वामन भटांनी धोतराचा काचा घट्ट बांधला. गजाननाला मनोभावे नमस्कार केला व सावित्रीला “येतो ग” म्हणून ते पूजा सांगायला बाहेर पडले. कलियुगात गांजलेली माणसं पूजा अर्चा करून देवाकडे यश, वैभव, सुख मागत असतात.. पण त्याच्याकडे काय मागायचं हे देखील आता लोकांना शिकवायला हवंय म्हणत वामन भट बाहेर पडले.
रमण शेटजीच्या “सुवर्णभूमी” या चार मजली बंगल्याची आज वास्तुशांत होती. घरात पूजेसाठी केवढी गर्दी जमली होती. भरजरी साड्या व दागिन्यातील लेकी सुना नटून थटून पुजेला आल्या होत्या.
“मीना भाभींनी वामन भटांना आसन दिलं. “बसा गुरूजी!”
“सीता नाही वाटतं?”गुरूजीनी इकडं तिकडं बघितलं. काळी, सावळी तरतरीत सीता पूजेची तयारी उत्तम करत असे.
“सीता येत नाही कामाला हल्ली.” मीनाभाभीनं जरा तुटकच उत्तर दिलं.
पूजा सुरू असतानाही लोकांची सतत चाललेली कुजबुज, टेक्स्टची देवाणघेवाण ऐकून गुरूजींच्या मनी आले..
निरूपणीं येऊन बैसला। तो विंचूवें फणकाविला। कैचे निरूपण जाला॥
निरूपणाला बसल्यावर काम/व्याप/मोहाचे अनेक विंचू चावू लागले तर माणसाचे पूजेत काय डोंबल लक्ष असणार?
तशीच पूजा आटोपून गुरूजी तीन तासांनी घरी आले..
काही दिवसांनी मीनाभाभींचा गुरुजींना फोन आला.
“गुरूजी, सत्यनारायणाची पूजा करूया म्हणते. एवढी मोठी वास्तुशांत केली पण शेठजींना अजिबात झोप लागत नाही. तब्ब्येत खालावली आहे त्यांची!” भाभींनी एका दमात बोलून टाकले..
“संध्याकाळी दोघांना भेटायला येतो..तेव्हा तारीख ठरवू!” गुरूजींनी फोन बंद केला.
शेटजींना भेटायला ते संध्याकाळी “सुवर्णभूमी”ला गेले. दिवाणखान्यातील श्रीकृष्णाच्या भव्य मुर्तीपुढे नतमस्तक झाले..स्वच्छ पांढरं धोतर व अंगरखा, उन्हामुळे तांबूस झालेला गौरवर्ण आणि तेजस्वी डोळ्यातील सात्विक भाव असलेल्या गुरूजींकडे बघून शेठजींनी हात जोडले..
“या गुरूजी..”
“शेटजी झोपेची काय तक्रार आहे?”गुरूजींनी विषयाला हात घातला..
“गुरुजी, जेमतेम दोन तास झोपतो मी. कामाचे विचार डोक्यात असतात पण पूर्वीही होतेच की. पूर्वी गादीला पाठ लागली की हा घोरू लागला म्हणे मॅा! आता मात्र छताकडे बघत पडून राहतो!”
“शेटजी, फक्त घरापुरती सत्यनारायण पूजा करू. मी पूजा सांगतो ती पूर्णपणे समजून घ्या. प्रत्येक विधी तन मन अर्पून समजून करायचा. स्वत:साठी काही मागायचे नाही. जे मागाल ते सर्वांसाठी! इतर काही गोष्टी करायच्या आहेत त्यापण सांगतो.” गुरूजींनी बरच काही सांगितलं..
पूजेचा दिवस उजाडला. वामन भटांनी मंत्रोच्चार सुरू केले. घराचा अणू रेणू पवित्र होऊ लागला..“शेटजी, नवग्रहांना आवाहन करू. नवग्रह कोणते माहित आहे ना?”
“सोम, मंगळ ते रवि सात झाले! आणि दोन कुठले ग?” त्यांनी भाभींकडे बघितले..भाभींनी कुणास ठाऊक असा हात केला.
“मंगळ ते शनी हे पाच, राहू, केतू व सुर्य, चंद्र असे नऊ ग्रह मानवी जीवनावर प्रभाव टाकतात. त्यांची आराधना करायची आहे! आचमनं का करायची? शरीर, मन व आत्मशुद्धीसाठी. तीनदा पाणी पिण्याने अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाची संतुष्टता प्राप्त होते. गुरूजी प्रत्येक विधीचा अर्थ सांगत पुढे जात होते..कधी नव्हे ते शेटजी व भाभी पूजेत काया वाचा मने गुंतले होते.
ना पाहुणे, ना फोटो, ना पंचपक्वान्नाचं जेवण..साजूक तुपात केलेला बदाम, बेदाणे, केळ्याचे काप व वेलदोड्याच्या गंधाने भक्तिरसात भिजलेला शिरा प्रसाद म्हणून ठेवला..
“शेटजी जगातील सर्व जीवांचं भलं होऊ दे, कल्याण होऊ दे अशी मनापासून प्रार्थना करा..” वामन भटांनी शेटजींकडे रोखून बघितले..
शेटजींनी प्रार्थना केली..पण सर्वांना सुख कसं मिळणार?
त्यांच्या डोळ्यापुढे काही चेहरे झरझर येऊन गेले..
मंगळसूत्र विकत घ्यायला आलेला मुलगा प्रवीण! शेटजी, लग्न झाल्यावर तीन महिन्यात उरलेले पैसे फेडतो म्हणणारा.. आपण नकार दिला..परत परत पैसे मोजत तो रिकाम्या हाताने बाहेर पडला..
डायमंड शो रूम साठी मोक्याची जागा हवी म्हणून वापरलेले साम, दाम, दंड, भेद..
सीते सारख्या देखण्या गुणी, तरूण मुलीची मोठ्याबरोबर मैत्री होतेय हे लक्षात येताच तिची केलेली हकालपट्टी..
शेटजी, आईचं ॲापरेशन आहे..नोकरीची फार जरूर आहे म्हणत गयावया करणारी सीता ..
व्यापारातील कित्येक न कराव्यात अशा गोष्टींना दिलेलं मुत्सद्देगिरी हे नाव..
पत वाढवण्यासाठी केलेला दान धर्म..
धाकट्याच्या गाडीनं धक्का मारल्यानं कंबरडं मोडलेल्या म्हातारीची जिंकलेली केस..
अशा सगळ्या जीवांचं भलं होऊ दे म्हणायचं?
किती लोकांना दुखावले, किती स्वप्नं मातीमोल केली, व त्यावर एक एक शोरूम उभी केली..
पूजा संपत आली.. शेटजींनी गुरुजींना वाकून नमस्कार केला..
गुरूजींनी पाठीवर थोपटून आशीर्वाद दिला..”पूजा आजवर करत होतात शेटजी पण घरात उपासना हवी. आता उपासनेस सुरवात झाली आहे! सर्वांचं भलं करत रहा. कल्याण करत रहा. सच्चाईने व्यापार करा..शुभं भवतु॥”
गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रोज पहाटे जप होऊ लागला. उपासना म्हणजे उप+आसन! देवाजवळ आसन.. मी व तो यातील भिंत विरघळायला हवी. झालेल्या चूका दुरूस्त करायच्या..कामगारांना उत्तम कामासाठी बक्षिसं देण्याची नवी स्किम जाहीर केली. हेल्थ इंन्शुरन्स पॅालिसी सुधारली.. कॅालेज फंड सुरू केला. गाडीचा धक्का बसलेल्या त्या म्हातारीची चौकशी केली. काही रक्कम पाठवली.. दोन्ही मुलं उत्तम काम करत होती..सुनाही सतत काम करत होत्या!
महिनाभर जप, उपासना, चालणं, घरचं अन्न खाऊन मन तजेलदार होऊ लागलं. मॅा नेहमी गायची ते भजन ह्रूदयात आपोआप वाजू लागलं..
कौन कहते है भगवान आते नाही। तुम मीरा के जैसे बुलाते नही॥
महिना झाल्यावर गुरूजी भेटायला आले होते..”गुरूजी, तुम्ही दाखवलेल्या मार्गांवर चालल्याने सध्या चार तास सलग झोपतो आहे..
वामन भट हसले. “शेटजी, तुमचे प्रयत्न आहेतच पण खरी उपासना आहे भाभींची ! सीतेच्या आईचं ॲापरेशन केलं ! सीतेचं लग्न उत्तम वर शोधून लावून दिलं. मुलं व सुनांना शोरूमच्या कामाची जबाबदारी घ्यायला लावली.. आपल्या अवतीभोवती असलेल्या जीवांचं आपण धड नाही केलं तर कोणता ईश्वर तुम्हाला जवळ बोलवेल हे भाभी मला ज्या ठामपणानं सांगत होत्या त्यावरून मी तुम्हाला तुमच्या चुकांचं परिमार्जन करा हे सुचवलं.. भाभींनी हे व्रत घेतलं आहे.. पुण्यसंचयाचं! त्याचं फळ आहे हे.. श्रीकृष्ण पहातो आहे..
शेटजी आश्चर्याने ऐकत राहिले.. मी व तो यातली भिंत केवळ जपाची माळ करून विरघळत नाही. प्रत्येक जीवात देव जाणवू लागला तर कदाचित विरघळेल. सच्चाईमुळे विरघळेल.. याला खरी उपासना म्हणतात.. आजपासून अशी उपासना चालू ठेवल्यास चार काय आठ तास शांत झोप लागेल या विचारात शेटजी गुंतून गेले होते..
मीना भाभींकडे कौतुकाने बघत त्यांनी हात जोडले.. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते..
भाभी प्रसन्न हसल्या..
“कामगारांच्या मुलांसाठी ट्यूशन सेंटर सुरू करायचं आहे..त्या सेंटरचं उद्घाटन तुम्ही कराचयच.. पुढच्या आठवड्यात! गुरूजींची प्रवचनं पण ठेवली आहेत..”
गुरूजी समाधानाने त्यांचा निरोप घेऊन घरी आले. त्यांचा आनंद बघून सावित्रीबाईं जे समजायचं ते समजल्या..
गुरूजीनी अळूची भाजी व भात खाऊन गादीवर डोके टेकताच त्यांना लहान मुलासारखी गाढ झोप लागली हे पाहून सावित्रीबाईंनी कौतुकाने मान वेळावली..
आणि मनाच्या श्लोकांचं वाचन नेहमी प्रमाणे सुरू केलं.
उपासनेला दृढ घालवावे। भूदेव संतांनी सदा नमावे।
सत्कर्म योगे वय घालवावे। सर्वामुखा मंगल बोलवावे॥
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा