गुरुचरित्रातील एक अत्यंत अर्थगर्भ ओवी माघ महिन्यातील महाशिवरात्रीचे महत्त्व अल्प शब्दांत पण आध्यात्मिक सूक्ष्मतेने उलगडून दाखवते.
असितपक्ष माघामासी । शिवरात्रि चतुर्दशीं ।
बिल्वपत्र वाहिल्यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥
माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर केवळ एक बिल्वपत्र अर्पण करून केलेली भक्ती खूपच दुर्मिळ आणि पुण्यदायी मानली जाते, असे गुरुचरित्र अत्यंत ठामपणे सांगते. शिवभक्तीसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री, मोठे विधी किंवा दीर्घ तपश्चर्या नव्हे, तर शुद्ध भावाने अर्पण केलेले एक साधे बिल्वपत्रसुद्धा अनंत फल देऊ शकते, ही या ओवीतील मूलभूत शिकवण आहे.
पण लगेच पुढील ओवीत गुरुचरित्र मानवी स्वभावावर नेमके आणि तीक्ष्ण बोट ठेवते
ऐसे अनुपम्य स्थान असतां । नवजाती मूर्ख ऐकतां ।
शिवतिर्थी असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥
इतकी श्रेष्ठ, अनुपम आणि दुर्लभ संधी समोर असतानाही अज्ञानाने ग्रासलेले लोक तिचे महत्त्व समजून घेत नाहीत. उदासीनतेमुळे ते या अमूल्य क्षणाकडे पाठ फिरवतात. या दोन ओव्यांतूनच गुरुचरित्राचा गाभा स्पष्ट होतो. ईश्वरकृपा सहज उपलब्ध आहे, पण ती ओळखण्याची दृष्टी माणसाकडे नसते.
हे तत्त्व केवळ तात्त्विक उपदेशापुरते मर्यादित राहत नाही, तर गुरुचरित्रात एका हृदयद्रावक कथेद्वारे ते खोलवर मनावर कोरले जाते. एक स्त्री चांडाळ जातीत जन्मास आली होती. जन्मापासूनच अंध असलेली ती दु:ख, उपेक्षा आणि दारिद्र्य यांची जणू चालती-बोलती प्रतिमा होती. आई-वडिलांनी काही काळ कसाबसा आधार दिला; पण आजारपण, गरिबी आणि परिस्थितीच्या ओघात तो आधारही तुटला. शिळे-उष्टे अन्न, पुढे महारोग, आणि अखेरीस नातलगांची पूर्ण उपेक्षा-अन्न नाही, वस्त्र नाही, सन्मान नाही अशा अवस्थेत तिचे आयुष्य भीक मागत सरकत राहिले. म्हातारपण आले, रोग वाढले, दु:खे असह्य झाली; मृत्यू यावा अशी तीव्र इच्छा झाली, पण तोही जणू तिला चुकवत होता. जन्मोजन्मी पुण्यकर्म नसल्यामुळे जिवंतपणीच अनंत यातना तिच्या वाट्याला आल्या होत्या.
अशाच अवस्थेत माघ महिना उजाडला. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गोकर्णक्षेत्री महाबळेश्वराच्या दर्शनासाठी गावोगावचे असंख्य स्त्री-पुरुष शिवनामाचा घोष करत, नाचत-गात, भक्तीभावाने निघाले होते. ही चांडाळीणही इतर भिकाऱ्यांसोबत रडत-ओरडत, “धर्म करा” म्हणत हात पुढे करत चालली होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, अंगावर वस्त्र नव्हते, संपूर्ण शरीर दुर्गंधीने भरलेले होते; कुणालाही तिची दया आली नाही. त्या दिवशी तिला काहीच मिळाले नाही, त्यामुळे कडकडीत उपवास आपोआपच झाला. रात्रभर शिवनामघोष कानावर पडत राहिला; जागरणही नकळतच घडले. एका भाविकाने भीक्षा म्हणून तिच्या हातात एक बिल्वपत्र ठेवले. ते खाण्यायोग्य नाही हे लक्षात येताच तिने रागाने ते फेकले; वाऱ्याने उडत ते नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. एवढ्याशा घटनेने व अनाहूत उपवास, अजाणते जागरण, शिवनामश्रवण आणि नकळत झालेले बिल्वपत्रपूजन यामुळे तिची शतजन्मांची पातके भस्म झाली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले.
ही कथा केवळ करुणेची नाही, तर महाशिवरात्रीच्या गूढ आणि सूक्ष्म अर्थाची ओळख करून देणारी आहे. गुरुचरित्र स्पष्ट करते की, शिवकृपा बाह्य कर्मकांडावर अवलंबून नसते; ती भाव, श्रद्धा आणि अंतःकरणातील शुद्धता पाहते. भक्ती जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी घडलेली, जर ती शिवतत्त्वाशी जोडली गेली, तर ती जन्मोजन्मांचे बंधन तोडण्याची ताकद ठेवते. म्हणूनच माघ महिन्यातील महाशिवरात्रीचे एक साधे बिल्वपत्रसुद्धा त्रिभुवनात दुर्लभ फळ देणारे ठरते.
हीच गोष्ट गौतम ऋषींनी ब्राह्मण व सतीच्या शापात अडकलेल्या मित्रसह राजाला समजावून सांगितली. या कथेनंतर त्यांनी राजाला स्पष्ट सल्ला दिला महाशिवरात्रीला उपवास कर, बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केल्यास तू सर्व पापांतून मुक्त होशील आणि शिवलोक प्राप्त करशील. येथे गुरुचरित्र केवळ धार्मिक विधान करत नाही, तर एक खोल आध्यात्मिक सत्य मांडते. शिवपूजा म्हणजे पाप-पुण्याच्या गणितापलीकडे जाऊन अंतःकरणातील अज्ञान, अहंकार आणि अंधार जाळून टाकण्याची प्रक्रिया आहे.
आपल्या भक्तीत अनेक अपूर्णता असू शकतात. विधी अपुरे असतील, ज्ञान मर्यादित असेल; पण भाव शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल आणि शिवनामाशी अंतःकरण जोडले गेले असेल, तर गुरुचरित्राच्या मते महाशिवरात्री निश्चितच जीवनाला नवा अर्थ देऊ शकते. माघ महिन्यातील त्या एका रात्रीत, एका बिल्वपत्रात आणि एका क्षणात दडलेली हीच महाशिवरात्रीची आणि गुरुचरित्राची अमूल्य शिकवण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा