मालती ताईंचा सगळ्यात लहान मुलगाही परदेशात निघाला होता. त्यांच्या हातात औक्षणाचे ताट होते आणि डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात विरहाचे. मालती ताई आणि वसंतराव उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपे; सुसंस्कृत आणि सुशिक्षित. ह्यांना तीन गुणी मुले, सगळ्यात मोठी मुलगी संपदा अत्यंत हुशार, ऍक्टिव्ह, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत पारंगत. त्याच जोरावर उत्तमोत्तम संधी चालून आल्या आणि परदेशी जाण्याचा चान्स मिळाला. सर्वार्थात साजेसा आयुष्याचा जोडीदारही मिळाला आणि मुलगी आता खऱ्या अर्थाने सेटल झाली असे बघून आई- वडीलही सुखावले. दोन तीन वर्षात मधला मुलगा सुमीतही ताईच्या पावलावर पाऊल ठेवून परदेशी निघून गेला.
शेंडेफळ श्रेयस ही खूप हुशार, अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला आणि सगळ्यां मध्ये सर्वात जास्त महत्वाकांक्षी असल्याने यश त्याच्या पासून कधीही दूर नव्हते. आणि अखेर तो दिवस उगवला ज्या दिवसासाठी त्याने अथक परिश्रम केले होते. एका अत्यंत नामांकित Research Institute मध्ये Scientist म्हणून अत्यंत कमी वयात त्याची नेमणूक झाली होती आणि हे पद वेगवेगळ्या देशांमधील हजारो कॅन्डिडेट्स मधून सर्वप्रथम स्थान पटकावून त्याने मिळवल होतं. तिन्ही मुलांनी आई-वडिलांचे नाव खूप खूप मोठे केले होते. आज त्या दोघांच्या प्रयत्नांचे, कष्टांचे व स्वप्नांचे सार्थक झाले होते. अत्यंत आनंद व अभिमानाने त्यांचं मन भरून आलं होतं. आकाश त्यांना ठेंगणं झाल्यासारख वाटत होतं . पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाल्यासारखेही वाटत होते. एक कधीही न संपणारी प्रचंड पोकळी.
मालती ताईंच्या घशाला कोरड पडत होती. हात-पाय थरथरत होते. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. वसंतरावांना आपल्या पत्नीची अवस्था समजत होती पण तरीही ते तिला काहीच धीर देवू शकत नव्हते. कारण काहीशी तशीच अवस्था त्यांचीही झाली होती. दिवसांमागुन दिवस जात होते. तिघही मुले आता उत्तम प्रकारे स्थिर-स्थावर झाली होती. त्यांची प्रगती उत्तरोत्तर वाढत होती. तसेच काम आणि जबाबदारीही वाढत होती. इकडे मालती ताई आणि वसंतराव अगदी निराश आणि एकाकी जीवन जगत होते. बाहेरच्या जगाशी तर जणू त्यांनी संबंधच तोडून टाकले होते. नातेवाईंकांशी पण अगदी औपचारिक संबंध ठेवले होते. रात्र रात्र झोप नाही, कुठे जाणे येणे नाही सण समारंभ नाही, आवडी निवडी व छंद नाही ह्या सगळ्यांमुळे ते दोघे हसणं-बोलणंही जणू विसरून गेले होते आणि ह्याचा परिणाम म्हणजे ते आणखी जास्त निराशेच्या गर्तेत ओढले जात होते, नकारात्मक बनत चालले होते .
एक दिवस मालती ताईंना काही केल्या झोप येईना. टीव्ही बघूनही किती बघणार. वाचून वाचून काय वाचणार, अचानक त्यांना त्यांचे जुने फॅमिली अल्बम्स बघावेसे वाटले. त्यांनी एक एक फोटो बघण्यास सुरुवात केली त्यात त्यांच्या साखरपुड्यापासून तर मुलांच्या बारश्याचे, मुंजी व वाढदिवसाचे ही फोटो जपून ठेवले होते. फोटो बघता बघता मालती ताईंच्या मनात एक अनामिक उत्साह भरून आला. त्यांना वाटले का आपण आपल्याला एकटे म्हणवून घेतो, मुलंतर पक्ष्यांसारखे, पंखात बळ आल्यावर उडणारच, उंच भरारी मारणारचं आणि हेच तर आपलं ध्येय होत. मुलं दूर गेले तरी आपण दोघे तर आहोतच ना एकमेकांसाठी "मेड फॉर इच अदर"
या आधीच संपूर्ण जीवन आव्हानं पेलण्यातच गेलं. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच संपदा आली. त्यानंतर दोन्ही मुले , त्यांचं लहानपण दुखणे, बहाणे, पै पाहुणे व इतर जबाबदाऱ्या ह्या सगळ्यात आयुष्य जणू वाहूनच गेलं. पती पत्नी म्हणून बरोबर राहिलो पण खर, खूर जगण तर राहूनच गेल आणि आता आपल्याला अनायसे संधी चालून आली तर आपण ती व्यर्थ गमवायला निघालो होतो ह्याचा त्यांना पश्चाताप झाला. मुलांनी स्वत:च्या कष्टाने व् हुशारीने आपल्याला खुप मान सन्मान मिळवून दिला. आज ते सुखी आहेत पण आपल सुख हे आपणच मिळवू शकतो हे त्यांना समजले आणि आयुष्याच्या ह्या सर्वात नाज़ुक वळणावर पुन्हा एकदा एकमेकांच्या साथीने सुन्दर जीवन जगण्याचा त्यांनी निश्चय केला .
आता सकाळ कधी होते आणि आपल्या ह्यांचीशी कधी आणि किती बोलते असे त्यांना झाले होते. ह्या तासाभरात त्यांना अल्लड नववधू झाल्याचा भास होत होता. आणि आपल्या पुढील जीवनाची सुंदर स्वप्ने रंगवीत त्या सकाळची वाट बघत होत्या. प्रेमाचा, आनंदाचा आणि यशाचा उत्सव आपल्या जोडीदारासोबत आयुष्यभर साजरा करण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या .
रुपाली पुराणिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा