मंगळवार, ३ मार्च, २०२६

2614. नि:शस्त्र शौर्य ! अशोक चक्रांकिता !

त्यादिवशीही तिच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. हातात एक लाठी आणि वॉकीटॉकी सेट. तिचं काम होतं भारतीय संसदेच्या प्रवेशद्वार क्रमांक ११ वर लक्ष ठेवणं. कुणी अनधिकृतपणे आतमध्ये प्रवेश करता कामा नये. पण त्यादिवशी त्याच प्रवेशद्वारातून साक्षात मृत्यू आत येण्याच्या प्रयत्नात होता !
    आजपासून बरोबर चोवीस वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस. गुरुवार १३ डिसेंबर,२००१. स्थळ. भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर. लोकसभा इमारत. सकाळचे ११ वाजलेत.
     रोजच्या शिरस्त्याप्रमाणे तिने आज कामावर येण्याआधी गावी असणा-या नव-याशी फोनवरून संवाद साधलेला आहे...”....थंडी खूप आहे...धाकटीच्या अंगावर स्वेटर घालायला विसरू नक!” कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव केंद्रीय राखीव पोलिस दलात (Central Reserve Police Force) मध्ये भरती होऊन सात वर्षे झाली होती. अल्पवयातच लग्न झालेले आणि पदरात दोन मुली. परिस्थितीची गरज म्हणून नोकरी मिळवणे आवश्यक झाले आणि तिने एक वेगळा मार्ग निवडला...पोलिस खात्यात भरती होण्याची संधी आली. १९९४ मध्ये ही दोन पोरींची आई सर्व स्पर्धा पार करीत करीत कॉन्स्टेबल बनली. आरंभी 104, Rapid Action Force मध्ये अलाहाबाद येथे तैनाती झाली. नीडर,शूर असलेली कमलेश कुमारी यादव अल्पवधीत एक उत्तम सुरक्षा रक्षक बनली. भारतीय संसदेची सुरक्षितता सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या ८८,महिला बटालियनमध्ये ब्राव्हो कंपनीत १२ जुलै २००१ रोजी कमलेश कुमारी कर्तव्यावर रुजू झाल्या.....त्यावेळी महिला पोलिसांकडे शस्त्रं दिली जात नसत! भेदक नजर हेच त्यांचं मोठं हत्यार. पंतप्रधान,राष्ट्रपती,उपराष्ट्रपती इत्यादिंसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि इतर शेकडो लोक संसदेत येत-जात असतात....ठरलेल्या नियमावलीचे अचूक पालन करीत,योग्य मानमरातब राखत काम बजवावे लागते...आणि यात कमलेशकुमारी तरबेज होत्या! सहाच महिन्यात कमलेश कुमारी यांनी संसद परिसर,त्यांतील सुरक्षा व्यवस्था,प्रवेशद्वारे यांची उत्तम माहिती करून घेतली. आणिबाणीची परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण मनावर बिंबवून ठेवले! 
     आज ११ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या लोखंडी फाटक क्रमांक १ वर कमलेश तैनात होत्या....चुस्त,तंदुरुस्त...सजग! डी.एल.३ सी जे १५२७ क्रमांकाची पांढरी अॅम्बासीडर कार विजय चौकातून थेट ११ क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून आत आली...वेग सामान्य नव्हता...आणि उद्देशही! कार मध्ये प्रचंड प्रमाणत संहारक शस्त्रे,दारूगोळा भरलेला होता! त्यांची योजना फारच भयावह होती! या कारवर लाल दिवा आणि काचेवर संसदेचे प्रवेश अनुमती स्टीकर होते...पण आज काहीतरी निराळेच होते...इतका वेग,अशा प्रकारचे ड्रायविंग...कमलेश कुमारी यांचे लक्ष होतेच....त्या वेगाने पुढे झाल्या आणि त्या कारसमोर उभ्या राहिल्या....आय.डी.दिखाईये....त्यांनी कारमध्ये बसलेल्या पाच जणांना उद्देशून म्हटले....उत्तरादाखल अकरा गोळ्या...ए.के.४७च्या ११ गोळ्या कमलेश कुमारी यांच्या पोटात, छातीत घुसल्या.....त्या कोसळल्या नाहीत....माघारी फिरल्या....त्यांच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराचा दरवाजा बंद करायला....आणि पलीकडे तैनात असलेल्या शस्रधारी सहका-याला ओरडून इशारा द्यायला.....जवान....अलर्ट...टेररिस्ट अटॅक! कोसळत असताना त्यांनी लोखंडी दार ओढून बंद करून घेतले होते.....पाच मृत्यूदूत ...त्यांना थांबावेच लागले...कमलेश कुमारी यांनी पाच सेकंदांनी त्यांना हरवले होते...तोवर शस्त्रधारी सैनिक सज्ज झाले...गोळीबाराच्या फैरी झडल्या...५ अतिरेक्यांना टिपण्यासाठी ११ जवान आणि एक कर्मचारी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली...या सगळ्यांनी मिळून त्यादिवशी शेकडो प्राण वाचवले होते...किंबहुना एक युद्ध थांबवले होते. देशाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती,देशाचे नेते त्यादिवशी मोठ्या संख्येने तिथे होते...त्यांना काही झाले असते तर मोठा अनवस्था प्रसंग ओढवला असता...त्याची परिणती निश्चित मोठ्या संघर्षात झाली असती. एक मोठा कट एका सामान्य महिलेच्या असामान्य कामगिरीने मध्येच रोखला गेला होता. 
कमलेश कुमारी...बिहार मधल्या एका लहानशा खेड्यात, समस्तीपूर जिल्ह्यातल्या महुआ बघानी गावात जन्मलेली मुलगी. पोटासाठी नोकरी मिळवलेली. पण एकदा वर्दी अंगावर आल्यावर दहा हत्तींचे बळ आलेली दुर्गा. म्हणायची....”अगर वर्दी में मर गयी...तो मेरे बच्चे गर्व कर सकेंगे!”
तिच्या डायरीत तिने लिहून ठेवले होते....”मैं अकेली हुई तो क्या...अगर मैंने एक भी गलत चीज को रोका तो मेरी ड्युटी पूरी होगी...मेरा कर्तव्य पूर्ण होगा!” 
या एकट्या नि:शस्त्र दुर्गेने त्यादिवशी पाच राक्षसांना रोखण्याची कामगिरी करून रण गाजवले होते....देशाने तिला अशोक चक्राने सन्मानित केले! 
कमलेश कुमारी यांचे बलिदान भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांत लिहिले गेले आहे..यात शंका नाही! आजच्या या बलिदान दिनी हुतात्मा कमलेश कुमारी यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली! (माहिती,छायाचित्र आणि संदर्भ इंटरनेटवरून साभार. केवळ सर्व सामान्यांच्या माहितीसाठी प्रसारित. जय हिंद. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...