शुभंकर पहिल्यापासूनच खूप अभ्यासू होता. खूप शिकून तो सॅनफ्रान्सिस्को मधे गुगल सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत कामाला लागला. पाच वर्षं काम केलं. भरपूर पैसा मिळवला! पण सतत कामाचा ताण व रॅट रेस मध्ये धावत रहाणं यामुळे बर्नआऊट म्हणजे काय हे तो रोज अनुभवत होता आणि..एक दिवस कंपनीमध्ये चक्क राजीनामा देऊन तो घरी आला..
त्याची पत्नी, मंजू, त्याच्याकडे रागाने व आश्चर्याने बघत राहिली. असं कुणी गुगल मधली उत्तम नोकरी सोडतं का आणि याला हुशार, शहाणा म्हणायचं? तिनं चहाचे दोन कप आणले व सरळ विषयाला हात घातला..शुभंकर, नोकरी सोडण्यापूर्वी एकदा सांगायचंस तरी मला !”
शुभंकर कागदावर कसलीशी आकडेमोड करत बसला होता.
“मंजू, आपण जग बघावं असं मला वाटतं. हे बघ..एवढे पैसे गुंतवून उरलेले पैसे वापरून हिंडू..फिरू..आयुष्याचा अर्थ शोधू. आपल्या अस्तित्वाचं कारण शोधू! सहा महिने-वर्ष तरी जग बघू. वाटलं तर नंतर परत येऊन दुसरी नोकरी शोधू.”
“अरे, डोंबलाचं अस्तित्व!! दारात ती तुझी महागाची गाडी दिसतेय ना..तिचं पेमेंट कसं करायचं, घराचं पेमेंट याचा आधी विचार कर. बेबी हवी आहे ना आपल्याला! आता चौतीसावं लागलंय मला..मी माझी नोकरी सोडून देणार नाही..मुलं, बाळ, घरं, नोकरी हेच माझं अस्तित्व आहे!” मंजूचा चेहरा लाल होत चालला होता.
शुभंकर हिरमुसला..काही वर्षं काम करून थोडा पैसा गाठीशी जमला की जग बघावं या विचाराची लाट तरूण पिढी मध्ये सर्वत्र आली आहे हे त्याला माहित होतं. त्याला ते पटतही होतं. कामावरच्या डेडलाईन्सच्या बंधनातून बाहेर पडून आपण काही वेगळं करून बघावसं वाटत होतं.. जवळच्या पर्वतरांगा, हिरवी पठारं बोलावत होती. नायगाऱ्याच्या धीरगंभीर आवाजात ओंकार सापडत होता.. त्यानं मंजूला सांगितलं की तो जग बघणार आहे! हात पाय धड असताना, डोकं शाबूत असताना..
“तू येणार नसशील तर मला परवानगी दे” यावर मंजू हवं ते कर म्हणून रागावून झोपायला गेली..
दुसरे दिवशी मंजू कामाला गेल्यावर त्यानं घर आवरलं. दारात उभी असलेली मर्सिडीज विकून एक स्वस्तातील गाडी विकत घेतली. पुढील सहा सात महिन्यांची घराची पेमेंट केली. मंजूच्या आवडीचा फ्लॅावर-कांदा-बटाटा रस्सा केला.. पुलाव केला. “आय विल मिस यु मंजू..बट धिस इज माय कॅालिंग.. थॅंक्यु फॅार अंडरस्टॅंडिंग! अशी नोट लिहून ठेवली व मोजके सामान घेऊन तो घरातून बाहेर पडला.
गुगल मधील रोजच्या बारा-पंधरा तासाच्या कामानं शिणून गेलेले त्याचं मन ॲरिझोना मधील ३०० मैल लांबीच्या ग्रॅंड केनियन मधे शांत होऊ लागलं. ना मोबाईल, ना ईमेल, ना डेडलाईन्स ची टांगती तलवार! असं आयुष्य तो कधी जगलाच नव्हता. निसर्ग रोज नवे धडे देत होता. रानातील फळं, भाज्या गोळा करून साधे अन्न आपले आपण शिजवून खाल्याने शरीर दुवा देत होतं. अंगभर व्यायाम होत होता. त्यानंतर तो चायना ला गेला. द ग्रेट वॅाल ॲाफ चायना बघून हिमालयात गंगोत्री जवळ काही आठवडे एकट्याने घालवले. आठ महिने बाहेर राहून त्यानं घरी परतण्याचे ठरवले..
सॅनफ्रान्सिस्कोला परत येताच ह्रदयातील धडधड वाढली होती. मंजू बोललीच नाही तर? आठ ते आठ नोकरी करणार नाही हे मंजूला कसं सांगायचं या विचारात तो घरी पोचला.. गेल्या आठ महिन्यात इंन्स्टावर, टिकटॅाक वर त्याच्या दैनंदिनीचे अनेक विडिओ त्यानं टाकले होते..त्याला लाखो चाहते मिळाले होते. त्याचे विडिओ पहात होते. त्याला सल्ले विचारत होते. पैसा मिळत होता..
चाकोरीबाहेर जाऊन काही करावं हा विचार तरूण मनांमधे पक्का रूजला होता..
घर बघून त्याला बरं वाटलं..ते जसं होतं तसचं दिसत होतं. अंगणातील गुलाब तसाच बहरला होता.. दारात एकच गाडी होती.. मंजूची. त्याला हायसं वाटलं.. तो गाडीतून उतरणार तेवढ्यात मंजू बाहेर येऊन झाडाला पाणी घालताना दिसली. त्याला धक्का बसला.. तिचं पोट चांगलचं दिसत होतं.. नऊ महिन्याच्या गरोदर बाईचं.. धडधडणाऱ्या छातीनं तो गाडीतून उतरला. वाढलेली दाढी व रापलेल्या चेहऱ्यामागील शुभंकर त्याच्या आवाजावरून मंजूने ओळखला.. ती क्षणभर स्तब्ध झाली पण पुढच्या क्षणी तिनं पुढे होऊन त्याला मिठी मारली..
“शुभंकर.. शुभंकार, तू परत आलास! मला वाटतच होतं की तू परत येशील.. तू बाहेर पडलास व दहा दिवसातच माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॅाझिटिव आली. मी तुला तू समक्ष भेटलास तरच सांगायचं ठरवलं होतं. तू नव्हतास पण माझ्या आतील या लहानशा जीवानं मला आधार दिला.. माझ्यामधे आपण निर्माण केलेलं अस्तित्व बघत तुला तुझ्या अस्तित्वाचा खरा अर्थ कुठेही न जाता समजू लागेल याची मला खात्री होती पण तुला जे करायचं आहे ते करू द्यावं असं वाटलं.. तू तुझं अस्तित्व बाहेर शोधत होतास व मी माझं आत..या बाळात” ती गप्प झाली..
शुभंकरनं तिला जवळ घेतलं..”थॅंक्यु मंजू.. मी पर्वत, दऱ्या, धबधबे, जंगलं, झरे यात मला शोधत राहिलो..तुझ्या आठवणीने अस्वस्थ झालो.. बाली मधे एक वृध्द गृहस्थ भेटले.. ते म्हणाले.. तू स्वामी विवेकानंद वाचले नाहीस का? आपली कर्तव्य सोडून जो स्वत:चा शोध घेण्यासाठी हिमालयात जातो तेव्हा तो माणूस रस्ता चुकलेला असतो.. ठीक आहे काही महिने हिंडणं, फिरणं.. पण गृहस्थाश्रमात गेल्यावर तुझं कर्तव्य तू केलच पाहिजे.. नाहीतर याला स्वामीजी पळवाट म्हणतात!”
तो विचारात गुंतलेला असताना मंजूच्या पोटात दुखू लागलं.. नववा सुरू होता.. तो घाबरून गेला. तातडीनं तिला घेऊन हॅास्पिटलला गेला. डॅाक्टरनी तिला ॲडमिट केलं. अंधाऱ्या खोलीतील अल्ट्रासाऊंडच्या स्क्रीनवर तो छोटासा जीव दिसत होता..
धडधडणारा, हलणारा, जिवंत. चोवीस तासांनी त्या जीवानं या जगात प्रवेश केला! ते गोजिरवाणं रूप बघून दोघांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते..
डॉक्टरनी त्यांच्या खांद्यावर थोपटले!”Congratulations,
your baby girl is perfectly healthy.” शुभंकरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्याने बाळाला हातात घेतलं..
जगातल्या सर्व पर्वतांपेक्षा उंच..
सर्व महासागरांपेक्षा खोल..
सर्व प्रवासांपेक्षा अर्थपूर्ण..
सर्व शास्त्रांहून गहन असणारा मनुष्य जन्म..
एक उत्तम, सुज्ञ, गुणी व्यक्ती तयार करून जगाचं भलं कसं होईल यासाठी प्रयत्न करणं हा आपल्या अस्तित्वाचा अर्थ आहे.. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला..
बाळानं पकडलेलं त्याचं बोट..मंजूचा दमलेला, शांत चेहरा, त्या जीवांच्या दर्शनाने निर्माण झालेले भाव..हे सारं बघण्यास आपण मुकलो असतो..
गंगोत्री जवळील साधूचं वाक्य..”जीवन का अर्थ हर एक के लिए अलग है।”आठवत होतं.. बाली मधील वृध्द गृहस्थांनी सांगितलेला विवेकानंदांच्या वाक्याचा अर्थ समजत होता..
“आपली कर्तव्यं सोडून हिमालयात जीवनाचा अर्थ शोधायला गेलात तर you have lost your way!”
त्यानं मंजूच्या कपाळावरून हात फिरवला..मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मंजू.. हे आश्वासन दिलं.. त्याच्या भ्रमंती साठी जमलेल्या लाखो चहात्यांना बाळाच्या आगमनाची माहिती द्यायची होती.. “अस्तित्व” या त्यानं लिहायला घेतलेल्या पुस्तकातील महत्वाचा टप्पा समोर आला होता..
हातातल्या बाळाला त्यानं जवळ घेतलं.. तिच्या कपाळावर ओठ टेकवले..
त्या निरागस स्पर्शात त्याला त्याच्या अस्तित्वाचा अर्थ पूर्णपणे
कळला होता..
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
सध्या तरूण पिढीमधे पैसा जमवून, नोकरी सोडून जग बघायला बाहेर पडणं, निसर्गाच्या सानिध्यात रहाणं या विचारांची लाट आली आहे. त्यात चूक काही नाही.. अशा सर्व तरुणांना ही गोष्ट अर्पण करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा