मंगळवार, ३ मार्च, २०२६

2626. रुद्रांश

 सरस्वतीला जाऊन ही आता जवळपास विस वर्ष झाली होती. शंकर आबाला ही भौतिक आसक्तीचा आताशा अक्षरशः विट आला होता. कायम स्वरुपी महादेवाच्या नामस्मरणात दिवसच काय रात्री अपरात्री जरी जाग आली तरी महादेवाचा जितका वेळ मिळेल तेंव्हा कधी कमी आवाजात कधी मनातल्या मनात उदघोष चालू होता. उतार वयामुळे तशि ही शंकर आबाची झोप दिवसेंदिवस कमी झाली होती.तशात मधुमेहाच्या आजाराने शरिराला नको तेव्हढा विळखा घातला होता. वेळोवेळी भूकेची तिव्रता वाढीस लागून ही सकाळीच ब्रम्ह मुहूर्तावर उठून गोदावरीच्या काठी वसलेल्या काळेश्वराला स्वतः घ्या हाताने दुघ अन् जलाभिषेक केल्याविना साधा अन्नाचा कणच काय पाणी ही न पिण्याचा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांपासून शिरस्ता चालूच होता.
सूनबाई म्हणून आलेली गौरी ही धार्मिक प्रवृत्तीची होती. शंकर आबाला गुडघ्याचा त्रास असूनही देवघरात मांडी घालून देवपूजा करायची दररोजची सवय गौरी अन् मुल्गा सदाशीवला अजिबात मान्य नव्हती.पण शंकर आबाच्या दुराग्रही स्वभावामुळे त्या दोघांनी ही हात टेकले होते. त्यात उद्या  २०२६ ची १५ तारखेला आलेली महाशिवरात्र. शंकर आबांनी आवर्जून सांगितल्याप्रमाणे गौरीने  काळेश्वराच्या दुग्ध जलामिषेकासाठी सर्व तयारी करून ठेवली होती.
दुधाचा गडू , तुप , दही , मध ,पाण्याने काठोकाठ भरलेला तांब्याचा मोठा तांब्या बेलपत्र, भस्म, गौकर्णाची फुले अन् प्रसादासाठी खडीसाखर तांब्याच्या मोठ्या ताम्हणात अगोदरच ठेवली होती.
शकंरआबानी रात्रीच गौरीला बजावून सांगितले 
"सूनबाई उद्या माझ्या महदेवाची शिवरात्र, अगोदर मी आपल्या   काळेगावच्या काळेश्वराला रुद्र अभिषेक करेल नंतर घरी येऊन घरातील देवपूजा करेल "
आज शिवरात्रीच्या सकाळच्या ब्रम्ह मुहूर्तावर शंकर आबा शुचिर्भूत झाले .कपाळावर पांढऱ्या भस्माची त्रिपुंडी, हातावर, मनगटावर पांढरेशुभ्र भस्माचे ओढलेले तीन तीन पट्टे लाऊन दररोज पेक्षा जास्त लवकर  निघताना गौरी आबाच्या तेजःपुंज  चेहऱ्याकडे आदरयुक्त कौतुकाने पहातच राहिली. काळेश्वर मंदिराकडे निघालेल्या शंकर आबाला पाहून गौरी मोठ्या काळजीने म्हणाली सुद्धा -
"अहो आबा इतक्या सकाळी सकाळीच मंदिरात कोणी तरी असेल  का  हो ? " 
आबा निघता निघता म्हणाले सुद्धा ---
" बाळा आज महाशिवरात्र,  कधिही  काळेश्वरा कडे ढुंकूनही न पाहणाऱ्या लोकांची नुसती रिघ लागेल अन् तसंही बरंय ना मला काळेश्वराला एकांती भेटता येईल   "
" अहो आबा मंदिराचा तो मला मोठा दरवाजा ढकलण्यासाठी तरी   मला सोबत येऊ द्या , का यांना उठवू तुमच्या सोबत यायला? "
गौरी म्हणाली खरी पण आबा जाता जाता उत्तरादाखल म्हणाले 
"अजिबात नको सूनबाई , तो आहे ना गं मंदिरात माझा काळेश्वर, दरवाजा ढकलण्याचे बळ देण्यासाठी "
गौरी त्यांच्या काळेश्वरा बद्दल असलेल्या नितांत श्रद्धेसमोर निरुत्तर  झाली. काळेश्वराच्या दर्शनाची ओढ असल्याने लगबगीने आबा हेमाडपंथी मंदिरापाशी आले. भले मोठे काहीसे आपल्या सारखेच जिर्ण झालेल्या मंंदिराचे कवाडं आबांनी होता होईल तेवढं  बळ लावल्या नंतर उघडले ‌खरे पण  कवाड ढकलताना येणारा आवाज आबांना  आपल्या शरिरातून उठता बसता येणाऱ्या हाडांची आठवण देऊन गेला. पंचक्रोशीतील सर्वात मोठें शिवलिंग असलेला काळेश्वर समईच्या मंद प्रकाशात आधिक गूढ रम्य तरीही आपलासा वाटतं होता. आबाची शारीरिक उंची त्यांच्या आध्यात्मिक अधिष्ठाना पेक्षा खूपच कमी असल्याने टाचा उंचावून तात्यांनी शिवलिंगावर पाणी भरलेला तांब्याच्या तांब्याने काळेश्वराला  शुद्ध पाण्याने शिद्धोदक सुरू करताना मुखोद्वक असलेल्या 
" ॐ नमो भगवते रुद्राय ---'  
ने पूर्ण रुद्र कमालिच्या आस्थेने प्रारंभ केले.  नंतर दुध,दही , तुप , मधाने  शिवलिंगाचे पंचामृत स्नान केले . पंचामृत स्नानानंतर पुन्हा उरलेल्या शुद्ध जलाने  सिद्धोदक केलें. तदनंतर  सूनबाई गौरीने  दिलेले  बेलपत्र अन् गोकर्ण फुले वाहिल्या नंतर भक्ती भावाने प्रसाद म्हणून दिलेली खडीसाखर समोर ठेवली. खरंतर हा सगळा रुद्राभिषेक करताना शंकर आबाचे हात पिंडी पर्यंत पोहचत नव्हते. शक्य तेव्हढ्या टाचा उंच करून वयाच्या नव्वदीत आलेल्या आबाची पूर्णतः  दमछाक झाली होती. एव्हाना पुर्वेला आलेल्या सुर्य देवाने आपली प्रकाश किरणे मंदिराच्या उंबरठ्यापर्यत पोहचवली होती. मंदिराचे दररोजचे पुजारी  सोबत  मुल्गा सदाशीव , सुनबाई गौरी सह गावातील गावकरी व परगावावरुन आलेली भक्तगण ही दरवाजाच्या बाहेर उभे राहून  पराकोटीच्या श्रद्धेने चाललेली आबाची पूजा आश्चर्य चकित होऊन पहात होती. कुणाला ही त्यांना थांबवण्याचे धाढस झाले नाही कारण आबांची पूजा करण्यातील विलक्षत तन्मयता अन्  निरपेक्ष उत्कटता सर्वांच्या अंगावर दुर्मिळ असे रोमांच उभे करत होते. आबांची यथार्थ भावनेने केलेली पूजा संपल्यानंतर सर्वांनी एकमुखाने केलेल्या 
" लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ,
  विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा "  
या आरतीने सांगता झाली. महत्प्रयासाने इतका वेळ शिवपिंडीला अटोकाट प्रयत्नांती स्पर्श करून उभे असलेले शंकर आबा. भरल्या डोळ्यांनी शिवलिंगाला  निस्सीमतेने 
" बा काळे्श्वरा पुरे कर रे ही भौतिक सुख दुःखाची येरझार,  आता  तरी या मातीचे अमृत होऊ दे "
म्हणता क्षणीच काही कळायच्या आत आबांचा भस्म लावलेला देह  तत्क्षणी एक रुद्रांश झाला होता. गौरी असो वा सदशीव इतकंच कशाला जमलेल्या भक्तगण आबा पर्यंत धावत जाऊन पोहचे पर्यंत  दयाळू काळेश्वराने शंकर आबासाठी मोक्षाचे दार उघडले होते. आलेल्या लोकांनी काळेश्वराच्या शिवलिंगाला घट्ट पकडून असलेल्या आबाच्या मातीदेहाचे अमृत झालेले पाहता क्षणीच निमीषभरात मंदिरातील घंटेचा पवित्र निनाद पुर्ण आसमंतात जोरजोरात घुमायला लागला . ----- सोबतीला
 "ॐ नमः शिवाय " 
चा एकमुखी सातत्याने चाललेला गजर काळेगावच्या वेशीपर्यंत पोहचला. कमालीच्या उमाळ्याने धावत आलेली सुनबाई गौरी शंकरआबाच्या पायावर डोके ठेवून; ओक्साबोक्शी रडायला लागली. त्याचवेळी मंदिरात लावलेल्या फोटोतील काळेश्वर नेहमीसारखाच मंद हसत पहात होता. इकडे मात्र  घरच्या देव्हाऱ्यातील सकाळपासून ताटकळून बसलेले देव शंकर आबाच्या हातून होणाऱ्या पूजेसाठी कमालिचे आसुसलेले होते.

( मुठभर शब्दांची पसाभर कथा  )
सुभाष मधुकरराव तोंडोळकर / छत्रपती संभाजीनगर.
© Subhash tondolkar 15/02/ 2026
फोटो सौजन्य.
Pinterest 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...