत गेली. अगदी बत्तीस गुण जमलेल्यांची लग्न मोडतात, मग आपल्याकडे तर आमची पत्रिकाच जमत नव्हती, हे कारण असेल... असं ती मजेत म्हणायची.
आश्चर्य म्हणजे तिच्या घरच्यांनीही काही आक्षेप घेतला नाही. “आमचा पत्रिकेपेक्षा तुम्हा दोघांवर विश्वास आहे,” असं एकदा आई म्हणाली बस इतकीच चर्चा.
आमच्याकडे काय कसली अपेक्षाच नव्हती, त्यामुळं आक्षेप घेण्याचाही प्रश्न नव्हता... मग तरी मी लग्नाला कसा उभा राहिलो त्यामागे एक प्रसंग आहे, तो मी जशाच्या तसा तुम्हाला सांगतो…
माझी एक फार जुनी मैत्रीण आहे– मनोरमा भोंसुले. मी जितका लग्नाबाबत उदासीन तितकी तिला लग्न करायची
हौस ! कुठलाही विषय ‘लग्न’ या विषयाकडे वळवण्याचं कसब तिला त्याकाळात अवगत झालं होतं. दर आठवड्याला बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम नेटानं पार पडत होते. पण कुठं जमत नव्हतं. अशात शेवडे गुरुजींच नाव तिला कुणीतरी संगितलं. ते जोगेश्वरीला मजासवाडीत एका जुन्या चाळीत राहयचे. गजानन महाराजांचे निस्सीम भक्त. आदल्या दिवशी फोन केला की दुसर्या दिवशीची वेळ ते द्यायचे. मन्यानं फोन केल्यावर त्यानी दुसर्या दिवशी साडेतीनला आम्हाला बोलावलं. अट एकच. ‘येताना काळे कपडे घालायचे नाहीत आणि दिलेली वेळ चुकवायची नाही.’
तिच्या आईची इच्छा होती, मी मनोरमासोबत जावं. सगळं नीट ऐकावं आणि घरी येऊन सांगावं. त्यानुसार मी गेलो. अगदीच बकाल वस्ती. पण पत्ता शोधत आम्हे साडेतीन म्हणजे साडेतीनला त्यांच्या समोर हजर झालो. तसे किरकोळ गृहस्थ. सांगण्यासारखं वैशिष्ट्य काही नाही. गंभीर आवाजात म्हणाले,
“प्रश्न कुणाचा आहे…?”
मी म्हणालो, “हिचा…”
मग ते म्हणाले, “तुम्ही मागं बसा. त्यांना इथे बसू दे…” असं म्हणत बोट दाखवत त्यानी मला पार भिंतीपाशी बसवलं.
पंधरा मिनिटं एकाग्रतेनं मनोरमाची पत्रिका बघत त्यानी पत्रिका बंद केली. पत्रिका मन्याच्या हातात देत म्हणाले, “तुझ्या लग्नाला वेळ आहे... पण या मुलाचं लग्न आत्ता जमेल!”
मी चरकलोच. माझ्याकडे धड बघितलंही नाही, हात नाही, पत्रिका नाही. तरी हा म्हातारा इतक्या खात्रीनं हे कसं बोलतोय? मला खरच राग आला आणि रागापोटी हसूही आलं.
मी ठामपणे म्हणालो, “मला लग्नच करायचं नाही…!”
ते म्हणाले, “हे ठरवणारा तू कोण आलास? निर्णय आधीच झालाय. वाग्दत्त वधू डोळ्यासमोर आहे !”
नियतीच्या निर्णयापुढं माझा निर्णय लटका ठरला आणि अतिशय विपरीत परिस्थिती असताना पुढच्या दोन महिन्यातच नीना चिटणीस मला भेटली. तसे एकदा आधी आम्ही भेटलो होतो. पण यावेळी मी माझा खूप आवडलं, हे सांगायला ती भेटली आणि झुळूझुळू वारा वाहत रहावा, तशा घटना घडल्या. माझ्या घरच्यांचा विश्वासच बसत नव्हता. दहावी पास मुलाचं एका झटक्यात लग्न जमलं? तेही सुस्वरूप पदवीधर मुलीसोबत? आणि दोन अडीच महिन्यात खरंच आमचं लग्नही पार पडलं. आमच्या लग्नात माझ्या घरच्यांचे फोटो पाहिलेत तर एकजात सगळे भेदरलेले, घाबरलेले. फक्त आम्ही दोघंच खूष !
मन्याचं त्यानंतर साडेपाच वर्षानी लग्न झालं. अगदी छान जोडीदार मिळाला. आम्हालाच हायसं वाटलं. लग्नानंतर आम्ही जेव्हा गोखल्यांपासून वेगळे झालो तेव्हा उमाला मी आवर्जून शेवडे गुरूजींकडे घेऊन गेलो. दोघे पाया पडलो, तेव्हा त्यांचं मौन व्रत चालू होतं. त्यानी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला. सुनेकरवी उमाची ओटी भरवली आणि जवळच्या पडशीतलं एक बेलाचं पान उमाच्या पदरात टाकलं.
त्यांच्या सुनबाई म्हणाल्या, “हे जपून ठेवा…”
उमानं ते अजूनपर्यंत श्रद्धेनं जपून ठेवलंय. शेवडे गुरुजी मात्र वयाची शहाण्णव वर्ष पूर्ण करून निवर्तले.
मला वाटतं पत्रिका जमण्यापेक्षा सूर जुळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याची कृपाच हवी. पत्रिका जमत नसल्यानं आमचं कधी एकमत होत नाही, इतकंच!
सांगायचं म्हणजे, आमचं एकमत होत नाही यावर एकमत होण्याला आता इतकी वर्षं झाली!
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा