मंगळवार, ३ मार्च, २०२६

2625. निर्णय

चित्रा नावाप्रमाणेच दिसायला रेखीव होती, सावळीच पण तरतरीत, काळ्याभोर डोळ्यांची ,कोणालाही बघताक्षणीच भुरळ घालणारी !!
    चित्रा एका फायनान्शियल कंपनीत मुख्य अकाऊंटंट  होती आणि कथ्थकनृत्यनिपुण असल्याने एका बॅले ग्रुपमधे हौस म्हणून काम करायची.
   संदीप तिच्या कंपनीचा मॅनेजर होता. अत्यंत हुषार, कर्तृत्ववान, रुबाबदार संदिप म्हणजे मुलींसाठी आकर्षण बिंदू होता.  पण त्याचे मात्र कामाव्यतिरिक्त कुठेही लक्ष नसायचे. कंपनीला एका बड्या क्लायंटची ऑफर होती. ती स्वीकारावी की नाही ह्यावर त्यादिवशीच्या मिटींगमधे जोरदार चर्चा चालू होती.  तेव्हा चित्राने ती कशी फायदेशीर आहे हे इतक्या मुद्देसुदपणे पटवून दिले की सगळ्यांनी तिचे मत उचलून धरले !
    संदीप तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे भारावूनच गेला. इतक्या दिवसात आपले  तिच्याकडे कधीच लक्ष कसे काय गेले नाही ह्याचा त्याला विस्मय वाटला. दिवसेंदिवस तिच्या हुषारीवर तो फिदाच होत गेला. तिच्यावर कधी मन जडले हे त्याचे त्यालाच समजले नाही. पण त्याच्या भावनांशी अनभिज्ञ चित्रा आपल्या कामाशीकाम ठेवून होती.
      १५ ॲागस्टला तिच्या बॅले ग्रुपचा एका अनाथ मुलांच्या संस्थेला मदतीसाठी प्रोग्राम होता. त्याच संस्थेतून मोठा होऊन आता इंडियन आर्मीत मेजर पदावर कार्यरत असणाऱा सुजय कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता. सगळा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. चित्राचा कथ्थक परफाॅर्मन्स तर दृष्ट लागण्या सारखा झाला! तिच्या नृत्यावर प्रेक्षक बेहद्द खूष झाले, सुजयची अवस्थातर love at first sight !!!
       नंतरच्या डिनरच्या कार्यक्रमात त्याने तिचे खूपच कौतुक केले ! दोघांनीही आपापले सेल नंबर शेअर केले आणि परत भेटण्याचा वायदा करून एकमेकांचा निरोप घेतला. नंतरचे दिवस मंतरलेले होते. तीनचार भेटीतच त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. तिच्या लाडक्या माईचा आपल्या मुलीच्या निवडीवर पूर्ण विश्वास होता. लवकरच शुभमुहुर्तावर त्यांचे शुभमंगल पार पडले. आणि मंतरलेल्या फुलपंखी क्षणांचा आनंद घेत घेत वर्ष कसे भुर्कन निघून गेले.   थोड्याच दिवसात सुजयचे पोस्टींग काश्मीर व्हॅलीत  झाले आणि विरहाचे दिवस सुरु झाले! एकेक दिवस एकेक युगासारखा वाटू लागला ! सुजय तिथल्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याच्या मोहिमेत पूर्णपणे बुडून गेला. चित्राला फोन करण्यासाठी सुद्धा त्याला वेळ मिळेना. असेच चार महिने गेले. चित्राला सारखी त्याची आठवण सतावत होती. शेवटी तिने त्याला सरप्राईज द्यायला काश्मीरला जायचे ठरवले. संदिपकडे ह्यासंबंधी बोलण्यासाठी ती आली तेव्हा  त्याची नजर तिच्यावरून हटेचना. लग्नानंतर अजूनच आकर्षक दिसत होती ती! आपल्या मनाला आवर घालत त्याने तिची रजा मंजूर केली.
    दुसऱ्याच दिवशीच्या फ्लाईटने ती काश्मीरला पोहोचली. जेव्हा सुजयने तिला पाहिलं, हर्षातिरेकच व्हायचा राहिला त्याला ! त्यालाही तिची फारच आठवण येत होती पण काय करणार त्याची ड्युटीच तशी होती. तिचे हे सरप्राईज त्याला फारच आवडले. इतक्या दिवसांचा विरह आनंदाश्रूत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी स्पेशल परमिशन घेऊन तो तिला काश्मीर दाखवायला घेऊन गेला.  दललेक, चष्मेशाही, गुलमर्ग, सोनमर्ग आणि एकमेकांचा मदभरा सहवास ! दोघांनाही स्वर्ग दोन बोटे उरला. दोनतीन दिवस कसे गेले कळलंच नाही!
     अचानक  पावसाला सुरवात झाली. असे वातावरण काश्मीरला काही नवे नव्हते. असा पाऊस मधूनमधून यायचाच. पण संततधार काही थांबेना. पाऊस थांबायचे नावच घेईना. काही दिवसातच त्याने रौद्ररूप धारण केले. नद्या भरभरून वाहू लागल्या. आणि बघताबघता प्रलयंकारी परिस्थिती निर्माण झाली. जिकडे तिकडे पुराने हाहा:कार माजवला.   लोकांच्या घरांत पाणी शिरले. माणसे, जनावरे पाण्याच्या ओढीत वाहून जाऊ लागली. लष्कर ह्या परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज झाले. मेजर सुजयची रेस्क्यु ऑपरेशनचा हेड म्हणून नियुक्ती झाली. भयावह परिस्थितीत सुजयने न डगमगता सगळ्यांना विभाग वाटून दिले आणि तहानभूक विसरून सगळे कामाला लागले.
      नदी समुद्रासारखी प्रचंड फुगली होती. ज्या वेगाने पाणी वहात होते त्यातून माणसांना वाचवणे फारच अवघड होत होते. तशात बातमी आली एका दोन मजली घराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढले आहे आणि त्यात एक आजी आणि नात अडकले आहेत. सुजय स्वत:च रेस्क्यु टीम घेऊन निघाला.  लाईफबोट्स आणि लाईफजॅकेट्स बरोबर घेतली होती. वाटेत दोन जण वाहून जात असताना सुजयच्या टिमने त्यांनाही लाईफ जॅकेट्स देऊन बोटीवर घेतले. तिथे गेल्यावर कळाले की त्या मुलीचे आजारी वडील पण तिथे होते. आता एक लाईफजॅकेट कमी पडत होते. मग त्यांच्यासाठी त्याने स्वत:चे लाईफजॅकेट काढून दिले. तो स्वत: उत्तम पोहणारा होता. त्यांनी मोठ्या शिताफीने त्या तिघांनाही लाईफबोटीत घेतले.  तेवढ्यात एक अजस्त्र लाट आली आणि सगळेच पाण्यात पडून वेगाने वाहत जाऊ लागले. सुजय आणि टीम प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते.  तशातच एक तुटलेला लाकडी खांब जोरात वहात आला आणि सुजयच्या डोक्यावर आपटला. त्याप्रहाराने तो बेशुद्ध होऊन वाहून जाऊ लागला, त्याच्याबरोबरीच्या जवानांनी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला. पण लोकांकडे बघावे की सुजयच्या मागे जावे ह्या संभ्रमात असतानाच रोरावणाऱ्या पाण्याबरोबर तो वाहून गेला.  त्याच्या टीमचे त्याला शोधण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले !
      चित्राला ही बातमी कळल्यावर दुःखातिरेकाने ती बेशुद्धच पडली. मिल्ट्री हाॅस्पीटलमधे तिला ॲडमिट करण्यात आले. जरा शुद्ध आली की पुन्हा ती बेशुद्ध पडत होती. असेच आठ दिवस गेले. तिच्या परिस्थितीत काही फरक पडेना. इकडे संदिपला बातमी समजली तेव्हा त्याने आधी माईंना धीर दिला आणि तातडीने तिला घेऊन येण्यासाठी रवाना झाला. तिला आणल्यावर त्याने लगेचच पुण्याच्या एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमधे तिला ॲडमिट केले. माई तर तिची अवस्था बघून घाबरून गेल्या होत्या. पण तिथल्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे काही महिन्यांत ती बऱ्यापैकी सावरली. संदीप आणि ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांच्या  सततच्या आग्रहाखातर ऑफिसात पुन्हा जाॅईन झाली.  पण पहिल्यासारखे काम तिला जमेचना. असेच सहा महिने गेले. एक दिवस संदिप घरी आला आणि माईंसमोरच त्याने तिला मागणी घातली! चित्राने असा विचार कधीच केला नव्हता. ती एकदम बावरूनच गेली. तर माई आनंदातिशयाने रडू लागल्या.    
      चित्राने रात्रभर विचार केला व दुसऱ्यादिवशी शांतचित्ताने आपले राजीनामा पत्र संदिपकडे  सादर केले.  नाराज होत तो तिला समजावू लागला. जरी विवाहाचा प्रस्ताव मंजूर नसेल तरी नोकरी सोडण्याची गरज नसल्याचे परोपरीने सांगू लागला. ती संदिपला म्हणाली, "सॉरी, सुजयला मी कधीच विसरू शकणार नाही. मी गेले सहा महिने विचार करत होते. मी एक निर्णय घेतला आहे.  आता त्याचे अर्धवट राहिलेले काम मी पूर्ण करणार आहे.  त्याला श्रद्धांजली म्हणून मीपण आता मिल्ट्री जाॅईन करणार आहे.  मी सगळी माहिती काढली आहे.  मी मिल्ट्रीच्या entrance exam ची तयारी करवून घेणाऱ्या मेजर साळवींच्या ॲकॅडमीत प्रवेश घ्यायला जाणार आहे.”  तिच्या निश्चयाने फुललेल्या तेजस्वी चेहऱ्याकडे तो पहातच राहिला आणि त्याने तिला एकदम कडक सलाम ठोकला ! त्याच्या ह्याकृतीने वातावरण एकदम निवळले. दोघेही हसू लागले.  
      माई तिच्याकडे अभिमानाने पहात होत्या. त्या रात्री कितीतरी दिवसांनी माईच्या कुशीत तिला शांत झोप लागली. नंतरच्या दिवसाची प्रसन्न पहाट तिच्या निर्णयाचे स्वागत करतच उजाडली. झुंजुमुंजू झालं. रातराणीच्या सुगंधाचा दरवळ कमी होताच प्राजक्ताने पखरण केली. कळ्या उमलू लागल्या.चित्राने प्रसन्न चित्ताने नवीन आयुष्याचे स्वागत करण्यासाठी हात जोडले.

सौ. रेवती कुलकर्णी , बेंगळुरू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...