‘पोरींनो, सवडीला दीनानाथला ऍडमिट केलंय काल दुपारी. छातीत दुखत होतं म्हणे तिला.’
शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अप्पीचा मेसेज. अप्पी सवडीच्या शेजारच्या अपार्टमेंटमधे रहात असल्यानं तिला ही बातमी कळलेली. आम्ही सगळ्या नर्व्हस झालो. सगळ्याजणींनी पन्नाशी पार केलेली. साठी दृष्टीपथात आलेली. कुणाच्या रक्तात साखरेचा शिरकाव झालेला, कुणाचं रक्त विनाकारण उसळू लागलेलं, कुणाच्या डोळ्यांनी मोत्यालंकार धारण केलेले, कुणाच्या वेड्यावाकड्या दंतोजीपंतांच्या जागी आता ‘कवळी’ नामक कुंदकळ्यांची माळ विराजत असलेली, कुणी जुन्या गुडघ्याला टाटा बायबाय करून नवीन गुडघोजींची स्थापना केलेली. पण अजूनपर्यंत सगळ्यांची हृदयं तरूण आहेत, असा गोड गैरसमज होता. त्यामुळं ग्रुपचं नाव ‘यंग हार्ट्स’ ठेवलेलं. अन् म्हणूनच आजच्या या सवडीच्या बातमीनं सगळ्यांची काळीजं धडधडू लागलेली.
‘सवडीला हृदयाचा त्रास होऊच कसा शकतो?’
‘…हृदयविकार हा ताणतणावामुळं होतो…’ असा आपला आमचा समज.
आणि सवडीचा ताणतणावातल्या ‘त’ शी दूरान्वयानंही संबंध नसलेला.
सवडी… म्हणजे ‘कु. सविता’.
आमच्या बरोबरच तिनं इयत्ता पाचवीत कन्याशाळेत प्रवेश केलेला. सावळा रंग, कुरळे केस, जाडसर बांधा, चंद्रासारखा गोल गरगरीत चेहरा, तंद्री लागली की अचानक जोडीदाराशी फारकत घेऊन वेगळ्याच मार्गानं जाणारा उजवा डोळा आणि २४ × ७ चेहर्याला धरून राहणारं दिलखुलास हास्य. मुद्दामहून तिच्याशी मैत्री करावी असं तिच्यात काहीच नव्हतं. पण ती मात्र सगळ्यांशी जवळीक करायची. नाव सविता असलं तरी आम्ही सगळ्या तिला ‘सवडी’च म्हणायचो.
‘हसणं’ हा तिचा ट्रेडमार्क. कुणी तिच्याशी भांडलं, तिचा अपमान केला, शिक्षक तिला रागावले. तरी ती हसायचीच. परीक्षेनंतर पेपर वाटपाच्या वेळी, ‘सविताऽऽ… शंभरपैकी सात मार्क…’ असं म्हणत जोशी सर तिच्या हातात पेपर द्यायचे. तेव्हाही ती तो घेऊन हसत हसत बाकावर जाऊन बसायची. फक्त यावेळी दातांनी ओठ चावलेला असायचा.
परीक्षेच्या वेळी आम्ही सगळ्या पोरी पोतंभर टेन्शनमध्ये पुस्तकं वाचत असायचो. ही मात्रं निवांत बसलेली… मैदानातल्या कबुतरांकडं पहात.
“सवडे, अगं तुला परीक्षेचं टेन्शन येत नाही का गं?” मी तिला विचारायचे.
“टेन्शन घ्यायचं नाही बघ कशाचच, एन्जॉय करायचं !” ती खळखळून हसायची.
शाळेचा पहिला दिवस. पाचवीचा आमचा वर्ग. मुख्याध्यापक सर तासावर आलेले. त्यांच्या शिस्तीच्या, कडकपणाच्या कथा थोरल्या बहिणींकडून ऐकलेल्या. आम्ही सगळ्या पोरी टरकलेल्या…
ओळखीचा कार्यक्रम सुरू झाला…
“वर्षा विष्णु काळे…”
“वैशाली अरूण फाटक…”
“संगीता सखाराम कुलकर्णी…”
“मंजुषा सुरेश महाजन…”
“सुनिता विश्वंभर पाटील…”
सुनितानं स्वत:चं नाव सांगितलं. सरांच्या मनात काय आलं माहीत नाही…
“विश्वंभर हे नाव कुणाचं आहे, कोण सांगेल?”
सगळा वर्ग चिडिचूप.
“सर, मी सांगते…” सवडीचा हात वर.
“सांगा…” सरांचा करडा स्वर.
“सर… विश्वंभर नाव आमच्या मावशीच्या चुलतदिराच्या पोराचं आहे !”
“अहो… कुणाचंं म्हणजे कुठल्या देवाचं…? विष्णुचं नाव आहे हे!” सर डोक्याला हात लावत म्हणाले, तशी सवडी खदाखदा हसली नि तिच्या पाठोपाठ सारा वर्ग.
एके दिवशी वर्गात सरस्वतीपूजन करायचं अचानक ठरलं. तयारी काहीच नव्हती. बाजार शाळेच्याच बाहेर.
“सविता, हे पाच रुपये घे. फुलं आणि नारळ चांगला सोलून, शेंड्या काढून आण.” बाईंनी सांगितलं.
पैसे घेऊन सवडी हसत हसत पळत गेली. दहा मिनिटात हजर… हातात पिशवी.
पूजा झाली, फुलं वाहिली… बाई पिशवीतून नारळ काढू लागल्या. हातात नारळाच्या फक्त शेंड्याच आल्या. नारळ नव्हताच.
“सविता, नारळ कुठाय?”
“बाई, तुम्ही ‘नारळ सोलून शेंड्या काढून आण’ म्हणून सांगितलंत. मी शेंड्या काढून आणल्या. सोललेला नारळ तिथंच ठेवला.” सवडी तोंडावर हात धरून हसू लागली. बाईंनी कपाळावर हात मारून घेतला.
सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा…
सवडी काय म्हणून या परीक्षेला बसली, हे तिला नि देवालाच ठाऊक. परीक्षा केंद्रात नखशिखांत नटलेली सवडी तासभर आधी हजर होती.
“अगं, एवढी नटून का आलीहेस परीक्षेला?” बाईंचा प्रश्न..
“काही नाही… मज्जा, एन्जॉय करायची परीक्षा पण !” सवडीचं तत्त्वज्ञान ऐकून आमचे पालकही अवाक् !
गणिताचा पेपर... सवडी वीस मिनिटांत परीक्षा खोलीबाहेर.
शिक्षक, पालक झाडाखाली बसलेले.
“एवढ्या लवकर आलीस?”
“पेपर एकदम सोप्पा होता. सगळा सोडवून झाला. मग बसून काय करायचं?”
पेपर संपला. आम्ही सगळे रडत बाहेर. पेपर भयंकर अवघड. पाच-सात प्रश्न राहिलेले.
“ए, टेन्शन घ्यायचं नाही… एन्जॉय करायचं !” सवडीचा हसत हसत सल्ला.
दोन महिन्यांची रिझल्ट आला.
सवडीला तिन्ही विषयात प्रत्येकी पाच मार्क; शंभरपैकी. तरी स्वारी जाम खूश !
“मला बघा, कसे एकसारखे मार्क मिळाले तिन्ही विषयात. अवघड असतंय असं !” म्हणत सातमजली हास्य.
अन् आम्हाला स्कॉलरशिप मिळूनही नंबर जरा मागं गेला म्हणून आम्ही नाराज. तोंडं पाडून…!!
‘चंद्रावर वातावरण कसं असतं?’ हे नववीच्या भुगोलाच्या परीक्षेतल्या प्रश्नाचं उत्तर सवडीनं–
‘चंद्रावर पाणी कमी असल्यानं काटेरी झुडपं असतात. ससे मोठ्या संख्येनं असतात.’ वगैरे लिहून
आणि शास्त्राच्या पेपरात.
‘अन्न एनसमधून आत घेऊन इसोफॅगसमधून न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं.’ अशी एनस व इसोफॅगसच्या कामांची अदलाबदल केलेली भन्नाट उत्तरं लिहून सार्या वर्गाला तासभर हसवलं होतं नि बरोबरीनं स्वत: हसली होती.
दहावीची परीक्षा झाली. सुट्टीतच सवडीचं लग्न झाल्याचं कळलं. शिक्षण, लग्न, मुलंबाळं, करीअर यात तीस वर्षं कशी गेली ते कळलंच नाही. ना कुणाची भेट ना कुणाची खबरबात. एके दिवशी ‘व्हॉट्सॲप’ नामक जादुगारानं आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. त्यात सवडीही होती. झूमवर एके दिवशी सगळ्या भेटलो. सवडीचा संसार बराच पुढे गेला होता. तिचा नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. खूप पैसा मिळवला होता त्यानं. पुण्यात मोठ्ठं नि अलिशान घर होतं. तिनं नवर्याचा फोटो दाखवला. स्मार्ट नि हुशार दिसत होता.
“तुझ्यात काय पाहिलं गं त्यानं?” स्पष्टवक्त्या गीतानं विचारलं.
“अगं माझ्या हसण्यावर भाळला तो.” तिचं हसत हसत उत्तर.
आता विषय मुलांवर आला.
“माझा थोरला मुलगा आय.टी.आय. झालाय. अमेरिकेत असतो. नि मुलगी सी.ए. झाली. मुंबईत नोकरी करतेय. वीस लाखाचं पॅकेज आहे.” इति सवडी.
‘आय.टी.आय करून अमेरिकेत…?’ या विचारात असतानाच तिच्या शेजारी राहणारी अप्पी म्हणाली,
“ए बावळट ,तुझ्या तेजसनं ‘आय.टी.आय.’ नाही, ‘आय.आय.टी.’ केलंय… पवईहून…!”
“अगं ‘आय.आय.टी.’ काय अन् ‘आय.टी.आय.’ काय... चांगलं शिकला, चांगला पगार आहे, मस्त एन्जॉय करतोय. झालं तर मग !” सात मजली हास्य.
“तुझी दोन्ही पोरं एवढी शिकली, एवढी हुशार निघाली. खूप कष्ट घेतले असशील नं तू त्यांच्यासाठी? काय काय केलंस?” आमचा प्रामाणिक प्रश्न.
“मी काही केलं नाही; हेच मोठं काम केलं. कधी त्यांच्या मागं लागले नाही अभ्यासासाठी. त्यांना पाहिजे ते करू दिलं. त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती. ‘टेन्शन घ्यायचं नाही. निवांत रहायचं नि एन्जॉय करायचं.’ नवर्यावर गेलीत गं पोरं माझी... हुशार, अभ्यासू आहेत त्याच्यासारखी !”
दाखवलं नाही तरी आम्हाला तिचा हेवा वाटलाच. आम्हा सार्या तथाकथित हुशार मुलींपेक्षा तिचा संसार जास्त यशस्वी होता…!!
एके दिवशी तिचे यजमान वारल्याची दु:खद बातमी आली. जेमतेम अठ्ठावन्न वय !
“हुशार, कर्तृत्त्ववान माणूस… पण स्वभाव फार गंभीर. नुसता काम करत राहिला आमच्यासाठी… आयुष्य एन्जॉय केलं नाही अजिबात. म्हणून इतक्या लवकर गेला !” आता मात्रं तिचे डोळे वहायचे थांबता थांबत नव्हते. सहा महिन्यात बिचारी सावरली. ट्रिप्सना जायचा सपाटा लावला. नाटक, सिनेमा, गेट टुगेदर्स. काही म्हणून सोडेना. बरोबरच होतं. एकटी कसे दिवस रेटणार होती?
“आता उरलेलं आयुष्य एकटीनं का होईना; पण एन्जॉय करणार!” तिचं स्पष्टीकरण.
अन् आज ही बातमी आली. तिला हॉस्पिटलमधे हार्टच्या त्रासासाठी ॲडमिट केलेलं. वाईट वाटत होतं. दुसरे दिवशी तिला हॉस्पिटलमधे भेटायला जायचं ठरलं. सगळ्यांनी मिळून. रात्री बाराला व्हॉट्सएप मेसेजच्या नोटिफिकेशनची बेल वाजली.
एवढ्या रात्री ग्रुपवर मेसेज…?
घाबरत ग्रुप उघडला…
सवडीचा मेसेज होता…
‘एन्जॉयग्राफी (enjoygraffy) झाली.
काही निघालं नाही. सगळं नॉर्मल.
उद्या घरी सोडतील.
घरीच या सगळ्याजणी…
मस्त एन्यॉय करू…’
जिनं सगळं आयुष्य ‘एन्जॉय’ या अजेंड्यावर निभावलं, तिनं ‘ॲंजिओग्राफी’चं ‘एन्जॉयग्राफी’ केलं, तर काय नवल?
तिच्या त्या ‘एन्जॉयग्राफी’ला हसत नि एन्जॉय करत केव्हा झोप लागली, ते कळलच नाही…!!
- नीला महाबळ गोडबोले, सोलापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा