काही गोष्टीना चुकीची सुरुवात होते, तशी विनित आणि मंजूच्या गोष्टीला झाली. मंजूचं विनितवर प्रेम नव्हतंच, तिला आवडायचा तो कौशल वाडेकर. कुरळ्या केसांचा, आडव्या खांद्याचा, काळासावळा असला तरी लक्ष वेधून घेणारा काहीसा अबोल, तसा तुसड्याच.
विनित याच्या अगदी विरुद्ध. देखणा, नाजूक चणीचा सॉफ्ट स्पोकन; तरी दोघांची जानी दोस्ती होती. अजूनही आहे.
मंजूनं कौशलचं लक्ष वेधून घ्यायचा खूप प्रयत्न केला. पण छे! ‘दुनिया है मेरे पिछे, लेकीन मैं तेरे पिछे’ अशी मंजूची गत झाली.
मंजू साधी आसामी नव्हती. दिसायला रेखीव, सुंदर तर होतीच; पण गडगंज श्रीमंत घराण्यातली होती. वडील हयात नव्हते; पण आईनं अतिशय दक्षतेनं त्यांचा व्यवसाय सांभाळला होता.
नाकारण्यासारखं मंजूत काही म्हणजे काहीच नव्हतं…पण का कोण जाणे, कौशलचं तिच्याकडे लक्षच जाईना; म्हणून त्याला जळवायला तिनं विनितचा एक मोहरा म्हणून उपयोग केला. तिनं विनितशी दोस्ती वाढवली. इतकी की, विनित तिच्यावर मानसिकरित्या अवलंबून राहायला लागला.
त्याचा फायदा असा झाला की, तिला जास्तीत जास्त कौशलसमोर वावरता यायचं. मग कौशलला काय आवडतं, काय नाही, त्याच्या अपेक्षा काय, त्याला कशानं राग येतो, कशानं तो सुखावतो याचा तिनं अभ्यास सुरू केला.
पण हेच तिला महागात पडलं… कारण कौशल तिचा डाव ओळखून होता. त्यानं तिला तशी इनडायरेक्टली कल्पनाही दिली होती.
विनितचा प्रश्नच नव्हता. तो मंजू आपल्यासोबत आहे, यातच खुश होता. मंजूच्या मनात काय चाललंय याची कौशल सोडला, तर कुणालाच कल्पना नव्हती. पण मंजू हल्ली सारखी विनितसोबत असते, हे मात्र लोकांनी ऑब्झर्व केलं होतं, करत होते.
तिच्या आईचही लक्ष होतच की! आणि आईलाही विनितसारखा सज्जन समजुतदार मुलगा जावई म्हणून पसंत होताच. म्हणून आईनंही विनितच्या घरच्यांशी संबंध वाढवले. विनितकडे तर मंजू हीच घरची सून, हे नक्की ठरलं होतं.
विनित म्हणाला, “पण आमच्यात अजून बोलणं झालेलं नाही.”
पण तोही योग आला. कौशलनं रजनीला– त्याच्या बालमैत्रिणीला त्याची भावी पत्नी म्हणून समोर आणल्यावर मंजूचा नाईलाज झाला आणि हा घाव तिच्या जिव्हारी लागला. ती कौशलला भेटली; पण तो खांदे उडवत म्हणाला,
“मला, तुला सफाई द्यायची काहीच गरज नाही. मी कधीही तुला रिस्पॉंस दिलेला नाही. मी कधीही तुझ्या वागण्याला प्रोत्साहन दिलेलं नाही… आणि रजनीचं आणि माझं लहानपणीच जमलं होतं. इतक्यात ओपन करायचं नाही, असा तिचा आग्रह होता. आता तिनं परमिशन दिल्यावर मी हे सांगितलं इतकंच…”
तो पुढंही खूप बोलला. म्हणाला, “मला माहितीये, तुझं विनूवर अजिबात प्रेम नाही. अजूनही वेळ गेलेली नाही; त्याच्या आयुष्यातून बाजुला हो… त्याचा गिनिपिग करू नकोस. उद्या माझंं रजनीशी नाही झालं, तरी मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही… पण हट्टाला पेटून तू विनूची जिंदगी खराब करू नकोस. असं झालं तर मी तुला कधीच क्षमा करणार नाही.”
कौशलच्या लग्नाची तारीख ठरली आणि मंजूला त्याच्या आधी लग्न उरकण्याची घाई झाली. ऐनवेळी दुसरा मुलगा शोधण्यापेक्षा तिला विनितच बरा वाटला.
…आणि तिनंच लग्नाचा प्रस्ताव ठेवून लग्न उरकलं सुद्धा! आणि विनितशी लग्न करून ती कौशलचा आदर्श संसार करायला लागली…
कौशलला आवडतात तसे खिडक्याना डाळींबी पडदे आले. कौशलला आवडतो म्हणून ती घरात फक्त सफेद पेहेराव करायला लागली. टेबलावर मुरांब्याच्या लोणच्याच्या छोट्या बरण्या दिसायला लागल्या…
विनितच्या घरचे काय सुनेच्या या गोष्टीवर खुशच होते. ‘करतेय ना हौसेनं, तर करू देत…’ असाच त्यांचा सूर होता. विनितचा तर प्रश्नच नव्हता.
त्याच दरम्यान कौशलचही लग्न झालं. रजनी स्वतंत्र विचारांची समंजस मुलगी होती. हिच्यासारखं तिला आपलं प्रेम सिद्ध करायची गरज नव्हती. ती तिच्या मतानं संसारात रमली.
मुळात तिला तिच क्षेत्र होतं, कामं होती… आणि तिचं आपल्या नवर्यावर फार फार प्रेम सुद्धा होतं. त्यापायीच दोघांच्यात खटके उडायचे, जे नार्मल जोडप्याचं लक्षण होतं.
इथं मंजू विनितला पटवून देत होती, “बघ, आपण किती सुखी… आपल्यात कधीच तू-तू, मैं-मैं होत नाही.”
जेव्हा रजनीचे कौशलच्या आई-बहिणींशी खटके उडायला लागले तेंव्हाच मंजूला विनितच्या बहिणी-भाचरांबद्दल अतोनात प्रेम दाटून आलं. मग माहेरवाशिणींचे लाड काय विचारता? ‘रजनीनं असं केलं? मग मी असं करेन…’ हा गोफ असाच विणला जात होता.
विनित कधी आम्हाला भेटला, तर जाणवायचं आम्हाला- तो अंतर्बाह्य सुखावलेला माणूस दिसायचा. कुणाच्या हक्काचं सुख याला मिळत होतं, हे त्याला ठाऊक नव्हतं.
रजनीनं इतक्यात आई व्हायला नकार दिल्यावर मंजूनं लगेच त्या दृष्टीने विचार केला… देवानंही ऐकलं आणि तिला तिच्यासारखी सुंदर आणि विनितसारखी सोज्वळ मुलगी झाली.
पूर्वी बोलताना कौशल म्हणाला होता, “पहिली मुलगीच हवी… आणि तिचं नाव मी यशोदा ठेवणार.”
मग काय, मंजू-विनितच्या मुलीला यशोदा नाव मिळालं. म्हणजे दुसरा मुलगा चार वर्षानी झाला तर त्याला नक्कीच ‘शुभांकर’ नाव मिळणार, हे गृहीतच धरायला हवं.
दोन दरडींवर पाय ठेवणं धोक्याचं मानलं जातं, पण इथं हा धोकाच मंजूच्या आयुष्याचा ध्यास बनला. ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असा खेळ चालू होता.
रजनीमुळं कौशल स्वामी विवेकानंदाच्या कार्याकडे ओढला गेला; मग मंजूलाही त्यात रस वाटणं आलंच !
आणि सध्या ती त्या संदर्भात कुठलातरी सेमिनार अटेंड करायला कन्याकुमारीला गेलीय. विनितकडे तिचं खूप कौतुक चाललंय.
विनित आम्हाला भेटला, तेव्हा सांगत होता, “मंजूचं सगळं सिस्टिमेटीक असतं. तिचा जराही गोंधळ उडत नाही. ती सगळ्याच प्लानिंग करते आणि त्याप्रमाणं वागते.”
आम्ही ऐकत होतो शांतपणे. त्याच्या निरागस साध्या वाक्यांचा संदर्भासहीत विचार केला, तर तो किती दाहक होता, याचा अंदाज फक्त आम्हालाच होता. कल्पना करूनही थरकाप उडत होता…
आपल्या घरी आपल्यासोबत राहून आपली बायको संसाराचा खेळ दुसर्याला गृहीत धरून खेळतेय, हे जेव्हा या निष्पाप माणसाला कळेल, तेव्हा त्याचं काय होईल?
त्याच्या तोंडाची काय आयुष्याची चव जाईल. त्याचा कशावरच विश्वास उरणार नाही. तो काही सिद्ध करू शकणार नाही… ना कुणाला जाब विचारू शकणार. तो फक्त जगत राहील!
प्रतारणा काय फक्त शारीरिकच नसते… मनानं सुद्धा बरीच सुखं अनुभवता येतात. पण विनित सुखी व्हायलाच या जगात आला होता. गोष्टीची चुकीची सुरुवात त्याच्या पथ्यावरच पडली होती… फक्त ‘हे पथ्य असंच सुरू राहू दे’, इतकीच त्या भगवंताजवळ प्रार्थना!
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा